“आम्हाला दोनच कामं येतात – नाव वल्हवायची आणि मासे धरायचे. पिढ्यान् पिढ्या. आणि सध्याची रोजगाराची स्थिती पाहता माझ्या पोरांनाही हेच काम पुढे चालू ठेवावं लागणार असं वाटायला लागलंय,” विक्रमादित्य निषाद सांगतात. गेली २० वर्षं ते भाविक आणि पर्यटकांना गंगेच्या या घाटावरून त्या घाटावर नावांमधून फिरवून आणतायत.

ज्या उत्तर प्रदेशात गंगा नदी तब्बल १००० किलोमीटर अंतर वाहत जाते तिथे रोजगार मात्र गेली पाच वर्षं ५० टक्क्यांवरून तसूभरही पुढे गेलेला नाही असं २०२४ चा भारतातील रोजगार अहवाल सांगतो.

“मोदी जी ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘विरासत ही विकास’ हा नारा देतात. ही विरासत म्हणजे नक्की कोण आहे ते जरा मला सांगा बरं. आम्ही काशीचे लोक का कुणी बाहेरचे?” ते विचारतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून खासदार म्हणून निवडून आले आहेत. पण त्यांचा निवडणूक प्रचार फार कुणाला आवडला नव्हता असं नावाडी असलेले निषाद म्हणतात. “आता आम्हाला खरंच विकास पहायचाय.”

बघाः वाराणसीचा नावाडी

ही विरासत नक्की कोणासाठी आहे ते जरा मला सांगा बरं. आम्हा काशीच्या लोकांसाठी का कुणा बाहेरच्यांसाठी?” नावाडी असलेले विक्रमादित्य निषाद विचारतात

निशाद म्हणतात की २०२३ साली मोदींनी सुरू केलेल्या रिव्हर क्रूझमुळे त्यांच्यासारख्या अनेकांच्या पोटावर पाय आलाय. “विकासाच्या नावाखाली ते स्थानिकांकडून विकास आणि विरासत हिरावून घेतायत आणि बाहेरच्या लोकांच्या घशात घालतायत,” ते म्हणतात. मोठमोठाल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे इथे आलेल्या परप्रांतीयांविषयी ते बोलतात. इथल्या स्थानिक कामगाराला मात्र महिन्याला १०,००० हून थोडीच जास्त कमाई होतीये. आणि भारतातल्या सर्व राज्यांच्या तुलनेत ही कमी आहे.

हिंदू धर्मामध्ये गंगाजलाला फार महत्त्व आहे. त्यामुळे गंगेचं प्रदूषण हाही मोठा वादाचा विषय झाला आहे. ४० वर्षीय निषाद त्यावरूनही नाराज आहेत. “त्यांचं म्हणणं आहे की गंगेचं पाणी आता स्वच्छ झालंय. खरं सांगू, पूर्वी आम्ही नदीत नाणं टाकलं तर सहज तळाला दिसायचं आणि बाहेर काढता यायचं. आणि आता? गंगेत अख्खा माणूस बुडाला तरी त्याला शोधायला दिवसचे दिवस लागतात,” ते म्हणतात.

PHOTO • Jigyasa Mishra
PHOTO • Jigyasa Mishra

डावीकडेः पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या क्रूझ बोटींपेकी अलकनंदा काठावर उभी आहे. उजवीकडेः गंगेची प्रार्थना करणारे भाविक

PHOTO • Jigyasa Mishra
PHOTO • Jigyasa Mishra

हिंदूंसाठी गंगा पवित्र असली तरी वर्षानुवर्षं नदीची प्रदूषण पातळी वाढत चालली आहे. अस्सी घाटापाशी (उजवीकडे) गंगेत मिसळणारं मैलायुक्त पाणी

२०१४ साली जून महिन्यात केंद्र सरकारने नमामि गंगे या प्रकल्पाची घोषणा केली. प्रदूषण कमी करणे, नदी संवर्धन आणि पुनरुज्जीवन अशा कामांसाठी सुमारे २०,००० कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र २०१७ साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधानुसार, गंगेचा उगम होतो त्या ऋषीकेशमध्ये आणि तिथून शेकडो किमी अंतरावर वाराणसीमध्ये गंगेच्या पाण्याची गुणवत्ता वाईट आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रसिद्ध केलेले पाण्याच्या गुणवत्तेचे आकडे ‘धोकादायक’ आहेत.

“ही क्रूझ वाराणसीची ‘विरासत’ कशी काय होऊ शकते? वाराणसीची खरी ओळख म्हणजे आमच्या या नावा,” नावेत बसून ते पर्यटकांची वाट पाहत असलेले निषाद पारीला सांगतात. “किती तरी जुनी मंदिरं पाडून विश्वनाथ कॉरिडॉर तयार केलाय. पूर्वी भाविक यायचे आणि सांगायचे बाबा विश्वनाथाचं दर्शन घ्यायचंय. आजकाल म्हणतात, ‘कॉरिडॉर’ला जायचंय,” उद्विग्न आवाजात निषाद म्हणतात. त्यांच्यासारख्या काशीच्या रहिवाशावर थोपवण्यात आलेले सांस्कृतिक बदल किती वेदनादायी आहेत हे त्यांच्या आवाजातून जाणवत राहतं.

Jigyasa Mishra

ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಚಿತ್ರಕೂಟ ಮೂಲದ ಜಿಗ್ಯಾಸ ಮಿಶ್ರಾ ಸ್ವತಂತ್ರ ಪತ್ರಕರ್ತೆಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಾರೆ.

Other stories by Jigyasa Mishra
Editor : PARI Desk

ಪರಿ ಡೆಸ್ಕ್ ನಮ್ಮ ಸಂಪಾದಕೀಯ ಕೆಲಸಗಳ ಕೇಂದ್ರಸ್ಥಾನ. ಈ ತಂಡವು ದೇಶಾದ್ಯಂತ ಹರಡಿಕೊಂಡಿರುವ ನಮ್ಮ ವರದಿಗಾರರು, ಸಂಶೋಧಕರು, ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರು, ಚಲನಚಿತ್ರ ನಿರ್ಮಾಪಕರು ಮತ್ತು ಭಾಷಾಂತರಕಾರರೊಂದಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತದೆ. ಪರಿ ಪ್ರಕಟಿಸುವ ಪಠ್ಯ, ವಿಡಿಯೋ, ಆಡಿಯೋ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ವರದಿಗಳ ತಯಾರಿಕೆ ಮತ್ತು ಪ್ರಕಟಣೆಯಗೆ ಡೆಸ್ಕ್ ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತದೆ ಮತ್ತು ಅವುಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತದೆ.

Other stories by PARI Desk
Translator : Medha Kale

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale