७ डिसेंबर २०२३. गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहारात रेफात अलरीर मारला गेला. कोण होता तो? पॅलेस्टाइनमधला आमच्यासारखाच एक अनुवादक, लेखक, अभ्यासक, स्तंभलेखक आणि कार्यकर्ता. पण, ज्या दिवशी तो मरण पावला, त्याच दिवशी त्याने लिहिलेल्या शेवटच्या कवितांपैकी एक कविता जगभरात किमान १०-१२ भाषांमध्ये अनुवादित झाली आणि कित्येकांपर्यंत पोचली.

या अशा जगात आणि काळाच्या अशा टप्प्यावर आम्ही भाषांविषयी पारीवर करत असलेल्या कामाचा मागोवा घेत आहोत. रेफात अलरीर यांचे हे शब्द आज आठवतायतः

आज आमचा संघर्ष मुखर करण्यासाठी आणि आमच्यावरचा हल्ला परतवून लावण्यासाठी आमच्याकडे केवळ आमची भाषा आहे. स्वतःला आणि इतरांना अनेक गोष्टी समजावून सांगण्यासाठी आज आमचे शब्द हेच मोठं धन आहेत आणि तेच आम्हाला वापरायचे आहेत. आणि हे शब्द शक्य तितक्या जास्त भाषांमध्ये आम्हाला न्यायचे आहेत. जितक्या जास्त लोकांच्या मनाला आणि हृदयाला भिडेल अशा भाषेवर माझा विश्वास आहे...मानवतेच्या भल्यासाठी घडलेली सर्वात उत्तम गोष्ट कोणती तर अनुवाद. आपसांतले अडथळे दूर करून एकमेकांमध्ये पूल बांधण्याचं, आपसांतली समज वाढवण्याचं काम अनुवादाने होतं. अर्थात “वाईट” अनुवादांमुळे गैरसमज होऊ शकतात हेही तितकंच खरं आहे.

अनुवादामध्ये लोकांना जोडण्याची, नवी समज तयार करण्याची असलेली ताकद हाच पारीभाषाच्या कामाचा गाभा आहे.

आणि त्या अर्थी २०२३ हे आमच्यासाठी उल्लेखनीय वर्ष ठरलं आहे.

या वर्षी छत्तीसगडी आणि भोजपुरी या दोन भाषांमध्ये आम्ही अनुवादाचं काम सुरू केलं. आता पारीवरचा मजकूर १४ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होतो.

याच वर्षी आम्हाला आमचं नाव मिळालं – पारीभाषा! आमच्या कामाचा आवाका 'इंग्रजीचा इतर भाषांमध्ये अनुवाद' यापलिकडे आहे. पारी खऱ्या अर्थाने बहुभाषी आणि ग्रामीण पत्रकारितेचा अस्सल आवाज असेल ही आमची भूमिका या नावातून स्पष्ट होते.

या देशातल्या साध्यासुध्या माणसांच्या आयुष्यात भाषांचं, बोलीचं महत्त्व काय आहे याचा वेध घेण्याचं काम आम्ही सातत्याने करत आहोत. भाषा आणि अनुवाद या विषयांभोवती गुंफलेल्या वार्तांकन आणि चर्चांमधून आम्ही याविषयी पारीची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.

पारीभाषाचं काम आकड्यांमध्ये

पारीमध्ये काम करत असलेल्या विविध गटांसोबत सुसंवाद आणि कामाच्या प्रभावी पद्धतींचा अवलंब केल्याने आमचे अनुवाद अधिकाधिक अचूक आणि योग्य होण्याच्या दिशेने आम्ही बरीच प्रगती करू शकलो आहोत. पारीवर प्रकाशित होणारा मजकूर वाढत जात असतानाही जर आठवड्याला भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणाऱ्या अनुवादांची संख्या या वर्षी सर्वाधिक होती. भारतीय भाषांमधले, लोकांनी वापरलेले शब्द, नावं इत्यादींचे उच्चार कळावेत म्हणून त्यांचं रेकॉर्डिंग, फोटोंखालचा मजकूर अचूक व्हावा यासाठी फोटोंसह फाइल अनुवादकांकडे पाठवणे अशा सगळ्या गोष्टी अचूक अनुवादांसाठी आवश्यक होत्या. त्यातून भाषांचा वापर किती विविध पद्धतीने केला जातो तेही अनुवादांमध्ये प्रतिबिंबित होऊ शकलं. जिथली गोष्ट आपण सांगतोय, तिथून फार दूर आपापल्या मेजांपुढे बसून भाषांतर करत असताना, एका भाषेतून दुसऱ्या भाषेत एखादा मजकूर आणत असताना त्यामधलं हे इतकं सारं अंतर कमी कसं करता येईल यावर आम्ही भर देत आहोत.

आणि हे केवळ भारतीय भाषांमध्ये होत असणाऱ्या अनुवादांपुरतं मर्यादित नाही. लोकांचं बोलणं आणि भाषा इंग्रजीत कशी अचूक व्यक्त होईल याकडेही आम्ही लक्ष देत आहोत. एखाद्या फिल्मची सबटायटल्स किंवा वार्तांकनात लोकांना वापरलेले शब्द, त्यांच्या भाषेतली उद्धरणं योग्य पद्धतीने अनुवादित व्हावीत यासाठीही आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत. यामुळे लोकांची बोली, भाषा, शब्दांचा खास वापर त्यातलं अनोखेपण इंग्रजीतही वाचकांपर्यंत पोचतं.

वेळेत आणि उत्तम अनुवाद, जिथली गोष्ट असेल त्या भाषेला प्राधान्य आणि इंग्रजी सोडून इतर भाषांमध्ये डिजिटल मजकूर वाचण्याकडे वाढलेला कल या सगळ्याचा परिणाम म्हणजे आम्ही प्रकाशित करत असलेल्या अनुवादांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तितकंच नाही त्याचा प्रत्यक्षात परिणामही पहायला मिळत आहे.

उदाहरणार्थ, विड्या वळता वळता वठलं आयुष्य आणि आरोग्य या स्मिता खटोर हिने लिहिलेल्या कहाणीची बंगाली आवृत्ती ঔদাসীন্যের ধোঁয়াশায় মহিলা বিড়ি শ্রমিকদের স্বাস্থ্য खूप लोकांपर्यंत पोचली, वाचली गेली. संघटनांनी त्यातील परिस्थिती मांडली आणि पुढे जाऊन विडी कामगारांच्या मजुरीमध्ये वाढ झाली. तसंच In Jaisalmer: gone with the windmills या प्रीती डेव्हिडने लिहिलेल्या आणि ऊर्जाची फिल्म असलेल्या कहाणीची प्रभात मिलिंद यांनी अनुवादित केलेली हिंदी आवृत्ती जैसलमेर : पवनचक्कियों की बलि चढ़ते ओरण स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर वाचली. तिच्या आधारे लोक संघटित झाले आणि परिणामी राज्य सरकारने पडीक जागा म्हणून दाखवलेली जमीन देगरायमधल्या देवराईला परत केली. अशी अनेक उदाहरणं देता येतील.

अनुवाद आणि भाषाविषयक कामांसाठी जगभरात कृत्रिम बुद्धीमत्तेचा अधिकाधिक वापर होत असताना त्याविरोधात ठामपणे उभं राहत पारी मात्र पारीभाषाच्या कामामध्ये विविध पातळीवर जास्तीत जास्त लोकांना सामावून घेत आहे. २०२३ साली पारीभाषाच्या कामामध्ये विविध सामाजिक स्तरातले, विविध प्रांतातले लोक मोठ्या संख्येने सामील झाले

पारीवर प्रकाशिक होणारे अनुवाद अनेक ग्रामीण वार्तापत्रं आणि मासिकं पुनःप्रकाशित करतात. भूमिका, मातृका, गणशक्ती, देश हितैशा, प्रजावाणी आणि इतर काही. जानेवारी २०२३ मध्ये मिळून साऱ्याजणी या स्त्रियांच्या प्रश्नांना वाहिलेल्या मराठी मासिकामध्ये पारीविषयी माहितीपर एक लेख छापून आला आणि आगामी काळात स्त्रियांसंबंधीच्या कहाण्यांचे मराठी अनुवाद या मासिकामार्फत वाचकांपर्यंत पोचवण्याचा विचार सुरू आहे.

संवेदनशील आणि सातत्यपूर्ण अनुवादांमुळे पारीभाषाने अनुवादांच्या जगात स्वतःची एक जागा तयार केली आहे. विविध भारतीय भाषांमध्ये काम कसं उभं करता येतं यासंबंधीच्या विचार आणि अनुभवांची देवाणघेवाण सुरू आहे आणि राहील.

पारीवरील ‘अनुवाद’ ते ‘पारीभाषा’

या वर्षी आम्ही भारतीय भाषांमध्ये मजकूर यावा, त्याचं मूळ भाषेत प्राथमिक संपादन आणि प्रकाशनापूर्वी इंग्रजी अनुवाद आणि संपादन असा प्रयत्न केला आहे. पण येत्या काळात भारतीय भाषांमध्ये लिहिला जाणारा मजकूर त्याच भाषेत संपादित व्हावा आणि नंतर त्याचा केवळ इंग्रजी अनुवाद व्हावा या दिशेने पाऊल टाकत आम्हाला आमच्या क्षमता वाढवायच्या आहेत. आमचे काही भाषा संपादक दोन भाषांमध्ये काम करतात आणि या वर्षी काही मजकूर या पद्धतीने मूळ भाषेत संपादन आणि इंग्रजी अनुवाद करून पारीवर एकाच वेळी दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित झाला आहे.

या वर्षी पारीभाषासोबत अनेक वार्ताहर, लेखकांनी काम केलं. त्यातले काही जण आमच्या कामातून पारीशी जोडले गेले. त्यातले काहीः जितेंद्र वसावा, जितेंद्र मैड, उमेश सोलंकी, उमेश राय, वाजेसिंह पारगी, केशव वाघमारे, जयसिंग चव्हाण, तपन सरकार, हिमाद्रि मुखर्जी, सायन सरकार, लाबोनी जांगी, राहुल सिंग, शिशिर अगरवाल, प्रकाश रणसिंग, साविका अब्बास, वाहिदुर रहमान, अर्शदीप आर्शी

पारीभाषाने आजवर पारी एज्युकेशनसोबत काम करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचं काम भारतीय भाषांमध्ये अनुवादित केलं आहे. मातृभाषेमध्ये शिकणारे तरुण विद्यार्थी आपल्या भाषेमध्ये लिहू लागले आहेत आणि पारीसोबत काम करत वार्तांकन आणि दस्तावेजीकरणाची कौशल्यं शिकत आहेत. त्यांच्या कहाण्या इतर भाषांमध्ये अनुवादित झाल्याने अनेकांपर्यंत पोचत आहेत.

ओडिशातील आदिवासी मुलांनी काढलेल्या चित्रांचा अनोखा संग्रह या वर्षी पारीवर प्रकाशित करण्यात आला. या मुलांनी या चित्रांची आणि स्वतःची सगळी माहिती उडियामध्ये सांगितली होती. पारीभाषाच्या उडिया गटाने या संपूर्ण प्रकल्पात अनुवादाचं अतिशय महत्त्वाचं काम पार पाडलं आहे.

महाराष्ट्रातली जात्यावरची ओवी असो किंवा गुजरातमधली कच्छी गाणी, त्यांची उत्तम प्रकारे गुंफण करून तो वेबसाइटवर प्रकाशित करण्याचा दांडगा अनुभव आता पारीकडे आहे. अनेक सामाजिक संस्था आणि डिजिटल पोर्टल्सनी पारीसोबत काम करण्याची आणि त्यांचा मजकूर इथे प्रकाशित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आगामी काळात पारीभाषाचं ध्येय म्हणजे लोकांचा असणारा हा संग्रह लोकांच्याच भाषेत तयार करणं आणि मांडणं. आणि त्या ध्येयाच्या दिशेने आम्ही एकेक पाऊल पुढे जात आहोत.

शीर्षक चित्रः रिचकिन संकलेचा

आम्ही करत असलेलं काम तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला पारीसाठी काही लिहायचं असेल , योगदान द्यायचं असेल तर [email protected] या ईमेलवर संपर्क साधा. मुक्त व स्वतंत्र पत्रकार , वार्ताहर , छायाचित्रकार , चित्रपटकर्ते , अनुवादक , संपादक , चित्रकार आणि संशोधकांचं स्वागत आहे.

पारी सेवाभावी संस्था आहे. बहुभाषी संग्रह आणि वार्तापत्र असणारी आमची वेबसाइट लोकांच्या देणग्या आणि आर्थिक मदतीवर विसंबून आहे. तुम्हाला पारीच्या कामाला हातभार लावायचा असेल तर DONATE या पानावर जाऊन सढळ हाताने मदत करा.

PARIBhasha Team

ಪರಿಭಾಷಾ ಎನ್ನುವುದು ನಮ್ಮ ವಿಶಿಷ್ಟ ಭಾರತೀಯ ಭಾಷೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದ್ದು, ಇದು ಅನೇಕ ಭಾರತೀಯ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಪರಿ ಕಥೆಗಳನ್ನು ವರದಿ ಮಾಡಲು ಮತ್ತು ಅನುವಾದಿಸಲು ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತದೆ. ಪರಿಯ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಥೆಯ ಪ್ರಯಾಣದಲ್ಲಿ ಅನುವಾದವು ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ವಹಿಸುತ್ತದೆ. ನಮ್ಮ ಸಂಪಾದಕರು, ಅನುವಾದಕರು ಮತ್ತು ಸ್ವಯಂಸೇವಕರ ತಂಡವು ದೇಶದ ವೈವಿಧ್ಯಮಯ ಭಾಷಾ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ವೈಭವವನ್ನು ಪ್ರತಿನಿಧಿಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಕತೆಗಳನ್ನು ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಭಾಷೆಯಲ್ಲೇ ಅವರಿಗೆ ತಲುಪಿಸುತ್ತದೆ.

Other stories by PARIBhasha Team