फाल्गुन संपत आलाय. सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या खाराघोडा स्टेशनजवळच्या एका कालव्यावर आळसावलेला रविवारचा सूर्य निवांत पहुडलाय. या कालव्यात एक तात्पुरता बांध घातलाय त्यामुळे पाणी अडलंय आणि एक छोटंसं तळं तयार झालंय. तळ्याच्या काठी काही मुलं एकदम शांत बसलीयेत. बांधावरून वाहून जाणाऱ्या पाणी चांगलंच आवाज करत चाललंय. वारं पडल्यावर रानातली झाडं कशी शांत होतात अगदी तसंच तळ्याच्या काठची सात मुलं चिडीचूप बसलीयेत. मासे धरायला गळ टाकलाय, त्याला एखाद-दुसरा मासा तरी लागेल याची वाट पाहत. अचानक काही तरी अडकतं, गळाला ओढ बसते आणि मग हे चिमुकले हात दोरी खेचू लागतात. गळाला मासा लागला. काही क्षण फडफड करून तो मासा शांत होतो.
तिथून थोडंच दूर अक्षय दरोदरा आणि महेश सिपारा एकमेकांशी काही तरी बोलतायत, ओरडतायत, चार शिव्याही देतायत. आणि मग ते एका पत्तीने मासा साफ करतात. खवले काढून त्याचे तुकडे करतात. महेश लवकरच पंधरा पूर्ण होईल. बाकीचे सहा जण तसे लहानच आहेत. मासे तर धरून झाले. आता मस्त गप्पाटप्पा आणि पोटभर हसणं सुरू. मासे साफ झाले की शिजवायची तयारी सुरू. आणि धमालही. माशाची आमटी तयार. आता अंगत पंगत. सोबत भरपूर हसू.
थोड्या वेळाने सगळी पोरं उड्या मारत पाण्यात. थोड्या वेळाने बाहेर यायचं, जरा कुठे गवत आहे तिथे बसायचं आणि अंग सुकवायचं. यातले तिघे चुंवालिया कोळी, दोघं मुस्लिम आणि दोघं इतर समाजाचे. अख्खी दुपार हे सात जण हसत, खिदळत, उड्या मारत, डुंबत एकमेकांना चार शिव्या देत धमाल करत होते. मी त्यांच्यापाशी जातो, हसून बोलायला काही तरी सुरुवात म्हणून त्यांना विचारतो, “काय रे पोरांनो, कितवीत आहात तुम्ही?”
उघडा बंब पवन म्हणतो, “आ मेसियो नवमु भाणा, आण आ विलासियो छठु भाणा. बिज्जु कोय नठ भणतु. मोय नठ भणतो [हा महेश नववीला आहे आणि विलास सहावीला. बाकी कोणीच शिकत नाहीत. मी पण.]” एक पुडी फोडून तो त्यातून कतरी सुपारी काढतो, दुसरीतून त्यात थोडी तंबाखू मिसळतो. हातात चोळून चिमूटभर तंबाखूची गोळी गालात सरकवतो आणि बाकी इतरांपुढे करतो. पाण्यात लाल पिंक टाकत तो पुढे सांगतो, “नो मजा आवे. बेन मारता ता. [काहीच मजा यायची नाही. बाई मारायच्या].” माझ्या पोटात खड्डा पडतो.