तर, आपण या जंगलात ‘सैतानाचा कणा’ शोधायला आलोय. पिरंदाई (सिसस क्वाड्रॅंग्युलॅरिस) याच नावाने ओळखली जाते. रथी आणि मी शोधत असलेल्या (पिरंदाई नावाच्या) या चौकोनी देठ असलेल्या वेलीत अनेक उत्तम गुण असतात. या वेलीचं कोवळा कोंब विशिष्ट पद्धतीने खुडतात, स्वच्छ करतात आणि लाल तिखट, मीठ आणि तिळाच्या तेलात मुरवून ठेवतात. अशा प्रकारे जर लोणचं घालून ठेवलं तर ते खराब न होता अगदी वर्षभर टिकतं. आणि भाताला लावून खाताना तर अगदी चविष्ट लागतं.

जानेवारीतली दुपार. मऊ, उबदार. जंगलाकडे निघालेली आमची वाट एका प्राचीन, कोरड्याठाक खाडीच्या मार्गाने जाते. हिचं एक उद्बोधक तमिळ नाव आहे : एलायथम्मन ओडाई. याचा शब्दश: अर्थ – जिला सीमा नाहीत अशा देवीचा प्रवाह. हे ऐकलं की आपण रोमांचित होतो. आणि कधी खडकाळ तर कधी वालुकामय, कधी रुंद वाटेवरचा तर कधी ओल्या पाणथळीतला हा प्रवास मला आणखीही रोमांच देऊ करतो.

चालता चालता रथी मला गोष्टी सांगते. काही काल्पनिक आणि मजेशीर असतात - संत्री आणि फुलपाखरांबद्दलच्या. अनेक असतात खऱ्या आणि थरारक - नव्वदच्या दशकात रोटीचं राजकारण आणि जातीय संघर्ष भडकला होता त्यावेळच्या गोष्टी. तेव्हा रथी माध्यमिक शाळेत असते. “माझ्या कुटुंबाने थूथुकुडीला पलायन केलं...’’

दोन दशकांनंतर रथी आपल्या गावी परतली आहे - एक व्यावसायिक कथाकथनकार, ग्रंथालय सल्लागार आणि कठपुतळीचे कार्यक्रम करणाऱ्या कलाकार म्हणून! ती सावकाश बोलते; भरभर वाचते. “कोरोना महामारीच्या काळात सात महिन्यांत लहान मुलांसाठीची छोटी-मोठी २२ हजार पुस्तकं मी वाचली. एका टप्प्यावर तर असं झालं की माझा साहाय्यक रोज मला ‘वाचन थांबवा’ अशी अक्षरक्ष: विनवणी करायचा. नाहीतर मी (पुस्तकातले) संवादच बोलू लागले असते.’’ ती हसते.

तिचं हसणं म्हणजे खळखळाट. जिच्यावरून तिचं नाव ठेवलंय त्या भागीरथी नदीसारखं. पण तिला सगळे ओळखतात ते रथी याच नावाने. भागीरथीची जिथे गंगा होते त्या हिमालयाच्या दक्षिणेस सुमारे ३ हजार किलोमीटर ती राहते. तामिळ नाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातलं थेनकलम हे गाव डोंगर आणि खुरट्या झाडाझुडपांच्या जंगलांनी वेढलेलं आहे. गावातले सगळे रथीला ओळखतात, अगदी तशीच रथीचीही इथल्या डोंगरांशी आणि जंगलांशी ओळख आहे.

“तुम्ही जंगलात कशाला जाताय?’’ एक महिला मजूर विचारते. “आम्ही पिरंदाई शोधतोय,’’ रथी सांगते. “कोण आहे ती? तुझी मैत्रीण?’’ एक गुराखी विचारतो. “हो... हो,’’ रथी हलकंसं स्मित करते, मी हात उंचावते, हलवते आणि आम्ही पुढे चालू लागतो...

Pirandai grows in the scrub forests of Tirunelveli, Tamil Nadu
PHOTO • Courtesy: Bhagirathy
The tender new stem is picked, cleaned and preserved with red chilli powder, salt and sesame oil and will remain unspoilt for a year
PHOTO • Courtesy: Bhagirathy

तामिळ नाडूतील तिरुनेलवेली इथल्या जंगलात पिरंदाई वाढते. रथी ला एक पिरं दा ई सापडते (उजवीकडे). कोवळं वं देठ विशिष्ट पद्धतीने खुड लं जातं , स्वच्छ केलं जातं आणि लाल तिखट , मीठ आणि तिळाच्या तेला मुरवून ठेवलं जातं . हे लोण चं खराब न होता अगदी वर्षभर टिकतं

*****

जंगलातून वनस्पती हुडकणं ही जगभरातल्या विविध संस्कृती आणि बहुतेक साऱ्या खंडांमधे आढळणारी परंपरा आहे. ‘कॉमन्स’ म्हणजेच भौतिक, नैसर्गिक व इतर सारी संसाधनं सर्व समाज घटकांसाठी आहेत या विचाराशी या परंपरेचा घनिष्ठ संबंध आहे. वनसंपदा; विशेषत: जंगलातली उत्पादनं जिथे स्थानिक पातळीवर हंगामी स्वरूपात आणि शाश्वत पद्धतीने वापरली जातात आणि तिथे सामुदायिकतेच्या कल्पनेतून साकारलेली ही परंपरा आढळते.

बेंगळुरू शहरातली वनसंपदा हुडकण्यासंदर्भाने लिहिलेल्या ‘चेजिंग सोप्पू’ या पुस्तकात लेखक म्हणतात, “जंगली वनस्पती गोळा करणं आणि त्यांचा वापर करणं हे स्थानिक लोकांकडे असलेलं परिस्थितिकीचं आणि वनस्पतीशास्त्राचं ज्ञान जतन करण्याच्या कामी हातभार लावतं.’’ थेनकलमप्रमाणे जवळपास सगळीकडे स्त्रियाच सामान्यत: जंगली वनस्पती गोळा करताना दिसतात.

“आजूबाजूच्या स्थानिक जंगली वनस्पतींबद्दलचं ज्ञानभांडार त्यांच्यापाशी असतं. त्याबाबतीत त्या तज्ञ असतात. वनस्पतींचे कोणते भाग अन्न, औषधं किंवा सांस्कृतिक वापरासाठी उपयुक्त आहेत आणि या वनस्पती नेमक्या कोणत्या ऋतूत आढळतात हे त्यांना ठाऊक असतं. (अशा वनस्पती वापरुन बनवल्या जाणाऱ्या) पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या स्वादिष्ट पाककृतीही त्यांच्याकडे असतात.”

एखादं हंगामी उत्पादन जर वर्षभर वापरायचं असेल तर त्यासाठीचा एक सोपा आणि आवडता मार्ग म्हणजे ते साठवणं. साठवण्याच्या सर्वात लोकप्रिय पद्धतींपैकी एक म्हणजे पदार्थ सुकवून मुरवणं आणि दुसरी म्हणजे लोणचं घालणं. एखादा पदार्थ मुरवण्या-टिकवण्यासाठी सामान्यत: व्हिनेगर वापरलं जातं; पण दक्षिण भारतात, विशेषत: तामिळ नाडूमध्ये त्याऐवजी तिळाचं तेल वापरतात.

“तिळाच्या तेलात सेसमिन आणि सेसमोल हे घटक असतात. ही दोन्ही संयुगं नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि ती पदार्थ टिकवण्याच्या कामी येतात,’’ असं मेरी संध्या जे सांगतात. त्यांनी फूड टेक्नॉलॉजी या विषयात एम. टेक. केलं आहे. माशांच्या लोणच्याचा त्यांचा स्वत:चा ब्रॅण्ड आहे. त्या ब्रॅण्डचं नाव आहे- ‘आळी’ (महासागर). आपल्या माशांच्या लोणच्यात ‘कोल्ड प्रेस्ड’ पद्धतीने काढलेलं तिळाचं तेल वापरणं संध्या पसंत करतात, “प्रामुख्याने त्यातील पौष्टिक गुणधर्म, चव, रंग आणि लोणचं जास्त काळ चांगलं टिकावं म्हणून!’’

PHOTO • Aparna Karthikeyan

वनस्पती हुडकणं ही जगभरातल्या विविध संस्कृती आणि खंडांमधे आढळणारी परंपरा आहे. जंगलातली उत्पादनं स्थानिक पातळीवर हंगामी स्वरूपात आणि शाश्वत पद्धतीने वापरली, खाल्ली जातात. वनस्पती हुडकण्यासाठी रथीला जवळपास १० किलोमीटरची पायपीट करावी लागते. ‘पण काय काय हुडकून घरी घेऊन येते,’ ती हसत हसत म्हणते, ‘त्यानंतर त्यांचं काय होतं, ते मला माहित नाही’

भाज्या आणि मांसापासून बनवलेल्या लोणच्यात आणि रश्श्यात रथीच्या घरी तिळाचं तेल वापरतात. आहाराच्या संदर्भातली वर्गवारी मात्र रथी यांना खटकते. “गावात एखादा प्राणी कापला जायचा, तेव्हा त्याचे चांगले भाग वरच्या जातीच्या लोकांकडे जात असत. आणि साधारणपणे खायला जे निरुपयोगी असायचं (प्राण्याचं अंग आणि आतले अवयव) ते आमच्याकडे यायचं. आमच्याकडे मांसापासून बनवलेल्या पदार्थांचा इतिहास नाही, कारण आम्हाला मांसाचे चांगले भाग कधी दिलेच गेले नाहीत. आम्हाला फक्त रंगती देण्यात यायची!’’ रथी सांगते.

‘गोया’ या ऑनलाइन नियतकालिकात प्रकाशित झालेल्या ‘ब्लड फ्राय अॅण्ड अदर दलित रेसिपीज’ या निबंधात विनय कुमार लिहितात, “दडपशाही, भूगोल, वनस्पती-प्राण्यांच्या स्थानिक प्रजाती आणि जातीपातीची उतरंड यांचा दलित, बहुजन आणि आदिवासी समुदायांच्या खाद्यसंस्कृतीवर कसा खोलवर परिणाम झाला आहे याची शोधाशोध करण्याचं, त्याचा पडताळा घेण्याचं काम समाजशास्त्रज्ञ अजूनही करत आहेत.’’

रथीची आई वडीवम्मल यांच्याकडे ‘रक्त, आतडं आणि वेगवेगळे भाग स्वच्छ करण्याची अद्भुत पद्धत’ आहे, रथी सांगते. “गेल्या रविवारी अम्मांनी रंगती शिजवली होती. ‘ब्लड सॉसेज’ आणि ‘ब्लड पुडिंग’ ही शहरामधे एक स्वादिष्ट ‘डेलिकसी’ असते. भेजा फ्राय हे सुपर फूड मानलं जातं. जेव्हा मी शहरात गेले होते, तेव्हा गावात जे २० रुपयांत मिळतं त्यासाठी खूप सारे पैसे मोजणं हे मला जरा विचित्रच वाटलं.’’

रथीच्या आईलाही वनस्पतींची सखोल माहिती आहे. “मागे वळून पहा. त्या ज्या बाटल्या दिसतायत ना, त्यात औषधी वनस्पती आणि तेलं आहेत,’’ दिवाणखान्यात असताना रथी मला सांगते. “माझ्या आईला या सगळ्यांची नावं आणि उपयोग ठाऊक आहेत. पिरंदाईमध्ये उत्कृष्ट पचन-गुणधर्म असल्याचं मानलं जातं. कोणती साधी किंवा औषधी वनस्पती हवी आहे हे अम्मा मला दाखवते. मी जंगलात जाते, तिच्यासाठी ती हुडकते, खुडून आणते, स्वच्छ करते.’’

हे हंगामी उत्पादन असतं. बाजारात मिळत नाही. वनस्पती हुडकण्यासाठी प्रत्येक वेळी रथीला जवळपास १० किलोमीटरची पायपीट करावी लागते आणि त्यात चारेक तास जातात. ‘पण मी वनस्पती घरी घेऊन येते,’ ती हसत हसत म्हणतात, ‘आणि त्यानंतर त्यांचं काय होतं, ते मला समजत नाही.’

*****

Rathy in the forest plucking tamarind.
PHOTO • Aparna Karthikeyan
tamarind pods used in foods across the country
PHOTO • Aparna Karthikeyan

(डावीकडे) जंगलात रथी चिंच तो डताना . (उजवीकडे) देशभरात ल्या विविध खाद्यपदार्थांमध्ये वापर ली जाणा री चिंचेची बुटुकं

भुरळ पाडणारी असते जंगलातली भटकंती. बालसाहित्यासारखी. प्रत्येक वळणावर एक आश्चर्य असतं: इथली फुलपाखरं, तिथले पक्षी आणि भल्यामोठ्या, सुंदर सावल्या देणारे वृक्ष. अजून अर्ध्या कच्च्या असलेल्या विशिष्ट प्रकारच्या बोरांकडे रथी बोट दाखवते. “काही दिवसात ती पिकतील आणि एकदम  स्वादिष्ट होतील,’’ त्या सांगते. आम्ही पिरंदाईसाठी भटकतोय, पण मिळत नाहीयेत. “आपल्या आधी कुणीतरी त्या खुडून नेल्यात,’’ रथी म्हणते, “पण काळजी करू नकोस, परतीच्या वाटेवर मिळतील आपल्याला.’’

ही कसर भरून काढण्यासाठी की काय रथी एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली थांबते, एक जाडजूड फांदी वाकवून चिंचेची बुटकं तोडते. अंगठा आणि चाफेकळीने वरचं तपकिरी कवच फोडून आतली गोड-आंबट चव आम्ही चाखतो. रथीच्या सुरुवातीच्या वाचन-आठवणींमध्ये चिंच आहे.

“मी बसलेय एका कोपऱ्यात... पुस्तक वाचत... आणि हातात चिंचेचं हिरवं बुटुक...’’ थोडं वय वाढल्यावर, अंगणातल्या कोडुक्कपुळी मारम (बिलायती चिंचेच्या) झाडावर बसून ती पुस्तकं वाचत असे. “मी १४-१५ वर्षांची असताना त्यावर चढायचे! त्यामुळे अम्माने ते झाडच तोडून टाकलं.’’ आणि ती खळखळून हसू लागते.

दुपारची वेळ आहे आणि सूर्य अगदी आमच्या माथ्यावर तळपतोय. जानेवारीच्या मानाने ऊन जास्तच कडक आणि कोमेजून टाकणारं आहे. रथी म्हणते, “थोडं पुढे गेल्यावर आपण पुलियुथुला पोहोचू, हा गावासाठी पाण्याचा स्रोत आहे.’’ आटलेल्या ओढ्याच्या काठाकाठाने थोडं थोडं पाणी साचल्यासारखं झालंय. तिथल्या चिखलपाण्यात फुलपाखरं नाचतायत. ते आपले पंख उघडतात (पंखांच्या आत असतो इंद्रधनुष्यी निळा रंग) आणि त्यांचे पंख बंद करतात (पंखांच्या बाहेर असतो अगदी सामान्य तपकिरी)! मला वाटतं, याहून जादुई काही असू शकत नाही.

पुलियुथु तळं ग्रामदेवतेच्या प्राचीन मंदिराशेजारी आहे. रथी सांगते त्यानुसार याच्या अगदी पलीकडेच गणपतीचं एक नवीन मंदिर उभं राहिलंय. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून आम्ही संत्री खातो. आजूबाजूचं सगळं मऊशार आहे - घनगर्द जंगलात झिरपणारा दुपारचा प्रकाश, आंबटगोड सुगंध, केशरी आणि काळे मासे. आणि अगदी शांत स्वरात रथी मला एक गोष्ट सांगते. ‘हिचं नाव पिथ, पिप अॅण्ड  पील.’ त्या सुरुवात करतात. मी ऐकते, तल्लीन होऊन जाते.

Rathy tells me stories as we sit under a big banyan tree near the temple
PHOTO • Aparna Karthikeyan
Rathy tells me stories as we sit under a big banyan tree near the temple
PHOTO • Aparna Karthikeyan

मंदिराजवळ च्या एका मोठ्या वडाच्या झाडाखाली ब सून थी मला गोष्टी सांगते

रथीला गोष्टी नेहमीच आवडायच्या. तिचे वडील समुद्रम हे बँक मॅनेजर होते. त्यांनी तिला मिकी माऊस कॉमिक्स आणून दिली. “मला चांगलं आठवतंय, त्यांनी माझा भाऊ गंगा याला एक व्हिडिओ गेम आणून दिला, माझी बहीण नर्मदा हिला एक खेळणं आणून दिलं आणि मला एक पुस्तक!’’ रथीने वाचनाची सवय आपल्या वडिलांकडून घेतली.

त्यांच्याकडे पुस्तकांचा बराच मोठा संग्रह होता. शिवाय, तिच्या प्राथमिक शाळेत एक मोठ्ठं ग्रंथालय होतं. “ही पुस्तकं घ्या, ती घेऊ नका असं तिथे कधी कुणी केलं नाही. माझ्यासाठी तर त्यांनी सहसा बंद असणारा नॅशनल जिओग्राफिक आणि विश्वकोशाचा दुर्मिळ विभागदेखील उघडला. कारण एकच होतं – माझी पुस्तकांची आवड!’’

रथीचं पुस्तकांवर अफाट प्रेम होतं, तिचं बालपण वाचनात गेलं. “रशियन भाषेतून अनुवादित केलेलं हे पुस्तक होतं आणि मला वाटत होतं की ते हरवलंय. त्याचं नाव मला आठवत नव्हतं, फक्त त्यातली चित्रं आणि गोष्ट आठवत होती. मागच्या वर्षी मला ते अॅमेझॉनवर मिळालं. सागरी सिंह आणि नौकानयनाची ही गोष्ट आहे. तुला ऐकायचीय का?’’ आणि रथी मला ती गोष्ट सांगते... तिच्या आवाजात चढउतार होत राहतात... अगदी गोष्टीत वर्णन केलेल्या लाटांसारखे... समुद्रासारखे.

तिचं बालपण कधीच शांत नव्हतं - समुद्रासारखं. माध्यमिक शाळेत असताना आजूबाजूच्या हिंसाचाराची आठवण तिच्या मनात आजही ताजी आहे. “भोसकाभोसकी. बस जाळल्या जायच्या. अशा गोष्टी सतत कानावर यायच्या. गावात आमची अशी पद्धत होती. सणासमारंभात ते चित्रपट दाखवायचे. हिंसाचाराचा तो मुख्य स्रोत होता. भोसकाभोसकी व्हायची. मी आठवीत असताना हिंसा शिगेला पोहोचली होती.

“कर्णन हा चित्रपट पाहिला आहेस का? आमचं आयुष्य तसंच होतं.’’ १९९५ मध्ये कोडियानकुलमला झालेल्या जातीय दंगलीचं काल्पनिक, कलात्मक चित्रण कर्णन या चित्रपटात केलंय. अभिनेता धनुष यात मुख्य भूमिकेत आहे. ‘उपेक्षित दलित समाजातल्या कर्णन नावाच्या निर्भीड आणि दयाळू तरुणाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. अत्याचाराविरुद्धच्या प्रतिकाराचं प्रतीक बनतो कर्णन!’ ‘सवर्ण गावकऱ्यांना विशेषाधिकार आणि सत्ता लाभते, तर दलितांना भेदभावाला तोंड द्यावं लागतं.’

जातीय हिंसाचार शिगेला पोहोचत होता त्या नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत रथीचे वडील त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी वेगळ्या शहरात राहत असत. रथी आणि तिची भावंडं आईसोबत गावात राहत असत. पण इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या चार वर्षात त्यांनी चार शाळा बदलल्या.

तिच्या आयुष्याचा आणि अनुभवांचा करिअर निवडीवर मोठा परिणाम झाला. “हे बघ, ३० वर्षांपूर्वी तिरुनेलवेलीमध्ये मी एक वाचक होते. माझ्यासाठी पुस्तकं निवडून द्यायला कुणीच नव्हतं. प्राथमिक शाळेत होते तेव्हा मी शेक्सपिअर हातात घेतला. तुला ठाऊक आहे, माझं आवडतं पुस्तक म्हणजे (जॉर्ज एलियटचं) ‘द मिल ऑन द फ्लॉस’. हे पुस्तक वर्णवाद आणि वर्गवादाबद्दल आहे.

यात मुख्य भूमिकेत आहे गडद त्वचा असलेली स्त्री. पदवी अभ्यासक्रमांसाठी हे पुस्तक लावलं जातं. पण कुणीतरी ते शाळेला दान केल्यामुळे मी ते चौथीत असताना वाचलं आणि मुख्य पात्राशी जोडली गेले. तिच्या गोष्टीतल्या दु:खाने मीही व्याकूळ झाले...’’

Rathy shows one of her favourite books
PHOTO • Aparna Karthikeyan
Rathy shows her puppets
PHOTO • Varun Vasudevan

थी आपलं एक आवडत पुस्तक आणि कठपुत ल्या दाखव तीये

त्यानंतर अनेक वर्षांनी रथीला बालसाहित्याचा नव्याने शोध लागला, तेव्हा तिच्या करिअरला वेगळी दिशा मिळाली. “मुलांसाठी अशी खास पुस्तकं आहेत याची मला कल्पनाच नव्हती. ‘व्हेअर द वाइल्ड थिंग्ज आर’ आणि ‘फर्डिनांड’सारखी पुस्तकं आहेत हे मला बिलकुल माहित नव्हतं.

८०-९० वर्षांपासून ही पुस्तकं होती आणि शहरातल्या मुलांनी ती वाचली होती. या साऱ्याने मला विचार करायला भाग पाडलं- माझ्या लहानपणी मला ही पुस्तकं मिळाली असती तर? माझा प्रवास वेगळा झाला असता. मी चांगला झाला असता असं नाही म्हणत... वेगळा म्हणतेय...’’

शिवाय अजूनही शैक्षणिक कामापासून दूर नेणारी गोष्ट याच नजरेतून वाचनाकडे पाहिलं जातं. “याकडे मनोरंजन म्हणून पाहिलं जातं,’’ ती मान हलवत म्हणते, “कौशल्य विकास म्हणून नाही. पालकही केवळ शैक्षणिक आणि उपक्रमांशी संबंधित पुस्तकं विकत घेतात. गोष्टींची पुस्तकं वाचताना मुलं कशी शिकू शकतात हे त्यांना दिसत नाही. शिवाय ग्रामीण-शहरी अशी मोठी दरी आहे. वाचनपातळीच्या संदर्भाने पाह्यलं तर खेड्यापाड्यातील मुलं शहरातल्या मुलांपेक्षा किमान दोन-तीन पातळ्या पिछाडीवर आहेत.’’

आणि म्हणूनच रथला ग्रामीण मुलांसोबत काम करायला आवडतं. गेल्या सहा वर्षांपासून ती साहित्य-जत्रा आणि पुस्तक-जत्रा आयोजित करत आहे. शिवाय गावातल्या ग्रंथालयांसाठी ती क्यूरेटर म्हणूनही काम करते. ती म्हणते, अनेकदा आपल्याला पात्र ग्रंथपाल सापडतात, त्यांच्यापाशी उत्कृष्ट कॅटलॉग, उत्कृष्ट संग्रह असतो. परंतु पुस्तकाच्या आत काय आहे, हे नेहमी त्यांना माहीत असतंच असं नाही. “तुम्ही काय वाचावं हे ते तुम्हाला सुचवू शकत नसतील तर मग त्याला काही अर्थ नाही!’’

काहीतरी गुपित सांगत असल्यागत रथी हळूच म्हणते, “एकदा एका ग्रंथपालाने मला विचारलं, ‘तुम्ही मुलांना ग्रंथालयात का जायला देताय मॅडम?’ त्यावरची माझी प्रतिक्रिया तुम्ही बघायला हवी होती!’’ आणि त्यांचं मनभर हसणं दुपार भारून टाकतं.

*****

घरी परतताना आम्हाला पिरंदाई सापडते. ती चिवट असते; वनस्पती आणि झुडपांना वेढून विखुरलेली. रथी मला तोडण्याजोगे कोवळे हिरवे कोंब दाखवते. वेल काटकन मोडते. मिळालेली सगळी पिरंदाई ती ओंजळीत गोळा करतात... ‘सैतानाचा कणा’... पिरंदाईचं हे नाव आम्हाला पुन्हा एकदा हसवतं.

Foraging and harvesting pirandai (Cissus quadrangularis), the creeper twisted over plants and shrubs
PHOTO • Aparna Karthikeyan
Foraging and harvesting pirandai (Cissus quadrangularis), the creeper twisted over plants and shrubs
PHOTO • Aparna Karthikeyan

झाडा झुडपां ना वेटोळं घालणारी वेल- पिरंदाई (सिसस क्वा ड्रॅंग्युलॅरिस )

एका पावसानंतर नवे कोंब फुटतील, रथी विश्वासाने सांगते. “आम्ही गडद हिरव्या रंगाचे भाग कधीच खुडत नाही. प्रजननशील मासे पाण्याबाहेर काढण्यासारखंच आहे हे, नाही का? मग तुम्हाला छोटे छोटे मासे कसे मिळतील?’’

गावाकडे परतण्याचा प्रवास दगदगीचा आहे. कडक ऊन, खजुराची झाडं, तपकिरी कोरडं पडलेलं झुडपांचं  जंगल. उन्हात चमचमणारी पृथ्वी. स्थलांतरित पक्ष्यांचा कळप – काळा शराटी – आम्ही जवळ जाताच भुर्रकन उडून जातो. ते सुबकपणे उंचावतात, पाय दुमडतात, पंख पसरवतात. आम्ही गावाच्या चौकात पोहोचतो... हातात संविधान घेऊन उभ्या असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या उंच पुतळ्यापाशी. “मला वाटतं, हिंसाचार झाला त्यानंतरच या पुतळ्याभोवती संरक्षक लोखंडी जाळी लावण्यात आली.’’

पुतळ्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर रथीचं घर आहे. दिवाणखान्यात परत आल्यावर ती मला सांगते की गोष्टी सांगणं हे तिच्यासाठी मनातल्या वेगवेगळ्या भावना मोकळ्या करायला देणारं माध्यम आहे. “गोष्टी सांगताना मी रंगमंचावर अनेक भावना साकारते, कदाचित रोजच्या आयुष्यात त्या मी कधी व्यक्त करणारही नाही. निराशा आणि थकवा यासारख्या अगदी साध्या साध्या भावनाही आपण लपवून ठेवतो, शक्यतो व्यक्त करण्याचं टाळतो. पण या भावना मी रंगमचावर व्यक्त करते.’’

प्रेक्षक रथी यांना पाहत नाहीत, तर त्या साकारत असलेली व्यक्तिरेखा पाहतात, याकडे त्या लक्ष वेधतात. दु:खालाही रंगमंचावर वाव मिळतो. “अगदी सुंदर पद्धतीने रडण्याचा बनावट आवाज मला काढता येतो. तो आवाज ऐकल्यावर लोक खोलीच्या दिशेने धाव घेतात आणि म्हणतात, आम्हाला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू आला.’’ मी विचारते, तो रडण्याचा आवाज तुम्ही मला काढून दाखवू शकाल का? पण रथी हसते. “इथे नाही, इथे नक्कीच नाही. किमान तीन नातेवाईक धावत येऊन विचारतील काय झालं...’’

माझी निघायची वेळ होते, तशी रथी मला पिरंदाईचं लोणचं बांधून देते. तेलात मुरलेलं आणि  लसणीने सजलेलं. सोबतीला तो स्वर्गीय सुगंध... उबदार दिवसातल्या लांबलचक भटकंतीची, हिरव्यागार कोंबांची आणि कथांची स्मृती जागवणारा...

Cleaning and cutting up the shoots for making pirandai pickle
PHOTO • Bhagirathy
Cleaning and cutting up the shoots for making pirandai pickle
PHOTO • Bhagirathy

पिरंदाईचं लोणचं घालण्यासाठी आधी वेलीचे कोंब साफ करून चिरून घ्यायचे

Cooking with garlic
PHOTO • Bhagirathy
final dish: pirandai pickle
PHOTO • Bhagirathy

लसूण घालून शिजवायचं (डावीकडे) आणि तय्यार झालेलं पिरंदाई लोणच (उजवीकडे); रेसिपी खाली

रथी यांची आई वडीवम्मल यांची पिरंदाई लोणच्याची रेसिपी

पिरंदाई स्वच्छ करून बारीक चिरून घ्या. चांगली धुवून मग निथळून घ्या. पाणी राहायला नको. एक कढई घ्या आणि त्यात पिरंदाईच्या मापाने तिळाचं पुरेसं तेल घाला. तेल गरम झाल्यावर मोहरी तडतडू  द्या आणि आवडत असल्यास त्यात मेथीचे दाणे आणि लसूण घाला. तांब्यासारखी लाली येईपर्यंत चांगलं परतून घ्या.

लिंबाएवढी चिंच पाण्यात भिजवून पिळून घ्या - पिरंदाईमुळे सुटणारी खाज चिंचेमुळे कमी होते. (कधीकधी पिरंदाई धुताना आणि साफ करतानाही आपल्या हातांना खाज सुटू शकते.)

आता त्यात चिंचेचं पाणी घाला. त्यानंतर मीठ, हळद, लाल तिखट आणि हिंग घाला. पिरंदाई नीट शिजेपर्यंत ढवळत राहा. पिरंदाई शिजल्यावर सगळं मिश्रण एकजीव होईल आणि त्यावर तिळाच्या तेलाचा तवंग येईल. लोणचं थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते बाटलीत भरा. वर्षभर टिकायला हरकत नाही.


या संशोधन अभ्यासाला अझीम प्रेमजी विद्यापीठाने रिसर्च फंडिंग प्रोग्राम २०२० अंतर्गत निधी दिला आहे.

Aparna Karthikeyan

ಅಪರ್ಣಾ ಕಾರ್ತಿಕೇಯನ್ ಓರ್ವ ಸ್ವತಂತ್ರ ಪತ್ರಕರ್ತೆ, ಲೇಖಕಿ ಮತ್ತು ʼಪರಿʼ ಸೀನಿಯರ್ ಫೆಲೋ. ಅವರ ವಸ್ತು ಕೃತಿ 'ನೈನ್ ರುಪೀಸ್ ಎನ್ ಅವರ್' ತಮಿಳುನಾಡಿನ ಕಣ್ಮರೆಯಾಗುತ್ತಿರುವ ಜೀವನೋಪಾಯಗಳ ಕುರಿತು ದಾಖಲಿಸಿದೆ. ಅವರು ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಐದು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಅಪರ್ಣಾ ತನ್ನ ಕುಟುಂಬ ಮತ್ತು ನಾಯಿಗಳೊಂದಿಗೆ ಚೆನ್ನೈನಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ.

Other stories by Aparna Karthikeyan

ಪಿ. ಸಾಯಿನಾಥ್ ಅವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಸ್ಥಾಪಕ ಸಂಪಾದಕರು. ದಶಕಗಳಿಂದ ಗ್ರಾಮೀಣ ವರದಿಗಾರರಾಗಿರುವ ಅವರು 'ಎವೆರಿಬಡಿ ಲವ್ಸ್ ಎ ಗುಡ್ ಡ್ರಾಟ್' ಮತ್ತು 'ದಿ ಲಾಸ್ಟ್ ಹೀರೋಸ್: ಫೂಟ್ ಸೋಲ್ಜರ್ಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯನ್ ಫ್ರೀಡಂ' ಎನ್ನುವ ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ.

Other stories by P. Sainath
Translator : Amruta Walimbe

Amruta Walimbe is an independent journalist and editor with a long experience of working with many NGOs and media houses in Maharashtra. She is also a trained psychologist.

Other stories by Amruta Walimbe