कोल्लिडा नदीचा वाळूमय काठ. तिन्ही सांजा होण्याची वेळ. श्रीरंगमच्या आपल्या तिळाच्या शेतापासून १० मिनिटांच्या अंतरावर नदीकिनारी वडिवेलन मला किती तरी गोष्टी सांगत होते. १९७८ साली त्यांच्या जन्मानंतर १२ दिवसांनी नदीला कसा पूर आला होता ते. त्यांचं गाव आणि कसे सगळेच शेतकरी तिथे ‘येल्ल’ म्हणजेच तिळाची शेती करतात. याच तिळापासून मधाच्या रंगाचं, जिभेवर वेगळी चव देणारं तेल निघतं. इतकंच नाही, केळ्याची दोन मोठी पानं उपडी टाकून पोहायला कसं शिकलो ते आणि कावेरीच्या तीरावर राहणाऱ्या प्रियाच्या प्रेमात कसे पडलो ते. वडलांच्या विरोधात जाऊन तिच्याशी लग्न कसं केलं तेही. आपल्या दीड एकरातल्या भात, ऊस, उडीद, तिळाच्या शेतीच्या गोष्टी तर अनेकानेक...

यातल्या पहिल्या तीन पिकांत थोडा तरी पैसा आहे. “भातातून येणारा पैसा उसात घालायचा. आणि त्यातून येणारा परत शेतीतच.” तिळाची लागवड तेलासाठी. लाकडी घाण्यावर तिळाचं तेल काढलं जातं. याला तमिळमध्ये नल्लेण्णइ म्हणतात. मोठ्या भांड्यात ते भरून ठेवलं जातं. “स्वयंपाकात, लोणच्यात सगळ्यात हेच वापरलं जातं,” प्रिया सांगते. “ते तर रोज तेलाची गुळणी पण करतात.” वडिवेलन हसतात आणि म्हणतात, “आणि तेल लावून स्नान, ते तर माझं सगळ्यात आवडतं.”

वडिवेलन यांना आवडणाऱ्या अशा किती तरी गोष्टी आहेत. आणि खरं तर त्यांना अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद सापडतो. लहानपणी नदीतली मासेमारी, मित्रांबरोबर भाजून खाल्लेले ताजे ताजे मासे, पंचायत प्रमुखाच्या घरी जाऊन पाहिलेला गावातला एकमेव टीव्ही. “काय सांगू? मला टीव्हीचं इतकं वेड होतं, की प्रक्षेपण नीट नसताना येणारा ऑइं आवाजसुद्धा मी ऐकत बसायचो!”

सूर्य कलतो आणि त्या रम्य आठवणीही हवेत विरून जातात. “आजकाल केवळ शेतीवर विसंबून राहणं शक्यच नाही,” वडिवेलन सांगतात. “मी कॅब देखील चालवतो म्हणून आमचं भागतंय.” आम्ही त्यांच्याच टोयोटा इटियॉसमध्ये बसून श्रीरंगम तालुक्यातल्या तिरुवळरसोलईमधल्या त्यांच्या घरून इथे नदीवर आलो होतो. गाडीचा हप्ता महिन्याला २५,००० इतका आहे. पैशाची अडचण कायमचीच, दोघंही म्हणतात. अनेकदा गरज भागवण्यासाठी एखादा डाग गहाण ठेवावा लागतो. “कसंय, आम्ही जर घर बांधण्यासाठी कर्ज काढायचं ठरवलं तर दहा चपला झिजतील इतक्या खेटा मारायला लावतात आमच्यासारख्यांना!”

आकाशात आता गुलाबी, निळा आणि काळ्या रंगाचे फटकारे दिसू लागलेत. जणू एखादं तैलचित्र असावं. दुरून कुठून तरी मोराचा आवाज येतोय. “या नदीत पाणमांजरं आहेत,” वडिवेलन सांगतात. आणि आमच्यापासून हाकेच्याच अंतरावर काही मुलं स्वतःच पाणमांजरं असल्यासारखी पाण्यात डुबक्या मारत असतात. “मीसुद्धा हे असंच करायचो. कारण आम्ही लहानाचे मोठं झालो तेव्हा करमणूक म्हणून दुसरं काहीही नव्हतं.”

Vadivelan and Priya (left) on the banks of Kollidam river at sunset, 10 minutes from their sesame fields (right) in Tiruchirappalli district of Tamil Nadu
PHOTO • M. Palani Kumar
Vadivelan and Priya (left) on the banks of Kollidam river at sunset, 10 minutes from their sesame fields (right) in Tiruchirappalli district of Tamil Nadu
PHOTO • M. Palani Kumar

वडिवेलन आणि प्रिया (डावीकडे) सूर्यास्तावेळी कोल्लिदम नदीच्या पाण्यात. तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या त्यांच्या शेतापासून ही नदी अगदी १० मिनिटांच्या अंतरावर

वडिवेलन नदीचे पूजक आहेत. “दर वर्षी आडि पेरक्क – म्हणजेच तमिळ दिनदर्शिकेनुसार आडि महिन्याच्या अठराव्या दिवशी ते कावेरी नदीच्या तीरावर येतात आणि नारळ वाढवतात. कापूर पेटवून फुलं वाहून नदीची पूजा करतात.” आणि याचाच प्रसाद म्हणून की काय कावेरी आणि कोल्लिदम या दोन्ही नद्या तमिळ नाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या शेतीला पोटभर पाणी देतात. गेल्या दोन हजार वर्षांपासून हे निसर्गचक्र असंच सुरू आहे.

*****

“उडकलेला मसूर, तिळाचे लाडू, मांस आणि भात,
फुलं, उदबत्ती आणि ताजा गरम भात वाहून
बाया एकमेकींचे हात हाती घेत, वेगळ्या विश्वात गेल्यासारख्या थिरकतात
आणि साजूक म्हाताऱ्या आशीर्वाद देतात
“या राजाच्या या महान राज्यात
भूक, आजारपण आणि वैर नसो
धरती सुजला आणि सुफला होवो”

दुसऱ्या शतकात लिहिल्या गेलेल्या सीलपदिकारम या तमिळ महाकाव्यामधल्या हा प्रार्थनाविधी “तमिळनाडूमध्ये आजही जवळपास तसाच्या तसा केला जातो,” ओल्ड तमिळ पोएट्री या आपल्या ब्लॉगमध्ये चेंदिल नाथन लिहितात. [काव्यः इंदिरा विळव, पंक्तीः ६८-७५]

तर, तीळ असा पुरातन देखील आहे आणि अगदी रोजच्या वापरातलाही. आणि वापरही विविध तऱ्हेचे. तिळाचं तेल म्हणजेच नल्लेनै तमिळ स्वयंपाकात अगदी दररोज वापरलं जातं. तिळाचा वापर अनेक देशी विदेशी गोड पदार्थात केला जातो. तिखट पदार्थांमध्ये थोडे पांढरे किंवा काळे तीळ घातले की मस्त कुरकुरीतपणा येतो. अनेक विधींमध्ये, खास करून पितरांच्या स्मृतीत केलेल्या तर्पण विधींमध्ये तिळाला फार महत्त्व आहे.

तिळाच्या तेलात ५० टक्के तेल, २५ टक्के प्रथिनं आणि १५ टक्के कर्बोदकं असतात. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तीळ आणि कारळ्यावरच्या एका प्रकल्पामध्ये नमूद केल्याप्रमाणे, या दोन्ही तेलबिया म्हणजे ‘ऊर्जेचा, ई, अ, ब आणि कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, तांबे मॅग्नेशियम, झिंक आणि पोटॅशियम या खनिजांचा मोठा साठा आहेत.’ कदाचित म्हणूनच तेल काढून झाल्यावर मागे राहिलेली ‘येल्ल पुनाक्क’ म्हणजेच पेंड जनावरांना खायला सगळ्यात उत्तम आहार असतो.

Ellu (sesame) is both ancient and commonplace with various uses – as nallenai (sesame oil), as seeds used in desserts and savoury dishes, and as an important part of rituals. Sesame seeds drying behind the oil press in Srirangam.
PHOTO • M. Palani Kumar

येल्ल (तीळ) एकीकडे पुरातन आणि दुसरीकडे अगदी रोजच्या वापरातला आहे – नल्लेण्णइ म्हणजेच तेलाच्या रुपात, मिठायांमध्ये, तिखट पदार्थांत तिळाचा वापर होतो आणि अनेक विधींमध्येही. श्रीरंगममध्ये तेलाच्या घाण्यामागे वाळत घातलेला तीळ

Freshly pressed sesame oil (left) sits in the sun until it clears. The de-oiled cake, ellu punaaku (right) is sold as feed for livestock
PHOTO • M. Palani Kumar
Freshly pressed sesame oil (left) sits in the sun until it clears. The de-oiled cake, ellu punaaku (right) is sold as feed for livestock.
PHOTO • M. Palani Kumar

नुकतंच गाळलेलं तिळाचं तेल (डावीकडे) उन्हात ठेवतात, त्यानंतर ते नितळतं. तीळाची पेंड (उजवीकडे) पशुखाद्य म्हणून वापरली जाते

‘तीळ ( Sesamum indicum L .) तेलबियांपैकी सर्वात जुना आहे आणि भारतात तिळाच्या लागवडीचा इतिहास सर्वात मोठा आहे.’ भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने प्रकाशित केलेल्या हँडबुक ऑन ॲग्रिकल्चर या पुस्तकात म्हटल्यानुसार जगभरात तिळाचं उत्पादन सर्वात जास्त होतं ते भारतात. आणि तिळाखालील क्षेत्राचा विचार करता २४ टक्के जमीन भारतात आहे. यात पुढे असंही म्हटलं आहे की जगभरात एकूण सर्व तेलबियांखाली येणाऱ्या क्षेत्रापैकी १२ ते १५ टक्के क्षेत्र भारतात असून ७ ते ८ टक्के उत्पादन इथे होतं आणि वापरही ९ ते १० टक्के आहे.

आणि भारताचा हा वाटा किंवा स्थान काही केवळ आधुनिक युगातलं नाहीये. इंडियन फूड, अ हिस्टॉरिकल कम्पॅनियन या आपल्या पथदर्शी पुस्तकात के. टी. अचया लिहितात की भारतातून तीळ निर्यात होत होता याचे अनेकानेक पुरावे आहेत.

भारताच्या दक्षिणेकडच्या बंदरांवरून तिळाचा व्यापार होत होता याची वर्णनं इतिहासात इसवीसनाच्या पार पहिल्या शतकापासून मिळतात. पेरिप्लस मारिस एरिथ्रेई (एरिथ्रियन समुद्राला वेढा घालून केलेला प्रवास) हे एका ग्रीक बोलणाऱ्या इजिप्तवासी अनामिकाने लिहिलेलं पुस्तक. यामध्ये त्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिलेल्या गोष्टींच्या आधारे त्या काळातल्या व्यापारासंबंधी अनेक तपशील नोंदवून ठेवले आहेत. तो लिहितो की बऱ्याच मौल्यवान वस्तू भारतातून परदेशात पाठवल्या जायच्या. यामध्ये हस्तीदंत आणि मलमल होती आणि सोबत तिळाचं तेल आणि सोनं ही कोन्गनाडची, म्हणजेच आताच्या तमिळनाडूच्या पश्चिमेकडच्या प्रदेशातील उत्पादनं असायची. सोन्यासोबत पाठवण्यात येणाऱ्या तेलाचं स्थान समजून घेता येऊ शकतं.

देशांतर्गत होणारा व्यापारही जोरात होता. मनकुडी मरुदनर यांनी लिहिलेल्या मदुरईकान्चीमध्ये मदुरई नगरीचं असं चित्र उभं केलं आहे की त्यातून तिथली सगळी लगबग आपल्याला समजते. “मिरीच्या गोण्या आणि भात, तृणधान्यं, हरभरा, वाटाणे, तीळ अशा सोळा प्रकारच्या धान्यांच्या राशी आडत्यांच्या रस्त्याकडेला लागल्या आहेत.”

तिळाच्या तेलाला तर राजाश्रयच होता. अचयांच्या पुस्तकात डॉमिंगो पेस या पोर्तुगीज व्यापाऱ्याचा उल्लेख येतो. १५२० च्या सुमारास तो अनेक वर्षं विजयनगर राज्यात वास्तव्याला होता. तो राजा कृष्णदेवरायाबद्दल लिहितोः

“राजा उगवतीच्या वेळी जवळपास अर्धा लिटर तिळाचं तेल पितो, त्याच तेलाची मालिश करतो, त्यानंतर लंगोट बांधून भरपूर वजनं उचलून व्यायाम करतो, त्यानंतर तलवार बाजी करत प्यायलेलं सगळं तेल अंगात जिरवून घामावाटे बाहेर काढतो.”

Sesame flowers and pods in Priya's field (left). She pops open a pod to reveal the tiny sesame seeds inside (right)
PHOTO • Aparna Karthikeyan
Sesame flowers and pods in Priya's field (left). She pops open a pod to reveal the tiny sesame seeds inside (right)
PHOTO • M. Palani Kumar

प्रियाच्या शेतातली तिळाची फुलं आणि बोंडं (डावीकडे). बोंड उकलून ती आतल्या तिळाच्या नाजूक बिया दाखवते (उजवीकडे)

Priya holding up a handful of sesame seeds that have just been harvested
PHOTO • M. Palani Kumar

प्रियाच्या ओंजळीतले नुकतंच बोंडं झोडून निघालेले तीळ

वडिवेलन यांचे वडील पळनीवेल यांना हे सगळंच फार आवडलं असतं. कारण त्यांच्या सगळ्या वर्णनांवरून त्यांना एकूणच खेळ आवडत असावेत असं वाटतं. “त्यांनी त्यांचं शरीर चांगलं कमावलेलं आहे. त्यांच्या नारळाच्या वाडीत ते मोठाले दगड [वजनं] उचलायचे, कुस्ती शिकवायचे. त्यांना सीलम्बम माहित होतं. [तमिळ नाडूचा पारंपरिक युद्धक्रीडा प्रकार. संगम साहित्यातही याचा उल्लेख आहे].”

रानातल्या तिळाचा उपयोग इथे फक्त तेल काढण्यासाठी होतो. कधी कधी खोबरेल तेलही काढलं जातं. मोठाल्या भांड्यांमध्ये दोन्ही तेलं साठवली जातात. “मला अगदी नीट आठवतंय. माझे वडील राले सायकल चालवायचे. सायकलीवर उडदाची पोती लादून त्रिचीच्या गांधी मार्केटला घेऊन जायचे. येताना मिरची, मोहरी, मिरी आणि चिंच घेऊन याचे. वस्तूंची देवाणघेवाण चालायची. वर्षभरासाठी स्वयंपाकघरात सगळा माल भरला जायचा!”

*****

२००५ वडिवेलन आणि प्रिया यांचं लग्न झालं. तिरुचीजवळच्या वयलूर मुरुगन मंदिरात समारंभ पार पडला. “माझे वडील आले नव्हते कारण त्यांना हे लग्न मान्य नव्हतं,” वडिवेलन सांगतात. “भरीस भर म्हणजे आमच्या काही नातेवाइकांना गावातून घेऊन येण्यासाठी माझे काही मित्र गावी गेले होते. त्यातल्या कुणी तरी जाऊन वडलांना विचारलं, येताय का म्हणून. मग काय त्यांचा पाराच चढला!” हे सांगताना वडिवेलन यांना हसू आवरत नाही.

आम्ही त्यांच्या घरी दिवाणखान्यात बसलो होतो. शेजारच्या फडताळात देवांच्या अनेक तसबिरी. भिंतीवर घरच्या अनेकांचे फोटो. चेहरे, स्वतः किंवा दुसऱ्यांनी टिपलेले. तिथेच एक टीव्ही. कधी फुरसत मिळाली तर प्रियासाठी तेवढाच विरंगुळा. आम्ही गेलो तेव्हा दोन्ही मुलं शाळेत होती. त्यांच्याकडचं कुत्रं आम्हाला भेटायला आलं. “ज्यूली नाव आहे,” वडिवेलन सांगतात. “भारी गोड आहे ही,” मी कौतुकाने म्हणते. “ती नाही तो आहे,” वडिवेलन हसत म्हणतात. ज्युली निघून जाते, जराशी नाराज दिसते का?

प्रिया खाणं वाढते. वडइ, पायसम असा एकदम मस्त बेत केलाय तिने. केळीच्या पानावर वाढलेलं खाणं फारच चविष्ट होतं. पोट टम्म भरलं.

Left: Priya inspecting her sesame plants.
PHOTO • M. Palani Kumar
Right: The couple, Vadivelan and Priya in their sugarcane field.
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः प्रिया तिळाची रोपं निरखून पाहतायत. उजवीकडेः वडिवेलन आणि प्रिया उसाच्या फडात

डोळ्यावर झापड येत होती. मग आम्ही तिळाच्या धंद्याविषयी बोलायला सुरुवात केली. तिळाची शेती कशी सुरू आहे सध्या? “वैताग आहे,” वडिवेलन सांगतात. तिळाचीच नाही, शेतीच वैताग आहे, ते म्हणतात. “हातात काहीच येत नाही पण खर्च मात्र वाढत चाललाय. युरिया किती महागलाय, इतर खतंसुद्धा. नांगरणी आहे, पेरणी आहे. त्यानंतर दारी धराव्या लागतात. पाणीसुद्धा सूर्य मावळल्यावर द्यावं लागतं.”

पेरल्यानंतर तीन आठवड्यांनी पाणी द्यावं लागतं, प्रिया सांगते. तोवर रोपं इतकी वाढलेली असतात असं म्हणताना ती जमिनीपासून वीतभर, ९-१० इंच अंतर हाताने दाखवते. “त्यानंतर रोपं झपाट्याने वाढतात. पाचव्या आठवड्यात, खुरपून काढायचं, युरिया द्यायचा आणि त्यानंतर दर दहा दिवसाला पाण्याची पाळी. स्वच्छ चांगलं ऊन असेल तर भरपूर तीळ येणार.”

वडिवेलन कामाला जातात तेव्हा शेताचं सगळं प्रियाच पाहते. त्यांच्या दीड एकरात कुठली तरी दोन पिकं असतातच. घरची कामं उरकून, मुलं शाळेत पाठवून प्रिया डबा घेते आणि सायकलवर शेतात पोचते. तिथे इतर मजूर कामावर आलेले असतातच. “सकाळी १० च्या सुमारास सगळ्यांसाठी चहा आणावा लागतो. जेवणानंतर सहा आणि पालकारम (काही तरी खाणं). बहुतेकदा सुइयम (गोड), आणि उरुलइ (खारा/तिखट) बोंडा [वडा] असतो.” त्यानंतर प्रिया फटाफट काय काय कामं करत असते. हे उचल, ते ठेव, स्वयंपाकाचं बघ, झाडलोट असं सगळं काम सुरू असतं... “थोडं सरबत घ्या,” आम्ही त्यांच्या शेताकडे निघता निघता ती म्हणते.

*****

येळ्ळ वयल म्हणजे तिळाचं शेत. अगदी देखणं. नाजूक पांढरी आणि गुलाबी झाक असलेली फुलं. इतक्या नाजूक बीपासून स्वयंपाकघरात रोज वापरलं जाणारं तिळाचं चिकट तेल निघत असेल असं वाटतही नाही.

तिळाचं रोप एकदम नाजूक, सरळ आणि उंच. खोडालाच अनेक हिरवी बोंडं लागलेली दिसतात. भुईमुगाच्या आकाराचं पण सरळ साल असलेलं. प्रिया त्यातलं एक बोंड आम्हाला उघडून दाखवते. आत सफेद पिवळसर तीळ. वेण्या घातल्यासारखे, एका रेषेत. एक चमचाभर तेल काढण्यासाठी अशा किती बिया लागत असतील याचा विचार करता येत नाही. चटणी पूड आणि तेल घालून इडली खाताना एका इडलीलाच दोन चमचे तेल जातं.

एप्रिलचं ऊन इतकं प्रखर होतं की सरळ विचार करता येत नव्हता. शेजारच्या राईत थोडी फार सावली होती तिथे जाऊन आम्ही थांबलो. इथेच शेतमजूर स्त्रियादेखील जरा विश्रांती घेतात, वडिवेलन सांगतात. यातल्या काही जणी शेजारच्याच गोपाळ यांच्या उडदाच्या शेतात कामाला जातात. सूर्य आग ओकत होता त्यामुळे सगळ्यांनी डोक्याला सुती पंचे गुंडाळले होते. सगळे अथक काम करतात, सुट्टी फक्त जेवण आणि चहाची.

Left: Mariyaayi works as a labourer, and also sells tulasi garlands near the Srirangam temple.
PHOTO • M. Palani Kumar
Right: Vadivelan’s neighbour, S. Gopal participates in the sesame harvest
PHOTO • M. Palani Kumar

मारियाई शेतात मजुरू करतात आणि श्रीरंगम मंदिरापाशी तुळशीच्या माळा विकतात. उजवीकडेः वडिवेलन यांचे शेजारी, एस. गोपाल तिळाच्या काढणीसाठी मदत करतात

Women agricultural labourers weeding (left) in Gopal's field. They take a short break (right) for tea and snacks
PHOTO • M. Palani Kumar
Women agricultural labourers weeding (left) in Gopal's field. They take a short break (right) for tea and snacks.
PHOTO • M. Palani Kumar

गोपाळ यांच्या रानात खुरपणी करत असलेल्या शेतमजूर बाया. उजवीकडेः दिवसभराच्या कामातून थोडी विश्रांती. चहा आणि थोडं खाणं

सगळ्याच मजूर वयस्क आहे. त्यातल्या सर्वात वयस्क आहेत सत्तरीच्या व्ही. मरियाई. शेतात खुरपायचं, लावणीचं किंवा कापणीचं काम नसतं तेव्हा त्या श्रीरंगम मंदिराबाहेर तुळशीच्या माळा विकतात. त्या अगदी मऊ आवाजात बोलतात. सूर्य वरून आग ओकतोय, जराही सुटका नाही...

पण तिळाच्या रोपाचं मात्र उन्हाशी चांगलंच सख्य आहे. वडिवेलन यांचे शेजारी, पासष्टीचे एस. गोपाल मला सांगतात की तिळाच्या पिकाचे तसे फारसे नखरे नाहीतच. हे तिघंही शेतकरी कीटकनाशकांविषयी फारसं काही बोलत नाहीत. किंवा फवारणीबद्दलही नाही. कधी तरी ओझरता उल्लेख आला तरच. पाण्याचीही त्यांना फारशी चिंता नाही. तिळाची शेती बरीचशी भरडधान्याच्या शेतीसारखी आहे. सोप्पी, पेरा आणि विसरून जा. नुकसान होतं ते केवळ अवकाळी पावसामुळे.

२०२२ साली नेमकं तेच झालं. “नको तेव्हा पाऊस पडला – जानेवारी आणि फेब्रुवारीत. रोपं घोट्यात होती, पावसाने त्यांची वाढ खुंटली,” वडिवेलन सांगतात. सध्या तीळ काढायला आलाय पण यंदा उतारा कमी पडणार अशी त्यांना भीती आहे. “गेल्या वर्षा आम्ही ३० सेंट (एकराचा तिसरा भाग) जमिनीत तीळ पेरला होता. दीड क्विंटल निघाला. यंदा मात्र ४० किलोच्या पुढे जाईल असं वाटत नाही.”

इतक्या मालात त्यांचं वर्षभर पुरेल इतकं तेलही निघणार नाही असा दोघांचा अंदाज आहे. “आम्ही एका वेळी १५ ते १८ किलो तीळ घाण्यात घालतो. त्याचं सात ते आठ लिटर तेल निघतं. असे दोन घाणे आम्हाला लागतात,” प्रिया सांगतात. उद्या आपण तेलाच्या घाण्यावर जाऊ असं वडिवेलन यांनी कबूल केलंय. पण त्या आधी तीळ गोळा कसा करतात?

गोपाळ आम्हाला तीळ कसे काढतात ते पहायला त्यांच्या शेतात बोलावतात. त्यांचं शेत इथनं हाकेच्या अंतरावर. तिथे शेजारी एका वीटभट्टीवर अनेक स्थलांतिरत कुटुंबं वीटेमागे एक रुपया अशा ‘भरघोस’ मजुरीवर कामाला आलेली आहेत. इथेच त्यांची छोटी मुलं लहानाची मोठी होतात (आणि ही पोरं तिथेच शेरडं आणि कोंबड्या पाळतात). वीटभट्टीवर संध्याकाळी शांतता आहे. तिथेच काम करणाऱ्या सीनीअम्मल चालत चालत आम्हाला मदत करायला येतात.

Priya and Gopal shake the harvested sesame stalks (left) until the seeds fall out and collect on the tarpaulin sheet (right)
PHOTO • M. Palani Kumar
Priya and Gopal shake the harvested sesame stalks (left) until the seeds fall out and collect on the tarpaulin sheet (right)
PHOTO • M. Palani Kumar

प्रिया आणि गोपाळ तिळाची बोंडं झोडतात (डावीकडे) आणि तीळ ताडपत्रीवर गोळा होतात (उजवीकडे)

Sesame seeds collected in the winnow (left). Seeniammal (right)  a brick kiln worker, helps out with cleaning the sesame seeds to remove stalks and other impurities
PHOTO • M. Palani Kumar
Sesame seeds collected in the winnow (left). Seeniammal (right)  a brick kiln worker, helps out with cleaning the sesame seeds to remove stalks and other impurities
PHOTO • M. Palani Kumar

सुपात गोळा केलेले तीळ (डावीकडे). वीटभट्टीवरच्या कामगार सीनीअम्मल तिळाची (उजवीकडे) बोंडं झोडायला, काडीकचरा काढून टाकायला मदत करतात

सगळ्यात आधी काढणी केलेल्या तिळावर झाकलेली ताडपत्री काढतात. माल थोडे दिवस झाकून ठेवल्यावर आत ऊब तयार होते आणि बोंडं फुटतात आणि तीळ बाहेर येतात. त्यानंतर सीनीअम्मल एका काठीने अगदी सराईतपणे तिळाची बोंडं उलटसुलट फिरवतात. पूर्ण पिकलेल्या आणि सुकलेल्या बोंडांना फुटायला वेळ लागत नाही आणि ती उलून त्यातून तयार तीळ बाहेर पडतात. पडलेले तीळ गोळा करून हातानेच त्याचे छोटे छोटे ढीग करून ठेवतात. सगळी बोंडं झोडून त्यातले तीळ बाहेर काढेपर्यंत त्यांचं हे काम सुरूच राहतं.

प्रिया, गोपाल आणि इतर मजूर बोंडं काढून मागे राहिलेलं काड बांधून ठेवतात. आजकाल जळणासाठी याचा वापर होत नाही. पूर्वी साळी उकळायला वापर व्हायचा पण आजकाल सगळे मिलला तांदूळ घेऊन जातात. त्यामुळे मागे राहिलेलं काड सरळ जाळून टाकलं जातं.

पूर्वी वापरात असलेल्या किती तरी पद्धती आता वापरातून नाहिश्या झाल्या आहेत. उइर वेली म्हणजे वेलीचं किंवा झाडांचंच कुंपण असायचं पूर्वी. ते आता दिसत नाही. “पूर्वी तशी कुंपणं होती तेव्हा खाली बिळं करून कोल्हे रहायचे. त्यांच्यामुळे पक्षी किंवा इतर प्राणी येऊन शेतातला माल खाऊ शकायचे नाहीत. पण आजकाल कोल्हा पहायलाही मिळत नाही!” ते खेदाने म्हणतात.

“अगदी खरंय,” वडिवेलन दुजोरा देतात. “पूर्वी इथे सगळीकडे कोल्हेच कोल्हे असायचे. माझ्या लग्नाआधी एकदा मला आठवतंय की नदीच्या काठावरून मी एक पिलू उचलून आणलं होतं. मला वाटलं छान, केसाळ असं कुत्रं आहे. पण ते पाहिल्या पाहिल्याच माझे वडील म्हणाले की हे दिसायला जरासं निराळं वाटतंय. त्या रात्री आमच्या घराच्या मागेच कोल्ह्याची कोल्हेकुई ऐकू आली होती. मग मी जिथून ते पिलू आणलं तिथेच परत नेऊन ठेवून आलो!”

आम्ही बोलत होतो तोपर्यंत सीनीअम्मलनी झोडलेले तीळ सुपात घेतले. डोक्यावर सूप धरून उफणणी सुरू केली. एका लयीत चालणारं पण भरपूर ताकद लागणारं हे काम काही साधं नाही. सुपातले तीळ पावसासारखे निनादत खाली पडतात.

Gopal's daughter-in-law cleans the seeds using a sieve (left) and later they both gather them into sacks (right).
PHOTO • M. Palani Kumar
Gopal's daughter-in-law cleans the seeds using a sieve (left) and later they both gather them into sacks (right).
PHOTO • M. Palani Kumar

गोपाळ यांची सून तीळ चाळून घेतीये (डावीकडे) त्यानंतर दोघं मिळून माल पोत्यात भरतो (उजवीकडे)

Priya helps gather the stalks (left). Gopal then carries it (right) to one side of the field. It will later be burnt
PHOTO • M. Palani Kumar
Priya helps gather the stalks (left). Gopal then carries it (right) to one side of the field. It will later be burnt.
PHOTO • M. Palani Kumar

प्रिया काड गोळा करतीये (डावीकडे). गोपाळ काड बांधून रानात कडेला रचून ठेवतात. काही काळाने ते पेटवून देतील

*****

श्रीरंगमच्या श्री रंगा मरच्चेक्क म्हणजेच तेलाच्या लाकडी घाण्यावर रेडिओवर एक जुनं तमिळ गाणं सुरू आहे. रोकड खतावणीच्या मागे घाण्याचे मालक आर. राजू बसलेत. घाण्यात तिळाचं तेल निघतंय आणि त्याचा आवाज भरून राहिलाय. मोठाल्या स्टीलच्या पातेल्यांमध्ये सोनेरी झाक असलेलं पिवळं धम्मक तेल काठोकाठ भरलं जातं. मागे अंगणात तीळ वाळत घातलाय.

“१८ किलो तीळ घाण्यात गाळला जातो त्याला दीड तास लागतात. त्यामध्ये १.५ किलो ताडगूळ पडतो. ८ लिटर तेल निघतं. स्टीलच्या घाण्यापेक्षा यामध्ये जरा कमी तेल निघतं,” राजू सांगतात. ते तेल गाळायला किलोमागे तीस रुपये घेतात. लाकडी घाण्याचं तिळाचं तेल ४२० रु. किलो भावाने विकलं जातं. “आम्ही फक्त उत्तम दर्जाचा तीळच वापरतो. एक तर शेतकऱ्यांकडून थेट विकत घेतो किंवा मग गांधी मार्केटमध्ये १३० रु. किलो भावाने विकत घेतो. तेलाची चव वाढावी यासाठी चांगल्या दर्जाचा ताडगूळ घ्यायचा तर ३०० रु. किलो भाव आहे.”

दिवसभरात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चारदा घाणा चालतो. ताजं गाळलेलं तेल निवळण्यासाठी उन्हात ठेवलं जातं. तीळाची पेंड म्हणजे येल्ल पुन्नाक्क तेलकट आणि चिकट असते. शेतकरी आपल्या जनावरांसाठी ३५ रु. किलोने ही पेंड विकत घेऊन जातात.

आपल्या एकरभर शेतात तिळाची शेती करण्यासाठी, मग पेरणी, वेचणी, झोडणी ते अगदी पोत्यात माल भरेपर्यंत २०,००० रुपये खर्च येतो असं राजू सांगतात. एकरी ३ क्विंटलहून जास्त उत्पादन होते. तीन महिन्याच्या पिकातून आपल्याला एकरी १५,००० ते १७,००० नफा होत असल्याचं ते सांगतात.

आणि खरी गोम तर तिथेच आहे, वडिवेलन सांगतात. “कष्ट आम्ही करतोय, पण त्याचा फायदा कुणाला मिळतोय माहितीये? व्यापाऱ्यांना. आमच्याकडून माल घेतला की भाव लगेच दुप्पट,” ते म्हणतात. “ते त्यात काही तरी भर घालतात का?” मानेनेच नकार देत ते म्हणतात. “म्हणूनच आम्ही तीळ विकत नाही. आम्ही घरच्यापुरता तीळ करतो, खाण्यापुरता. बस्स...”

The wooden press at Srirangam squeezes the golden yellow oil out of the sesame seeds
PHOTO • M. Palani Kumar
The wooden press at Srirangam squeezes the golden yellow oil out of the sesame seeds
PHOTO • M. Palani Kumar

श्रीरंगमच्या लाकडी घाण्यातून तिळाचं सोनेरी रंगाचं तेल निघतं

Gandhi market in Trichy, Tamil Nadu where sesame and dals are bought from farmers and sold to dealers
PHOTO • M. Palani Kumar
Gandhi market in Trichy, Tamil Nadu where sesame and dals are bought from farmers and sold to dealers
PHOTO • M. Palani Kumar

तमिळ नाडूच्या तिरुचीच्या गांधी मार्केटमध्ये शेतकरी तीळ आणि उडीद-मूग घेऊन येतात आणि व्यापाऱ्यांना विकतात

तिरुचीच्या गांधी मार्केटमध्ये तिळाच्या दुकानांमध्ये लगबग सुरू आहे. बाजाराबाहेर मूग-उडीद आणि तिळाच्या पोत्यांवर शेतकरी बसले होते. अंधाऱ्या दुकानांमध्ये व्यापारी बसलेत. वाड-वडलांची ही दुकानं आहेत. पी. सर्वानन, वय ४५ सांगतात की आम्ही गेलो तेव्हा उडदाची सगळ्यात जास्त आवक झाली होती. मार्केटमध्ये काम करणाऱ्या बाया आणि गडी चाळण मारून उडीद गोण्यांमध्ये भरत होते. “तिळाची आवक आता आता सुरू झालीये,” ते सांगतात. “आता गोण्या यायला लागतील.”

५५ वर्षीय एस. चंद्रसेकरन म्हणतात की सर्वात जास्त उतारा असतानाही त्यांच्या वडलांच्या काळात याच्या चारपट उत्पादन होत होतं. “जून महिन्यात २,००० येल्ल मूटइ म्हणजेच तिळाच्या गोण्या गांधी मार्केटला येतात. गेल्या काही वर्षांत हीच संख्या ५०० वर आली आहे. शेतकरी आता या पिकाची लागवड करत नाहीत. किती कष्ट आहेत या पिकात. भाव वाढतच नाहीयेत – १०० ते १३० रुपये किलोच्या पुढे जातच नाहीत. त्यामुळे आता शेतकरी उडदाकडे वळलेत. कारण तो मशीनवर काढता येतो आणि पोत्यात भरला जातो.”

पण तिळाच्या तेलाला मात्र भाव चांगला मिळतो. आणि त्यात वाढच होतीये. पण शेतकऱ्यांना चांगला भाव का मिळत नाही? “सगळं मार्केटवर अवलंबून आहे,” चंद्रसेकरन सांगतात. “मागणी आणि पुरवठा, इतर राज्यात किती उत्पादन झालंय किंवा मोठ्या तेलघाण्याच्या मालकांकडे किती माल पडून आहे त्यावर सगळं ठरतं.”

आणि सगळीकडेच हीच कथा आहे. सगळ्याच पिकांबद्दल आणि उत्पादनांबद्दल हेच घडतं. काही जणांवर कृपा तरी काही जणांवर मात्र वक्रदृष्टी असते. आणि कोणावर लोभ आहे हे वेगळं सांगायलाच नको...

*****

खाद्यतेल उद्योगाचा इतिहास पाहिला तर त्यात अनेक गोष्टींचा गुंता आपल्याला सापडतो. एकीकडे आयात आणि दुसरीकडे पिकं आणि पिकांशी संबंधित सांस्कृतिक प्रथा मात्र विरत चालल्या आहेत. आयआयटी दिल्लीत समाजशास्त्र आणि धोरण अभ्यास विभागात सहयोगी प्राध्यापक असणाऱ्या डॉ. रिचा कुमार आपल्या ‘ फ्रॉम सेल्फ-रिलायन्स टू डीपनिंग डिस्ट्रेस (स्वावलंबनाकडून अरिष्टाकडे)’ या शोधनिबंधात लिहितातः “१९७६ पर्यंत भारतात खाद्यतेलाची जेवढी गरज होती त्याच्या ३० टक्के तेल आयात होत होतं.” पुढे त्या म्हणतात, “सहकारी दूध संस्थांमुळे दुधाचं उत्पादन वाढलं तोच प्रयोग इथे तेलाबाबत सरकारला करायचा होता.”

Freshly pressed sesame oil (left). Various cold pressed oils (right) at the store in Srirangam
PHOTO • M. Palani Kumar
Freshly pressed sesame oil (left). Various cold pressed oils (right) at the store in Srirangam.
PHOTO • M. Palani Kumar

तिळाचं ताजं तेल (डावीकडे). श्रीरंगमच्या दुकानातली वेगवेगळ्या प्रकारची तेलं (उजवीकडे)

डॉ. कुमार सांगतात, “तेल क्रांती झाल्यानंतरही नव्वदच्या दशकाच्या मध्यावर खाद्यतेलाची टंचाई वाढत होती. कारण तेलबिया-डाळी-धान्य अशा मिश्र शेतीची जागा हळू हळू गहू, भात आणि उसाने घेतली कारण या पिकांना सरकारकडून प्रोत्साहनही दिलं गेलं आणि हमीभावही. १९९४ मध्ये खाद्यतेलाची आयात खुली करण्यात आली आणि त्यानंतर बाजारात इंडोनेशियाचं स्वस्त पामतेल आणि अर्जेंटिनाच्या सोयाबीन तेलाचा सुळसुळाट झाला.”

“इतर तेलं, साजूक तुपाला पर्याय म्हणून तयार करण्यात येणारं वनस्पती तूप या सगळ्यापेक्षा पाम तेल आणि सोयाबीन तेल स्वस्त होतं. या दोन तेलांमुळे अनेक प्रकारच्या तेलांची बाजारपेठच बंद झाली. विविध भागात वेगळ्या प्रकारची तेलं गाळण्यात यायची. मोहरी, तीळ, जवस, खोबरेल आणि शेंगदाणा तेलाचं उत्पादन घटलं कारण भावच मिळत नसल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळले,” डॉ. कुमार लिहितात.

आणि आता तर परिस्थिती अशी आहे की पेट्रोल आणि सोन्यानंतर सर्वात जास्त आयात काय होत असेल तर खाद्यतेल. शेतमालाच्या एकूण आयातीच्या ४० टक्के आणि सकल आयातीच्या ३ टक्के आयात फक्त खाद्यतेलाची आहे असं जून २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुशिंग फॉर सेल्फ सफिशियन्सी इन एडिबल ऑइल्स इन इंडिया (भारतात खाद्यतेलाच्या क्षेत्रात आत्म-निर्भरतेच्या दिशेने) या शोधनिबंधात म्हटलं आहे. देशातली खाद्यतेलाची ६० टक्के गरज आयातीतून भागवली जात असल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

*****

वडिवेलन यांच्या कुटुंबाचा ६० टक्के खर्च टॅक्सी चालवून भागवला जातो. त्यांच्या गावापुढे जाऊन कावेरी दोन पात्रांमध्ये वाहते. वडिवेलन यांचा वेळ आणि खरं तर आयुष्यही असंच दोन भागांमध्ये वाटलं गेलं आहे. शेती आणि ड्रायविंग. शेती कष्टाची आहे, ते सांगतात. “बेभरवशाची तर आहेच पण फार गोष्टी घालाव्या लागतात.”

दिवसभर ते दुसरं काम करतात (आणि खूप वेळ टॅक्सी चालवतात) म्हणून त्यांची पत्नी शेतातलं काम स्वतः पाहते. घरचं तर सगळं काम तिलाच पहावं लागतं. वडिवेलनही बरीच मदत करतात. कधी कधी रात्री पिकाला पाणी द्यावं लागतं, कधी पिकाच्या काढणीसाठी यंत्र शोधत फिरावं लागतं. कारण पिकं काढणीला आली की सगळ्यांच्याच शेतात लगबग असते. ते पूर्वी शेतात अंगमेहनतीचं भरपूर काम करायचे. “पण आजकाल मी टिकाव हातात घेतला तरी माझी पाठ धरते आणि मग मला गाडी चालवता येत नाही!”

Women workers winnow (left) the freshly harvested black gram after which they clean and sort (right)
PHOTO • M. Palani Kumar
Women workers winnow (left) the freshly harvested black gram after which they clean and sort (right)
PHOTO • M. Palani Kumar

शेतमजूर बाया उडदाची उफणणी करतायत (डावीकडे) त्यानंतर ते निवडून, साफ करून माल भरला जातो (उजवीकडे)

त्यामुळे मग हे दोघं शेतात मजूर लावतात. अर्थात मिळाले तर. खुरपणी, लावणी, तिळाची काढणी आणि झोडणी अशी कामं करण्यासाठी त्यांना म्हाताऱ्या बायाच कामाला मिळतात.

उडदाची शेतीही सोपी नाही. “पीक हातात येण्याआधी आणि नंतर लगेच पाऊस पडला. इतका त्रास झाला, काढलेला उडीद कोरडा ठेवण्यासाठी किती खटाटोप करावा लागला.” ते जे काही करतात ते ऐकल्यावर माझा त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. आणि फक्त त्यांच्याबद्दल नाही तर माझ्या इडली आणि डोश्यामधल्या उळंद म्हणजेच उडदाबद्दलही.

“मी विशीत असताना ट्रक चालवायचो. १४ चाकाची लॉरी होती. आम्ही दोघं ड्रायव्हर होतो आणि आळीपाळीने गाडी चालवायचो. सगळा देश आम्ही पालथा घातला होता. उत्तर प्रदेश, काश्मीर, राजस्थान, गुजरात...” ते प्रवासात काय काय खायचे आणि प्यायचे (उंटणीच्या दुधाचा चहा, रोटी आणि दाल आणि अंडा भुर्जी) कुठे अंघोळ करायचे (नदीवर, किंवा श्रीनगरसारख्या ठिकाणी अंघोळीची गोळी), गाडी चालवत असताना ते काय काय ऐकायचे (“इळयराजाची गाणी, अर्थात ‘कुथ पाट’, डोळा लागू नये म्हणून). प्रवासातली एकमेकांची संगत, गप्पा आणि गजाली आणि भुतंखेतं. “एका रात्री, मी लघवी करण्यासाठी ट्रकमधून खाली उतरलो. डोक्यावर कांबळं घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी इतर लोक सांगू लागले की त्यांना डोक्यावरून काही तरी ओढून घेतलेलं एक भूत दिसलं म्हणे!”

दूरदेशीचं ड्रायव्हिंग त्यांनी हळू हळू थांबवायचं ठरवलं. कारण अनेक आठवडे त्यांना घरापासून लांब रहावं लागायचं. लग्नानंतर ते आसपासच गाडी चालवू लागले आणि शेतीदेखील करू लागले. वडिवेलन आणि प्रियाची दोन मुलं आहेत – मुलगी दहावीत आणि मुलगा सातवीत शिकतोय. “त्यांना हवं ते सगळं देण्याचा आमचा प्रयत्न असतो, पण खरं सांगू त्यांच्यापेक्षा माझ्या लहानपणी मी जास्त आनंदात असायचो,” ते अगदी विचारपूर्वक सांगतात.

Vadivelan’s time is divided between farming and driving. Seen here (left)with his wife Priya in the shade of a nearby grove and with their children (right)
PHOTO • M. Palani Kumar
Vadivelan’s time is divided between farming and driving. Seen here (left)with his wife Priya in the shade of a nearby grove and with their children (right)
PHOTO • Aparna Karthikeyan

वडिवेलन यांचा वेळ आणि खरं तर आयुष्यही असंच दोन भागांमध्ये वाटलं गेलं आहे. इथे (डावीकडे) आपली पत्नी प्रियासोबत शेजारच्या राईत आणि मुलांसोबत (उजवीकडे)

त्यांच्या लहानपणच्या गोष्टी काही सरळसाध्या नाहीत. “तेव्हा आम्हाला काही कुणी लहानाचं मोठं केलं नाही,” असं म्हणत ते माझ्या दिशेने वळतात आणि हसतात. “आम्ही तसेच मोठे झालो.” नववीत असताना त्यांना स्लिपर्सचा पहिला जोड मिळाला. तोपर्यंत ते सगळीकडे अनवाणीच हिंडायचे. आजीने लावलेली किंवा रानातून हुडकून आणलेली पालेभाजी ते पन्नास पैशाला जुडी करून विकायचे. “त्यातही घासाघीस करणारे काही होते!” ते सुस्कारतात. ते सगळीकडे सायकलने जायचे, अंगात शाळेने दिलेली हाफपॅण्ट आणि शर्ट. “तीन महिने कपडे टिकायचे. घरी वर्षातून एकदाच नवीन कपडे घेतले जायचे.”

वडिवेलन हे खडतर आयुष्य लांघून गेले. ते चपळ होते, पळण्याच्या स्पर्धा जिंकायचे, पुरस्कार मिळवायचे. ते कबड्डीदेखील खेळायचे. नदीत पोहावं, मित्रांबरोबर घरी, बाहेर वेळ घालवावा आणि रोज रात्री अप्पायीच्या गोष्टी ऐकाव्यात. “गोष्ट अर्ध्यावर असतानाच मला झोप लागायची. मग पुढल्या रात्री ती तिथूनच गोष्ट सुरू करायची. तिला किती तरी गोष्टी यायच्या. राजे-राण्या, देवी-देवतांच्या... किती तरी.”

पण जिल्हा पातळीवरच्या स्पर्धांमध्ये मात्र ते भाग घेऊ शकले नाहीत कारण त्यांच्या घरच्यांना त्यासाठी लागणारे कपडे आणि आहार काही परवडणारा नव्हता. घरी जेवण म्हणजे कांजी, भात, कालवण आणि कधी कधी मांसमच्छी. शाळेत जेवणात उपमा मिळायचा. आणि संध्याकाळचं ‘स्नॅक’ म्हणून भाताची पेज असायची, मीठ घातलेली. हा त्यांचाच शब्द. आता मात्र त्यांच्या मुलांसाठी पाकिटबंद किती तरी प्रकारचं खाणं ते आणत असतात.

त्यांनी लहानपणी काढलेले कष्ट आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत यासाठी ते झटत असतात. मी दुसऱ्यांदा त्यांच्या गावी गेले तेव्हा कोल्लिदमच्या तीरावर त्यांची पत्नी आणि मुलगी रेती खणतात. सहा इंचावरच पाणी लागतं. “या नदीचं पाणी शुद्ध आहे,” प्रिया सांगते. रेतीचा एक डोंगर करून ती त्यात आपली केसाची पिन लपवून ठेवते आणि तिची मुलगी ती शोधून काढते. नदीच्या उथळ पाण्यात वडिवेलन आणि त्यांचा मुलगा अंघोळ करतात. तिथे आम्ही सोडून दुसरं कुणीच नाही. वाळूत ठसे दिसतात, सांजवेळी घरी परतणाऱ्या गायींच्या खुरांचे. नदीकाठचं गवत शहारतं. मोकळ्या, अथांग जागांचं सौंदर्य तिथे भरून राहिलेलं असतं. “हे तुम्हाला शहरात नाही मिळणार,” वडिवेलन म्हणतात आणि आम्ही घराच्या दिशेने चालू लागतो.

*****

पुढल्या वेळी मी नदीवर जाते तर जणू काही शहरच तिथे आलंय असं वाटतं. २०२३ चा ऑगस्ट महिना. वडिवेलन यांच्या गावी मी थेट एक वर्षानंतर जात होते. आडि पेरक्क साजरा होत होता. कावेरीच्या तीरावर साजऱ्या होणाऱ्या या सणात या नदीचा इतिहास, संस्कृती आणि विधींचा संगम आपल्याला पहायला मिळतो.

Vadivelan at a nearby dam on the Cauvery (left) and Priya at the Kollidam river bank (right)
PHOTO • Aparna Karthikeyan
Vadivelan at a nearby dam on the Cauvery (left) and Priya at the Kollidam river bank (right)
PHOTO • Aparna Karthikeyan

कावेरीवरील एका धरणापाशी उभे वडिवेलन (डावीकडे) आणि कोल्लिदम नदीच्या तीरावर प्रिया (उजवीकडे)

The crowd at Amma Mandapam (left), a ghat on the Cauvery on the occasion of Aadi Perukku where the river (right) is worshipped with flowers, fruits, coconut, incense and camphor.
PHOTO • Aparna Karthikeyan
The crowd at Amma Mandapam (left), a ghat on the Cauvery on the occasion of Aadi Perukku where the river (right) is worshipped with flowers, fruits, coconut, incense and camphor.
PHOTO • Aparna Karthikeyan

आडि पेरक्क साजरा करण्यासाठी कावेरी नदीवरील (डावीकडे) अम्मा मंडपममध्ये या घाटावर जमलेले लोक फुलं, फळं, नारळ वाहत, कापूर पेटवत नदीची पूजा करतायत (उजवीकडे)

“आज गर्दी असणारे चिक्कार,” श्रीरंगमच्या एका शांतशा गल्लीत गाडी लावता लावता वडिवेलन आम्हाला आधीच सांगून ठेवतात. आम्ही चालत कावेरीच्या तीरावर असलेल्या अम्मा मंडपम या घाटावर पोचतो. भाविकांची तिथे गर्दी झालीये. सकाळचे साडेआठच वाजले होते तरी पाय ठेवायलाही जागा नव्हती. पायऱ्यांवर पहावं तिथे लोक आणि केळीच्या पानावर नारळ, उदबत्ती खोवलेली केळी, हळदीचे छोटे गणपती, फुलं, फळं आणि कापूर ठेवलेली केळीची पानं. सगळीकडे सणाचा उत्साह, जणू काही मोठं लग्नच असावं.

नवपरिणित जोडपी आणि कुटुंबं भटजींच्या अवतीभवती गोळा झालेली दिसतात. थाली म्हणजेच मंगळसूत्रातले सोन्याचे दागिने नव्या धाग्यामध्ये घालून घेतली जातात. त्यानंतर वर-वधू पूजा करून गळ्यातले लग्नाच्या दिवसाचे हार नदीला अर्पण करतात. स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात हळदीने पिवळे केलेले धागे बांधतात. जमलेल्या गोताला कुंकू आणि प्रसाद दिला जातो. कावेरीच्या पल्याडच्या तीरावर तिरुचीचं प्रसिद्ध गणपती मंदीर उन्हात चमकत असतं.

आणि नदी आपल्या वेगात वाहत राहते, लोकांच्या प्रार्थना आणि इच्छा पोटात घेऊन, लोकांची रानं आणि स्वप्नं भिजवत, तशीच जशी वाहत आहे हजारो वर्षांपासून....

फ्रॉम सेल्फ-रिलायन्स टू डीपनिंग डिस्ट्रेसः द अँबिव्हेलन्स ऑफ द येलो रेव्होल्युशन इन इंडिया हा शोधनिबंध उपलब्ध करून डॉ. रिचा कुमार यांचे मनापासून आभार.

या संशोधन प्रकल्पास अझीम प्रेमजी युनिवर्सिटी, बंगळुरूकडून संशोधन सहाय्य कार्यक्रम २०२० अंतर्गत अर्थसहाय्य मिळाले आहे.

Aparna Karthikeyan

ಅಪರ್ಣಾ ಕಾರ್ತಿಕೇಯನ್ ಓರ್ವ ಸ್ವತಂತ್ರ ಪತ್ರಕರ್ತೆ, ಲೇಖಕಿ ಮತ್ತು ʼಪರಿʼ ಸೀನಿಯರ್ ಫೆಲೋ. ಅವರ ವಸ್ತು ಕೃತಿ 'ನೈನ್ ರುಪೀಸ್ ಎನ್ ಅವರ್' ತಮಿಳುನಾಡಿನ ಕಣ್ಮರೆಯಾಗುತ್ತಿರುವ ಜೀವನೋಪಾಯಗಳ ಕುರಿತು ದಾಖಲಿಸಿದೆ. ಅವರು ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಐದು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಅಪರ್ಣಾ ತನ್ನ ಕುಟುಂಬ ಮತ್ತು ನಾಯಿಗಳೊಂದಿಗೆ ಚೆನ್ನೈನಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ.

Other stories by Aparna Karthikeyan
Photographs : M. Palani Kumar

ಪಳನಿ ಕುಮಾರ್ ಅವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಸ್ಟಾಫ್ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್. ದುಡಿಯುವ ವರ್ಗದ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ಅಂಚಿನಲ್ಲಿರುವ ಜನರ ಬದುಕನ್ನು ದಾಖಲಿಸುವುದರಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಆಸಕ್ತಿ. ಪಳನಿ 2021ರಲ್ಲಿ ಆಂಪ್ಲಿಫೈ ಅನುದಾನವನ್ನು ಮತ್ತು 2020ರಲ್ಲಿ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ ಮತ್ತು ಫೋಟೋ ದಕ್ಷಿಣ ಏಷ್ಯಾ ಅನುದಾನವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಅವರು 2022ರಲ್ಲಿ ಮೊದಲ ದಯನಿತಾ ಸಿಂಗ್-ಪರಿ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟರಿ ಫೋಟೋಗ್ರಫಿ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದರು. ಪಳನಿ ತಮಿಳುನಾಡಿನ ಮ್ಯಾನ್ಯುವಲ್‌ ಸ್ಕ್ಯಾವೆಂಜಿಗ್‌ ಪದ್ಧತಿ ಕುರಿತು ಜಗತ್ತಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿದ "ಕಕ್ಕೂಸ್‌" ಎನ್ನುವ ತಮಿಳು ಸಾಕ್ಷ್ಯಚಿತ್ರಕ್ಕೆ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.

Other stories by M. Palani Kumar

ಪಿ. ಸಾಯಿನಾಥ್ ಅವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಸ್ಥಾಪಕ ಸಂಪಾದಕರು. ದಶಕಗಳಿಂದ ಗ್ರಾಮೀಣ ವರದಿಗಾರರಾಗಿರುವ ಅವರು 'ಎವೆರಿಬಡಿ ಲವ್ಸ್ ಎ ಗುಡ್ ಡ್ರಾಟ್' ಮತ್ತು 'ದಿ ಲಾಸ್ಟ್ ಹೀರೋಸ್: ಫೂಟ್ ಸೋಲ್ಜರ್ಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯನ್ ಫ್ರೀಡಂ' ಎನ್ನುವ ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale