दुपार होत आलीये. गोलपी गोयारी तयार होऊन घरी वाट बघत बसलीये. पिवळे पट्टे असलेलं दोखोना वस्त्र नीटनेटकं करून घेत असतानाच शाळेत जाणाऱ्या आठ जणी तिच्याकडे येतात. त्यांनी देखील तिच्यासारखीच दोखोना नेसलीये आणि लाल रंगाच्या आरोनिया घेतल्या आहेत. आसामच्या बोडो समुदायाचं हा परंपरागत वेष.

“मी या मुलींना बोडो नृत्य शिकवते,” गोलपी सांगते. ती स्वतः बोडो आहे आणि बक्सा जिल्ह्याच्या गोआलगावमध्ये राहते.

बक्सा, कोक्राझार, उदलगुडी आणि चिरांग या चार जिल्ह्यांचा मिळून बोडोलँड प्रदेश तयार होतो. या प्रदेशाचं अधिकृत नाव बोडोलँड टेरिटोरियल रीजन असं आहे. आसामच्या आदिम जमातींपैकी एक असलेले बोडो आदिवासी इथे राहतात. भूतान आणि अरुणाचल प्रदेशाच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेला हा प्रदेश ब्रह्मपुत्र नदीच्या किनाऱ्यावर आहे.

“त्या स्थानिक उत्सव आणि समारंभांमध्येही आपली कला सादर करतात,” तिशी पार केलेली गोलपी सांगते. पारीचे संस्थापक संपादक पी. साईनाथ यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये एकोणिसावा यूएन ब्रह्मा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी हा पुरस्कार देण्यात आला होता. त्या निमित्ताने बोडो नृत्य सादर करण्यासाठी गोलपीने मोठ्या मनाने आपल्या घरी सगळी तयारी केली होती.

बोडो तरुणी आणि स्थानिक वादकांचा हा कलाविष्कार पहा

नाचाची तयारी होते आणि गोबर्धन तालुक्यातले वादक गोलपीच्या घरी आपली वाद्यं जुळवू लागतात. त्यांनी खोत घोसला जाकिट घातलंय आणि हिरवी आणि पिवळी आरोनिया परिधान केली आहे. काहींनी डोक्याला मफलर बांधलाय. कुठल्याही सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमात बोडो पुरुष असा वेष करतात.

बोडो सणांमध्ये नेहमी वाजवली जाणारी वाद्यं म्हणजे सिफुंग (मोठी बासरी), खाम (ढोल) आणि सेरजा (एक प्रकारचं व्हायोलिन). सगळी वाद्यांना आरोनाई बांधतात. तिच्यावर पारंपरिक बोन्दुरान नक्षीकाम केलेलं असतं. आणि ही सगळी वाद्यंही इथेच तयार झालेली असतात.

या वादकांपैकी एक म्हणजे ख्वार्वमदाओ बासुमातारी. ते खाम वाजवणार. गोळा झालेल्या सगळ्यांशी ते थोडा संवाद साधतात आणि सांगतात की त्यांचा हा गट आता सुबुनस्री आणि बागुरुब्मा हे नाच प्रकार सादर करणार आहेत. “वसंतामध्ये भात लावल्यानंतर किंवा भातं काढल्यानंतर ब्विसागु या सणावेळी हा बागुरुम्बा हा नाच सादर केला जातो. लग्नामध्येही सगळे आपला आनंद साजरा करण्यासाठी हा नाच करतात.”

रणजित बासुमातारी सेरजा वाजवतोय

नाच करणारे सगळे जण गोळा झाल्यानंतर रणजित बासुमातारी पुढे येतो. सगळे नाच सादर झाल्यानंतर तो एकटा काही काळ सेरजा वाजवतो. लग्न किंवा इतर समारंभांमध्ये आपली कला सादर करून त्यातून चार पैसे कमावणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी तो एक. ही सगळी धामधूम सुरू असताना गोलपी कुठे तरी गायब झालीये वाटतं. सकाळपासून पाहुण्यांना खाऊ घालण्यासाठी तिने कष्टाने अनेक पदार्थ तयार केले आहेत.

मग ती सगळे पदार्थ छान मांडून जेवायला वाढते. सोबइ जंग सामो (उडदाची डाळ आणि गोगलगायी), तळलेला भांगुन मासा आणि ओन्ला जंग दाउ बेदोर (भाताच्या पिठाबरोबर कोंबडीचं कालवण), केळफूल आणि डुकराचं मांस, बांबू पत्ती, तांदळाची वाइन आणि छोटी जहाल लाल मिरची. सकाळी सादर झालेल्या, भुरळ पाडणाऱ्या नाचानंतर आता हे खाणं म्हणजे चैनच.

Himanshu Chutia Saikia

ಹಿಮಾಂಶು ಚುಟಿಯಾ ಸೈಕಿಯಾ ಸ್ವತಂತ್ರ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟರಿ ಚಲನಚಿತ್ರ ನಿರ್ಮಾಪಕ, ಸಂಗೀತ ನಿರ್ಮಾಪಕ, ಛಾಯಾಗ್ರಾಹಕ ಮತ್ತು ಅಸ್ಸಾಂನ ಜೋರ್ಹಾಟ್ ಮೂಲದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಕಾರ್ಯಕರ್ತ. ಇವರು 2021ರ ʼಪರಿʼ ಫೆಲೋ.

Other stories by Himanshu Chutia Saikia
Text Editor : Riya Behl

ರಿಯಾ ಬೆಹ್ಲ್‌ ಅವರು ಲಿಂಗತ್ವ ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಣದ ಕುರಿತಾಗಿ ಬರೆಯುವ ಮಲ್ಟಿಮೀಡಿಯಾ ಪತ್ರಕರ್ತರು. ಈ ಹಿಂದೆ ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ (ಪರಿ) ಹಿರಿಯ ಸಹಾಯಕ ಸಂಪಾದಕರಾಗಿದ್ದ ರಿಯಾ, ಪರಿಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ತರಗತಿಗಳಿಗೆ ತಲುಪಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಣ ತಜ್ಞರೊಂದಿಗೆ ನಿಕಟವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದರು.

Other stories by Riya Behl
Translator : Medha Kale

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale