हत्तीच्या पायांचे ठसे मिळतात का ते पाहण्यासाठी आम्ही डोंगरात हिंडत होतो.

आणि तिथे मऊ मातीत आम्हाला अगदी ताटांहूनही मोठ्या आकाराचे अनेक ठसे सापडू लागतात. काही दिवसांपूर्वीच्या ठशांची माती आता गळून पडायला लागलीये. आणि बाकीच्या ठशांवरून हत्तीने इथे काय काय उद्योग केलेत ते समजून येतंयः थोडीफार भटकंती, भरपेट जेवण आणि भरपूर लीद. आणि जाता जाता दिलेल्या धक्क्यांच्या खुणा सर्वत्रः ग्रॅनाइटचे खांब, कुंपणाच्या तारा, फाटकं...

हत्तीसंबंधी जे जे काही सापडेल ते आम्ही कॅमेऱ्यात टिपत होतो. पायाच्या ठशाचा एक फोटो मी माझ्या संपादकाला पाठवला. “या ठशाचा मालक हत्ती होता का आसपास?” फार आतुरतेने तो विचारतो. पण मी मात्र त्याच्या मनातली आशा खरी न ठरो असा धावा केला.

कारण कसंय, कृष्णगिरीच्या गंगनहळ्ळी पाड्यावरचे हत्ती काही सोंडेने डोक्यावर थोपटणारे आणि केळी मागणारे गोंडस हत्ती नाहीत. देवळातल्या हत्तींना कदाचित असं काही आवडत असेल. पण त्यांचे जंगलात राहणारे हे भाऊ मात्र वन्य आहेत आणि कायम भुकेले.

तमिळ नाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातल्या नाचणीच्या शेतकऱ्यांना मी २०२१ च्या डिसेंबरमध्ये भेटायला गेले आणि माझ्याही नकळत माझे पाय या हत्तींच्या मागावर पडले. मला वाटत होतं की शेतीचं अर्थकारण वगैरे विषयांवर चर्चा होईल. पण ज्यांच्या ज्यांच्याशी बोलले त्या सगळ्यांचं म्हणणं एकच. आता केवळ घरच्यापुरती नाचणी पिकतीये आणि याला कारणीभूत कोण, तर हत्ती. तुटपंजा भाव (किलोमागे २५-२७ रुपये. जर ३५-३७ रुपये भाव मिळाला तर त्यांचं किमान नुकसान तर होणार नाही), वातावरणातले बदल आणि प्रचंड प्रमाणातला पाऊस यामुळे शेतकरी कात्रीत सापडला आहे. आणि ‘घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं’ म्हणावं तसं हत्ती आता पिकात घुसतायत आणि शेतकऱ्याचं कंबरडं पारच मोडून चाललंय.

“हत्ती हा फार बुद्धीमान प्राणी आहे. कुंपणाच्या तारा पायाने खाली कशा वाकवायच्या आणि मग कुंपण पार कसं करायचं त्याचा शोध त्याने आता लावलाय. आणि विजेचा प्रवाह असलेल्या ताऱांच्या कुंपणासाठी झाडाच्या फांद्यांचा वापर कसा करायचा, तेही,” आनंदरामू रेड्डी सांगतात. “आणि ते कायम कळपात हिंडत असतात.” देनकनीकोट्टई तालुक्यातल्या वदरा पालयम पाड्यावरच्या आनंदरामूंना सगळे प्रेमाने आनंदा म्हणतात. मेलगिरी राखीव जंगलाच्या वेशीवर ते आमच्याशी बोलत होते. हे जंगल कावेरी उत्तर वन्यजीव अभयारण्याच्या क्षेत्रात मोडतं.

The large footprint of an elephant.
PHOTO • M. Palani Kumar
Damage left behind by elephants raiding the fields for food in Krishnagiri district
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः हत्तीच्या पायाचा मोठाला ठसा. उजवीकडेः अन्नाच्या शोधात आलेल्या हत्तींनी शेतात कसा विध्वंस केला त्याच्या खुणा

गेल्या कित्येक वर्षांपासून हत्ती जंगलांमधून बाहेर पडत शेतात घुसायला लागले आहेत. अगडबंब आकाराचे आणि स्थूलचर्मी म्हणजेच जाड कातडीचे हत्ती कळपाने गावात घुसतात, नाचणीवर ताव मारतात आणि बाकी पिकं तुडवत जातात. शेवटी शेतकऱ्यांनी नाचणीला पर्यायी पिकं घ्यायला सुरुवात केली आहे. टोमॅटो, झेंडू आणि गुलाब. जे काही बाजारात विकलं जाईल आणि मुख्य म्हणजे हत्तीला खायला आवडत नाही ते. “२०१८-१९ मध्ये इथे विजेचा प्रवाह सोडलेलं कुंपण घातलंय. तेव्हापासून हत्तींचा कळप बाहेर आलेला नाही,” आनंदा मला धीर देत सांगतात. “पण, नर हत्तींचं काही करू शकत नाही. मोट्टई वाल, मखना आणि गिरी... त्यांना भूकच एवढी लागते की ते आमच्या शेतात येणारच.”

“आजच्या जंगलांची जी काही अवस्था झालीये तीच मानव-वन्यजीव संघर्षाला कारणीभूत आहे,” ए. आर. संजीव कुमार सांगतात. तमिळ नाडूच्या धर्मपुरी आणि कृष्णगिरी जिल्ह्यात ते मानद वन्यजीव रक्षक म्हणून काम करतात. एकट्या कृष्णगिरीमध्येच तब्बल ३३० पेक्षा जास्त गावांना हत्तींचा त्रास आहे.

मी या भागात फिरून आले आणि त्यानंतर काही दिवसांत झूमवरून संजीव कुमार यांनी मला एक सादरीकरण पाठवलं. कुमार केनेथ अँडरसन नेचर सोसायटी या वन्यजीव संवर्धन संस्थेचे संस्थापक सदस्य आणि माजी अध्यक्षही आहेत. संगणकाच्या पडद्यावर जे चित्र दिसत होतं ते थक्क करणारं होतं. काळ्या रंगावर हत्तीच्या आकाराचे ठिपके दिसत होते. “हा प्रत्येक ठिपका म्हणजे जिथे जिथे असा संघर्ष होतोय ती गावं. पिकांच्या नुकसानभरपाईसाठी केलेल्या दाव्यांच्या आधारे ही विदा गोळा करण्यात आली आहे,” ते सांगतात.

ईशान्येकडच्या मोसमी वाऱ्यांनी आणलेला पाऊस संपला की हत्ती चढाई करतात. कारण पिकं काढणीला आलेली असतात. “दर वर्षी याच काळात, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात [कृष्णगिरी जिल्ह्यात] १० ते १२ माणसं मेली आहेत. बहुतेक करून नाचणी काढण्याच्या काळात.” हत्तीही मरतात. “पलटवार असतोच. त्यात रुळ ओलांडून जाताना, महामार्गावरती गाडीची धडक लागून किंवा उघड्या विहिरींमध्ये पडूनही हत्ती दगावतात. आणि रानडुकरांसाठी लावलेल्या विजेच्या सापळ्यांचा धक्का बसूनही ते मरतात.”

हत्ती शंभराहून अधिक वनस्पती खातात, संजीव सांगतात. “झाडाचे वेगवेगळे भाग त्यांना आवडतात. पाळीव हत्तींचं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की ते २०० किलो गवत खातात आणि २०० लिटर पाणी पितात. पण जंगलात ऋतूमानाप्रमाणे यामध्ये बदल होतो आणि त्यानुसार त्यांच्या तब्येतीतही.”

In this photo from 2019, Mottai Vaal is seen crossing the elephant fence while the younger Makhna watches from behind
PHOTO • S.R. Sanjeev Kumar

२०१९ साली काढलेल्या या फोटोत मोट्टई वाल कुंपण ओलांडून जाताना दिसतोय तर मखना त्याच्याकडे पाहत मागे उभा आहे

त्यात भर पडलीये टणटणीची. घाणेरी म्हणून ओळखली जाणाऱ्या फुलांच्या या झुडुपांनी “आता होसूर क्षेत्रातल्या ८५-९० टक्के क्षेत्रावर कब्जा केलाय.” शेरडं किंवा गायीगुरं या झाडाला तोंडही लावत नाहीत. घाणेरी प्रचंड झपाट्याने वाढते. “बंडीपूर आणि नागरहोळेमध्येही हीच गत आहे. प्राण्यांना पाहण्यासाठी ज्या सफरी नेतात त्या मार्गावरची घाणेरी काढून टाकली जाते. मग गवत उगवतं आणि ते खाण्यासाठी येणाऱ्या हत्तींचं दर्शन पर्यटकांना होऊ शकतं.”

संजीव यांच्या मते हत्ती आपला अधिवास सोडून बाहेर येतायत याचं मुख्य कारण ही घाणेरी आहे. शिवाय हत्तींसाठी नाचणी म्हणजे मेजवानीच. “मी देखील हत्ती असतो ना, नुसता ताव मारला असता.” खास करून नर हत्ती तर पिकात घुसणार म्हणजे घुसणारच. २५ ते ३५ या वयामध्ये त्यांची फार झपाट्याने वाढ होते. आणि याच वयातले हत्ती पुढचा मागचा विचार न करता हिंडत असतात.

पण मोट्टई वालचं मात्र तसं नाही. तो जुना जाणता हत्ती आहे. त्याची सीमारेषा त्याला पक्की माहित आहे. संजीव यांच्या मते तो ४५ वर्षांहून मोठा, पन्नाशीला टेकलेला आहे. तो सगळ्यात ‘गोंडस’ हत्ती असल्याचं ते सांगतात. “तो मस्तीत होता ना तेव्हाचा एक व्हिडिओ मी पाहिलाय.” हत्ती वयाच्या विशिष्ट टप्प्यावर मस्तीत येतात. ही नैसर्गिक आणि निरामय प्रक्रिया असली तरी त्या २-३ महिन्यांच्या काळात ते जास्त हिंसक किंवा आक्रमक होऊ शकतात. “खरं तर या काळात ते हिंसक होतात. पण मोट्टई वाल एकदम शांत होता. त्याच्या कळपात छोटे-मोठे सगळेच हत्ती होते आणि तो मात्र एकटाच कडेला उभा होता. त्यानं खरंच जग पाहिलंय.”

संजीव यांच्या मते तो ९.५ फूट उंच असावा आणि त्याचं वजन ५ टन तरी असेल. “त्याचा एक चमचा आहे, मखना. ते दोघं इतर तरुण हत्तींबरोबर एकत्र असतात.” त्याची पोरं बाळं? मी विचारते. संजीव हसतात आणि म्हणतात, “चिक्कार असतील.”

मस्तीचा त्याचा काळ उलटून गेलाय तरी तो पिकात का घुसतो? आपली तब्येत सांभाळण्यासाठी तो असं करत असणार असा संजीव यांचा कयास आहे. “जंगलाच्या बाहेर त्याला पक्वान्नंच मिळतात ना – नाचणी, फणस, आंबे... पोट भरलं की तो जंगलात परत जातो.” इतर काही हत्ती कोबी, घेवडा, फ्लॉवर देखील खातात. हे काही त्यांचं अन्न नाही. त्यावर कीटकनाशकंही फवारलेली असतात, संजीव सांगतात.

“तीन वर्षांपूर्वी परिस्थिती फारच वाईट होती. टोमॅटो आणि घेवड्याच्या शेतीत ज्यांनी भरपूर खर्च केला होता त्यांचं मोठं नुकसान झालं. हत्ती एक घास खात असेल ना तर पाच घास वाया घालतो.” आता अधिकाधिक शेतकरी हत्तीला आवडत नाहीत अशा पिकांच्या शोधात आहेत. म्हणजे या भागातल्या शेतीतले बदल थेट मोट्टई वाल आणि त्याच्या मित्रांमुळे घडतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

A rare photo of Mottai Vaal, in the Melagiri hills
PHOTO • Nishant Srinivasaiah

मेलगिरीच्या डोंगरातला मोट्टई वालचा एक दुर्मिळ फोटो

कित्येक वर्षांपासून हत्ती जंगलाच्या बाहेर येऊन पिकात घुसतायत. कळपाने गावात येणारे हे हत्ती बहुतेक सगळी नाचणी फस्त करतात

*****

“पूर्वी आम्हाला काही तरी भरपाई मिळायची. पण आता [अधिकारी] नुसते फोटो काढतात, पैसा काही येत नाही.”
गुमलापुरम गावाच्या गंगनहळ्ळी पाड्यावरच्या शेतकरी, विनोदम्मा

मोट्टई वालला अगदी म्हणजे अगदी जवळून भेटलेल्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत गोपी शंकरसुब्रमणी. आम्ही गोपाकुमार मेनन यांच्यासोबत गोल्लापल्ली इथे मुक्कामाला होतो. तिथून अर्ध्या तासाच्या अंतरावर नवदर्शनम या सामाजिक संस्थेचा परिसर लागतो. तिथल्या आपल्या निवासाचं दार सकाळी गोपी यांनी उघडलं. आणि...

ज्याची वाट पाहतोय त्या मित्राच्या ऐवजी तिथे उभा होता एक हत्ती. उंच आणि अगडबंब. आणि हो, अगदी लाजाळू. क्षणात मोट्टई वाल आल्या पावली परत गेला. डोंगराच्या कडेला लागून असलेल्या आपल्या सुबक अशा घराच्या ओसरीत बसून गोपी आम्हाला किती तरी सुरस कथा सांगतात. काही नाचणीच्या आणि बऱ्याचशा हत्तींच्या.

एरोस्पेस इंजिनियर असलेल्या गोपी यांनी तंत्रज्ञानाला रामराम करत शेतीत हात घातला. गेली अनेक वर्षं ते गुमलापुरमच्या गंगनहळ्ली पाड्यावर असलेल्या नवदर्शनम ट्रस्टमार्फत १०० एकर जमिनीची व्यवस्था पाहतायत. “आमच्या भव्य दिव्य योजना नाहीत, मोठी बजेट नाहीत. सगळंच सुटसुटीत आणि सोपं.” त्यांच्या अनेक उपक्रमांमधला महत्त्वाचा म्हणजे अन्नधान्यासंबंधीची सहकारी संस्था. आसपासच्या शेतकऱ्यांच्या सहकार्यातून हे काम उभं राहिलं आहे. कमी जमीन आणि वर्षातले काही महिनेच शेती होत असल्यामुळे गावकरी पोटापाण्यासाठी जंगलावर अवलंबून होते.

“आम्ही ३० कुटुंबांना थोडी जागा दिली आणि खाद्यपदार्थांमध्ये मूल्यवर्धन कसं करायचं हे शिकवलं. आणि जंगलावर अवलंबून राहण्याची जी संस्कृती होती ती थोडी कमी केली. यातली बहुतेक कुटुंबं गंगनहळ्ळीची आहेत,” गोपी सांगतात. आता घरी खाण्यासाठी म्हणून नाचणी केली जाते. आणि जास्त उत्पन्न झालं तरच बाजारात विकली जाते.

गोपी गेल्या १२ वर्षांपासून नवदर्शनममध्ये राहतायत. या काळात झालेला सगळ्यात मोठा बदल म्हणजे नाचणीचं वाण बदललंय. पूर्वी ४-५ महिन्यांची नाचणी घेतली जायची. त्या जागी आता लवकर म्हणजेच ३ महिन्यात येणारं संकरित वाण वापरलं जातंय. ते म्हणतात की कोरडवाहू जमिनीवर पिकाचं आच्छादन जितका जास्त काळ असेल तितकं खरं तर चांगलं, कारण “त्या धान्याचं पोषण वाढत जातं.” अर्थातच कमी दिवसांच्या वाणात हा गुण नसतो. आणि याचा परिणाम काय? लोक एकाच्या जागी आता दोन मुद्दे (नाचणीचे उंडे) खातात. “इतका ढळढळीत फरक आहे.”

Gopi Sankarasubramani at Navadarshanam's community farm in Ganganahalli hamlet of Gumlapuram village.
PHOTO • M. Palani Kumar
A damaged part of the farm
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः गुमलापुरमच्या गंगनहळ्ळी पाड्यावरच्या नवदर्शन ट्रस्टच्या सामुदायिक शेतात उभे असलेले गोपी शंकरसुब्रमणी. उजवीकडेः शेतात झालेली नासधूस

शेतकरी तरीही कमी दिवसांच्या वाणाला पसंती देतात. कारण अशा पिकाची राखणही कमी काळ करावी लागते. शिवाय दोन्हीला भाव सारखाच मिळतो. “अर्थात शेतकऱ्यांना पिकं घेताना एकमेकांशी समन्वय साधावाच लागतो,” गोपी सांगतात. “जर अनेक जण राखणीला असतील तर एक या कोपऱ्यातून हाळी घालतो, तर दुसरा पलिकडच्या कोपऱ्यातून. आणि हत्ती बिचकून येत नाहीत. पण जर सगळ्यांनीच कमी दिवसाची पिकं घ्यायला सुरुवात केली, तर मात्र हत्ती थेट तुमच्या पिकात घुसणार...”

आमचं बोलणं सुरू असताना मागे पक्ष्यांची नादमधुर किलबिल चालू असते. कुणी शीळ घालतंय, कुणी हसतंय तर कुणी गातंय. जणू काही त्यांनाही या जंगलातल्या काही बातम्या आम्हाला सांगायच्या आहेत.

दुपारचं जेवण झालं. रागी मुद्दे आणि पालकाची भाजी. त्यानंतर शेंगदाण्याची चिक्की आणि नाचणीचे लाडू आमच्यासमोर आले. ज्यांनी हे सगळं बनवलं होतं त्या विनोदम्मा आणि बी. मंजुला कानडीत बोलतात आणि गोपी आणि त्यांचे सहकारी माझ्यासाठी दुभाष्याचं काम करतात. त्या दोघींचं असं म्हणणं आहे की पाऊस आणि हत्तींच्या तडाख्यात काहीच पीक हाती लागत नाही.

त्यांच्या रोजच्या जेवणात नाचणी आहे. लहान मूल भात खाऊ लागेपर्यंत त्याला नाचणीची जराशी दाटसर खीर खायला घालतात. वर्षभराची नाचणी पोत्यात भरून घरीच साठवलेली असते. जशी लागेल तशी दळून घ्यायची. पण काही यंदा घरची नाचणी वर्षभर पुरणार नाहीये.

या दोघीही गंगनहळ्ळीत राहतात आणि नुकत्याच दुपारचं जेवण उरकून आल्या आहेत. विनोदम्माची चार एकर तर मंजुषाची दीड एकर शेती आहे. त्यात त्या नाचणी, भात, डाळी आणि मोहरी करतात. “अवकाळी पाऊस आला तर नाचणी ठुशीतच उगवायला लागते,” मंजुला सांगते. आणि मग सगळं पीक खराब होतं.

हे टाळण्यासाठी विनोदम्माच्या घरच्यांनी वेळ न दवडता पीक काढायचं ठरवलं. आणि भरडायला यंत्र आणायचा निर्णय घेतला. हवेत हाताने आखीव रेषा काढत बोलणाऱ्या विनोदम्मांचे हातवारे भाषेतली दरी मिटवून टाकतात.

मानव आणि प्राण्यांमधला संघर्ष आणि त्याबद्दलचा त्यांचा उद्वेग कुणी काहीही न सांगता समजून जातो. “पूर्वी आम्हाला काही तरी भरपाई मिळायची. पण आता [अधिकारी] नुसते फोटो काढतात, पण पैसा काही मिळत नाही.”

Manjula (left) and Vinodhamma from Ganganahalli say they lose much of their ragi to unseasonal rain and elephants
PHOTO • M. Palani Kumar
A rain-damaged ragi earhead
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः गंगनहळ्लीच्या मंजुला (डावीकडे) आणि विनोदम्मा सांगतात की पाऊस आणि हत्तींच्या तडाख्यातून फारशी नाचणी हाती येत नाही. उजवीकडेः पावसाने झोडपलेली नाचणीची ठुशी

हत्ती नेमका खातो तरी किती? चिक्कार, गोपी म्हणतात. त्यांना आठवतंय की एकदा दोन हत्तींनी, दोन दिवस दोन रात्र मुक्काम ठोकला आणि जवळपास १० पोती नाचणी, म्हणजे २०,००० रुपयांचा माल फस्त केला. “एकाने तर एका फटक्यात २१ फणस साफ केले होते. आणि कोबी...”

आपलं पीक वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांचा डोळ्याला डोळा लागत नाही. गोपींना आठवतं की सलग दोन वर्षं नाचणीच्या हंगामात जवळपास दररोज रात्री हत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी ते मचाणावर राहिलेले आहेत. साधं सोपं नाहीये हे. अख्खी रात्र अशी काढल्यानंतर सकाळी तुमच्या अंगात कसलंही त्राण राहत नाही. नवदर्शनमच्या भोवती असलेल्या वळणवाटांवर आम्हाला अशी किती तरी मचाणं दिसली होती. काही व्यवस्थित बांधलेली होती तर काही तात्पुरती उभी केलेली. प्रत्येक मचाणाला एक घंटा मात्र होती. पत्र्याचा डबा आणि दोर बांधलेली एक काठी. हत्ती दिसला तर एकमेकांना सावध करण्यासाठी.

आणि इतका सगळा खटाटोप करूनही अनेकदा हत्ती पिकं खाऊन जातातच. ही खरी दुःखाची बाब. “एखादा हत्ती दिसला तरी आम्ही त्याला थांबवू शकायचो नाही,” गोपी सांगतात. “फटाके फोडा, हे कर, ते कर. पण त्याला काडीचाही फरक पडत नाही.”

गंगनहळ्ळीमध्ये आता अगदी खास समस्या निर्माण झाली आहे. वनखात्याने हत्तींसाठी घातलेलं कुंपण नवदर्शनमच्या अगदी जवळ संपतं. आणि मध्ये एक अशी वाट तयार झाली आहे की जणू काही ती हत्तींसाठीच ठेवलेली असावी. मग काय, वर्षभरात २० वेळा येणारे हत्ती पिकं काढणीला आली की जवळ जवळ रोज मुक्कामी येतात.

“कुंपणाच्या अल्याड-पल्याडचे दोघंही यामुळे त्रस्त आहेत. कारण कसंय, एकदा [हत्तींना बंदिस्त करण्यासाठी] कुंपण घालायला सुरुवात केली की त्याला अंत नाही.” बोट नाचवत आणि मान हलवत गोपी सांगतात.

A makeshift machan built atop a tree at Navadarshanam, to keep a lookout for elephants at night.
PHOTO • M. Palani Kumar
A bell-like contraption in the farm that can be rung from the machan; it serves as an early warning system when elephants raid at night
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः रात्री हत्तींवर नजर ठेवण्यासाठी नवदर्शनममध्ये एका झाडावर बांधलेलं मचाण. उजवीकडेः हत्ती आल्याचा निरोप सगळ्यांना कळावा म्हणून मचाणाला अडकवायची ही एक घंटाच

*****

“मी जास्त वेळ घरी द्यावा असं माझ्या पत्नीचं म्हणणं आहे”
हत्तींच्या हल्ल्यापासून दिवसरात्र पिकं राखणाऱ्या साठीच्या एका शेतकऱ्याने राष्ट्रीय हरित लवादासमोर आपली कैफियत मांडली.

मानव-हत्ती संघर्षावर संवेदनशील आणि शाश्वत स्वरुपाचा उपाय काढणं गरजेचं आहे. त्यामागे अनेक कारणं आहेत. मुळात या प्रश्नाचा आवाका अगदी हत्तीएवढा मोठा आहे. फ्रंटिअर्स इन इकॉलॉजी अँड एव्होल्युशनमधील एका शोधनिबंधात जगभरातल्या उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. त्यानुसार, “दिवसाला १.२५ अमेरिकन डॉलरपेक्षाही कमी उत्पन्न असलेल्या जगभरातल्या १.२ अब्ज लोकांपैकी बहुसंख्य आशियाई आणि आफ्रिकी हत्तींचा अधिवास असलेल्या देशांमध्ये राहतात.” आणि आधीच परिघावर फेकल्या गेलेल्या या जनतेला “आपल्या तुटपुंज्या संसाधनांसाठी आणि जागेसाठी इतर प्रजातींशी स्पर्धा करावी लागत आहे.”

भारतात २२ राज्यांमध्ये मानव आणि हत्तींमध्ये संघर्ष सुरू आहे असं संजीव कुमार सांगतात. तमिळ नाडू, कर्नाटक, केरळ, ओरिसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि आसाममध्ये हा संघर्ष विशेष तीव्र आहे.

पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालयाने राज्यसभेमध्ये अधिकृतरित्या सादर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०२० या केवळ तीन वर्षांच्या काळात १,४०१ माणसं आणि ३०१ हत्तींचा या संघर्षात जीव गेला आहे.

शेतकऱ्याला तिच्या किंवा त्याच्या नुकसानापोटी भरपाई देण्यासंबंधी सरकार कटिबद्ध आहे. पण फक्त कागदावर. २०१७ साली पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालयाच्या प्रोजेक्ट एलिफंट डिव्हिजनअंतर्गत प्रकाशित केलेल्या एका आराखड्यानुसार नासधूस झालेल्या पिकाच्या ६० टक्के भरपाई देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यात असंही म्हटलंय की “पिकाच्या नुकसानीच्या १०० टक्के भरपाई मिळू लागली तर शेतकरी पीक वाचवण्याची धडपडच करणार नाहीत.”

के. कार्तिकेयनी भारतीय वनसेवा अधिकारी आहेत तसंच होसूरच्या वन्यजीव संवर्धन कार्यालयात सहाय्यक संवर्धक पदावर कार्यरत आहेत. त्या सांगतात की दर वर्षी होसूर वन विभागात २०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान होतं. “वनविभागाकडे पिकाच्या नुकसान भरपाईसाठी किमान ८०० ते १,००० शेतकरी अर्ज करतात. आणि दर वर्षी यासाठी आम्ही ८० लाख ते १ कोटी रुपये खर्च करतो,” त्या सांगतात. जीवितहानी झाल्यास दिल्या जाणाऱ्या पाच लाखांच्या भरपाईचाही यात समावेश आहे. आणि या भागात दर वर्षी हत्तींच्या हल्ल्यात १३ जणांचा जीव जातोय.

Tusker footprints on wet earth.
PHOTO • Aparna Karthikeyan
Elephant damaged bamboo plants in Navadarshanam
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः ओल्या मातीतले हत्तींच्या पायाचे ठसे. उजवीकडेः नवदर्शनममधील हत्तींनी मोडून टाकलेला बांबू

“एकरी जास्तीत जास्त २५,००० रुपये भरपाई देता येते,” कार्तिकेयनी सांगतात. “दुर्दैवाने फळबागेसाठी ही भरपाई पुरेशी नाही. शेतकऱ्याचं एकरी ७०,००० रुपयांचं नुकसान होतं.”

शिवाय, भरपाईसाठी दावा करायचा तर शेतकऱ्याला सगळी कागदपत्रं सादर करावी लागतात, गरजेप्रमाणे कृषी किंवा फळबाग अधिकाऱ्याकडून शेताची पाहणी करून घ्यावी लागते, त्यानंतर गाव प्रशासन अधिकाऱ्याने भेट देऊन जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करून ती प्रमाणित करावी लागतात. आणि शेवटी फॉरेस्ट रेंज ऑफिसर येऊन फोटो काढून जातो. त्यानंतर जिल्हा वन अधिकारी भरपाईला मंजुरी देतो.

परिणामी, शेतकऱ्याला तिष्ठत बसावं लागतं. कधी कधी तर तीन तीन हंगाम उलटून जातात. आणि भरपाई किती तर ३,००० ते ५,००० रुपये. “एखाद्या खेळत्या फंडातून तात्काळ दावा निपटवला तर जास्त चांगलं होऊ शकेल,” कार्तिकेयनी सांगतात.

या संघर्षावर काही तरी तोडगा काढला तर माणसांचे जीव वाचतील, शेतकऱ्यांची उपजीविका अबाधित राहील. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा राज्याच्या वनखात्याबद्दल लोकांचं चांगलं मत तयार होईल. “सध्या हत्तींचं संवर्धन ही जणू फक्त शेतकऱ्यांची जबाबदारी झाली आहे,” संजीव कुमार म्हणतात.

रात्रंदिवस हत्तींपासून पिकांची राखण करणं काही गंमतीचं काम नाहीये, संजीव म्हणतात. दिवसरात्र शेतकऱ्याचा वेळ फक्त एवढ्यावरच खर्च होतो. राष्ट्रीय हरित लवादाच्या एका बैठकीत एका शेतकऱ्याने न्यायाधीशांना अखेर सांगितलं, ‘मी जास्त वेळ घरी द्यावा असं माझ्या पत्नीचं म्हणणं आहे’. संजीव तो प्रसंग आठवून सांगतात की हे साठीला आलेले शेतकरी होते आणि त्यांच्या बायकोला त्यांचं बाहेर काही तरी प्रेमप्रकरण चालू असल्याचा संशय होता.

शेतकरी इतके तणावाखाली असतात की त्यांचा सगळा राग वनविभागावर निघतो. “सगळं उट्टं वन विभागावर काढलं जातं. त्यांनी ऑफिस फोडलंय. रास्ता रोको केलाय आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण केलीये. असं काही घडलं की वन विभाग जरा जपून काम करतो आणि त्याचा परिणाम वन्यजीव संरक्षणाच्या कामावर होतो,” संजीव कुमार सांगतात.

Anandaramu Reddy explaining the elephants’ path from the forest to his farm in Vadra Palayam hamlet
PHOTO • M. Palani Kumar

वदरा पालयम पाड्यावर आनंदरामू रेड्डी जंगलातून हत्तींचा यायचा मार्ग समजावून सांगतायत

मानव-वन्यजीव संघर्षाची किंमत केवळ आर्थिक किंवा पर्यावरणीय नाही. मानसिकही आहे. तुमची कोणतीही चूक नसताना तुम्ही सुरू केलेला उद्योग कुठल्याही क्षणी उद्ध्वस्त होऊ शकतो आणि तरीही तो चालूच ठेवायचाय

आणि हे सगळं तर आहेच. पण हत्तींच्या जिवालाही धोका आहेच. आणि हा धोका काही किरकोळ नाहीये. तातडीने त्याच्याकडे लक्ष देणं भाग आहे. २०१७ साली झालेल्या शिरगणतीत तमिळ नाडूमध्ये हत्तींची संख्या होती २,७६१. भारतात हत्तींची एकूण संख्या आहे, २९,९६४. म्हणजे एकू हत्तींच्या १० टक्क्यांहून कमी.

माणसांकडून होणारे प्रतिहल्ले, वीजेचा धक्का, रस्त्यावर आणि रुळांवर होणारे अपघात या सगळ्यामुळे हत्तींचा जीव धोक्यात आला आहे. एका बाजूने पाहिलं तर या समस्येवर काहीच उत्तर नाही असं वाटायला लागतं. पण संजीव आणि इतर अनेकांनी एक उपाय शोधलाय. मूर्तीच्या मदतीने...

*****

“खरं तर आम्हाला वीजेवर अजिबात अवलंबून रहायचं नाहीये. सौर ऊर्जाही खात्रीची नाही. शिवाय, हत्तींना वीज वगैरे सगळं समजलंय.”
एस. आर. संजीव कुमार, कृष्णगिरी आणि धर्मापुरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक

कृष्णगिरी जिल्ह्यातल्या मेलगिरी एलिफंट फेन्सची (मेलगिरी विद्युत कुंपण) कल्पना मुळात दक्षिण आफ्रिकेच्या ॲडो अभयारण्यावरून आली आहे, संजीव कुमार सांगतात. “‘द एलिफंट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे रमण साहुकार, त्यांनी मला या कुंपणाविषयी सांगितलं होतं. तिथे त्यांनी भंगारात गेलेले रेल्वेचे रुळ आणि लिफ्टच्या केबल वापरल्या होत्या. त्यांनी कुंपण घातलं आणि संघर्ष मिटला.” संजीव यांनी ॲडो अभयारण्याची क्लृप्ती इथे वापरून पहायचं ठरवलं.

होसूर वन विभागाने आजवर हत्तींनी जंगलातच रहावं, बाहेर शेतांमध्ये शिरू नये यासाठी अनेक उपाय करून पाहिले होते – पण एकालाही यश आलं नव्हतं. जंगलाच्या भोवती हत्ती पार करू शकणार नाहीत असे खंदक खोदून पाहिले. सौरऊर्जेचा प्रवाह सोडलेली कुंपणं, अणकुचीदार खिळे असलेले अडथळे बसवून पाहिले. अगदी आफ्रिकेतून काटेरी झाडं देखील आणून झाली. सगळं मुसळ केरात.

आणि मग भारतीय वनसेवा अधिकारी असणाऱ्या दीपक बिल्गी यांची होसूर विभागात उप वन संवर्धक या पदावर नियुक्ती झाली. आणि आशेचा किरण दिसू लागला. बिल्गी यांनी ही कल्पना उचलून धरली, त्यासाठी निधीची तरतूद केली, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. आणि “प्रायोगिक तत्त्वावर आम्ही कुंपण उभं करायचं ठरवलं,” संजीव सांगतात.

A section of the Melagiri Elephant Fence, which is made of pre-cast, steel-reinforced concrete posts, and steel wire rope strands
PHOTO • M. Palani Kumar

मेलगिरी एलिफंट फेन्सचा एक भाग. साच्यातून काढलेले, स्टीलच्या सळया घातलेले काँक्रीटचे खांब आणि स्टीलच्या पातळ तारा

गंमत म्हणजे हत्तींची ताकद किती याबद्दल फारशी काही माहितीच उपलब्ध नाहीये. एकटा हत्ती किंवा एकत्र काही हत्ती मिळून किती जोर लावू शकतात याची कल्पनाच नाहीये. म्हणून मग त्यांनी नमुना म्हणून एक कुंपण मदुमलईमध्ये उभं केलं आणि तिथल्या कुमकीं बरोबर (प्रशिक्षित पाळीव हत्ती) ते वापरून पाहिलं. त्यातला एक, दात नसलेला पाच टनी हत्ती म्हणजे मूर्ती. अनेकांच्या मृत्यूला तो आजवर कारणीभूत ठरलाय. नंतर वनविभागाने त्याचं ‘पुनर्वसन’ केलं. आणि मजा बघा. मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी घालण्यात येणाऱ्या तारांची तपासणी करण्याचं काम या पठ्ठ्याकडे आलं.

“त्याचं पूर्वायुष्य काय होतं याबद्दल तुम्ही कसलाच अंदाज बांधू शकत नाही,” संजीव सांगतात. “कारण आता तो इतका छान शिकलाय. एकदम शांत आणि मायाळू झालाय तो.” मूर्ती आता निवृत्त देखील झालाय. हत्ती अंदाजे ५५ व्या वर्षी निवृत्त होतात. मस्त मजा करत, आरामात खात-पीत छान आयुष्य सुरू असतं. अधून मधून हुक्की आली तर पाळीव हत्तिणींपैकी एखादीशी संगही करता येतो बरं. जंगलात अशा हत्तीचं काहीच काम नाही. उलट तरण्या हत्तींशी अशा कामासाठी स्पर्धाच करावी लागणार.

मूर्तीचं निरीक्षण केल्यावर असं दिसून आलं की विशिष्ट परिस्थितीत एखादा हत्ती १८०० किलोपर्यंत दाब निर्माण करू शकतो. मूर्तीच्या निरीक्षणातून प्रयोग करत उभारलेल्या कुंपणाचा पहिला दोन किलोमीटरचा टप्पा आनंदांच्या घरापासून जवळच होता.

“या प्रयत्नातून आम्ही खूप काही शिकलो. एका आठवड्याच्या आतच मोट्टई वालसोबत हिंडणाऱ्या मखनाने ते कुंपण तोडून टाकलं. मग आम्ही नव्याने त्याची बांधणी केली. मूळ खांबांपेक्षा हे खांब आता ३.५ पट जास्त मजबूत आहेत. तारा तर आधीपासून पक्क्या आहेत आणि १२ टनाचं वजन सहन करू शकतात. म्हणजे ही दोरी दोन हत्तींचं वजन पेलू शकते.”

इतर कुंपणांच्या तुलनेत त्यांचं कुंपण तोडणं अशक्य असल्याचं संजीव सांगतात. साच्यातून काढलेले, स्टीलच्या सळया घातलेले काँक्रीटचे खांब आणि स्टीलच्या तारांची रस्सी यात वापरलेली आहे. हत्ती हे खांबही पाडू शकत नाहीत आणि रस्सीही तोडू शकत नाहीत. ते कुंपण ओलांडून जाऊ शकतात किंवा त्याच्या मधून पलिकडे पोचू शकतात. “यामुळे काय होतं, एखाद्या विशिष्ट ठिकाणी काही समस्या असेल तर आम्हाला ती लगेच दुरुस्त करता येते. आमच्या चमूने लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये तर आमचे हे सवंगडी जंगलाच्या बाहेर येऊन पिकं फस्त करून परत जाताना टिपले गेले आहेत.” कॅमेऱ्यात दिसलेल्या दृश्यांच्या आधारे त्यांनी आणखी काही सुधारणा केल्या. “कधी कधी हत्ती स्वतःच येतो आणि अजून काम करायलं हवं आहे हे तोच आम्हाला दाखवून देतो,” संजीव हसत हसत सांगतात.

विजेचा वापर नसलेल्या या कुंपणाच्या उभारणीसाठी किलोमीटरमागे ४० ते ४५ लाखांचा खर्च येतो. खाजगी क्षेत्राच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तमिळ नाडू शासनाच्या इनोवेटिव्ह इनिशिएटिव्ह्ज योजनेअंतर्गत पहिले दोन किलोमीटर आणि त्यानंतर पुढच्या १० किलोमीटर कुंपणाचं काम हाती घेण्यात आलं.

Anandaramu walking along the elephant fence and describing how it works
PHOTO • M. Palani Kumar

हत्तींसाठीच्या कुंपणाच्या बाजूबाजूने जात आनंदरामू हे कुंपण कसं काम करतं हे सांगतात

सध्या एकूण २५ किलोमीटरचं कुंपण घालण्यात आलं आहे. त्यातल्या १५ किलोमीटर कुंपणात वीजेचा वापर केलेला नाही तर १० किलोमीटर कुंपणामध्ये सौरऊर्जेचा प्रवाह सोडलेला आहे. वीजेचं व्होल्टेजही जास्त – १०,००० व्होल्ट इतकं असतं. दर सेकंदाला सोडला जाणारा हा लहानसा एकदिक प्रवाह म्हणजेच डायरेक्ट करंट असतो. “याचा स्पर्श झाला तरी हत्ती मरत नाही,” संजीव सांगतात. “विजेच्या धक्क्याने हत्ती मरतात ते आपण घरी किंवा शेतात वापरतो त्या तारांना स्पर्श झाला तर. तो प्रवाह २३०V एसी इतका असतो. जंगलातल्या कुंपणातला प्रवाह याच्याहून हजारो पटीने कमी असतो. तसा नसता तर हत्तींचा जीव जायचा राहणार नाही.”

त्यातही जर डीसी व्होल्टेज ६,००० व्होल्ट्स इतकं कमी झालं तर त्यावरून हत्ती एकदम आरामात चालत जातात. झाडाची फांदी किंवा छोटं झाड तारांवर पडलं तर असं होऊ शकतं. आणि कधी कधी काही हत्तींना भूकच इतकी जबरदस्त लागलेली असते की ते सरळ वाट खणत जातात. “त्यांच्या डोक्यात नक्की काय चाललेलं असतं याचा अंदाज बांधणं खरंच अवघड आहे,” संजीव स्पष्टपणे सांगतात.

“खरं तर आम्हाला वीजेवर अजिबात अवलंबून रहायचं नाहीये. सौर ऊर्जाही खात्रीची नाही,” ते म्हणतात. शिवाय, हत्तींना वीज वगैरे सगळं समजलंय. इन्सुलेशन, कंडक्टिविटी इत्यादी सगळ्या संकल्पना त्यांना समजल्या आहेत. ते झाडाची एखादी फांदी घेतात आणि चक्क कुंपण शॉट करून टाकतात. किंवा एखादा नर हत्ती तारा तोडण्यासाठी त्याच्या सुळ्याचाही वापर करतो कारण त्यातून वीज वाहून जात नाही हे त्यांना नीट कळालंय. “एक हत्ती एका छोट्या फांदीने कुंपणात विजेचा प्रवाह तर नाही ना हे तपासत होता. त्याचा फोटो आहे माझ्याकडे,” संजीव यांना हसू आवरत नाही.

*****

“मेलगिरी फेन्समुळे हत्ती दक्षिणेकडे जाऊ लागलेत. आणि हे खरं तर चांगलंच आहे कारण तिथे सलग जंगलं आहेत, अगदी थेट पुढे नीलगिरीपर्यंत.”
के. कार्तिकेयनी, भारतीय वनसेवा अधिकारी

मानव-वन्यजीव संघर्षाची किंमत केवळ आर्थिक किंवा पर्यावरणीय नाही. मानसिकही आहे. तुमची कोणतीही चूक नसताना तुम्ही सुरू केलेला उद्योग कुठल्याही क्षणी उद्ध्वस्त होऊ शकतो तरीही तो चालूच ठेवायचाय. कृष्णगिरी जिल्ह्यात गेल्या कित्येक पिढ्यांपासून राहत असलेल्या आणि शेती करणाऱ्यांचं आयुष्य हे असं आहे.

स्थानिक पिकांवर ताव मारण्यासोबतच पिकं फस्त करणारे हत्ती जास्तच जास्त अंतर प्रवास करायला शिकले आहेत. आणि हा बदह गेल्या एका दशकात झाला असल्याचं संजीव कुमार सांगतात. “अभयारण्याच्या बाहेर एक दोन किलोमीटरपर्यंत फिरणारे हत्ती आता थेट ७०-८० किलोमीटरचा प्रवास करून आंध्रा किंवा कर्नाटकात पोचतायत. तिथे दोनेक महिने मुक्काम करून परत येतात.” होसूरच्या भागात हत्ती पिकं खातात त्यामुळे ते चांगले गब्दुले आहेत, एकदम गुटगुटीत दिसतात आणि त्यांना पिलंही जास्त होतात.

तरुण हत्ती तर खूप जोखीम घेतात. संजीव यांनी अभयारण्याच्या बाहेर मरण पावलेल्या हत्तींची माहिती गोळा केली आणि त्याच्या नोंदी घेतल्या. मरण पावलेले ६०-७० टक्के हत्ती तरुण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

Mango plantation damaged by elephants in Anandaramu’s field
PHOTO • Anandaramu Reddy
Ananda with more photographs showing crops ruined by elephant raids
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः आनंदरामूंच्या शेतातली हत्तींनी उद्ध्वस्त केलेली आमराई. उजवीकडेः हत्तींच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या पिकांचे फोटो

आनंदा सांगतात की आजकाल त्यांना कळप फारच क्वचित दिसतात. फक्त त्रिकुट फिरत असतं: मोट्टई वाल, मखना आणि गिरी. अजूनही ते अधूनमधून हत्तींच्या हल्ल्यात पिकं कशी उद्ध्वस्त होतात त्याचे फोटो मला व्हॉट्सॲपवर पाठवत असतात. आंब्याच्या पडलेल्या फांद्या, मोडून पडलेल्या केळी, पायाखाली तुडवलेली फळं आणि ढीगभर लीद. ते बोलतात तेही फक्त उदास होऊन. चिडून कधीच नाही.

“याचं कारण आहे. राग असलाच तर तो सरकार किंवा वनखात्यावर आहे,” संजीव सांगतात. “त्यांना माहिती आहे, भरपाई मिळालीच तर फार उशीरा मिळते. किंवा मिळतही नाही. त्यामुळे त्यांनी अर्ज भरणंही सोडून दिलंय. आणि हे चांगलं नाही. कारण समस्या किती गंभीर आहे हे आता कसं कळणार?”

संघर्ष मिटवायचा एकच उपाय आहे. हत्तींनी जंगलातच रहावं. त्यांचा नैसर्गिक अधिवास त्यांना मिळाला तर हा प्रश्न कायमचा संपणार आहे. “पण हा फक्त ८० टक्के उपाय झाला. टणटणीचा बंदोबस्त करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.”

सध्या तरी २५ किलोमीटर कुंपण घातलेल्या क्षेत्रात हा संघर्ष ९५ टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसून येतंय. अर्थात मानव-हत्ती संघर्ष असणाऱ्या एकूण क्षेत्राचा विचार करता हे कुंपण फक्त २५ टक्के क्षेत्रावर आहे. “मेलगिरी फेन्समुळे हत्ती दक्षिणेच्या दिशेने जायला लागलेत,” कार्तिकेयिनी सांगतात. “आणि हे चांगलंच आहे कारण तिथे सलग जंगल आहे. अगदी सत्यमंगलमपर्यंत आणि तिथून पुढे पार नीलगिरीपर्यंत. त्यांच्यासाठी तेच चांगलंय.”

मेलगिरी फेन्स प्रत्यक्षात अडथळ्याचं काम करते. “आणि जिथे सौरऊर्जेचा वापर करून कुंपणातून प्रवाह सोडलाय, तिथे ती थेट नाही तर मानसिक पातळीवरही अडथळा निर्माण करते. हलकाच झटका बसतो पण त्यांच्या मनात भीती तर निर्माण होतेच. हत्तीही चलाख आहेत. मधाच्या पोळ्याच्या आकाराच्या तारा, वाघाच्या डरकाळ्यांचे आवाज किंवा गजराचे आवाज अशा कशाचाही त्यांच्यावर परिणाम होत नाही.” थोडक्यात काय, तर संजीव कुमार यांच्या सांगण्यानुसार तुम्ही हत्तींना येडं बनवू शकत नाही.

हत्ती मात्र कायमच आपल्या एक पाऊल पुढे असल्याचं दिसतं. आपल्या हालचालीतून आपल्यालाच आत कसं अडकवायचं हे माणसांना कळतंय म्हटल्यावर त्यांनी आधी कॅमेरा ट्रॅप तोडून टाकायला सुरुवात केली. संजीव सांगत होते आणि मी मात्र माझ्यासमोरच्या पडद्यावर कुंपणापाशी उभ्या असलेल्या, तारा ओलांडून नाचणी फस्त कशी करावी या विचारात मग्न उभ्या हत्तींच्या जोडगोळीकडे टक लावून पाहत होते...

गोपाकुमार मेनन यांनी केलेली मदत, पाहुणचार आणि या वार्तांकनासाठी केलेलं सहाय्य यासाठी त्यांचे शतशः आभार.

या संशोधन प्रकल्पास अझीम प्रेमजी युनिवर्सिटी, बंगळुरूकडून संशोधन सहाय्य कार्यक्रम २०२० अंतर्गत अर्थसहाय्य मिळाले आहे.

शीर्षक छायाचित्र (मोट्टई वाल): निशांत श्रीनीवासय्या.

अनुवादः मेधा काळे

Aparna Karthikeyan

ಅಪರ್ಣಾ ಕಾರ್ತಿಕೇಯನ್ ಓರ್ವ ಸ್ವತಂತ್ರ ಪತ್ರಕರ್ತೆ, ಲೇಖಕಿ ಮತ್ತು ʼಪರಿʼ ಸೀನಿಯರ್ ಫೆಲೋ. ಅವರ ವಸ್ತು ಕೃತಿ 'ನೈನ್ ರುಪೀಸ್ ಎನ್ ಅವರ್' ತಮಿಳುನಾಡಿನ ಕಣ್ಮರೆಯಾಗುತ್ತಿರುವ ಜೀವನೋಪಾಯಗಳ ಕುರಿತು ದಾಖಲಿಸಿದೆ. ಅವರು ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಐದು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಅಪರ್ಣಾ ತನ್ನ ಕುಟುಂಬ ಮತ್ತು ನಾಯಿಗಳೊಂದಿಗೆ ಚೆನ್ನೈನಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ.

Other stories by Aparna Karthikeyan
Translator : Medha Kale

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale