हा लेख पारी निर्मित वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहा ण्यांपैकी असून या लेखमालेस २०१९ सालासाठीच्या पर्यावरणविषयक लेखन विभागाअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.

काजल लता बिस्वास आजही चक्रीवादळाच्या आठवणी विसरू शकल्या नाहीयेत. सुंदरबनला आयला वादळाचा तडाखा बसला त्याला १० वर्षं उलटली, पण आजही २५ मे २००९ हा दिवस त्यांना जसाच्या तसा आठवतो.

दुपार व्हायची होती. “[कालिंदी] नदीचं पाणी अख्ख्या गावात भरलं आणि घरांमध्ये शिरलं,” काजल लता सांगतात. त्या दिवशी त्या त्यांच्या एका नातेवाइकांकडे, कुमिरमारी गावी होत्या, त्यांच्या गावाहून, गोबिंदकाटीपासून ७ किमी दूर. “आम्ही ४०-५० जण असू, एका नावेत आम्ही आसरा घेतला आणि रात्रभर तिथेच बसून राहिलो. झाडं, नावा, गुरं, भातं सगळं डोळ्यासमोर वाहून जात होतं. रात्री तर एकही गोष्ट दिसेना. काडेपेट्या पण ओल्या झालेल्या. वीज चमकली की क्षणभर काय तो उजेड व्हायचा.”

आपल्या घराच्या बाहेर दुपारच्या जेवणासाठी मच्छी साफ करता करता ४८ वर्षीय काजल लता पुढे म्हणतात, “ती रात्र विसरणंच शक्य नाही. पिण्यासाठी पाण्याचा थेंब नव्हता. मी कसं तरी एका प्लास्टिकच्या पिशवीत पावसाच्या पाण्याचे काही थेंब गोळा केले. माझ्या दोघी मुली आणि भाची तहानेने व्याकूळ झाल्या होत्या, त्यांचे ओठ तरी ओले केले,” त्या आठवणींनी आजदेखील त्याचा आवाज कातर होतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच नावेने त्यांनी आपलं गाव गाठलं. पुराच्या पाण्यातून वाट काढत त्या आपल्या घरी पोचल्या. “तनुश्री, माझी थोरली, १७ वर्षांची होती. काही ठिकाणी पाणी इतकं चढलं होतं की ती जवळपास बुडालीच होती. नशीब तिने तिच्या मावशीचा पदर पकडला,” काजल लता सांगतात. तेव्हा वाटलेली भीती आजही त्यांच्या डोळ्यात तरळून जाते.

२०१९ साली मे महिन्यात तीच भीती फनी वादळाच्या रुपात परत आली. त्यांच्या धाकट्या मुलीच्या, २५ वर्षीय अनुश्रीच्या लग्नाचा मुहूर्तच वादळाने गाठला होता.

Kajal Lata Biswas cutting fresh fish
PHOTO • Urvashi Sarkar
PHOTO • Urvashi Sarkar

काजल लता बिस्वास आपल्या गोबिंदकाटी गावातल्या घराबाहेर मच्छी साफ करता करता वादळाची दहशत काय असते ते सांगतायत, गावातल्या या झोपड्यांमध्ये (उजवीकडे) धान साठवून ठेवलंय, या पिकाला तर चांगलाच फटका बसलाय

लग्न ६ मे रोजी होतं. काही दिवस आधीपासूनच पंचायतीकडून आणि सरकारकडून रेडिओवर फनी वादळाबद्दल दक्षतेच्या सूचना यायला सुरुवात झाली होती. “आमची काय गत झाली असेल, किती भीती वाटली असेल, तुम्हीच विचार करा,” काजल लता म्हणतात. “वारा आणि पावसामुळे आमची सगळी तयारी वाया जायची आम्हाला काळजी होती. लग्नाच्या आधी काही दिवस पाऊस येत होता. पण नशिबाने आमच्या गावाला काही वादळाचा तडाखा बसला नाही,” सुटकेचा निःश्वास टाकत त्या सांगतात.

२ मे रोजी भारतीय वेधशाळेने आंध्र प्रदेश, ओदिशा (जिथे नंतर सर्वात जास्त नुकसान झालं) आणि पश्चिम बंगालला फनी वादळाचा तडाखा बसू शकतो अशी दक्षतेची सूचना जारी केली होती. फनीबद्दल बोलताना रजत जुबिली गावातले ८० वर्षीय शेतकरी आणि शिक्षक असणारे प्रफुल्ल मोंडल वरच्या पट्टीत सांगतातः “फनी सुंदरबनला अगदी चाटून गेलं म्हणा ना. वारं घोंघावत आमच्या जवळून निघून गेलं. जर का आम्हाला त्याचा फटका बसला असता, तर आम्ही, आमची घरं, शेतं-भातं सगळं बेचिराख झालं असतं...”

सुंदरबनसाठी चक्रीवादळं काही नवीन नाहीत हे मोंडल आणि काजल लता दोघंही जाणून आहेत. पश्चिम बंगाल शासनाच्या आपत्ती निवारण आणि नागरी संरक्षण खात्याने साउथ आणि नॉर्थ २४ परगणा या दोन्ही जिल्ह्यांची चक्रीवादळामुळे ‘अतितीव्र नुकसानीचा धोका असणारं क्षेत्र’ म्हणून नोंद केली आहे.

मोंडल यांचं गाव साउथ २४ परगणा जिल्ह्याच्या गोसाबा तालुक्यात आहे तर काजल लतांचं नॉर्थ २४ परगणा जिल्ह्याच्या हिंगलगंज तालुक्यात. पश्चिम बंगालच्या १९ तालुक्यांचा – नॉर्थ २४ परगण्यातले ६ आणि साउथ २४ परगण्यातले १३ तालुके मिळून भारतीय सुंदरबनचा प्रदेश बनतो, त्यात या दोन्ही तालुक्यांचा समावेश आहे.

भारत आणि बांग्लादेशमध्ये पसरलेलं सुंदरबन कदाचित जगातलं सर्वात मोठं खारफुटीचं जंगल असावं – एकूण क्षेत्र १०,२०० चौरस किलोमीटर. “सुंदरबनचा प्रदेश ही कदाचित जगातली सर्वात समृद्ध परिसंस्था असावी...” बिल्डिंग रेझिलियन्स फॉर द सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ द सुंदरबन्स या शीर्षकाच्या जागतिक बँकेने तयार केलेला अहवाल म्हणतो. “हे संपूर्ण खारफुटीचं वन इथल्या विलक्षण जैवविविधतेमुळे प्रसिद्ध आहे. यात आपलं अस्तित्व धोक्यात असणाऱ्या रॉयल बेंगॉल टायगर, गोड्या पाण्यातल्या मगरी, भारतीय अजगर आणि नदीतल्या डॉल्फिन माशांच्या अनेक प्रजातींचा समावेश आहे.”

भारतीय सुंदरबन क्षेत्रात – अंदाजे ४,२०० चौरस किलोमीटर – जवळपास ४५ लाख लोकही राहतात. यातले बहुतांश अगदी हलाखीत, कसंबसं पोट भरत इथल्या खडतर निसर्गाशी आणि तीव्र हवामानाशी मुकाबला करतायत.

जरी आयलानंतर तेवढं मोठं चक्रीवादळ या भागात आलं नसलं तरी हा सर्व प्रदेश अतिशय धोकाप्रवण आहे. पश्चिम बंगाल शासनाच्या आपत्ती निवारण विभागासाठी २००६ साली खरगपूरच्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थेने तयार केलेल्या अहवालातल्या नोंदींप्रमाणे १८९१ ते २००४ या काळात राज्यात ७१ चक्रीवादळं आली आहेत. याच काळात साउथ २४ परगण्याच्या गोसाबा तालुक्याला सर्वात जास्त फटका बसला असून तिथे ६ तीव्र स्वरुपाची आणि १९ चक्रीवादळं थडकली आहेत.

PHOTO • Urvashi Sarkar

रजत जुबिली गावातल्या ८० वर्षांच्या प्रफुल्ल मोंडल यांनी अनेक वादळांना तोंड दिलं आहे पण आता मात्र त्यांचं कुटुंब लहरी हवामानाशी झगडत आहे

प्रफुल्ल यांना आयलाच्या आधीची चक्रीवादळंही आठवतात. “१९९८ चं वादळ मी विसरूच शकत नाही [पश्चिम बंगालमधलं स्वातंत्र्यानंतरचं ‘सर्वात तीव्र वादळ’, आयलाहूनही वेगवान, ‘तीव्र चक्री वादळ’ म्हणून नोंद] जोराचं आणि भयंकर वारं होतं. त्या आधी १९८८ साली वादळ आलं होतं, तेही माझ्या ध्यानात आहे,” ते सांगतात.

वादळांचा हा इतिहास असला तरीही कमी दाबाचा वादळी पट्टा (समुद्रामध्ये तयार होणारा हवामानातला बदल, ज्यात ताशी ६२-८२ किमी वादळी वाऱ्यांपेक्षा कमी वेगाने, ताशी ३१-६० किमी वेगाने वारे वाहतात) तयार होण्याच्या घटना गंगेच्या खोऱ्यात गेल्या १० वर्षांत २.५ पटीने वाढल्या आहेत. कोलकाता स्थित सागरशास्त्रज्ञ डॉ. अभिजित मित्रा यांच्या २०१९ साली प्रकाशित झालेल्या मॅनग्रोव्ह फॉरेस्ट इन इंडियाः एक्स्प्लोअरिंग इकोसिस्टिम सर्विसेस या पुस्तकात ही माहिती मिळते. “म्हणजेच वादळांची वारंवारिता वाढली आहे,” ते म्हणतात.

इतरही अनेक अभ्यास हे दाखवतात की बंगालच्या उपसागरामध्ये, सुंदरबनसह, चक्रीवादळ येण्याच्या घटना वाढल्या आहेत.  २०१५ साली डायव्हर्सिटी या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार १८८१ ते २००१ या काळात ही वाढ २६ टक्के इतकी आहे. २००७ साली आणखी एक अभ्यास करण्यात आला ज्यामध्ये १८७७ ते २००५ या काळात मे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यातल्या वादळांची आकडेवारी वापरण्यात आली. त्यात असं दिसून येतं की या १२९ वर्षांच्या काळात तीव्र वादळी स्थिती असणाऱ्या या विशिष्ट महिन्यांमध्ये मोठी वादळं येण्याची वारंवारिता लक्षणीय रित्या वाढली आहे.

यासाठी जबाबदार ठरणारा एक घटक म्हणजे (जर्नल ऑफ अर्थ सायन्स अँड क्लायमेट चेंज मधील एका निबंधानुसार) समुद्री पृष्ठभागाचं तापमान. भारतीय सुंदरबनमध्ये १९८० ते २००७ या काळात दर दशकात तापमान ०.५ अंश सेल्सियसने वाढलं आहे जे जगभरातल्या एका दशकातल्या ०.०६ अंश सेल्सियस या वाढीपेक्षा जास्त आहे.

या सर्वांचे अतिशय विद्ध्वंसक असे परिणाम झाले आहेत. “२००९ मध्ये आलेल्या मोठ्या चक्रीवादळानंतर सुंदरबनमध्ये वादळ आलेलं नसलं तरी,” कोलकात्याच्या जादवपूर विद्यापीठातील सागरशास्त्रीय अभ्यास विभागातील प्रा. सुगता हाझरा म्हणतात, “वारंवार येणाऱ्या पुरामुळे आणि बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे येणाऱ्या चक्रीवादळांचा परिणाम म्हणून संरक्षक बांध ढासळून या प्रदेशाची मोठी हानी झाली आहे.”

PHOTO • Urvashi Sarkar

अनेक स्थित्यंतरांप्रमाणेच समुद्राची वाढती पातळी आणि सागरी पृष्ठभागाचं वाढतं तापमान यामुळे सुंदरबनला धोका निर्माण झाला आहे

जागतिक बँकेच्या अहवालानुसार संरक्षक बांध, “चक्रीवादळं आणि समुद्राची वाढती पातळी या दोन्हीपासून संरक्षण करण्याचं मोलाची भूमिका निभावतात. वातावरणातले बदल आणि १९ व्या शतकातील ३,५०० किलोमीटरमधल्या संरक्षक बांधांची यंत्रणा ढासळू लागलीये, खोऱ्याचं क्षेत्र आकसतंय, समुद्राची पातळी वाढतीये या सगळ्याचा परिणाम म्हणजे लोक आणि त्यांच्या संसाधनांची उत्पादकता धोक्यात आली आहे.”

२०११ सालच्या वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडच्या निबंधानुसार २००२-२००९ या काळात सुंदरबनच्या सागर या बेट वेधशाळेच्या नोंदींनुसार समुद्राची सरासरी पातळी वर्षाला १२ मिमी किंवा २५ वर्षांत वर्षाकाठी ८ मिमी याप्रमाणे वाढली आहे.

तापमान वाढ आणि त्यातून होणारी समुद्राच्या पातळीतली वाढ खारफुटीवरही विपरित परिणाम करत आहे. वादळं आणि जमिनीची धूप होण्यापासून ही वनं किनारी भागांचं रक्षण करतात, मासे आणि इतर प्रजातींची पैदास इथे होते आणि बेंगॉल टायगरचा हा अधिवास आहे. २०१० साली जादवपूर विद्यापीठाच्या सागरशास्त्रीय अभ्यास विभागाच्या टेम्पोरल चेंज डिटेक्शन (२००१-२००८) स्टडी ऑफ सुंदरबन या  निबंधात म्हटलं आहे की समुद्राची वाढती पातळी आणि चक्रीवादळांमुळे सुंदरबनमधील वनाच्छादन कमी होत चाललं आहे ज्यामुळे खारफुटीच्या वनांचं स्वास्थ्य धोक्यात आलं आहे.

रजत जुबिली गावातले अर्जुन मोंडल सुंदरबनसाठी खारफुटीचं महत्त्व किती आहे हे जाणून आहेत. त्यांनी सुंदरबन्स रुरल डेव्हलपमेंट सोसायटी या सामाजिक संस्थेसोबत काम केलं आहे. “सगळेच वातावरण बदलांबद्दल ऐकून आहेत, पण आपल्यावर या बदलांचा काय परिणाम होतोय? याबद्दल आपण जास्त जाणून घेतलं पाहिजे,” २०१९ च्या मे महिन्यात त्यांनी मला सांगितलं होतं.

२९ जून २०१९ रोजी पिरखाली जंगलात खेकडे धरायला गेले असताना अर्जुन यांना वाघ घेऊन गेला. सुंदरबनमध्ये माणसांवर होणारे वाघांचे हल्ले काही नवीन नाहीत, पण कुठे ना कुठे समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे वनांची होणारी धूप आणि त्यामुळे वाघ मानवी वस्ती असलेल्या गावांच्या जवळ जवळ येत असल्याने सध्या हल्ल्यांच्या घटना वाढताना दिसत आहेत.

चक्रीवादळांनी तर हा भाग झोडपून काढला जातोच आहे पण पाण्याची लवणता किंवा खारेपणाही वाढला आहे. खासकरून सुंदरबनच्या मध्य भागात, जिथे गोसाबा आहे. “... समुद्राच्या पातळीतली वाढ तसंच खोऱ्यात येणाऱ्या गोड्या पाण्याचे प्रवाह आटत चालले असल्यानेही खारेपणात लक्षणीय वाढ झाली आहे ज्याचा परिसंस्थेवर विपरित परिणाम होत आहे,” जागतिक बँकेचा अहवाल सांगतो.

PHOTO • Urvashi Sarkar
PHOTO • Urvashi Sarkar

सुंदरबनमधले मोठाले संरक्षक कठडे शेतीसाठी आणि माती खारपड होऊ नये म्हणून मोलाचे आहेत, तेच आता समुद्राची पातळी वाढत चालल्याने ढासळू लागले आहेत

डॉ. मित्रांनी सहयोगी लेखक म्हणून लिहिलेल्या एका शोधनिबंधानुसार सुंदरबन ‘हायपरसलाइन (तीव्र लवण)’ झालं आहे. “सुंदरबनच्या मधल्या भागात समुद्राची पातळी वाढल्यामुळे पाण्याचा खारेपणा वाढला आहे. आणि याचा संबंध थेट वातावरण बदलांशी आहे,” डॉ. मित्रा म्हणतात.

बिद्याधारी नदीत गाळ भरल्यामुळे हिमालयातून वाहणारे गोड्या पाण्याचे प्रवाह मध्य आणि पूर्व सुंदरबनमध्ये पोचू शकत नाहीत असं इतर संशोधकांचं म्हणणं आहे. पाण्यातले भराव, शेती, सांडपाणी आणि मैला आणि मत्स्योत्पादनातील टाकाऊ पदार्थ पाण्यात सोडल्यामुळेही पाण्याचा खारेपणा वाढत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. १९७५ साली (गंगा नदीवर, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात) फराक्का बंधारा बांधण्यात आला त्यामुळेदेखील मध्य सुंदरबनच्या पाण्याच्या खारेपणात वाढ झाली आहे.

खारेपणा वाढल्याचा परिणाम काय होतो ते रजत जुबिलीच्या मोंडल कुटुंबाला पुरेपूर ठाऊक आहे – आयला वादळानंतर तीन वर्षं त्यांच्यापाशी विकायला भातंच नव्हती. भाताच्या विक्रीतून येणारं वर्षाचं १०,००० ते १२,००० रुपयांचं उत्पन्नच थांबलं. “भातशेतीच नाही तर गावंच्या गावं ओस पडली कारण पुरुष मंडळी कामाच्या शोधात तमिळ नाडू, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रात गेले, तिथे कारखान्यात, बांधकामावर मजूर म्हणून कामाला लागले,” प्रफुल्ल सांगतात.

राज्यभरात २ लाख हेक्टर पिकाखालचं क्षेत्र आणि ६० लाखांहून अधिक माणसांना आयला वादळाचा फटका बसला, १३७ लोकांचा जीव गेला आणि १० लाखांहून अधिक घरांची पडझड झाली. “ज्याचं नुकसान झालं नाही असं माझ्या गावात तरी कुणीच सापडणार नाही,” प्रफुल्ल सांगतात. “आमचं घर आणि पिकं, दोन्हीचं नुकसान झालं. आमची १४ शेरडं गेली. पुढची तीन वर्षं काहीही पिकलं नाही. सगळं सुरुवातीपासून परत उभारायला लागलं. फार कठीण काळ होता तो. मी पोटासाठी म्हणून सुतार काम, इकडची तिकडची कामं करायला सुरुवात केली.”

आयलाचा परिणाम म्हणून जमिनी खारपड व्हायला लागल्यामुळे काजल लतांच्या कुटुंबाला आपल्या २३ बिघा (७.६ एकर) जमिनीपैकी सहा बिघा जमीन विकावी लागली. “जमीन इतकी खारपड झाली की गवताचं एक पातंही उगवलं नाही. भातदेखील येऊ शकला नाही. हळू हळू मोहरी, कोबी, फुलकोबी आणि दोडक्यासारख्या भाज्या यायला लागल्या, त्याही घरच्यापुरत्या. विकण्याइतक्या नाहीतच,” त्या सांगतात. “आमचं तळं होतं, ज्यात शोल, मागूर, रुइसारखे मासे सोडले होते. त्यांच्या विक्रीतून वर्षाकाठी २५,००० ते ३०,००० रुपयांची कमाई व्हायची. पण आयला येऊन गेल्यानंतर पाणी पुरतं खारं झालंय, त्यामुळे त्यात मासे नसल्यात जमा आहेत.”

PHOTO • Urvashi Sarkar
PHOTO • Ritayan Mukherjee

सुंदरबनच्या परिसंस्थेसाठी खारफुटी फार मोलाची आहे मात्र तीही आता विरळत चालली आहे

आयलाचा परिणाम म्हणून मातीचा दर्जा खालावलाय – खारपड आणि अल्कलीचं प्रमाण जास्त – परिणामी नॉर्थ आणि साउथ २४ परगण्यांमध्ये भातशेती ढासळल्याचं जर्नल ऑफ एक्सपरिमेंटल बायोलॉजी अँड ॲग्रिकल्चरल सायन्सेस मधील एका शोधनिबंधात म्हटलं आहे. याच पत्रिकेतील एका अभ्यासानुसार भातशेती परत सुरू करायची असेल तर फॉस्फेट आणि पोटॅश असणाऱ्या खतांचा निर्धारित पातळीपेक्षा जास्त प्रमाणात वापर करावा लागू शकतो.

“आयला येऊन गेल्यानंतर खतांचा वापर वाढला आहे. त्याच्याशिवाय आम्ही पुरेसं पिकवूच शकणार नाही,” प्रफुल्लांचे पुत्र, ४८ वर्षीय प्रबीर मोंडल सांगतात. “असलं खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही पण आम्हाला तेच खावं लागणार आहे. आम्ही लहानपणी खाल्लेल्या भाताची चव आजही माझ्या लक्षात आहे. तो नुस्ता खाल्ला तरी चालायचा. आजकाल भाजीबरोबर खाल्ला तरी चवीला काही तरी कमीच वाटतं.”

त्यांच्या वडलांच्या मालकीची १३ बिघा (४.२९ एकर) जमीन आहे. एका बिघ्यात ८-९ बस्ते तांदूळ होतो – एक बस्ता म्हणजे ६० किलो. “लावणी, कापणी, झोडणी, त्यात खताचा खर्च, सगळा हिशोब केला तर सगळा खर्च जाऊन आमच्या हाती फार काही उरत नाही.”

आयला येऊन गेल्यानंतर संपूर्ण सुंदरबनमध्ये भाताचं उत्पादन निम्म्यावर आल्याचं – १.६ हेक्टरमध्ये ६४-८० क्विंटलवरून ३२-४० क्विंटल – २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात म्हटलं आहे. आता कुठे आयला येण्याआधी होत होतं तितकं उत्पादन व्हायला लागलं असल्याचं प्रबीर सांगतात तरी त्यांचं कुटंब तसंच गावातले इतरही जण आता सर्वस्वी जून ते सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या पावसावर अवलंबून आहेत.

आणि तोच पाऊस आता बेभरवशाचा झाला आहे. “समुद्राची वाढलेली पातळी,” प्रा. हाझरा म्हणतात, “आणि उशीरा येणारा, अपुरा मॉन्सून हे वातावरणातील बदलांचे दूरगामी परिणाम आहेत.”

गेल्या दोन दशकात बंगालच्या उपसागराच्या उत्तरेच्या भागात (जिथे सुंदरबन आहे) एका दिवसात १०० मिमीहून जास्त पावसाचे दिवस वाढत असल्याचं कोलकात्याच्या सागरशास्त्र अभ्यास विभागात सध्या चालू असलेल्या अभ्यासातून दिसून येतं. सोबतच, पेरणीच्या काळात अपुरा पाऊस पडतोय, जसं या वर्षी झालंय असं प्रा. हाझरा सांगतात. ४ सप्टेंबरपर्यंतच्या पाऊसमानात साउथ २४ परगण्यात ३०७ मिमी आणि नॉर्थ २४ परगण्यात १५७ मिमी इतकी तूट आहे.

आणि हे केवळ याच वर्षी झालंय असं नाही – सुंदरबनमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पावसातली तूट किंवा अतिवृष्टी असं चालू आहे. जून ते सप्टेंबर या काळात सामान्यपणे साउथ २४ परगण्यात १५५२.६ मिमी पाऊस पडतो. २०१२-२०१७ या सहा वर्षांमधली पावसाची आकडेवारी पाहिली तर यातली चार वर्षं कमी पाऊस पडल्याचं आढळतं, त्यातही २०१७ (११७३.३ मिमी) आणि २०१२ (११३०.४ मिमी) ही सर्वात कमी पावसाची वर्षं असल्याचं दिसतं.

PHOTO • Urvashi Sarkar

भाताची वाढ पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. पाऊसच नसेल तर भात येणार नाही

नॉर्थ २४ परगण्यात याच्या अगदी उलट घडतंयः अतिवृष्टी. जून ते सप्टेंबर दरम्यान इथे सामान्यपणे ११७२.८ मिमी इतका पाऊस पडतो. २०१२-२०१७ या काळात सहातली चार वर्षं इथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, त्यातही सर्वात जास्त म्हणजे २०१५ साली - १४२८ मिमी.

“खरी समस्या आहे अवेळी पावसाची,” काजल लता सांगतात. “यंदा फेब्रुवारी महिन्यात भरपूर पाऊस पडला, पावसाळा असावा असा. जुन्या जाणत्या लोकांनाही याआधी फेब्रुवारी महिन्यात इतका पाऊस झाल्याचं स्मरत नाहीये.” जून-जुलैत भाताची लावणी करायची, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कापणी करायची. भाताच्या विक्रीतून येणाऱ्या पैशावरच त्यांच्या कुटुंबाची सगळी भिस्त. “भाताची वाढ पूर्णपणे पावसावरच अवलंबून असते. पाऊसच नसेल तर भात येणार नाही.”

गेल्या चार-पाच वर्षांपासून, त्या म्हणतात, पावसाळ्याचे महिने सोडून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात देखील पाऊस यायला लागलाय. एरवीसुद्धा या काळात थोडाफार पाऊस पडतो पण जास्त जोरात पाऊस आला तर मात्र भाताच्या पिकावर परिणाम होऊ शकतो. “एक तर जेव्हा हवा तेव्हा पाऊस पडत नाही आणि नको तेव्हा भरपूर पडतो. यामुळे पिकांचं नुकसान व्हायला लागलंय. दर वर्षी आम्हाला आशा असते की या वर्षी तरी [अवेळी] जास्त पाऊस येणार नाही. पण इतका पाऊस कोसळतो की सगळं पीक पाण्यात जातं. म्हणूनच आमच्यात असं म्हणतात की, आशाय मोरे चासा आशाच शेतकऱ्याचा घात करते.”

रजत जुबिली गावात, प्रबीर मोंडल देखील काळजीत पडलेत. “जून आणि जुलैत [आमच्या गावात] पाऊसच नव्हता. भातं सुकून गेली. नशीब [ऑगस्टमध्ये] पाऊस आला. पण तेवढा पुरणार का? आणि जर का अतिच पडला आणि पिकं पाण्याखाली गेली तर?”

आरोग्यसेवादाते असणारे प्रबीर सांगतात (त्यांच्याकडे पर्यायी वैद्यक विषयाची पदवी आहे), त्यांचे अनेक रुग्ण वाढत्या उष्म्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. “अनेकांना हल्ली उष्माघाताचा त्रास व्हायला लागलाय. अचानक कधीही त्रास होऊ शकतो आणि तो जीवघेणाही ठरू शकतो,” ते सांगतात.

सुंदरबनमध्ये समुद्याच्या पृष्ठभागाचं तापमान तर वाढतंच आहे पण सोबत जमीनही तापू लागली आहे. १९६० साली इथे ३२ अंश सेल्सियसपर्यंत तापमान जाईल असे वर्षाकाठी १८० दिवस होते, पण २०१७ साली त्यात वाढ होऊन त्यांची संख्या १८८ झाली आहे असं न्यू यॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वातावरण बदल आणि जागतिक तापमान वाढीसंदर्भातल्या एका संवादी पोर्टलवरून समजतं. या शतकाच्या शेवटपर्यंत अशा उष्ण दिवसांची संख्या २१३ ते २५८ असू शकेल.

वाढता उष्मा, चक्रीवादळं, लहरी पाऊस, वाढता खारेपणा, विरळत जाणारं खारफुटींचं वन आणि इतरही बऱ्याच समस्यांनी भंडावून गेलेले सुंदरबनचे रहिवासी आता जणू काही सततच्या अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकले आहेत. आजवर अनेक मोठ्या वादळांचा आणि चक्रीवादळांचा सामना केलेल प्रफुल्ल मोंडल कोड्यात पडलेतः “उद्या काय वाढून ठेवलंय, कुणास ठाऊक?”

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया zahra@ruralindiaonline.org शी संपर्क साधा आणि namita@ruralindiaonline.org ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Reporter : Urvashi Sarkar
urvashisarkar@gmail.com

ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ಆಗಿರುವ ಊರ್ವಶಿ ಸರ್ಕಾರ್ 2016 ರ ಪರಿ ಫೆಲೋ ಕೂಡ ಹೌದು.

Other stories by Urvashi Sarkar
Editor : Sharmila Joshi

ಶರ್ಮಿಳಾ ಜೋಶಿಯವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಮಾಜಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಸಂಪಾದಕಿ ಮತ್ತು ಬರಹಗಾರ್ತಿ ಮತ್ತು ಸಾಂದರ್ಭಿಕ ಶಿಕ್ಷಕಿ.

Other stories by Sharmila Joshi
Series Editors : P. Sainath
psainath@gmail.com

ಪಿ. ಸಾಯಿನಾಥ್ ಅವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಸ್ಥಾಪಕ ಸಂಪಾದಕರು. ದಶಕಗಳಿಂದ ಗ್ರಾಮೀಣ ವರದಿಗಾರರಾಗಿರುವ ಅವರು 'ಎವೆರಿಬಡಿ ಲವ್ಸ್ ಎ ಗುಡ್ ಡ್ರಾಟ್' ಮತ್ತು 'ದಿ ಲಾಸ್ಟ್ ಹೀರೋಸ್: ಫೂಟ್ ಸೋಲ್ಜರ್ಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯನ್ ಫ್ರೀಡಂ' ಎನ್ನುವ ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ.

Other stories by P. Sainath
Series Editors : Sharmila Joshi

ಶರ್ಮಿಳಾ ಜೋಶಿಯವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಮಾಜಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಸಂಪಾದಕಿ ಮತ್ತು ಬರಹಗಾರ್ತಿ ಮತ್ತು ಸಾಂದರ್ಭಿಕ ಶಿಕ್ಷಕಿ.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale