दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या बेळतांगडी तालुक्यातल्या डोंगरदऱ्यांमध्ये आजकाल गाईच्या गळ्यातल्या घंटांची टणटण क्वचितच कानावर पडते. “आता या घंटा कुणीच बनविना गेलंय,” हुकरप्पा सांगतात. पण ही काही साधीसुधी घंटा नाही बरं. त्यांच्या गावात, शिबाजेमध्ये गुरांच्या गळ्यातल्या घंटा धातूच्या नसतात. त्या बांबूपासून बनतात, हाताने. आणि साठी पार केलेले, सुपारीची शेती करणारे हुकरप्पा गेली किती तर वर्षं या अनोख्या घंटा तयार करतायत.

“मी पूर्वी गुरामागे जायचो,” हुकरप्पा सांगतात. “कधी कधी गायी कुठे तरी हरवायच्या. तेव्हा आमच्या डोक्यात कल्पना आली की त्यांच्या गळ्यात बांबूच्या घंटा करून घालाव्या.” घंटांच्या आवाजावरून डोंगरदऱ्यात वाट चुकलेल्या किंवा दुसऱ्याच्या पिकात तोंड घालायला गेलेल्या गायी शोधायला सोपं जाईल. मग गावातल्या एका जाणत्या माणसाने त्यांना ही घंटा करायची कला शिकवली आणि मग हुकरप्पा स्वतः घंटा बनवायला लागले. आणि लवकरच ते वेगवेगळ्या आकाराच्या घंटा बनवण्यात अगदी तरबेज झाले. बांबू दारातच होता त्यामुळे तीही अडचण नव्हती. त्यांचं गाव, बेळतांगडी कुद्रेमुख अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात आहे. पश्चिम घाटाच्या कर्नाटक प्रांतातल्या या भागात तीन प्रकारचे बांबू आढळतात.

हुकरप्पा तुळू बोलतात. या भाषेत बांबूच्या या घंटेला ‘बोम्का’ म्हणतात. कन्नडमध्ये तिला ‘मोंटे’ म्हणतात. शिबाजेमध्ये या घंटेचं विशेष स्थान आहे. इथल्या दुर्गा परमेश्वरीच्या देवळात देवीला या घंटा वाहण्याची परंपरा आहे. देवळाच्या आवारालाही इथे मोंटेतड्का म्हणतात. आपल्या गायीगुरांवर लक्ष राहू दे म्हणून लोक देवीला नवस बोलतात आणि हुकरप्पांकडून घंटा बनवून घेतात. “लोक नवस फेडण्यासाठी या घंटा बनवून घेतात. समजा, एखादी गाय गाभण राहत नसेल तर मग देवीला घंटा वाहतात,” ते सांगतात. “एका घंटेचे ५० रुपये देतात. आणि मोठी घंटा असेल तर ७०.”

व्हिडिओ पहाः शिबाजेचे हुकरप्पा आणि त्यांच्या घंटा

शेती आणि बांबूंच्या घंटा बनवायला सुरुवात केली त्या पूर्वी हुकरप्पा गुरं राखायचे. तोच त्यांचा पोटापाण्याचा धंदा होता. ते आणि त्यांचा मोठा भाऊ गावातल्या एकाच्या गायी राखायचे. “आमच्यापाशी जमीन नव्हती. घरी १० माणसं. त्यामुळे पोटाला कायमच चिमटा असायचा. वडील मजुरी करायचे. माझ्या मोठ्या बहिणी पण कामाला जायच्या,” ते सांगतात. कालांतराने गावातल्या एका जमीनदाराने त्यांना थोडी पडक जमीन खंडाने कसायला दिली. तिथे त्यांनी सुपारीची झाडं लावली. “एक हिस्सा मालकाला जायचा. १० वर्षं आम्ही अशी शेती केली. इंदिरा गांधींनी जमीन सुधार कार्यक्रम राबवला [१९७० च्या दशकात] तेव्हा आम्हाला त्या जमिनीची मालकी मिळाली,” हुकरप्पा सांगतात.

गुरांच्या गळ्यातला घंटा बनवून कमाई काही फार होत नाही. “आमच्या भागात आता या घंटा फार कुणी बनवेना गेलंय. माझ्या एकाही पोराने ही कला शिकून घेतली नाही,” हुकरप्पा सांगतात. आणि पूर्वी अगदी सहज मिळणारा बांबू आता दुर्मिळ व्हायला लागलाय. आजकाल बांबू शोधायला ७-८ मैलाची पायपीट करावी लागतीये. आणि तिथेसुद्धा काही वर्षांनी बांबू सापडेल का, शंकाच आहे,” ते म्हणतात.

पण हुकरप्पांच्या सराईत हातात बांबू पडला की ते सफाईने त्याचे तुकडे करतात, तासून, हव्या त्या आकारात तो कोरून घेतात. त्यांच्यामुळेच बांबूच्या घंटा तयार करण्याची ही कला अजूनही जिवंत आहे आणि बेळतांगडीच्या जंगलात या घंटांची टणटण अजून तरी निनादतीये.

अनुवादः मेधा काळे

Reporter : Vittala Malekudiya

ವಿಠ್ಠಲ ಮಲೆಕುಡಿಯ ಪತ್ರಕರ್ತ ಮತ್ತು 2017ರ ಪರಿ ಫೆಲೋ. ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಬೆಳ್ತಂಗಡಿ ತಾಲೂಕಿನ ಕುದುರೆಮುಖ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉದ್ಯಾನದ ಕುತ್ಲೂರು ಗ್ರಾಮದ ನಿವಾಸಿಯಾಗಿರುವ ಇವರು ಅರಣ್ಯವಾಸಿ ಬುಡಕಟ್ಟು ಜನಾಂಗವಾದ ಮಲೆಕುಡಿಯ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಸೇರಿದವರು. ಮಂಗಳೂರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಿಂದ ಪತ್ರಿಕೋದ್ಯಮ ಮತ್ತು ಸಮೂಹ ಸಂವಹನದಲ್ಲಿ ಎಂ.ಎ ಪದವಿ ಪಡೆದಿರುವ ಅವರು ಪ್ರಸ್ತುತ 'ಪ್ರಜಾವಾಣಿ' ಎಂಬ ಕನ್ನಡ ದೈನಿಕದ ಬೆಂಗಳೂರು ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ.

Other stories by Vittala Malekudiya