गूगल मॅप्सनी मला सांगितलं की माझं ठिकाण जवळ येत चाललंय. पण बाहेर पाहतो तर सगळा परिसर मला आठवतो त्यापेक्षा नक्कीच काही तरी वेगळा दिसत होता. समुद्र किनाऱ्यावर एक पडझड झालेलं घर होतं ते काही दिसेना. मी मागल्या वेळी उप्पाडाला आलो होतो तेव्हा त्या घराची पक्की जागा आणि तिचे नकाशावरचे आकडे मी माझ्या फोनमध्ये नोंदवून घेतले होते. ‘ते घर होय? – ते गेलं समुद्रात – पार तिकडे!’ बंगालच्या उपसागरा उसळणाऱ्या एका लाटेकडे बोट दाखवत टी. मारम्मा अगदी सहज सांगते.

२०२० साली देशभरात टाळेबंदी जाहीर झाली त्याच्या अगदी काही आठवडे आधी मी मारम्मा आणि त्यांच्या कुटुंबांची काही छायाचित्रं घेतली होती. समुद्राच्या किनाऱ्यावरचं ते जुनं, पडकं घर विलक्षण दिसत होतं, उदासही. चिंचोळ्या किनारपट्टीवर उभा असलेला घराचा तो उरला सुरला भागही तसा डळमळीतच होता. मारम्माचं एकत्र कुटुंब एकविसाव्या शतकाची सुरुवात झाली तोपर्यंत तिथे राहत होतं.

“चांगल्या आठ खोल्या आणि तीन गोठे होते. सगळे मिळून इथे १०० माणसं रहायची,” मारम्मा सांगते. पन्नाशीची मारम्मा इथली साधी राजकारणी आहे आणि पूर्वी तिचा मच्छीचा धंदा होता. २००४ साली त्सुनामी आली त्या आधी उप्पाडात आलेल्या वादळात घराचा मोठा हिस्सा कोलमडून पडला. त्यामुळे या एकत्र कुटुंबाची फाटाफूट होऊन ते वेगवेगळे रहायला लागले. मारम्मा दुसरीकडे रहायला गेल्या पण त्या आधी याच जुन्या घरात काही वर्ष राहिल्या.

ही काही एकट्या मारम्माची गोष्ट नाहीये. उप्पाडातल्या जवळपास प्रत्येकालाच समुद्र आत येत चालल्यामुळे एक तरी घर बदलायलाच लागलं आहे. स्वतःला आलेला अनुभव आणि इथल्या राहणाऱ्यांच्या आपसूक नेणिवेतून आता घर कधी सोडायचं हे समजायला लागलं आहे. “लाटा उसळत पुढे पुढे यायला लागल्या ना की आम्हाला समजतं की आता आपलं घर समुद्रात जाणार. मग आम्ही आमचा सगळा पसारा एका बाजूला करतो [तात्पुरती सोय म्हणून भाड्याचं घर पाहतो]. त्यानंतर साधारण महिनाभरात जुनं घर पाण्यात गेलेलं असतं,” ओ. सिवा सांगतो. १४ वर्षांच्या सिवानेही एक घर बदललं आहे.

T. Maramma and the remains of her large home in Uppada, in January 2020. Her joint family lived there until the early years of this century
PHOTO • Rahul M.

टी मारम्मा आणि उप्पाडातल्या त्यांच्या उरल्यासुरल्या घराचे अवशेष, जानेवारी २०२०. एकविसाव्या शतकाची सुरुवातीची काही वर्षं त्यांचं एकत्र कुटुंब याच घरात राहिलंय

*****

पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये असलेलं उप्पाडा आंध्र प्रदेशाला लाभलेल्या ९७५ किलोमीटर लांब समुद्रकिनाऱ्यावरचं एक लहानसं गाव. इथल्या रहिवाशांनी आठवतंय तेव्हापासून समुद्राचं अतिक्रमण सहन केलं आहे.

सुमारे ५० वर्षांपूर्वा मारम्माचं कुटुंब या घरात रहायला आलं. तेव्हा ते घर किनाऱ्यापासून बरंच लांब होतं. “किनाऱ्यावरून घरी चालत आलं की पाय दुखायला लागायचे,” ओ. चिन्नब्बै सांगतात. मारम्माचे चुलते आणि सिवाचे आजोबा. सत्तरी पार केलेल्या, ऐंशीकडे चाललेल्या खोल दर्यात मच्छिमारी करणाऱ्या या आजोबांना आठवतं की त्यांच्या घरापासून ते समुद्रापर्यंतच्या रस्त्यावर अनेक घरं होती, दुकानं आणि सरकारी इमारती देखील होत्या. “त्या तिथे किनारा होता,” दूर क्षितिजावर मावळतीच्या आकाशात काही जहाजं दिसत होती तिथे बोट दाखवत चिन्नब्बै सांगतात.

“आमचं नव घर आणि किनाऱ्यामध्ये खूप सारी रेती होती,” मारम्माला आठवतं. “आम्ही लहान होतो न तेव्हा इथे रेतीचे ढिगारे करायचो आणि त्यावरून घसराघसरी खेळायचो.”

गतस्मृतीतलं हे उप्पाडा आज समुद्राच्या पोटात गडप झालंय. १९८९ ते २०१८ या कालावधीत दर वर्षी उप्पाडाच्या समुद्रकिनाऱ्याची धूप होऊन तो १.२३ मीटर आत गेल्याचं आणि २०१७-१८ साली तर २६.३ मीटर धूप झाल्याचं विजयवाडा-स्थित आंध्र प्रदेश स्पेस अप्लिकेशन्स सेंटरने केलेला एक अभ्यास सांगतो. दुसऱ्या एका अभ्यासात असं नमूद करण्यात आलं आहे की गेल्या चाळीस वर्षांमध्ये काकीनाडा उपनगरांमधली ६०० एकरहून अधिक जमीन समुद्रात गेली असून काकीनाडा विभागातल्या कोतापल्ले मंडलातल्या एकट्या उप्पाडा गावातली एक चतुर्थांश जमीन समुद्राने गिळंकृत केली आहे. २०१४ साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार गेल्या २५ वर्षांत किनार शेकडो मीटर आत सरकल्याचं काकीवाडाच्या उत्तरेकडच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमारांचं म्हणणं आहे.

Maramma’s old family home by the sea in 2019. It was washed away in 2021, in the aftermath of Cyclone Gulab.
PHOTO • Rahul M.
Off the Uppada-Kakinada road, fishermen pulling nets out of the sea in December 2021. The large stones laid along the shore were meant to protect the land from the encroaching sea
PHOTO • Rahul M.

डावीकडेः २०१९ साली किनाऱ्यावर उभं असलेलं मारम्मांचं जुनं घर. २०२१ साली गुलाब चक्रीवादळ आलं आणि ते वाहून गेलं. उजवीकडेः उप्पाडा-काकीनाडा रस्त्यावर डिसेंबर २०२१ मध्ये मच्छीमार बांधव पाण्यातली जाळी ओढून घेतयात. रस्त्याच्या कडेच्या शिळा समुद्रापासून इथल्या जमिनीचं रक्षण व्हावं यासाठी टाकले होते

“काकीनाडा शहराच्या उत्तरेला काही किलोमीटरवर असलेल्या उप्पाडाच्या समुद्रकिनाऱ्याची धूप होण्याचं कारण म्हणजे २१ किलोमीटर लांबीच्या होप आयलंडची वाढ. शास्त्रीय भाषेत याला ‘स्पिट’ असं म्हणतात. गोदावरीची उपनदी असणाऱ्या नीलरेवुच्या मुखापासून उत्तरेच्या दिशेने हे बेट वाढत चाललं आहे,” डॉ. काकणी नागेश्व राव सांगतात. ते विशाखापट्टणमच्या आंध्र विद्यापिठातून भू-अभियांत्रिकी विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. “या बेटाला आपटून येणाऱ्या लाटा उप्पाडाच्या किनाऱ्यावर आदळतात आणि त्यामुळे किनाऱ्याची धूप होतीये. सुमारे १०० वर्षांपूर्वी हे बेट तयार व्हायला लागलं असावं आणि आता दिसतंय तसं बेट १९५० च्या दशकात तयार झालंय,” प्रा. राव सांगतात. गेल्या अनेक दशकांपासून ते आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरच्या विविध सागरी भूरुपांच्या आणि प्रक्रियांचा जवळून अभ्यास करत आहेत.

विसाव्या शतकाची सुरुवात होत असतानाची काही अधिकृत कागदपत्रं पाहिली तर आपल्या लक्षात येतं की सुमारे १०० वर्षांपूर्वीच उप्पाडामध्ये घडत असलेल्या या बदलांची दखल घेण्यात आली होती. १९०७ सालच्या ‘गोदावरी जिल्हा गॅझटियर’ मध्ये अशी नोंद आहे की १९०० सालापासून उप्पाडामधल्या ५० यार्डांहून अधिक जमिनीचीधूप झाली आहे. म्हणजेच त्या सात वर्षांमध्ये या गावाची सात मीटर जमीन दर वर्षी समुद्राने गडप केली.

“समुद्र किनाऱ्यांवर तशाही बऱ्याच घडामोडी होत असतात. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक घटक एकत्र येऊन बरंच काही घडत असतं,” डॉ. राव सांगतात. “उप्पाडामध्ये किनाऱ्याची धूप झाली त्याला अनेकविध कारणं आहेत.” जागतिक तापमानवाढ, उत्तर व दक्षिण ध्रुवांवरचं हिमाच्छादन वितळत जाणं, समुद्राची वाढती पातळी आणि बंगालच्या उपसागरातली चक्रीवादळांची वाढती संख्या ही त्यातली काही मोजकी कारणं. गोदावरीच्या खोऱ्यातल्या मोठामोठाल्या धरणांमुळे नदीच्या मुखाशी अवसाद किंवा गाळ भार कमी होत चालला आहे आणि यामुळे स्थिती आणखी बिकट होत चालली आहे.

*****

गावाची जमीन हळू हळू गडप होते आणि पूर्वीचं उप्पाडा लोकांच्या स्मृतीतून डोळ्यासमोर यायला लागतं.

जुन्या काळातलं, त्यांच्या आठवणींमधलं, त्यांच्या गोष्टींमधलं उप्पाडा कसं होतं हे समजून घ्यायचं असेल तर नाकु स्वातंत्रम वाचिंदी हा तेलुगु चित्रपट पहा असं गावातल्या एकाने मला सांगितलं. १९७५ साली आलेल्या त्या सिनेमातलं हो गाव खरंच वेगळंच भासतं – गावापासून समुद्रकिनारा चांगलाच लांब दिसतोय, मध्ये सुंदरशी पुळण. सिंगल-फ्रेम दृश्यांमध्ये विविध कोनांमधून चित्रण करता येऊ शकेल इतका सागरकिनारा रुंद होता. सिनेमातल्या अनेक महत्त्वाच्या दृश्यांना याच समुद्राची आणि किनाऱ्यावरच्या रेतीची पार्श्वभूमी दिसते.

Pastor S. Kruparao and his wife, S. Satyavati, outside their church in Uppada, in September 2019.
PHOTO • Rahul M.
D. Prasad  grew up in the coastal village, where he remembers collecting shells on the beach to sell for pocket money. With the sand and beach disappearing, the shells and buyers also vanished, he says
PHOTO • Rahul M.

डावीकडेः पास्टर एस. कृपाराव आणि त्यांची पत्नी, एस. सत्यवती उप्पाडामधल्या आपल्या चर्चसमोर, सप्टेंबर २०१९ मध्ये. उजवीकडेः डी. प्रसाद याच समुद्रकाठावरच्या गावात लहानाचे मोठे झाले. आपल्या दोस्तांबरोबर समुद्रातून शंखशिपले गोळा करून आणायचे आणि ते विकून खर्चासाठी पैसे कमवायचे. रेती आणि किनारा गायब व्हायला लागला आणि त्यासोबत शंख-शिंपले आणि त्यांचे ग्राहकही

“मी त्या सिनेमाचं शूटिंग पाहिलं होतं. त्याच्यासाठी आलेले काही नट-नटी इथे एका विश्रामगृहात राहिले होते,” ६८ वर्षीय एस. कृपाराव सांगतात. ते उप्पाडाच्या चर्चमध्ये पास्टर आहेत. “आता ते सगळं पाण्यात गेलंय. गेस्टहाउससुद्धा.”

१९६१ साली प्रसिद्ध झालेल्या पूर्व गोदावरी जिल्हा गॅझेटियरमध्ये या अतिथीगृहाचा संदर्भ येतो. “तिथे एक अत्यंत आरामदायी दोन खोल्याचं प्रवासी निवास आहे, समुद्रकिनाऱ्याहून फर्लांगभर दूर. या आधी बांधलेलं विश्रामगृह समुद्राने गिळंकृत केल्यामुळे हे बांधलं असल्याचं सांगतात.” म्हणजे ज्या अतिथीगृहात नाकु... सिनेमाचे कलाकार राहिले होते ते समुद्राच्या पोटात गेलेलं दुसरं निवास आहे म्हणायचं.

समुद्राने खाऊन टाकलेल्या अनेक वस्तू आणि वास्तू जुन्या नोंदींमध्ये आणि एका पिढीकडून दुसरीकडे आलेल्या कहाण्यांमध्ये आपल्याला सापडतात. जुन्या जाणत्या लोकांना त्यांचे आई-वडील किंवा आजी-आजोबा एका पेड्डा रायी, म्हणजेच मोठाल्या शिळेबद्दल बोलायचे ते आठवतं. ही शिळा समुद्राच्या पाण्याखाली असते. १९०७ च्या गॅझेटियरमध्ये असंच काहीसं वर्णन आढळतं. “समुद्रात आतमध्ये अर्ध्या मैलावर जुने अवशेष आहेत. कोळ्यांच्या जाळ्यात किती तरी गोष्टी येतात. समुद्राला जेव्हा उधाण येतं तेव्हा पूर्वी कधी पाण्यात बुडून गेलेल्या गावातून किनाऱ्यावर वाहून येणारी नाणी वगैरे गोळा करायला गावातली मुलं येतात.”

१९६१ च्या हँडबुकमध्ये देखील या अवशेषांचा उल्लेख येतोः “जुने जाणते मच्छीमार सांगतात की मासे धरायला दर्यावर गेलं की किनाऱ्यापासून आतमध्ये एक मैलाच्या अंतरावर त्यांच्या होड्या किंवा गलबतं, माशाची जाळी आणि दोऱ्या पाण्यात बुडालेल्या घरांना किंवा झाडांच्या बुंध्यांना अडकतात आणि त्यांच्या आजवरच्या अनुभवानुसार समुद्र त्यांच्या गावावर अतिक्रमण करायला लागलाय.”

तेव्हापासून समुद्राची भूक काही भागलेली नाही आणि गावाचे घास घ्यायचाही तो थांबलेली नाही. जवळपास अख्खा किनारा, अगणित घरं, एक मंदीर तर नक्कीच आणि एक मशीद, सगळं त्याच्या पोटात गेलंय. गेल्या एक दशकभरात १२.१६ कोटी रुपये खर्चून, उप्पाडाचं रक्षण करण्यासाठी २०१० मध्ये बांधलेली १,४६३ मीटर लांबीची ‘जिओट्यूब’देखील लाटांच्या तडाख्यासमोर टिकू शकलेली नाही. किनाऱ्याची धूप थांबवण्यासाठी आणि भराव घालण्यासाठी मोठाल्या वाहिन्यांमध्ये पाणी आणि रेतीचं मिश्रण भरून त्या किनाऱ्यावर अंथरतात, त्याला जिओट्यूब असं म्हणतात. “१५ वर्षांमध्ये दोन चौरस फूट रुंदीच्या शिळांचे सहा इंची दगड झालेले माझ्या डोळ्याने मी पाहिलेत. लाटांचा तडाखा इतका जोराचा आहे,” २४ वर्षांचा डी. प्रसाद सांगतो. तो याच वस्तीत मोठा झालाय आणि अधून मधून मासेमारी करतो.

Remnants of an Uppada house that was destroyed by Cyclone Gulab.
PHOTO • Rahul M.
O. Chinnabbai, Maramma's uncle, close to where their house once stood
PHOTO • Rahul M.

डावीकडेः गेल्या वर्षी गुलाब वादळामध्ये पडझड झालेल्या घराचे बाकी अवशेष. उजवीकडेः मारम्मांचे चुलते ओ. चिन्नब्बै कधी काळी त्यांचं घर जिथे होतं तिथे उभे आहेत

२०२१ साली आलेल्या उप्पेना या तेलुगु सिनेमामध्ये दिसणारं उप्पाडा एकदमच बदललंय. पूर्वी जिथे पुळण होती तिथे आता समुद्रापासून गावाचं रक्षण करण्यासाठी मोठमोठाले बोल्डर आणि शिळा रचलेल्या दिसतात. १९७५ च्या सिनेमात गाव आणि समुद्र एकाच चौकटीत घेता येत होता पण आता मात्र ती दृश्यं वरतून किंवा तिरक्या कोनातूनच घेता आलीयेत. कॅमेरा ठेवण्याइतकीही पुळण आता उरलेली नाही.

उप्पाडाच्या किनाऱ्याला अलिक़डच्या काळात बसलेला सगळ्यात जोराचा तडाखा म्हणजे सप्टेंबर २०२१ मध्ये आलेलं गुलाब चक्रीवादळात. या वादळात ३० घरं समुद्रात वाहून गेली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात आलेल्या जवाद वादळात नव्यानेच बांधलेल्या उप्पाडा-काकीनाडा महामार्गाचं इतकं निकसान झालं की आता तो वापरासाठी धोकादायक बनला आहे.

गुलाब वादळ येऊन गेल्यानंतरही समुद्र उफाणलेलाच होता आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला मारम्माच्या जुन्या घराचे जे काही अवशेष उरले होते तेही समुद्राच्या पोटात गेले. ती आणि तिचे पती ज्या घरात राहत होते ते घर देखील समुद्रात गेलं.

*****

“[गुलाब] वादळ येऊन गेल्यानंतर आमच्यापैकी कित्येक जणांना दुसऱ्यांच्या घराबाहेरच्या ओट्यांवर रात्र काढावी लागली होती,” २०२१ साली झालेली पडझड आठवते आणि मारम्माचा आवाज कातर होतो.

२००४ साली वादळामुळे मारम्मा आणि तिचे पती टी. बाबईंना आपल्या पूर्वजांचं राहतं घर सोडावं लागलं होतं. त्यानंतर खोल दर्यात मासेमारी करणारे बाबई आणि मारम्मांनी दोन घरं बदलली. त्यातलं एक भाड्याचं तर एक त्यांचं स्वतःचं होतं. गेल्या वर्षीच्या वादळात ते घरही पाण्याने ओढून नेलं. आजघडीला हे दोघं शेजारीच एका नातेवाइकाच्या घराबाहेर, उघड्यावरच एका ओट्यावर राहतायत.

“कधी काळी आम्ही ‘साउंड-पार्टी’ [खाऊन-पिऊन सुखी आणि चांगली पत असलेले] होतो,” मारम्मा सांगतात. घराबाहेर पडायचं, नवं घर बांधायचं हे चक्र सुरूच होतं. त्यात चार मुलींच्या लग्नावर झालेला खर्च अशा सगळ्यामुळे त्यांच्यापाशी असलेली गंगाजळी खालावत गेली.

M. Poleshwari outside her third house; the first two were lost to the sea. “We take debts again and the house gets submerged again”
PHOTO • Rahul M.
M. Poleshwari outside her third house; the first two were lost to the sea. “We take debts again and the house gets submerged again”
PHOTO • Rahul M.

डावीकडेः मारम्माचं जुनं घर मोठं, आठ खोल्यांचं होतं. “शंभरेक माणसं इथे राहत होती,” ती सांगते. उजवीकडेः एम. पोलेश्वरींचं हे तिसरं घर. पहिली दोन समुद्राने गिळून टाकली. त्या म्हणतात, “आम्ही परत परत कर्ज काढतो आणि पुन्हा पुन्हा घरं पाण्यात जातात”

“हे घर बांधण्यासाठी आम्ही लोकांकडून कर्जं घेतली होती. पण ते घर पाण्यात गेलं,” एम. पोलेश्वरी सांगते. मारम्माप्रमाणे तिच्याही आवाजात त्रागा असतो. “आम्ही परत परत कर्ज काढतो आणि पुन्हा पुन्हा घरं पाण्यात जातात.” आतापर्यंत पोलेश्वरीची दोन घरं समुद्रात गेली आहेत. आता तिसऱ्या घरात संसार मांडल्यावरही तिला पैसापाणी कसं काय भागवायचं याचा आणि खोल दर्यात मासेमारी करणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या सुरक्षेचा घोर लागून राहिलेला असतो. “दर्यावर असताना वादळ आलं तर जीवच जायचा. पण आम्ही करणार तरी काय? समुद्रावरच आमचा प्रपंच सुरू आहे.”

उत्पन्नाचे इतर स्रोतही घटत चालले आहेत. प्रसाद लहान असताना त्याच्या दोस्तांबरोबर किनाऱ्यावर जायचा आणि ओहोटीच्या वेळी किनाऱ्यावर वाहून आलेले शंखशिंपले आणि खेकडे गोळा करून विकायचा. तेवढेच खर्चाला पैसे व्हायचे. पुळण आणि रेतीच नाहीशी झाल्यामुळे शंखशिंपलेही गायब झालेत आणि ते विकत घेणारे ग्राहकही.

“विकले जातील या आशेने आम्ही शिंपले गोळा केले होते,” अंगणात वाळत घातलेल्या शिंपल्यांकडे नजर टाकत पोलेश्वरी सांगते. “पूर्वी ‘शिंपले विकत घेऊ, शंख विकत घेऊ’ असं म्हणत गावात माणसं फिरायची. आजकाल तेही क्वचितच दिसतात.”

२०२१ साली सप्टेंबर महिन्यात आलेल्या वादळानंतर मच्छीमार वस्तीतल्या मारम्मा आणि इतर २९० जणांनी मिळून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांना पत्र पाठवून आपल्या गावाला असलेला वाढता धोका आणि गावाची झालेली वाताहत याकडे लक्ष वेधलं. “पूर्वी [माजी मुख्यमंत्री] वाय एस राजशेखर रेड्डी गारुंनी मच्छीमारांचं गाव असलेल्या उप्पाडाच्या किनाऱ्यावर मोठे बोल्डर आणि शिळा टाकून गाव समुद्रात जाण्यापासून वाचवलं होतं. त्सुनामी आणि चक्रीवादळांमध्ये या खडकांनीच आमचं रक्षण केलं,” पत्रात लिहिलं होतं.

The stretch from the fishing colony to the beach, in January 2020. Much of it is underwater now.
PHOTO • Rahul M.
The Uppada-Kakinada road became unsafe after it was damaged by Cyclone Jawad in December 2021. A smaller road next to it is being used now
PHOTO • Rahul M.

डावीकडेः मच्छीमारांच्या वस्तीपासून पुळणीपर्यंतचा पट्टा, जानेवारी २०२०. यातला बहुतेक भाग आता पाण्याखाली गेला आहे. उजवीकडेः डिसेंबर २०२१ मध्ये आलेल्या जवाद वादळाने उप्पाडा-काकीनाडा महामार्गाचं नुकसान झाल्यामुळे तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सध्या त्याच्या शेजारी बांधलेल्या छोट्या रस्त्याने वाहतूक सुरू आहे

“आता सारखीच वादळं यायला लागली आहेत त्यामुळे किनाऱ्यावरचे मोठे दगड दूर फेकले गेले आहेत आणि किनाऱ्याचा बांध फुटला आहे. ज्या रस्सीने दोर बांधले होते तोही आता जीर्णशीर्ण झाला आहे. त्यामुळे किनाऱ्याला लागून असलेली घरं आणि झोपड्या आता थेट समुद्रात गेल्या आहेत. किनाऱ्यावरचे मच्छीमार जीव मुठीत धरून जगत आहेत.”

पण डॉ. राव यांच्या मतानुसार उफाणलेल्या समुद्रापासून अशा बोल्डरपासून संरक्षण मिळत असल्याचे फारसे काही पुरावे नाहीत. समुद्राचं पाणी आत शिरू नये यासाठी तात्पुरती सोय इतकाच त्याचा उपयोग असतो. “घरंदारं वाचवत बसू नका. किनारा वाचवा. पुळणच तुमच्या घरांचं रक्षण करते,” ते सांगतात. “जपानच्या काइके किनाऱ्यावर जसे दगडी बांध घातलेत तसं काही केलं तर उप्पाडामध्ये किनाऱ्याची धूप रोखता येऊ शकते.”

*****

समुद्र गावाचा एकेक लचका तोडत असताना गावातही कित्येक बदल व्हायला लागले आहेत. १९८० च्या दशकात उप्पाडातले विणकर गावाच्या आतल्या भागात रहायला गेले. हातमागावरच्या रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या विणकरांना सरकारने तिथे जागा देऊ केली होती. हळू हळू गावातले वरच्या जातीतले सधन लोकही समुद्रापासून लांब रहायला जाऊ लागले. पण मच्छीमारांचं अख्खं आयुष्यच समुद्राशी जोडलेलं असतं त्यामुळे त्यांना किनाऱ्यावरून हलणं शक्यच नाहीये.

वरच्या जातीचे लोक सुरक्षित भागात रहायला गेले आणि जातीशी निगडीत काही रुढीही गळून पडू लागल्या. हेच घ्या ना, वरच्या जातीच्या घरांमध्ये काही समारंभ असला तरी घावलेली मासळी त्यांना फुकट देऊन टाकावी लागायची. पण आता तसं काही करावं लागत नाही. हळू हळू मच्छीमारांनी ख्रिश्चन धर्म जवळ केला. “अनेकांनी मुक्तीसाठी धर्मात प्रवेश केला,” पास्टर कृपाराव सांगतात. इथले बहुतेक लोक खूपच गरीब आहेत आणि पूर्वी मागास वर्गात होते. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याआधी आपण स्वतः जातीवरून हिणवल्याचे अनेक प्रसंग घडले असल्याचं कृपाराव सांगतात.

Poleru and K. Krishna outside their home, in 2019. The structure was washed away in 2021 after Cyclone Gulab struck the coast.
PHOTO • Rahul M.
The cyclone also wrecked the fishing colony's church, so prayers are offered in the open now
PHOTO • Rahul M.

डावीकडेः के. पोरेलु आणि के. कृष्णा २०१९ साली त्यांच्या घराबाहेर उभे आहेत. गेल्या वर्षी आलेल्या गुलाब चक्रीवादळात त्यांचं हे घर वाहून गेलं. उजवीकडेः वादळात चर्चच्या इमारतीची पडझड झाल्यामुळे आता खुल्या आकाशाखाली प्रार्थना होतात

“२०-३० वर्षांपूर्वी गावातले बहुतेक सगळे हिंदू होते. गावातल्या देवीचा सण नेमाने साजरा केला जायचा,” चिन्नब्बैंचा मुलगा ओ. दुर्गय्या सांगतो. “आणि आता जवळजवळ सगळं गाव ख्रिश्चन झालंय.” १९९० च्या दशकात [देवीची आराधना करण्यासाठी] हे गाव गुरुवारी सुटी घ्यायचं आणि आता चर्चला जाण्यासाठी रविवारी काम करत नाही. गावातले रहिवासी सांगतात की काही दशकांपूर्वी गावात थोडेफोर मुस्लिम रहिवासी होते पण गावातली मशीद समुद्राच्या पाण्यात बुडाली त्यानंतर त्यातले बरेच गाव सोडून गेले.

जे गावी मागे राहिले ते उफाणत्या समुद्राकडूनच तगून राहण्याचे धडे घेतायत. “[धोका] सरळ दिसतो. या दगडातून घोल्लुगोल्लु असा आवाज यायला लागतो. पूर्वी आम्ही  [लाटांचा अंदाज बांधायला] आकाशातल्या तारे पहायचो, ते वेगळेच चमकायचे. आता आम्हाला सगळी माहिती मोबाइल फोनवरून मिळते,” २०१९ साली मी पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हा मच्छीमार असलेले के. कृष्णा सांगत होते. “कधी कधी शेतावरून पूर्वेचं वारं वाहतं तेव्हा पैशाची मासळी मिळत नाही,” त्यांच्या पत्नी, के. पोलेरु सांगतात. मच्छीमार वस्तीच्या टोकाला असलेल्या त्यांच्या झोपडीत उभं राहून आम्ही समुद्राच्या लाटा पाहत होतो. त्यानंतर गुलाब वादळात त्यांची झोपडी कोलमडून गेली आणि आता ते नव्या झोपडीत राहतायत.

तिथे मारम्मा आपल्या नातेवाइकाच्या घराबाहेरच्या ओट्यावर दिवसरात्र काढतायत. त्यांनी काय काय गमावलं त्याचं दुःख आणि धक्का देखील त्यांच्या कापऱ्या आवाजातून अनुभवायला मिळतो. “आम्ही बांधलेली दोन घरं  समुद्राने गिळून टाकली. आता अजून एक बांधू शकू का, काय माहित.”

अनुवादः मेधा काळे

Reporter : Rahul M.

2017 ರ 'ಪರಿ' ಫೆಲೋ ಆಗಿರುವ ರಾಹುಲ್ ಎಮ್. ಅನಂತಪುರ, ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶ ಮೂಲದ ಪತ್ರಕರ್ತರಾಗಿದ್ದಾರೆ.

Other stories by Rahul M.
Editor : Sangeeta Menon

ಸಂಗೀತಾ ಮೆನನ್ ಮುಂಬೈ ಮೂಲದ ಬರಹಗಾರು, ಸಂಪಾದಕರು ಮತ್ತು ಸಂವಹನ ಸಲಹೆಗಾರರು.

Other stories by Sangeeta Menon

ಪಿ. ಸಾಯಿನಾಥ್ ಅವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಸ್ಥಾಪಕ ಸಂಪಾದಕರು. ದಶಕಗಳಿಂದ ಗ್ರಾಮೀಣ ವರದಿಗಾರರಾಗಿರುವ ಅವರು 'ಎವೆರಿಬಡಿ ಲವ್ಸ್ ಎ ಗುಡ್ ಡ್ರಾಟ್' ಮತ್ತು 'ದಿ ಲಾಸ್ಟ್ ಹೀರೋಸ್: ಫೂಟ್ ಸೋಲ್ಜರ್ಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯನ್ ಫ್ರೀಡಂ' ಎನ್ನುವ ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ.

Other stories by P. Sainath