तिरु मूर्तींच्या वडलांचं आज वर्षश्राद्ध आहे. सुंदरमूर्तींच्या हार घातलेल्या तसबिरीसमोर लाल केळ्यांचा घड, फुलं, नारळ, पेटलेला कापूर ठेवलाय. पण तिरु मूर्तींनी मात्र काही वेगळ्याच गोष्टी समोर ठेवलेल्या आहेतः दहा प्रकारचे साबण, नारळाच्या तेलाचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचं सगळ्यात आवडतं उत्पादनः दळलेली हळद.

“अप्पांना याहून चांगलं मी काय वाहणार?” आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते विचारतात. त्यांच्या वडलांनी मंजळ म्हणजेच हळदीची शेती सोडून दिली होती. सगळ्यांचा विरोध पत्करून तिरूंनी ही शेती नव्याने सुरू केली. “लोक मला सांगायचे, मल्ली (मोगरा) लाव, कारण फुलात रोजचा पैसा आहे. मी हळद लावली तेव्हा सगळे मला हसले होते,” ते हसतात. तिरूंनी त्या सगळ्यांचं म्हणणं खोटं ठरवलंय. आणि त्यांची गोष्ट तशी दुर्मिळच – एका शेतकऱ्याच्या यशाची गोष्ट.

४३ वर्षांचे तिरू मूर्ती भावासोबतच्या सामायिक १२ एकरात शेती करतात. तमिळ नाडूच्या इरोडे जिल्ह्यातल्या भवानीसागर तालुक्यात उप्पुपालम वस्तीमध्ये त्यांची जमीन आहे. ते तीन पिकं घेतात – हळद, केळी आणि नारळ. पण ते ठोक बाजारात विक्री करत नाहीत. किंमतीवर आपलं काहीच नियंत्रण नाही तर विकून काय उपयोग, असा त्यांचा रोकडा सवाल आहे. स्थानिक पातळीवर, देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मोठे व्यापारी, कॉर्पोरेट मंडळी आणि सरकारच भाव ठरवतं.

हळदीचा बाजार तेजीत आहे आणि जगभरात भारताची इथे चांगलीच सद्दी आहे. २०१९ साली १९ कोटी डॉलर मूल्याची – एकूण जागतिक व्यापाराच्या ६२.६ टक्के - हळद निर्यात झाली. पण मेख अशी की भारत हळद आयातही करतो. ११.३ टक्के हळद आयात होते आणि जगभरात आयात करणाऱ्या देशांमध्ये आपला दुसरा क्रमांक आहे. गेल्या काही वर्षांत आयात वाढलीये आणि त्याचा भारतातल्या हळद उत्पादकांना फटका बसला आहे.

देशातल्या बाजारात – इरोडेच्या बाजारपेठांमध्ये – आधीच त्यांची पिळवणूक होतीये. मोठे व्यापारी आणि खरेदीदार भाव ठरवतात. जैविक पद्धतीने पिकवलेल्या उत्पादनाला अधिक भाव मिळत नाही. आणि वर्षागणिक भावात मोठे चढउतार होत असतात. २०११ साली हळदीला क्विंटलमागे १७,००० रुपये भाव मिळाला होता. त्याच्या पुढच्याच वर्षी त्याच्या पावपटीवर भाव आला. २०२१ साली क्विंटलमागे सरासरी ७,००० रुपये भाव मिळत होता.

करामत्या स्वभाव, चिकाटी आणि समाजमाध्यमांवरचा वावर यांतून तिरु यांना एक साधासरळ उपाय गवसलाः मूल्यवर्धन. आता त्यांनी केलेलं सगळं काही बाकी सगळ्यांना शक्य होईलच असं नाही. पण त्यांनी मिळवलेलं यश कौतुकास पात्र आहे. “एका नारळाला शेताच्या बांधावर १० रुपये मिळतात. पण मी त्याचं तेल काढतो आणि त्याचा साबण तयार करतो. हळदीचंही तसंच,” ते सांगतात. “मी १.५ एकरात हळद पिकवतो. मला जर बाजारात ३ क्विंटल हळद विकायची असेल तर या जैविक उत्पादनावर मला किलोमागे ५० रुपये तोटा सहन करावा लागेल,”

Two types of turmeric grow in Thiru Murthy's fields at the foothills of the Sathyamangalam hills in Erode.
PHOTO • M. Palani Kumar
Thiru at home with his children and a relative’s son
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः इरोड्याच्या सत्यमंगलम डोंगररांगांच्या पायथ्याशी तिरु मूर्तींची जमीन आहे. त्यात दोन प्रकारच्या हळदीचं पीक घेतलं जातं. उजवीकडेः तिरू आपल्या घरी मुलांसोबत, सोबत त्यांचा भाचा

जैविक पद्धतीने शेती करायची म्हणजे रासायनिक शेती करणाऱ्यांपेक्षा खर्चातही भर पडतेच. असं असूनही त्यांच्या आसपासच्या शेतकऱ्यांपेक्षा त्यांची परिस्थिती चांगली आहे.

सत्यमंगलम डोंगरारांगांच्या पायथ्याला त्यांची शेती आहे. शांतशा खेड्यातलं हिरवं कंच शेत आणि पाठीमागे  माथ्यावर काळ्या ढगांचा मुकुट ल्यालेल्या निळ्याजांभळ्या डोंगररांगा. त्यांची हळदीची रोपं चांगलीच उंच आहेत. मोठमोठाली पानं पावसाच्या शिडकाव्यात आणि ऑक्टोबर महिन्यातल्या उन्हात न्हाऊन निघालीयेत. शेताच्या बांधावर असलेल्या नारळाच्या झावळ्यांमध्ये शिंपी पक्ष्यांची घरटी दिसतायत. किलबिलाट करत झावळ्यांमधून भुर्रकन उडतायत. शेतकरी म्हणून त्यांनी केलेल्या संघर्षाचा विसर पडावा इतकं सुंदर दृश्य समोर आहे. काही वेळाने आपल्या घरी ते आम्हाला हळूहळू, त्यातले बारकावे समजावून सांगतात. गुलाबी रंगाच्या भिंती आणि खाली सिमेंटचा कोबा केलेलं त्यांचं घर. चार वर्षांची नात मांडीत बसली होती आणि तिच्या पायातले पैंजण मधूनच छुमछुम करत होते.

“मी ग्राहकांना अर्धा किंवा एक किलोचे पुडे करून विकले तरच काही तरी नफा मिळतो. किंवा मग साबण, तेल किंवा दुधात घालायच्या पावडरी करून.” ते ज्या गोष्टी पिकवतात त्या सगळ्याचं मूल्य कसं वाढवता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे. हळद विकण्याआधी ती उकडून, वाळवून, सोलून विकावी लागते. तेही हे सगळं करतातच. इतर शेतकरी देखील चांगला भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत हळद साठवून ठेवतात आणि तिरु देखील आपल्या गोदामात हळद ठेवतात.

पण ते पुढे जाऊन हळदीचे कंद आणि मोड थोडे थोडे दळूनही ठेवतात. आणि जरा कल्पक विचार करून ते त्यापासून काही सौंदर्यप्रसाधनं आणि पेय तयार करतात. आणि अशा प्रकारे किलोमागे १५० रुपये जास्त कमवतात.

“पण मी सगळा पैसा वापरून टाकत नाही,” ते सांगतात. मिळालेला पैसा ते परत शेतीत घालतात. शेतीतल्या उत्पन्नावर त्यांचं घर चालतं आणि परिसरातल्या अनेकांना रोजगार निर्माण झालाय. “हळदीचा हंगाम तेजीत असतो तेव्हा माझ्या शेतात किमान पाच गडी आणि तीन बायांना काम असतं. गड्यांना ४०० तर बायांना ३०० रुपये रोजगार आहे. शिवाय चहा आणि बोंडा (वडा). सध्या हळद काढायची तर पूर्ण वर्षभरात ४०,००० रुपये खर्च येतोय. पूर्वी याच्या एक दशांश देखील खर्च येत नव्हता. मजुरांना विचारलं तर ते म्हणतात, पेट्रोल १०० रुपये झालंय, दारूची क्वार्टर [१८० मिली] १४० रुपयाला मिळायला लागलीये...” ते हसायला लागतात. या सगळ्यात वाढ झाली तरी हळदीचे भाव काही वाढलेले नाहीत.

*****

नाचणी झोडपणाऱ्या बायांची गाणी
हळद आणि सुरणाची राखण करणाऱ्या शेतकऱ्यांचे ढोल
रानडुकरांना पळवून लावणारे
डोंगरात भरून राहिलेत ध्वनी आणि नाद

मलइपाडु कडाम या संगम कालीन कवितेतून

Trays with the lots of turmeric fingers and bulbs displayed at an auction in the regulated market in Perundurai, near Erode
PHOTO • M. Palani Kumar
Trays with the lots of turmeric fingers and bulbs displayed at an auction in the regulated market in Perundurai, near Erode
PHOTO • M. Palani Kumar

इरोडेच्या जवळ पेरुन्दुरईमध्ये एका सरकारी नियंत्रणाखालच्या बाजारपेठेत मोठ्या ट्रेमध्ये ठेवलेले हळदीचे मोड आणि कंद

तमिळ नाडू आणि हळदीचं नातं २,००० वर्षांपूर्वीपासून सुरू आहे, चेंथिल नाथन सांगतात. OldTamilPoetry.com या आपल्या ब्लॉगवर त्यांनी या तमिळ कवितेचा अनुवाद केला आहे. ते सांगतात की मलइपाडु कडाम ही “संगम काव्यांमधल्या दहा दीर्घ काव्यांमधली एक आहे.”

भारतभरात स्वयंपाकघरात अधिराज्य गाजवणारी हळद (Curcuma longa) आल्याच्या कुळातली. जमिनीच्या आतलं खोड, त्यातला मुख्य कंद आणि त्याला फुटणारे मोड असं सगळं विक्रीसाठी वापरलं जातं. काढणीच्या वेळी कंद आणि मोड वेगळे करून त्यावर प्रक्रिया केली जाते. उकडून, वाळवून, घासून साफ केले जातात आणि मगच त्यांची विक्री होते. सौद्यात मोडांना जास्त भाव मिळतो.

भारतीय अन्नधान्याचा मागोवा घेणारे इतिहासकार के टी अचाया म्हणतात की हळद मूळची कदाचित आपल्याच देशातली असावी. इंडियन फूडः ए हिस्टॉरिकल कम्पॅनियन या आपल्या पुस्तकात ते लिहितातः “आकर्षक रंग आणि रंगवण्याची क्षमता यामुळे हरिद्रा [हळदीचं संस्कृत नाव] जादू आणि कर्मकांडांमध्ये हळदीला विशेष स्थान मिळालं.” अगदी रोजच्या वापरातला हा पदार्थ भारतभरातल्या विविध खाद्यसंस्कृतींमध्ये वापरला जातो. चिमूटभर हळद घालताच अन्नाला हलकासा रंग येतो, स्वाद येतो आणि तिच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. करक्युमिन हे पिवळं धमक रंगद्रव्य आपल्या औषधी मूल्यासाठी वेगळं काढलं जातं. अँटी ऑक्सिडंट आणि दाहशामक असे त्याचे गुण आहेत.

शास्त्रज्ञांच्या फार आधी हळदीचे हे उपयोग घराघरातल्या आज्ज्यांना समजले होते. हळद आणि मिरी घालून दूध गरम करायचं – असं केल्याने करक्युमिन रक्तात सहज शोषलं जातं – आणि घरी कुणाला सर्दी पडसं झालं की द्यायचं. सध्या स्टारबक्समध्ये ‘गोल्डन टर्मरिक लॅटे’ कसं करायचं ते सांगतात, ते अर्थातच माझ्या आजीच्या पसंतीस उतरेलच असं नाही. कारण त्यासाठी ओटचं दूध, फेस आणण्यासाठीचं यंत्र आणि व्हॅनिला पाहिजे.

हळद शुभ मानली जाते. दक्षिणेकडच्या राज्यात हळदीने रंगवलेला दोरा विवाहित स्त्रिया गळ्यात घालतात. मुलीला पहिली पाळी आली की मंजळ नीरातु विळा (‘हळदीने नाहण्याचा विधी’) केला जातो (आणि आजकाल त्याचे अगदी फ्लेक्स पण लागतात आणि मोठी गर्दी असते). हळद जंतुनाशक म्हणून फार पूर्वीपासून वापरात आहे. जखमा, काही कापलं तर हळदीचा लेप लावला जायचा. आणि प्राण्यांच्या औषधांमध्ये ही हळदीचा असाच वापर केला जात आहे.

अमेरिकेतल्या संशोधकांनी जेव्हा हळदीचं पेटंट घेतलं तेव्हा कौन्सिल फॉर साइंटिफिक अँड इंडस्ट्रियल रीसर्च (सीएसआयआर) ने १९९७ साली १५,००० अमेरिकी डॉलर फी देऊन वकिलाची नेमणूक केली आणि दावा केलाकी भारतात अनेक शतकांपासून हळद जखमांवर उपचार म्हणून वापरात आहे त्यामुळे “पेटंट घेण्यासाठी लागणारी ‘नाविन्या’ची अट हे पेटंट पूर्ण करू शकत नाही.” सीएसआयआरने अमेरिकेच्या पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिसला हळदीवरचं हे “वादग्रस्त पेटंट” मागे घ्यायला भाग पाडलं.

शिवाजी गणेशन असते तर भलते खूश झाले असते. ब्रिटिशांच्या विरोधात लढलेल्या वीरपाण्डिया कट्टबोम्मन या नायकाची भूमिका १९५९ सालच्या याच नावाने प्रदर्शित झालेल्या सिनेमामध्ये त्यांनी केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम चित्रपट आणि सर्वोत्तम अभिनेता असे पुरस्कार मिळवणारा हा पहिला तमिळ चित्रपट होता. इंग्रजांनी लादलेल्या करांना विरोध करताना कट्टबोम्मन म्हणतो, “का? तुम्ही माझ्या समाजाच्या बायांना काय हळद दळायला मदत केली आहेत काय?”

*****

“माझ्या वडलांच्या कष्टाची फळं मी आज चाखतोय.”
तिरु मूर्ती, इरोड्याचे हळद-उत्पादक शेतकरी

Thiru inspecting the turmeric plants in his farm, in Uppupallam hamlet of Erode's Bhavanisagar block
PHOTO • M. Palani Kumar

इरोड्याच्या भवानीसागर तालुक्यातल्या उप्पुपल्लम गावातल्या आपल्या शेतात हळदीची रोपं निरखून पाहणारे तिरु मूर्ती

ते १८ वर्षांचे असल्यापासून त्यांनी अधून मधून शेती केली होती. २०२१ साली ऑक्टोबर महिन्यात आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं. ही आमची दुसरी भेट होती. २०२१ च्या मार्च महिन्यात जेव्हा हळद काढणीला येते तेव्हा पहिल्यांदा आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. वाऱ्यावर झुलणाऱ्या हळदीच्या रोपांमधून, पांढऱ्या शुभ्र लुंगीचं टोक हातात धरून चालत चालत ते आम्हाला त्यांचा आजवरचा प्रवास वर्णन करून सांगत होते.

“अप्पा उप्पुपल्लमला आले. ते त्यांचं आजोळ. सत्तरीच्या दशकात त्यांनी दहा का वीस हजार रुपये एकर भावाने जमीन खरेदी केली. आता त्याच जमिनीचा भाव ४० लाख रुपये एकर झाला आहे. आणि आता एकगठ्ठा १० एकर विकत घेणंही शक्य होणार नाही!” तिरूंनी १० वीत असताना शाळा सोडली आणि २००९ साली ते पूर्णपणे जैविक शेती करायला लागले. तेव्हा त्यांचं वय होतं ३१.

पण शेती हा काही त्यांची पहिली पसंती नव्हती. त्या आधी त्यांनी अनेक प्रकारच्या नोकऱ्या किंवा कामं करून पाहिली होती. पहिल्यांदा त्यांनी घरीच एक मलिगई कडई म्हणजे किराणा मालाचं दुकान टाकलं. ते दुकानात एलंध वडइ म्हणजेच आंबट गोड बोरांचे वडे, थिनपंडाम नावाचा एक पदार्थ, तांदूळ, सिगारेट आणि विड्या विकायचे. दिवाळीच्या काळात फटाके विकायचे. धंदा करायचा त्यांना नादच होता. त्यामुळे मग त्यांनी अनेक प्रकारचे व्यवसाय करून पाहिले. केबल टीव्ही, दूधविक्री करून पाहिली. त्यानंतर ते बंगळुरूला गेले. त्यांची मोठी बहीण तिथे रहायची. तिथे त्यांनी दुचाकी गाड्या दुरुस्तीचं गॅरेज टाकलं, नंतर कर्ज देणाऱ्या एका वित्त संस्थेत काम केलं. चारचाकी गाड्यांच्या खरेदी विक्रीचाही त्यांना धंदा करून पाहिला. “चौदा वर्षांमध्ये मी सहा प्रकारची कामं केली. फार अवघड होतं. मी खूप हातपाय मारले, चटके सोसले.”

बंगळुरूमधले त्यांचे दिवस म्हणजे कुत्र्यासारखी हालत असं ते वर्णन करतात – “नाइ पदधा पाडु.” कमाई अगदीच थोडी आणि एका मित्राबरोबर राहत असलेल्या ६ बाय १० फूट खोलीचं २,५०० रुपये भाडं द्यायला लागत होतं.

“२००९ साली मार्च महिन्यात मी सत्यमंगलमला परत आलो आणि मला शेतीचं वेडच लागलं.” त्यांनी आपल्या वडलांचा कित्ता गिरवत उसाची लागवड केली आणि सोबत टॅपिओका आणि एका वाफ्यात कांदा लावला.

“मी चुका केल्या आणि त्यातनंच शिकत गेलो. २०१० साली कांदा ८० रुपये किलो होता. काढणीला आला तेव्हा भाव ११ रुपये किलो इतके घसरले होते. मरण अडि – जिवघेणा झटका होता,” ते सांगतात. इतर पिकं होती त्यामुळे त्यांचं नुकसान जरासं भरून निघालं. त्यांच्या वडलांचं निधन झाल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०१४ साली त्यांनी मंजळ म्हणजेच हळदीची लागवड केली. नऊ वर्षं त्यांच्या कुटुंबातल्या कुणीही हळद लावली नव्हती.

*****

हळदीतून पैसा तर कमवला जातोय. पण दर वेळी तो शेतकऱ्यालाच मिळेल असं काही नाही...
इरोड्यातील हळद उत्पादक

In his banana field, Thiru has planted the red variety this time.
PHOTO • M. Palani Kumar
The wooden chekku in which coconut oil is cold-pressed to make fragrant hair oils
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः तिरु आपल्या केळीच्या बागेत. यंदा त्यांनी लाल केळी लावल्या आहेत. उजवीकडेः सुगंधी तेलं तयार करण्यासाठी आधी या लाकडी घाण्यातून उष्णतेशिवाय नारळाचं तेल काढलं जातं. त्याला चेक्कु म्हणतात

तमिळ नाडूमध्ये एकूण ५१,००० एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केली जाते. एकूण उत्पादन ८६,००० टनांहून जास्त होतं आणि भारतात हळद उत्पादनात या राज्याचा चौथा क्रमांक लागतो. राज्यात इरोडे जिल्ह्यात हळदीचं सर्वात जास्त लागवड होते, १२,५७० एकर.

तिरु यांची दीड एकर जमीन म्हणजे या महासागरातला एक छोटासा थेंब म्हणायला पाहिजे. २०१४ साली त्यांनी अगदी अर्ध्या एकराच्या तुकड्यात हळद लावायला सुरुवात केली आणि बाकी शेतात नारळ आणि केळी लावल्या. एक टन हळद अगदी झटक्यात विकली गेली आणि त्यामुळे त्यांना एकदम हुरुप आला. ३०० किलो हळद दळून त्यांनी किरकोळ विक्री केली. त्यांच्या फेसबुकवरच्या मित्रमंडळींमध्ये १० दिवसांत सगळी हळद विकली गेली. त्यांनी आपल्या या व्यवसायाचं नाव ठेवलं येरमुनइ म्हणजे नांगराचा फाळ. “या अवजाराला तोडच नाहीये, म्हणून.” एक पुरुष दोन बैलांना हाकतोय आणि नांगरट करतोय असं प्रतीकात्मक चित्र लोगो म्हणून वापरण्यात आलंय. ही यशाची सुरुवात होती.

या यशामुळे हुरुप आल्याने त्यांनी पुढच्या वर्षी अडीच एकरात हळद लावली. चांगली पाच हजार क्विंटल हळद निघाली. पण पुढचे अनेक महिने यातला चार-पंचमांश माल पडून राहिला. त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यांच्या पिकाला जैविक किंवा सेंद्रिय पीक असल्याचं प्रमाणपत्र काही मिळू शकलं नाही. हे मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत खर्चिक आणि दमवणारी आहे. अखेर त्यांनी त्यांच्याकडची हळद इरोड्यातल्या एका मसाला कंपनीला विकून टाकली. त्यांनी हिशोब करून त्यांच्या हाती एक पट्टी दिली, ज्याच्यावर क्विंटलमागे ८,१०० रुपये भावाने रकमेचा हिशोब लिहिलेला होता. आणि त्यानंतर एका आठवड्याने १५ दिवसांनंतरच्या तारखेचा बाहेरच्या राज्यातल्या बँकेचा एक चेक त्यांच्या हाती पडला.

पण तो चेक वटण्यासाठी पुढचे अनेक आठवडे लागले. ते नोटाबंदीचं वर्ष होतं. “२०१७ सालापासून मी फक्त एक किंवा दीड एकरात हळद लावायचं ठरवलंय. आणि एका आड एक वर्ष मी जमीन पडक ठेवतो. जमिनीला देखील आराम पाहिजे ना.”

जानेवारी महिन्यात ते वाफे तयार करायला लागतात. दीड महिन्याची दोन भरडधान्यं घेतात आणि ही पिकं परत मातीत लोटली जातात, त्यातून मातीत नत्र आणि इतर पोषक द्रव्यं मिसळली जातात. या सगळ्याला १५,००० रुपये खर्च येतो. त्यानंतर ठिबकची पाइपलाइन वाफ्यात अंथरायच्या. हळदीचे वाफे नीट तयार करायचे. या सगळ्याला आणखी १५,००० रुपयांचा खर्च. हळदीच्या कंदांचा खर्च ४० रुपये किलो भावाने २४,००० रुपये. एकरी ८०० किलो कंद तरी लागतात. मजुरीचा खर्च साधारणपणे एकरी ५,००० रुपये इतका येतो. एका महिन्यानंतर कंदांना डोळे फुटतात, मोड येतात तेव्हा दोन टन लेंडी खत द्यावं लागतं. शेणापेक्षा लेंडी खत किती तरी पटीने चांगलं असल्याचं ते शपथेवर सांगतात. खतासाठी १४,००० रुपये खर्च येतो.

त्यानंतर सहा वेळा खुरपून घ्यावं लागतं. दर वेळी १०,००० रुपये खर्च येतो (एका एकरात ३०-३५ बायांना दिवसाला ३०० रुपये मजुरी). मार्च महिन्यात हळदीच्या काढणीला ४०,००० रुपये खर्च येतो. आणि हे काम “गुत्तं घेऊन करतात. शक्यतो २० गडी आणि ५० बायांची एक टोळी काढणीसाठी येते. ते एका दिवसात काम उरकतात. आणि जर पीक जोमदार असेल तर जादा ५,००० रुपयांची मागणी केली जाते.”

Fresh turmeric fingers, which are processed by Thiru Murthy to make beauty products and malted drinks.
PHOTO • Aparna Karthikeyan
The purpose-built pit for boiling the turmeric
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः ओल्या हळदीचे मोड. यावर प्रक्रिया करून तिरु मूर्ती त्यापासून सौंदर्य प्रसाधनं आणि पेयं तयार करतात. उजवीकडेः हळद उकडण्यासाठी तयार केलेला जमिनीतला खड्डा

या सगळ्यानंतर अखेर ताजी हळद उकडून, वाळवून, पॉलिश केली जाते. हे सगळं एका वाक्यात लिहिता येतं पण प्रत्यक्षात मात्र ही सगळी कामं वेळखाऊ, आणि कौशल्य लागणारी आहेत. या सगळ्या प्रक्रियांमुळे उत्पादन खर्चात ६५,००० रुपयांची भर पडते. एकीकडे खर्चाचा रकाना वाढत जातो आणि हळदीचं वजन मात्र कमी कमी होत जातं.

दहा महिने आणि २,३८,००० रुपये खर्चल्यानंतर तिरु मूर्तींकडे २,००० किलो हळकुंडं आहेत. उत्पादन खर्च किलोमागे ११९ रुपये इतका आला. (कोडुमुडीचे के. एन. सेल्लामुथु देखील जैविक पद्धतीने हळद करतात त्यांच्या अंदाजाप्रमाणे लागवडीचा खर्च किलोमागे ८० रुपये इतका येतो. ते जास्त उत्पादन देणारं वाण वापरतात आणि लागवडीची पद्धत देखील कमी वेळ घेणारी आणि इतकी कुशल नाही.)

तिरु हळदीची किंमत अनेक गोष्टींचा विचार करून ठरवतात. एक किलो हळद दळण्यासाठी ४० रुपये तर पॅकेजिंग आणि कुरियरचे आणखी ४० रुपये खर्च येतो.

जी दुकानं मोठ्या प्रमाणावर, म्हणजेच २० किलोहून जास्त माल घेतात त्यांना ३०० रुपये किलो दराने हळद विकली जाते. त्यांच्या शेतात जाऊन हळद घेतल्यास ४०० रुपये आणि भारतभरात कुठेही टपालाने पाठवायची झाल्यास किलोमागे ५०० रुपये बाव पडतो. इतर ब्रँड त्यांच्या हळदीची किंमत ३७५ रुपये किलोहून अधिक ठेवतात. काही तर किलोमागे पार १,००० रुपये आकारत आहेत. इरोड्याच्या बाजारात वाळलेल्या हळकुंडाला किलोमागे ७० रुपये भाव देतात. दळल्यावर ९५० ग्रॅम हळद पूड मिळते. विकताना मात्र हाच भाव तिपटीहून जास्त होतो.

*****

“विळा, बंदूक किंवा लाठ्याकाठ्यांशिवाय या कॉर्पोरेटांनी शेतकऱ्यांना नमवलंय.”
भारतीय हळद उत्पादक संघटनेचे अध्यक्ष पी. के. दैवसिगमणी

“मी खूप प्रयत्न केला, भांडलो पण मला हळदीसाठी रास्त भाव ठरवता आला नाही,” हळद उत्पादक संघटनेचे अध्यक्ष दैवसिंगमणी सांगतात. ऑक्टोबर महिन्यात एका संध्याकाळी आम्ही त्यांना इरोड्याजवळच त्यांच्या घरी भेटलो. बाहेर पाऊस पडत होता. “सरकारांनी कॉर्पोरेटांपुढे लोटांगण घातलंय. ते जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना – फक्त छोट्या किंवा हळदीच्या शेतकऱ्यांना नाही – काहीही भवितव्य नाही... अमेरिकेतही हीच स्थिती आहे. शेती आतबट्ट्याची झाली आहे. तिथे ते तुम्हाला इंग्रजीत हे सगळं सांगतात आणि आम्ही इथे तमिळमध्ये हेच सगळं म्हणतोय,” ते सांगतात.

Inside the storage yard of the Perundurai regulated market.
PHOTO • M. Palani Kumar
Buyers at the auction inspect the turmeric lots
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः सरकारी नियंत्रणाखाली चालणाऱ्या पेरुन्दुराईच्या बाजारपेठेतल्या गोदामात. उजवीकडेः सौदे सुरू आहेत, खरेदीदार हळद पाहतायत

“संरजामशाही व्यवस्थेची जागा आता कॉर्पोरेटांनी घेतली आहे. आणि आता ते धनदांडगे जमीनदार झाले आहेत. त्यांचा आकार आणि व्याप्ती इतकी प्रचंड आहे की ते हजारो टन हळदीवर प्रक्रिया करू शकतात. इथे काही टन हळदीची प्रक्रिया करणारे शेतकरी किंमती ठरवताना त्यांच्याशी काय स्पर्धा करणार?”

इरोड्याजवळच्या शासन नियंत्रित बाजारपेठेत दररोज सौदे होतात आणि त्यातच शेतकऱ्यांचं नशीब उघडतं किंवा फसतं. या बाजारपेठेत फक्त हळदीची खरेदी विक्री होते. आणि इथे हळद साठवून ठेवण्यासाठी अनेक गोदामं आहेत जिथे लाखो पोती हळद साठवली जाते आणि एक शेड आहे जिथे सौदे होतात. ११ ऑक्टोबर रोजी सौदे सुरू असताना आम्ही तिथे गेलो होतो. ‘टॉप रेट’ हळकुंडाला क्विंटलमागे ७,७४९ रुपये आणि कंदांना ६,६६९ रुपये भाव फुटला होता. व्यापारी भाव देताना शेवटचा आकडा कायम ९ ठेवतात. बाजारपेठेचे निरीक्षक म्हणून काम करणारे अरविंद पलानीसामी सांगतात की व्यापाऱ्यांचा अंकशास्त्रावर फारच विश्वास असल्याचा हा परिणाम.

प्लास्टिकच्या ट्रेमध्ये हळदीचे ५० नमुने मांडून ठेवले आहेत. व्यापारी येतात आणि प्रत्येक ट्रेमधली हळद निरखून पाहतात. हळकुंड तोडून पाहतात, वास घेतात अगदी जमिनीवर आपटूनही पाहतात. हातात खुळखुळवून हळकुंडाची तपासणी करतात. आपली टिपणं लिहून ठेवतात आणि बोली लावतात. मसाल्याच्या एका मोठ्या कंपनीच्या विक्री विभागातले सी. आनंदकुमार सांगतात की त्यांनी फक्त “फर्स्ट क्वालिटीची” हळद घेतलीये. आज त्यांनी ४५९ नमुन्यांपैकी २३ पोती हळद विकत घेतलीये.

बाजारसमितीच्या शेजारीच अरविंद यांची कचेरी आहे. तिथे आम्ही बोलत असताना ते सांगतात की या बाजारपेठेत वर्षाला ४० कोटींची उलाढाल होते. शेडच्या सिमेंटच्या जिन्यात बसलेल्या कोडुमुडीच्या एल. रासिना यांना क्विंटलमागे फक्त ५,४८९ रुपये भाव मिळालाय. त्या ३० क्विंटल माल घेऊन आल्या आहेत.

त्यांच्याकडे स्वतःची अशी साठवणुकीची सोय नाही त्यामुळे त्या कायमच आपला माल सरकारी गोदामांमध्ये घेऊन येतात. इथे क्विंटलमागे दिवसाला २० पैसे इतका आकार पडतो. काही काही शेतकरी तर चांगला भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत चार चार वर्षं आपला माल गोदामात ठेवतात. सात महिने हळद गोदामात ठेवलीये. पाच वेळा चकरा मारून झाल्यावर अखेर त्यांनी माल विकायचा ठरवलं. तेही तोट्यात.

इरोडे, कोइम्बतोर आणि सेलम जिल्ह्यांचा भाग कोंगु पट्टा म्हणून ओळखला जातो. इथले शेतकरी शेतीकडे जोडधंदा म्हणून पाहतात, दैवसिंगमणी सांगतात. “ते फक्त शेतीच्या भरवशावर राहिले तर त्यांचं काही खरं नाही.”

P.K. Deivasigamani, president of the turmeric farmers' association.
PHOTO • M. Palani Kumar
Labels on the samples exhibited at the turmeric auction
PHOTO • M. Palani Kumar
Labels on the samples exhibited at the turmeric auction
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः हळद उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, पी. के. दैवसिंगमणी. मध्यभागी आणि उजवीकडेः हळदीच्या सौद्यांच्या वेळी मालाच्या नमुन्यांवर लावलेली लेबलं

त्यांच्या अंदाजानुसार तमिळ नाडूमध्ये सुमारे २५,००० ते ५०,००० शेतकरी हळदीची शेती करतात. अर्थात भाव किती मिळतो त्यावर आकडा कमी जास्त होतो. जर क्विंटलमागे १७,००० रुपये भाव मिळाला (जसा पूर्वी मिळत होता) तर “हळदीची शेती करणारे ५ कोटी शेतकरी” असतील, ते हसत हसत म्हणतात. “आणि हाच भाव ५,००० रुपयांवर घसरला तर तुम्हाला १०,००० शेतकरीसुद्धा दिसणार नाहीत.”

दैवसिंगमणी यांची सूचना काय तर बहुविध पिकं घ्या. “इतक्या मोठ्या प्रमाणावर हळद घेऊच नका,” ते म्हणतात. “माल कमी असेल तर आपल्याला भावही चांगला मिळेल.”

*****

“जास्त उतारा देणारं संकरित वाण वापरण्यापेक्षा देशी वाण लावा.”
तिरु मूर्ती, इरोड्याचे हळद शेतकरी

गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांच्या शेतात दोन टन हळद निघाली. ओल्या हळदीच्या ढिगावर सुकलेली पानं झाकली होती. यानंतर हळद उकडून वाळवायचं काम होणार. तिरु यांचं आधुनिकतेशी वावडं नाही. ते सौर ऊर्जा वापरतात आणि त्याचा प्रचारही करतात. तसंच त्यांचा स्थानिक देशी वाणावर पूर्ण विश्वास असून इरोड्याच्या हळदीला ‘ इरोडे लोकल ’ असं भौगोलिक चिन्हांकनही मिळालं असल्याने ते खूश आहेत.

फक्त जास्तीत जास्त उतारा देण्यावर भर असणाऱ्या संशोधन संस्थांवर ते नाराज आहेत. जास्त उतारा म्हणजे रासायनिक खतांना पर्याय नाही. “आमचा माल आम्हाला रास्त भावात विकता यावा यासाठी सरकार आम्हाला काही मदत का करत नाही?” धोरणकर्त्यांना स्वतःला या गोष्टी माहिती हव्यात, ते म्हणतात. त्यांची पत्नी आणि व्यवसायातील भागीदार गोमती दुजोरा देतात. “कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इथे येऊ दे. आमच्या शेतात काम करू दे,” दोघंही म्हणतात. “प्रत्यक्षात काय अडचणी येतात हे जर त्यांना कळलंच नाही तर ते फक्त संकरित वाणं तयार करण्याच्या मागे लागतील.” त्यांची नाराजी समजते. मोठ्या आणि चमकदार हळदीला क्विंटलमागे २०० रुपये जास्त भाव मिळतो. पण अशा हळदीच्या उत्पादनासाठी रासायनिक खतांचा मारा करावा लागतो.

त्यांनी शेती करायला सुरुवात केली तेव्हा पैशाची चणचण होती. हळदीसारख्या बारमाही पिकाचा पैसा एका वर्षानंतर हातात येतो. तिरुंना बँकेकडनं कर्ज मिळण्याची शक्यता नाही. कारण त्यांच्या वडलांनी प्रचंड मोठं कर्ज करून ठेवलंय आणि त्याची परतफेड करण्याची सगळी मदार तिरु यांच्यावर. त्यामुळे ते अजूनही १४ लाखांचं कर्ज फेडतायत. आणि ती फेड करण्यासाठी त्यांनी एक खाजगी कर्ज घेतलंय ज्याचा व्याज दर “रेन्दु रुप वट्टी” म्हणजेच दर महिना दर शेकडा दोन रुपये इतका आहे. म्हणजेच वर्षाला २४ टक्के.

The harvested turmeric is covered with dried leaves, waiting to be boiled, dried and polished.
PHOTO • Aparna Karthikeyan
Thiru uses solar power and champions it
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः काढलेली ओली हळद पानांनी झाकून रास लावून ठेवतात. आता ती उकडून, वाळवून तिच्यावर प्रक्रिया होणार. उजवीकडेः तिरु सौर ऊर्जा वापरतात आणि त्याचा प्रचारही करतात

“फेसबुकवरच्या काही मित्रांनीही मला काही पैसे उसने दिले. कसल्याही व्याजाशिवाय, सहा महिन्यांसाठी. नशिबाने आता मला कोणाकडूनही पैसे घेण्याची गरज नाहीये. पण मी आजही माझ्या वडलांचं बँकेचं कर्ज फेडतोच आहे.” सध्या ते महिन्याला ५०,००० रुपये कमवतायत. आणि हे कमवण्यासाठी त्यांच्या घरची तीन प्रौध माणसं (तिरु, त्यांची आई आणि गोमती) दिवसाचे १२ तास काम करतात. अर्थात घरच्यांच्या कष्टाचं मोल खर्चाच धरलं जात नाहीच.

ज्या खोलीत हळद दळली जाते तिथले मूठभर कंद ओंजळीत घेऊन ते मला दाखवतात. केशरी झाक असलेले पिवळे धम्मक कंद अगदी दगडासारखे कडक आहेत. इतके कडक की चक्कीत घालण्याआधी ते ग्रॅनाइटच्या उखळात कुटले जातात. नाही तर चक्कीची पाती तुटू शकतात.

खोलीत सुगंध भरून राहिलाय. ताज्या हळदीचा वास उग्र असला तरी मस्त वाटतोय. खोलीतल्या सगळ्या वस्तू सोनरी धुळीने माखून गेल्या आहेत. विजेवरची चक्की, खटक्यांचा बोर्ड अगदी कोळिष्टकांवरही हळद साचल्यामुळे सोनेरी हारांसारखी ती चमकतायत.

तळव्यावर मध्यभागी मेंदीचा एक मोठा गोल आणि त्याभोवती छोट्या ठिपक्यांची नक्षी. तिरुंचे तळवे केशरी रंगले आहेत. त्यांचे काटक हात पाहिले की त्यांनी घेतलेले कष्ट आणि मेहनत लगेच दिसून येते. डोळ्याला दिसत नाहीत ते आपल्या पिकांवर प्रक्रिया करून त्यांचं मूल्य वाढवण्यासाठी घेतलेले अपार कष्ट. आता याच वर्षी आल्याच्या पिकाला चांगलाच फटका बसला. पण यात गमावलेले ४०,००० रुपये म्हणजे “आपल्यासाठी एक धडा” असल्याचं ते मानतात. ते मला हे सगळं सांगत असतानाच गोमती गरमागरम भजी आणि चहा घेऊन आल्या.

*****

“हळदीच्या पिकाचं महत्त्व लक्षात घेऊन इरोडे जिल्ह्याच्या भवानीसागरमध्ये सुमारे १०० एकरांवर हळद संशोधन केंद्र सुरू करण्याचं नियोजन आहे.”

एम. आर. के. पनीरसेल्वम, कृषी मंत्री, तमिळ नाडू

उच्च दर्जाची हळद ९३ रुपये किलो दराने निर्यात होते पण तशीच हळद ८६ रुपये किलो दराने आयात होत असेल तर शेतकऱ्याचा फायदा कसा काय होणार? हा सात रुपयांचा फरक शेतकऱ्यांचं नुकसान करतोच आहे पण हळदीची आयात मोठ्या प्रमाणावर वाढत चाललीये – गेल्या चार वर्षांत दुप्पट झाली असताना भविष्यात आपल्या मालाला रास्त भाव मिळेल अशी कसलीच शाश्वती शेतकऱ्याकडे नाही.

A small batch of turmeric waiting to be cleaned
PHOTO • M. Palani Kumar
Thiru Murthy and T. Gomathy with their electric grinding mill
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः ही हळकुंडं अजून साफ व्हायची आहेत. उजवीकडेः तिरु मूर्ती आणि गोमती आपल्या विजेवर चालणाऱ्या चक्कीपाशी

तमिळ नाडू शासनाने आपल्या अधिकृत सूचनेमध्ये याची नोंदही घेतली आहेः भारतामध्ये जगात सर्वात जास्त हळदीचं उत्पादन होत असलं तरी “कर्क्युमिनचं प्रमाण जास्त असलेल्या वाणाची कमतरता असल्याने” आपला देश इतर देशांमधून हळद आयात करतो, कृषी मंत्री पनीरसेल्वम म्हणतात.

गेल्या ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करताना पनीरसेल्वन यांनी नवीन हळद संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली होती. या केंद्राच्या उभारणीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याचंही जाहीर करण्यात आलं होतं. तसंच “शेतकऱ्यांनी इतर पिकांकडे वळू नये” यासाठी सुधारित वाण, मूल्य वर्धन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याचं वचनही सरकारने दिलं.

तिरु मूर्ती यांचं स्वतःचं साधंसं तत्त्व आहेः ग्राहकाला सर्वोत्तम द्या. “माझा माल चांगला असेल तर ३०० लोक तो खरेदी करतील आणि इतर ३,००० लोकांना सांगतील. पण तोच फारसा चांगला नसेल तर हेच ३०० लोक इतर ३०,००० लोकांना सांगतील की हा माल वाईट आहे.” समाजमाध्यमं आणि लोकांकडून होणाऱ्य प्रसारामुळे ते १० महिन्यांच्या काळात ३ टन हळद विकू शकतात. महिन्याला सरासरी ३०० किलो. आणि हे करत असताना ते मोलाचं काही शिकले आहेत. एक म्हणजे ठोक बाजारात जैविकरित्या पिकवलेल्या हळदीला जादा भाव मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे शेतकरी जोपर्यंत स्वतः विक्री करत नाही तोपर्यंत त्याला चांगला भावही मिळू शकत नाही.

तिरू दोन पद्धतीने हळदीवर प्रक्रिया करतात. एक तर पारंपरिक पद्धतीने हळद उकडायची, वाळवून दळायची. ते मला प्रयोगशाळेचे काही अहवाल दाखवतात – या पद्धतीने प्रक्रिया केल्यास कर्क्युमिनचं प्रमाण ३.६ टक्के इतकं येतं. दुसरी पद्धत जरा निराळी आहे. यामध्ये हळदीचे कंद कापून उन्हात सुकवले जातात आणि मग दळले जातात. या पद्धतीत कर्क्युमिनचं प्रमाण ८.६ टक्के इतकं येतं. तसंही त्यांना कर्क्युमिनच्या अधिक मात्रेसाठी चाललेला आटापिटा काही कळलेला नाही. “औषध उद्योगात हळदीपासून कर्क्युमिन वेगळं केलं जातं त्यासाठी असेल तर ठीक आहे,” ते म्हणतात. “खाण्यामध्ये आपल्याला अधिक मात्रेची काय गरज?”

ते काढणी केल्या केल्या ओली हळद देखील विकतात. ४० रुपये किलो भावाने ती जाते (पॅकिंग आणि टपालाचा खर्च धरून ७० रुपये किलो). याशिवाय ते आणि गोमती दर महिन्याला किमान ३००० साबण स्वतः हाताने तयार करतात. ते अनेक प्रकारच्य वनौषधी स्वतः घेऊन येतात, त्या निवडून, चाळून त्यापासून नऊ प्रकारचे साबण तयार करतात. यामध्ये दोन प्रकारची हळद, कोरफड, वाळा, कुपी किंवा खोकली, काळा शिरस, शिकेकाई आणि कडुनिंब अशा वनस्पती वापरल्या जातात.

त्यांची पत्नी त्यांची फिरकी घेतेः “लोक म्हणतात की तुम्ही काय काय वापरता ते कळू देऊ नका. पण ते सगळं काही उकलून सांगतात. वर बनवण्याची पद्धतसुद्धा.” तिरु यांनी हळदीपासून केशकल्प तयार करण्याची कृती त्यांच्या फेसबुक पेजवर दिली आहे. आपण वापरतो ती पद्धत लोकांना सांगण्याबद्दल त्यांच्या मनात बिलकुल शंका नाही. “बाकीच्यांनाही करून पाहू दे. सुरुवातीचा उत्साह तसाच टिकवून ठेवणं येऱ्यागबाळ्याचं काम नाही!” ते म्हणतात.

*****

“शेतकऱ्याला सगळ्यात चांगलं पीक कधीच खाता येत नाही. जे विकलं जात नाही तेच आमच्या पानात येतं. आमच्या पिकांच्या बाबतीतही तसंच आहे. वेडीवाकडी केळी, तुटकेफुटके साबण...”
इरोड्याच्या हळद उत्पादक टी. गोमती

Thiru and Gomathy with their children in the workshop, behind their living room.
PHOTO • M. Palani Kumar
Gomathy and her daughter shelving soaps in the workshop
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः तिरु आणि गोमती आपल्या मुलांसोबत आपल्या कारखान्यात, दिवाणखान्याच्या मागच्याच बाजूला. उजवीकडेः गोमती आणि त्यांची मुलगी कारखान्यात सोबण फडताळात ठेवतायत

तिरु आणि गोमती यांचा २०११ साली पाहून ठरवून विवाह झाला. त्यांनी जैविक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली होती. पण त्यातल्या मूल्यवर्धनाबद्दल मात्र त्यांना फार काही माहित नव्हतं. २०१३ साली त्यांनी फेसबुक वापरायला सुरुवात केली. त्यावरती त्यांनी एक पोस्ट टाकली होती आणि त्यानंतरच समाजमाध्यमांची ताकद त्यांच्या लक्षात आली. गाव आणि शहरातली दुही आणि इतरही बऱ्याच गोष्टी.

त्यांनी स्वतः नाष्टा करत असताना त्याचं एक छायाचित्र फेसबुकवर टाकलं. त्यांचं साधंसुधं खाणं – रागी काली – नाचणीचे उंडे लोकांना फारच आवडल्याचं दिसलं. त्याच्यावरच्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहून ते जाम खूश झाले. त्यानंतर आपल्या शेतातल्या रोजच्या गोष्टी ते फेसबुकवर टाकायला लागले. सगळं काही ऑनलाइन रेकॉर्ड करायला सुरूवात झालीः खुरपणी, तणणी, जैविक खतं देण्याची प्रक्रिया वगैरे वगैरे.

हळदीचं पहिलं पीक हातात आलं तेव्हा त्यांनी ते ऑनलाइन विकलं. गोमतीसुद्धा त्यांना हातभार लावू लागल्या. “साबण, तेल आणि चूर्णांच्या ऑर्डर माझ्या फोनवर, व्हॉट्सॲपवर येतात आणि मी त्या तिला पाठवतो.” घरचं सगळं काम, १० वर्षांचा नितुलन आणि ४ वर्षांची निगळिनी या दोघांना सांभाळत गोमती पॅकिंग आणि टपालाने उत्पादनं पाठवण्याचं सगळं काम स्वतः करतात.

कोविडची टाळेबंदी आणि मुलाचे ऑनलाइन वर्ग यामुळे सगळंच अवघड होऊन बसंल. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा मुलं काचेच्या बाटल्यांमधल्या बेडकांच्या पिलांशी खेळत होती आणि त्यांचा कुत्रा अगदी उत्सुकतेने आत बघत होता. नंतर एकदा गेलो तेव्हा ते स्टीलच्या एका पाइपवरून खाली घसरत यायचा खेळ खेळत होते. “हेच शिकलेत ते, खांबावर कसं चढायचं ते,” त्या उसासा टाकतात.

त्यांना हाताखाली काम करायला गावातलीच एक बाई येते. “आमच्या कॅटलॉगमधल्या २२ प्रकारांमधला एकेक नमुना देखील कुणी कुणी मागतं. आता हे काही सोपं नाहीये,” गोमती सांगतात. त्या घर चालवतात. त्या सगळं काम पाहतात. बोलतात कमी आणि हसतात जास्त.

तिरु दिवसभरात किमान १० गिऱ्हाइकांना त्यांच्या हळदीचा भाव बाजारात मिळणाऱ्या हळदीपेक्षा दुप्पट का आहे हे समजावून सांगत असतात. “दिवसातले माझे किमान दोन तास लोकांचं शिक्षण करण्यात जातात. जैविक शेती, भेसळ, कीटकनाशकांचे दुष्परिणाम, इत्यादी.” ते फेसबुकवर एखादी पोस्ट टाकतात तेव्हा ती अंदाजे १,००० लोक लाइक करतात आणि २०० लोक तरी त्यावर त्यांची कमेंट टाकतात. ते प्रश्न विचारतात. “मी जर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर त्यांच्या नजरेत मी ‘फेक’ ठरेन.”

Weighed and packed turmeric powder, which Thiru sells directly through social media.
PHOTO • M. Palani Kumar
Soaps and bottles of hair oil, ready to be sold
PHOTO • M. Palani Kumar
Soaps and bottles of hair oil, ready to be sold
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः मोजून पॅक करून ठेवलेली हळद. तिरु समाजमाध्यमांवरून विक्री करतात. मध्यभागी आणि उजवीकडेः विक्रीसाठी ठेवलेले साबण आणि केशतेलाच्या बाटल्या

शेती आणि ई-उद्योग (“अगदी मागच्या महिन्यापर्यंत मला याला ई-बिझनेस म्हणतात ते माहितही नव्हतं!”) यामध्ये इतका वेळ जातो की गेल्या पाच वर्षांत ते सुटीसाठी कुठेच गेले नाहीयेत. “जास्तच दिवस झाले असतील,” गोमती हसत हसत म्हणतात. “ते कामाशिवाय जास्तीत जास्त सहा तास राहू शकतात. त्यानंतर त्यांना घरी यायचे वेध लागतात. त्यांच्या गायी, पिकं आणि तेलाच्या चेक्कुकडे [घाणा].”

एखादं लग्न वगैरे असलं तर त्यांची आई कार्यक्रमाला जाते, त्यांचा मोठा भाऊ त्यांना गाडीने घेऊन जातो. तिरु काही स्वतःचं काम सोडून अशा कार्यक्रमांना जात नाहीत. “कोविड-१९ च्या साथीनंतर आमच्या कनवटीला जरा काही पैसा आहे,” ते विनोदाने म्हणतात. “कसंय एरवी आम्हाला काही कार्यक्रम असला की गाडी काढून पार कोइम्बतोरला जावं लागायचं. आता कार्यक्रमच बंद आहेत त्यामुळे पेट्रोलचे १,००० रुपये वाचलेच म्हणायचे.”

शेतात मजूर कामाला येतात तेव्हा “अम्मा त्यांच्या कामावर देखरेख ठेवते. माझा सगळा वेळ या वरच्या कामात जातो.” मी दोन वेळा त्यांच्या घरी गेले. आणि दोन्ही वेळा गोमती स्वयंपाकघरात किंवा त्यांच्या कारखान्यात व्यग्र होत्या. कारखाना म्हणजे त्यांच्या दिवाणखान्यामागचा उंच आढं असलेली मोठीशी जागा. इथे फडताळांमध्ये अनेक प्रकारचे साबण मांडून ठेवले आहेत. त्यावर साबणाचा प्रकार, तारीख वगैरे लिहिलेली लेबलं नीट लावलेली आहेत. तिरु आणि गोमती दिवसातले किमान १२ तास तरी काम करतात. आणि त्यांचा दिवस पहाटे ५.३० वाजताच सुरू होतो.

वनौषधी आणि त्यांचे गुण याबद्दल दोघांकडे सखोल ज्ञान आहे. तमिळमध्ये ते वेगवेगळ्या वनस्पतींची नावं पटापट सांगत असतात. गोमती केसाला लावायची सुगंधी तेलं देखील तयार करतात. फुलं आणि औषधी वनस्पती नारळाच्या तेलात भिजवून नंतर उन्हामध्ये ठेवून देतात. “ग्राहकांना देण्याआधी आम्ही आमची सगळी उत्पादनं स्वतः वापरून पाहतो,” त्या मला सांगतात.

सध्या घरातले सगळे या व्यवसायामध्ये भाग घेतायत, तिरु म्हणतात. त्यांच्या उत्पादनांच्या किंमती कमी आहेत कारण घरच्यांचे श्रम खर्चामध्ये कधीच धरले जात नाहीत.

*****

“अमूलला दूध घालणाऱ्यांना ग्राहक देतात त्या किंमतीच्या जवळपास ८० टक्के भाव मिळतो. अख्ख्या जगात सहकाराचं असं कुठलंही प्रारुप नाही.”
बालसुब्रमण्यम मुथुसामी, स्तंभलेखक

Thiru spends at least two hours a day educating others about organic farming.
PHOTO • Aparna Karthikeyan
Gomathy and Thiru with an award they received for organic farming
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः तिरु दिवसातले किमान दोन तास जैविक शेतीविषयी लोकांचं प्रबोधन करण्यात घालवतात. उजवीकडेः जैविक शेतीसाठी मिळालेला पुरस्कार घेतलेले तिरु आणि गोमती

एखाद्या साध्यासुध्या छोट्या शेतकऱ्याला तिरु जे काही करतायत ते करणं कदाचित फार अवघड जाईल कारण एक तर त्याची किंवा तिची जमीनच मुळात खंडाने कसायला घेतलेली असते किंवा मालकीची असली तरी थोडीच (दोन एकरांहून कमी) असते. त्यांना मिळालेलं यश इतरांनाही मिळेलच असं काही सांगता येत नाही. अरुनचोल या ऑनलाइन तमिळ प्लॅटफॉर्मवर स्तंभ लिहिणारे बालसुब्रमण्यम मुथुसामी स्वतः इरोड्याच्या शेतकरी कुटुंबातले आहेत. सहकार हेच प्रभावी उत्तर असल्याचं ते मानतात.

ग्राहक एखादं उत्पादन काय किंमतीला विकत घेतो आणि उत्पादकाला किती भाव मिळतो याची टक्केवारी ते मांडतात. दुधाची कायमच सरशी होते. आणि सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या उद्योगांची, ते अमूलचं उदाहरण देऊन सांगतात. ग्राहक २४० रुपये किलो दराने हळद खरेदी करतो आणि त्याच्या २९ टक्के पैसा हळदीच्या शेतकऱ्याच्या हातात पडतो. अमूल दुधाचं उदाहरण घेतलं तर शेतकऱ्याला जवळपास ८० टक्के पैसा मिळतो.

या यशाची किल्ली म्हणजे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं संघटन, बालसुब्रमण्यम सांगतात. “पुरवठ्याची साखळी स्वतःच्या मालकीची असणे आणि मध्यस्थ किंवा दलाला हद्दपार करणे.” अर्थात सहकारी संस्था आणि शेतकऱ्यांच्या संस्थांमध्येही अडचणी आहेत हे ते मान्य करतात. “या संस्था अधिक चांगल्या पद्धतीने चालवल्या गेल्या पाहिजेत आणि पुढे जाण्याचा केवळ हा एकच मार्ग आहे.”

तिरु ठामपणे सांगतात की हळदीच्या लागवडीतही फायदा आहे – पण तुम्ही मूल्य वर्धन केलं तरच. गेल्या सात वर्षांत त्यांनी ४,३०० किलो दळलेली हळद विकली आहे. शिवाय खोबरेल तेल, केळ्याचं पीठ, (हळदीपासून तयार केलेलं) कुंकू आणि साबणही. त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नसती तर यातलं काहीही करता आलं नसतं, ते सांगतात. (छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्यासारखं काही करणं का शक्य होणार नाही त्याची मेख इथेच आहे.) “दहा एकर जमीन चार कोटीच्या घरात जाईल. त्यासाठी कोण पैसा द्यावा?” त्यांचा सगळा व्यवसाय ऑनलाइन सुरू आहे. त्यांच्याकडे जीएसटी नंबर आहे आणि ते जीपे, फोनपे, पेटीएम, भीम आणि आपल्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने पैसे घेतात.

२०२० साली कार्तिक सिवकुमार यांच्या उळवन फौंडेशनने जैविक शेतीसाठी तिरु यांना रोख एक लाख रुपये आणि पुरस्काराने सन्मानित केलं. आणि जैविक शेतीच नाही तर मूल्यवर्धन आणि ग्राहकांना थेट विक्रीसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. मूळचे कोंगु प्रदेशातल्या सत्यराज या तमिळ अभिनेत्याच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

वर्षागणिक मिळत असलेलं छोटं छोटं यश तिरु यांची जिद्द अधिकाधिक वाढवतं. हार त्यांना माहितच नाहीये. “मला शेतकऱ्याच्या तोंडी ‘नुकसान’ हा शब्द ऐकायचाच नाहीये,” तिरु म्हणतात. “शेती चाललीच पाहिजे.”

हे वार्तांकन करत असताना केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल कृषी जननी संस्थेच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उषा देवी वेंकटाचलम यांचे मनापासून आभार.

या संशोधन कार्यास अझीम प्रेमजी युनिवर्सिटीच्या २०२० सालच्या रिसर्च फंडिंग प्रोग्राम अंतर्गत अर्थसहाय्य मिळाले आहे.

शीर्षक छायाचित्रः एम. पलनी कुमार

अनुवादः मेधा काळे

Aparna Karthikeyan

ಅಪರ್ಣಾ ಕಾರ್ತಿಕೇಯನ್ ಓರ್ವ ಸ್ವತಂತ್ರ ಪತ್ರಕರ್ತೆ, ಲೇಖಕಿ ಮತ್ತು ʼಪರಿʼ ಸೀನಿಯರ್ ಫೆಲೋ. ಅವರ ವಸ್ತು ಕೃತಿ 'ನೈನ್ ರುಪೀಸ್ ಎನ್ ಅವರ್' ತಮಿಳುನಾಡಿನ ಕಣ್ಮರೆಯಾಗುತ್ತಿರುವ ಜೀವನೋಪಾಯಗಳ ಕುರಿತು ದಾಖಲಿಸಿದೆ. ಅವರು ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಐದು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಅಪರ್ಣಾ ತನ್ನ ಕುಟುಂಬ ಮತ್ತು ನಾಯಿಗಳೊಂದಿಗೆ ಚೆನ್ನೈನಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ.

Other stories by Aparna Karthikeyan
Photographs : M. Palani Kumar

ಪಳನಿ ಕುಮಾರ್ ಅವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಸ್ಟಾಫ್ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್. ದುಡಿಯುವ ವರ್ಗದ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ಅಂಚಿನಲ್ಲಿರುವ ಜನರ ಬದುಕನ್ನು ದಾಖಲಿಸುವುದರಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಆಸಕ್ತಿ. ಪಳನಿ 2021ರಲ್ಲಿ ಆಂಪ್ಲಿಫೈ ಅನುದಾನವನ್ನು ಮತ್ತು 2020ರಲ್ಲಿ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ ಮತ್ತು ಫೋಟೋ ದಕ್ಷಿಣ ಏಷ್ಯಾ ಅನುದಾನವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಅವರು 2022ರಲ್ಲಿ ಮೊದಲ ದಯನಿತಾ ಸಿಂಗ್-ಪರಿ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟರಿ ಫೋಟೋಗ್ರಫಿ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದರು. ಪಳನಿ ತಮಿಳುನಾಡಿನ ಮ್ಯಾನ್ಯುವಲ್‌ ಸ್ಕ್ಯಾವೆಂಜಿಗ್‌ ಪದ್ಧತಿ ಕುರಿತು ಜಗತ್ತಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿದ "ಕಕ್ಕೂಸ್‌" ಎನ್ನುವ ತಮಿಳು ಸಾಕ್ಷ್ಯಚಿತ್ರಕ್ಕೆ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.

Other stories by M. Palani Kumar