PHOTO • P. Sainath

खरं म्हणायचं तर ती तारेवरची कसरत होती, अधिक चलाखी गरजेची होती आणि धोकाही जास्तच होता. बरं, संरक्षक जाळ्या किंवा बाकी काहीच नाही. ज्या खुल्या विहिरीवर ती उभी होती, तिला कठडा पण नव्हता. मोठाल्या ओंडक्यांनी विहीर झाकलेली होती. आजूबाजूची माती आणि वाऱ्याने येणारा कचरा आत पडू नये म्हणून असेल कदाचित. दुपारच्या वेळी ४४ अंश सेल्सियस इतक्या तापमानात गरम हवा सुटली होती. ओंडके जरासे हलवून, कोनात बसवून मध्यभागी एक भोक तयार केलं होतं.

या ओंडक्यांच्या अगदी तोंडावर उभं राहून तिला पाणी शेंदायचं होतं. यात दोन प्रकारची जोखीम होतीः एक तर पाय घसरून तीच आत पडली असती किंवा तिच्या भाराने ओंडके आत पडले असते. कसंही करून थेट २० फूट आत पडायचा धोका होता. त्यातही विहीरीत आत पडल्यावर वरून अंगावर ओंडके पडले असते तर कपाळमोक्षच. पाय मुरगळला असता तर पावलाचा चेंदामेंदाच झाला असता.

पण, त्या दिवशी असं काहीही झालं नाही. तिथे आलेली ती भिलाला आदिवासी तरुणी गावातल्या फलियावरून म्हणजेच पाड्यावरून आलेली होती. अतिशय झोकात ती त्या ओंडक्यावरून पुढे गेली. दोरी बांधलेली बादली तिने सावकाश विहीरीत सोडली आणि पूर्ण भरून पाणी शेंदून घेतलं. दुसऱ्या कळशीत ते पाणी भरलं. परत एकदा बादलीने पाणी शेंदलं. तीही शांत आणि ओंडकेही. तशीच न अडखळता ती आपल्या वाटेने परत निघाली. मध्य प्रदेशातल्या झाबुआ जिल्ह्यातल्या वाकनेरमधल्या आपल्या घरी. डोक्यावरची जड कळशी उजव्या हाताने तोलत आणि डाव्या हातात हेलकावणारी बादली.

मी तिच्यासोबत तिच्या फलियावरून बरंच अंतर चालत या विहिरीपाशी पोचलो होतो. माझ्या लक्षात आलं की दिवसातून तिने अशा दोन खेपा जरी केल्या तरी या एका कामासाठी तिला किमान सहा किलोमीटर अंतर चालावं लागत असणार. ती गेल्यानंतरही जरासा वेळ मी तिथे थांबलो. इतर काही तरुण मुली, काही तर अगदी पोरी म्हणाव्यात इतक्या लहान मुली हेच काम तितक्याच सराईतपणे करत होत्या. अगदी सोप्पं, सहज वाटावं अशा तऱ्हेने. म्हणून मग म्हटलं आपणही जरा प्रयत्न करूनच पहावा. त्यातल्याच एकीकडून दोरी बांधलेली बादली घेतली आणि मी निघालो. ओंडक्यावर पाऊल टाकलं की तो हलायचा तरी नाही तर गोल फिरायचा तरी. विहिरीच्या मध्यावर जायचा प्रयत्न करत असताना दर वेळी मी ज्या ओंडक्यावर उभा असायचो तो हलायला लागायचा किंवा असा काही खाली जायला लागायचा की श्वास अडकावा. आमची स्वारी परत धरणीकडे.

इतक्या सगळ्या वेळात भोवती बराचसा प्रेक्षकवर्गा जमा झाला होता. पाण्यासाठी आलेल्या बाया आणि मी कधी एकदा विहिरीत पडतोय याची उत्सुकतेने वाट पाहणारी चिल्लीपिल्ली. त्या दिवशीची दुपारची करमणूक म्हणजे मी. पण आमचा कार्यक्रम उरकायची वेळ आली होती. कारण माझी कसरत पाहून मज्जा घेणाऱ्या त्या बायांना आता घोर लागला होता तो घरच्यासाठी पाणी भरण्याचा. त्यांच्यासाठी हे अर्थातच अतिशय महत्त्वाचं काम होतं. बऱ्याच प्रयत्नाअंती मी अर्धी बादली पाणी शेंदू शकलो होतो असं स्मरणात आहे. १९९४ ची घटना सांगतोय. पण तिथल्या बालगोपाळांनी मात्र माझ्या त्या कामगिरीचं कौतुक शिट्ट्या आणि हुर्योने केलं होतं बरं.

या लेखाची छोटी आवृत्ती १२ जुलै १९९६ रोजी द हिंदू बिझनेसलाइनमध्ये प्रकाशित झाली होती.

ಪಿ. ಸಾಯಿನಾಥ್ ಅವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಸ್ಥಾಪಕ ಸಂಪಾದಕರು. ದಶಕಗಳಿಂದ ಗ್ರಾಮೀಣ ವರದಿಗಾರರಾಗಿರುವ ಅವರು 'ಎವೆರಿಬಡಿ ಲವ್ಸ್ ಎ ಗುಡ್ ಡ್ರಾಟ್' ಮತ್ತು 'ದಿ ಲಾಸ್ಟ್ ಹೀರೋಸ್: ಫೂಟ್ ಸೋಲ್ಜರ್ಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯನ್ ಫ್ರೀಡಂ' ಎನ್ನುವ ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale