पहिला पाऊस सानिया मुलाणीच्या मनात आपल्या जन्माशी निगडीत आक्रिताच्या आठवणी घेऊन येतो.

२००५ साली जुलै महिन्यातला तिचा जन्म. जन्माच्या आठवडाभर आधी आलेल्या महापुरात १,००० जणांचा जीव गेला आणि महाराष्ट्रातल्या दोन कोटी लोकांना विस्थापित व्हावं लागलं होतं. “पुरात जन्मली, आता आयुष्यभर हा पूर पाठ सोडणार नाही,” किती तरी जण तिच्या आई-वडलांना हेच सांगत होते.

जुलै २०२२. जोराचा पाऊस सुरू झाला आणि १७ वर्षीय सानियाच्या मनात या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. “कुणी जरी म्हटलं ना, पाणी वाढत चाललंय म्हणून, मला पूर येणार अशीच भीती वाटायला लागते,” कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या भेंडवड्यात राहणारी सानिया म्हणते. २०१९ पासून या ४,६८६ लोकवस्ती असणाऱ्या गावाने दोन महापुरांचा मुकाबला केला आहे.

“२०१९ साली ऑगस्ट महिन्यात पूर आला, तेव्हा फक्त २४ तासात आमच्या घरात सात फूट पाणी भरलं होतं,” सानिया तेव्हाच्या आठवणी सांगते. पाणी भरायला लागलं आणि लगेचच मुलाणी कुटुंबीय घर सोडून सुरक्षित स्थळी गेले. पण सानियाच्या मनावर त्याचा फार खोल आघात झाला आहे.

२०२१ साली जुलै महिन्यात पुन्हा एकदा या गावाला पुराचा फटका बसला. गावाबाहेर उभारलेल्या निवाऱ्यात तीन आठवडे काढल्यानंतर हे कुटुंब गावी परतलं, तेही सुरक्षित असल्याचं गावातल्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरच.

२०१९ साली आलेल्या पुरानंतर तायक्वोंदो खेळाडू असलेली सानिया ब्लॅक बेल्ट मिळवण्यासाठी मेहनत घेत होती, त्याला पुरती खीळ बसली आहे. गेली तीन वर्षं तिला सतत थकवा जाणवतोय. अस्वस्थता, चिडचिड आणि चिंतेचं प्रमाण वाढलंय. “मला माझ्या ट्रेनिंगवर लक्षच केंद्रित करता येत नाही,” ती म्हणते. “आता सगळं पावसावर अवलंबून आहे.”

Saniya Mullani (centre), 17, prepares for a Taekwondo training session in Kolhapur’s Bhendavade village
PHOTO • Sanket Jain
The floods of 2019 and 2021, which devastated her village and her home, have left her deeply traumatised and unable to focus on her training
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः १७ वर्षीय सानिया मुलाणी (मध्यभागी) कोल्हापूरच्या भेंडवडे गावामध्ये तायक्वोंदोचा सराव करतीये. उजवीकडेः २०१९ आणि २०२१ साली आलेल्या महापुराने तिचं गाव आणि घर उद्ध्वस्त झालं आणि तिच्या मनावर त्याचा खोल आघात झाला, इतका की ती आता सरावही नीट करू शकत नाही

Young sportswomen from agrarian families are grappling with mental health issues linked to the various impacts of the climate crisis on their lives, including increased financial distress caused by crop loss, mounting debts, and lack of nutrition, among others
PHOTO • Sanket Jain

वातावरणीय संकटाच्या विविध परिणामांचा मानसिक आरोग्याशी संबंध आहे आणि शेतकरी कुटुंबातल्या तरुण मुला-मुलींच्या आयुष्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. नापिकीमुळे होत असलेलं आर्थिक नुकसान, कर्जाचा वाढता डोंगर आणि पोषक आहाराची कमतरता हे त्यातले परिणाम

लक्षणं जाणवायला सुरुवात झाली तेव्हा तिला वाटलं की जरा काळ गेला की आपल्याला बरं वाटेल. पण तसं काही झालं नाही म्हणून ती एका खाजगी डॉक्टरांकडे गेली. २०१९ च्या ऑगस्टपासून ती किमान २० वेळा डॉक्टरांकडे गेली असेल. पण चक्कर, थकवा, अंगदुखी, अधूनमधून येणारा ताप, मन एकाग्र करण्यात अडचणी आणि सतत “टेन्शन आणि तणाव” काही केल्या जात नाहीत.

“आता तर डॉक्टरांकडे जायचं म्हटलं तरी वाईट साईट स्वप्नं पडायला लागतात,” ती म्हणते. “खाजगी डॉक्टरकडे एका वेळच्या तपासणीचे १०० रुपये तरी होतात. वर औषधं, तपासण्या आणि फॉलो अप,” ती म्हणते. “सलाइन लावायला लागलं तर एका बाटलीला ५०० रुपये खर्च होतात.”

डॉक्टरांकडे जाऊन काहीच फरक पडत नाही असं दिसल्यावर तिची एक मैत्रीण म्हणाली, “गप्प ट्रेनिंग करायचं.” पण त्याचाही काहीच फायदा झाला नाही. खेदाची बाब म्हणजे 'तब्येत खराब होत चाललीये' असं डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी काय सल्ला द्यावा? “जास्त ताण घेऊ नको.” येणारा पाऊस काय घेऊन येणार आणि आपल्या कुटुंबाला काय भोगायला लागणार याची टांगती तलवार मनावर असताना सानिया हा सल्ला कसा काय पाळणार?

२०१९ आणि २०२१ च्या महापुरात सानियाच्या वडलांचा, जावेद यांचा एकूण १,००० टन ऊस पाण्यात गेला. २०२२ साली देखील अतिवृष्टी आणि वारणा नदीला आलेल्या पुरात त्यांच्या बहुतेक पिकाची नुकसानी झाला आहे.

“२०१९ साली पूर आला ना, तेव्हापासनं पेरलेलं तुमच्या हाती लागेल का याची खात्री नाही. प्रत्येक शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागायलीये,” जावेद सांगतात. लागवडीचा खर्च जवळ जवळ दुप्पट झालाय आणि हातात काय येतंय? कधी कधी फक्त भोपळा. यातूनच शेती आतबट्ट्याची झाली आहे.

The floods of 2019 destroyed sugarcane fields (left) and harvested tomatoes (right) in Khochi, a village adjacent to Bhendavade in Kolhapur district
PHOTO • Sanket Jain
The floods of 2019 destroyed sugarcane fields (left) and harvested tomatoes (right) in Khochi, a village adjacent to Bhendavade in Kolhapur district
PHOTO • Sanket Jain

२०१९ साली आलेल्या पुराने उसाचं नुकसान केलं (डावीकडे), भेंडवड्याच्या शेजारी असलेल्या खोचीमध्ये काढलेले टोमॅटो पाण्यात गेले

अशा परिस्थितीत खाजगी सावकारांकडून अवाच्या सवा व्याजावर कर्ज घेण्यावाचून कुठलाही पर्याय हाती राहत नाही. आणि यातून ताण वाढतच जातो. “महिन्याचा हप्ता भरायची तारीख जवळ येत जाते ना, तेव्हा किती तरी लोक टेन्शनमुळे दवाखान्याच्या वाऱ्या करतात, तुम्हीच बघा,” सानिया सांगते.

वाढतं कर्ज आणि आणखी एका पुराची भीती यामुळे सानिया कायम दडपणाखाली असते.

“कसंय, कुठल्याही नैसर्गिक आपत्तीनंतर लोक आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक तितके प्रयत्न करू शकत नाहीत. त्यांची इच्छा नसते असं नाही, त्यांना ते शक्यच होत नाही,” कोल्हापूरस्थित मानसशास्त्रज्ञ शाल्मली रणमाळे काकडे सांगतात. “यातूनच असहाय्यपणा, वैफल्य आणि दुःखावेग निर्माण होतो. याचा मूडवर परिणाम होऊन चिंता वाढायला सुरुवात होते.”

बदलत्या वातावरणाचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे ही बाब संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयपीसीसीने पहिल्यांदाच अधोरेखित केली आहे. “मानसिक आरोग्यासंबंधीची चिंता आणि ताण ही आव्हानं जागतिक तापमानवाढीसोबत अभ्यास केलेल्या प्रदेशांमध्ये वाढत जाणार आहेत. विशेषकरून लहान मुलं, किशोरवयीन मुलं-मुली, वृद्ध आणि इतर काही आजार असलेल्या व्यक्तींसाठी अधिकच.”

*****

१८ वर्षांच्या ऐश्वर्या बिराजदारची सगळी स्वप्नं २०२१ च्या पुरात वाहून गेली.

पुराचं पाणी ओसरलं तेव्हा पुढचे १५ दिवस जवळ जवळ १०० तास ही धावपटू आणि तायक्वोंदो खेळाडू आपलं घर साफ करत होती. “वास जाता जाईना झाला होता. आणि भिंती पाहून वाटत होतं की कुठल्याही क्षणी कोसळून पडतील,” ती सांगते.

४५ दिवसानंतर आयुष्याची गाडी जरा कुठे रुळावर यायला लागली. “एक दिवस जरी सराव चुकला तरी रुखरुख लागून राहते,” ती सांगते. दीड महिना ट्रेनिंग बुडलं तर ते भरून काढण्यासाठी तिला जादा मेहनत करावी लागत आहे. “[पण] माझ्यातला स्टॅमिना पार गेलाय कारण आम्हाला निम्म्या आहारावर दुप्पट सराव करावा लागतो. याचा त्रास होतो आणि टेन्शन पण वाढतं,” ती म्हणते.

Sprinter and Taekwondo champion Aishwarya Birajdar (seated behind in the first photo) started experiencing heightened anxiety after the floods of 2021. She often skips her training sessions to help her family with chores on the farm and frequently makes do with one meal a day as the family struggles to make ends meet
PHOTO • Sanket Jain
Sprinter and Taekwondo champion Aishwarya Birajdar (seated behind in the first photo) started experiencing heightened anxiety after the floods of 2021. She often skips her training sessions to help her family with chores on the farm and frequently makes do with one meal a day as the family struggles to make ends meet
PHOTO • Sanket Jain

धावपटू आणि तायक्वोंदो खेळाडू ऐश्वर्या बिराजदार (पहिल्या छायाचित्रात मागे बसलेली) हिला २०२१ साली आलेल्या पुरानंतर चिंतेने ग्रासलं होतं. शेतात काही काम असेल तर तिला खेळाचा सराव बुडवावा लागतो. घरची परिस्थिती इतकी हलाखीची असते की अनेकदा ती दिवसातून एकदाच जेवते

पुराचं पाणी ओसरलं, त्यानंतर सानिया आणि ऐश्वर्याच्या आई-वडलांनी पुढचे तीन महिने हाताला कामच नव्हतं कारण सगळं गावच पुन्हा एकदा पूर्वपदाला येण्यासाठी धडपडत होतं. जावेद शेतीतून पुरेसं काही येत नाही म्हणून गवंडी काम करतात. पण या भागातली बांधकामं ठप्प झाल्याने त्यांना काहीच काम नव्हतं. शेतांमध्ये पाणी भरून राहिलं होतं. खंडाने शेती आणि शेतमजुरी करणाऱ्या ऐश्वर्याच्या आईवडलांनाही त्यामुळे काहीच काम मिळालं नाही.

कर्जं फेडायची होती, व्याजाचा आकडा वाढत चालला होता त्यामुळे मग या घरांमध्ये आहाराला कात्री बसली. ऐश्वर्या आणि सानियांनी जवळपास चार महिने दिवसभरात फक्त एकदा जेवून काढले आणि कधी कधी तर ते जेवणही मिळालं नाही.

घरच्यांचा भार हलका करण्यासाठी या तरुण खेळाडू मुली किती दिवस रिकाम्या पोटी निजल्या याची गणती देखील करू शकत नाहीत. आता या सगळ्याचा त्यांच्या सरावावर आणि खेळावर परिणाम होणं अगदीच साहजिक होतं. “आता माझं शरीर फार जास्त व्यायाम सोसूच शकत नाही,” सानिया सांगते.

सानिया आणि ऐश्वर्याला चिंतेचा त्रास जाणवत होता पण सुरुवातीला त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण त्यांच्या सोबत खेळणाऱ्या धावपटूंनाही हा त्रास जास्त प्रमाणात होतोय हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी विचार करायला सुरुवात केली. “पुराचा फटका बसलेल्या आमच्या सगळ्या धावपटू त्याच त्रासाबद्दल बोलायच्या,” ऐश्वर्या सांगते. “मला याचा इतका जास्त ताण आलाय की बहुतेक वेळा मला फारच उदास वाटत असतं,” सानिया सांगते.

“२०२० पासून आम्ही पाहतोय की पहिल्या पावसानंतर, जून महिन्याच्या आसपास लोकांच्या मनात पुराची भीती वाढायला सुरुवात होते,” हातकणंगल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार सांगतात. “आता पुराला तर आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे ही भीती वाढतच जाते. त्यातूनच आजार बळावतो आणि लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.”

२०११ ते २०२१ अशी दहा वर्षं डॉ. दातारांवर शिरोळ तालुक्यातल्या ५४ गावांची जबाबदारी होती. पूर ओसरल्यानंतर आरोग्यसेवा सुरळित करण्याचं काम त्यांनीच हाती घेतलं होतं. “किती तरी लोकांमध्ये [पूर येऊन गेल्यानंतर] इतका प्रचंड ताण असायचा की अखेर उच्च रक्तदाब आणि मानसिक आजारांचं निदान व्हायचं.”

Shirol was one of the worst affected talukas in Kolhapur during the floods of 2019 and 2021
PHOTO • Sanket Jain

कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ आणि २०२१ साली आलेल्या पुराचा शिरोळ तालुक्याला सगळ्यात जास्त फटका बसला आहे

Flood water in the village of Udgaon in Kolhapur’s Shirol taluka . Incessant and heavy rains mean that the fields remain submerged and inaccessible for several days, making it impossible to carry out any work
PHOTO • Sanket Jain

शिरोळ तालुक्यातल्या उदगावमध्ये शिरलेलं पुराचं पाणी. झड लागल्यासारखा जोरदार पाऊस बरसल्यावर शेतं कित्येक दिवस पाण्याखालीच राहिल्याने शेतात जाताच आलं नाही आणि कसलीच कामंही करता आली नाहीत

२०१५ ते २०२० या काळात कोल्हापूर जिल्ह्यात प्रौढ स्त्रियांमध्ये (१५-४९) उच्च रक्तदाबाचं प्रमाण ७२ टक्क्यांनी वाढलं असल्याचं एनएफएचएसच्या अहवालातून समोर येतं. २०१८ साली आलेल्या पुरानंतर कर्नाटकाच्या कोडागुमध्ये २१७ पूरबाधितांचा एक अभ्यास हाती घेण्यात आला होता. या व्यक्तींमध्ये नैराश्य, शारीरिक आजार, अंमली पदार्थांचं सेवन झोपेच्या समस्या आणि चिंता हे त्रास सुरू झाल्याचं यातून पुढे आलं होतं.

२०१५ साली चेन्नई आणि कडलूरमध्ये आलेल्या पुरानंतर तिथल्या पूरग्रस्तांपैकी ४५.२९ टक्के लोकांना मानसिक आजार जडल्याचं तसंच सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २२३ लोकांपैकी तब्बल १०१ जणांना नैराश्याने ग्रासल्याचं एका शोधनिबंधात नमूद करण्यात आलं आहे.

विशाल चव्हाण भेंडवड्यामध्ये ३० विद्यार्थ्यांना तायक्वोंदोचं प्रशिक्षण देतात. तरुण खेळाडूंवरही असाच काहीसा परिणाम पहायला मिळत असल्याचं ते सांगतात. “२०१९ पासून अनेक खेळाडूंनी अशाच त्रासामुळे खेळणंच सोडून दिलं आहे,” ते सांगतात. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेणारी ऐश्वर्यादेखील आता मार्शल आर्ट्स आणि ॲथलेटिक्समध्ये करियर करायतं का नाही याबद्दल विचार करत आहे.

२०१९ साली पूर येण्याआधी ऐश्वर्याने घरच्यांसोबत चार एकरात ऊस लावला होता. “२४ तासाच्या आतच उसाच्या मुळ्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं आणि सगळं पीक वाया गेलं,” ती सांगते.

तिचे आईवडील खंडाने शेती करतात आणि आलेल्या मालाचा चौथा हिस्सा स्वतःकडे ठेऊन बाकी जमीनमालकाला देतात. “२०१९ आणि २०२१ च्या पुराची सरकारने नुकसान भरपाईसुद्धा दिली नाहीये. आणि दिली तरी जमीनमालकाला मिळणार,” ऐश्वर्याचे वडील ४७ वर्षीय रावसाहेब सांगतात.

एकट्या २०१९ च्या पुरात त्यांचा २४० टन ऊस गेला. त्याचं मूल्य ७ लाख २० हजार इतकं होतं. त्यामुळे रावसाहेब आणि त्यांच्या पत्नी शारदा, वय ४० या दोघांनाही आता दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही. कित्येक वेळा ऐश्वर्या त्यांना मदत म्हणून घरच्या गायींचं दूध काढायचं काम करते. “पूर येऊन गेला की पुढचे किमान चार महिने कसलंही काम मिळत नाही, बघा” शारदा सांगतात. “पाणीच सरत नाही. मातीचा कस पुन्हा यायला किती तरी काळ जातो.”

Aishwarya, who has to help her tenant-farmer parents on the fields as they struggle to stay afloat, is now considering giving up her plan of pursuing a career in sports
PHOTO • Sanket Jain

कसं तरी करुन जगून राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या आईवडलांना ऐश्वर्या होईल तशी मदत करतीये. खेळामध्ये करियर करायचं का नाही याचा आता ती विचार करत आहे

Along with training for Taekwondo and focussing on her academics, Aishwarya spends several hours in the fields to help her family
PHOTO • Sanket Jain
With the floods destroying over 240,000 kilos of sugarcane worth Rs 7.2 lakhs in 2019 alone, Aishwarya's parents Sharada and Raosaheb are forced to double up as agricultural labourers
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः तायक्वोंदोचं प्रशिक्षण आणि अभ्यासावर लक्ष देत असतानाच ऐश्वर्या घरच्यांसोबत कित्येक तास शेतातही काम करते. उजवीकडेः एकट्या २०१९ साली आलेल्या पुरात ७.२ लाखाचा २४० टन ऊस हातचा गेल्यानंतर ऐश्वर्याचे आई-वडील, शारदा आणि रावसाहेब दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जात आहेत

२०२१ च्या पुरात रावसाहेबांचं ६ क्विंटल म्हणजेच ४२,००० रुपयांचं सोयाबीन वाया गेलं. ही अशी नुकसानी सोसावी लागत असल्याने आपण खेळात करियर करायचं का याबद्दलच ऐश्वर्याच्या मनात शंका निर्माण झाली आहे. “आता मी पोलिस भरतीच्या परीक्षेसाठी अर्ज करावा असा विचार करतीये,” ती म्हणते. “फक्त खेळाच्या भरोशावर राहायचं तर त्यात रिस्क आहे. पावसाचं चक्र असं बदलत चाललंय त्यामुळे जास्तच.”

“माझं ट्रेनिंग शेतीवरच अवलंबून आहे,” ती म्हणते. शेतीवरच घर चालत असल्यामुळे तिथे काहीही बिनसलं की त्याचा कुटुंबाच्या परिस्थितीवर थेट परिणाम होतो. बदलत्या वातावरणाचे असे फटके बसू लागल्यावर खेळात करियर करता येणार का अशी शंका ऐश्वर्याच्या मनात येणं साहजिक आहे.

“कुठल्याही [नैसर्गिक] आपत्तीचा सर्वात जास्त फटका महिला खेळाडूंना बसतो,” कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातल्या पेठेवाडीचे क्रीडा प्रशिक्षक पांडुरंग तेरसे सांगतात. “कित्येक कुटुंबांचा कसलाच पाठिंबा नसतो, आणि थोड्या दिवसांसाठी या मुलींचा सराव थांबला की घरचे लोक त्यांना 'आता हे खेळ वगैरे सोडा आणि कमवायचं बघा' असं सांगतात. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम होतो.”

या तरुण खेळाडूंसाठी काय करता येईल असं विचारल्यावर मानसशास्त्रज्ञ काकडे सांगतात, “आम्ही आमच्या उपचारांचा भाग म्हणून वियोगासाठी समुपदेशन करतो – शांतपणे ऐकून घेणे आणि त्यांना त्यांच्या भावनांना वाट करून द्यायला उद्युक्त करणे. आपल्या मनातल्या गुंतागुंतीच्या भावना बोलण्यासाठीची जागा मिळाली तर थोडी निश्चिंती वाटते. आपल्या पाठीशी उभा असलेला एक गट आहे ही भावना आघातातून बाहेर येण्यासाठी पुढे जाऊन परिणामकारक ठरते.” पण वस्तुस्थिती अशी आहे की भारतामध्ये लाखो लोक मानसिक आजारांसाठी उपचार घेऊच शकत नाहीत. कारण एक तर आधीच अपुऱ्या असलेल्या आरोग्य सेवा यंत्रणेकडे निधीचा खडखडाट आणि उपचारांचा खर्चही जास्त असतो.

*****

२०१९ चा पूर आला आणि लांब पल्ल्याची धावपटू असणाऱ्या सोनाली कांबळेच्या स्वप्नांना खीळ बसली. क्रीडाक्षेत्रात करियर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सोनालीचे आईवडील दोघंही भूमीहीन शेतमजूर आहेत. पुरानंतर आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सोनालीची मदत लागणार होती.

“आम्ही तिघं काम करतोय, तरीही भागत नाहीये,” तिचे वडील राजेंद्र कांबळे म्हणतात. पावसाची झड लागली की रानात पाणी भरतं, काहीच करता येत नाही. पुढचे अनेक दिवस शेतात कामं निघत नाहीत आणि मजुरीवर जगणाऱ्या कुटुंबांचं कमाईचं साधनच हिरावून घेतलं जातं.

Athletes running 10 kilometres as part of their training in Maharashtra’s flood-affected Ghalwad village
PHOTO • Sanket Jain
An athlete carrying a 200-kilo tyre for her workout
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः महाराष्ट्राच्या घालवाड गावातल्या खेळाडू रोजच्या सरावाचा भाग म्हणून १० किलोमीटर पळतायत. उजवीकडेः व्यायामाचा भाग म्हणून २०० किलो वजनाचं टायर उचलणारी एक खेळाडू

Athletes in Kolhapur's Ghalwad village working out to build their strength and endurance. Several ASHA workers in the region confirm that a growing number of young sportspersons are suffering from stress and anxiety related to frequent floods and heavy rains
PHOTO • Sanket Jain
Athletes in Kolhapur's Ghalwad village working out to build their strength and endurance. Several ASHA workers in the region confirm that a growing number of young sportspersons are suffering from stress and anxiety related to frequent floods and heavy rains
PHOTO • Sanket Jain

कोल्हापूरच्या घालवाड गावात ताकद आणि चिकाटी वाढवण्यासाठी धावपटूंचा व्यायाम सुरू आहे. सतत येणारे पूर आणि अतिवृष्टीमुळे अनेक तरुण खेळाडूंना ताण आणि चिंतेचा त्रास होत असल्याचं इथल्या अनेक आशा कार्यकर्त्यां सांगतात

कांबळे कुटुंब शिरोळ तालुक्याच्या घालवाडमध्ये राहतं. या गावात सात तास कामाची महिलांना २०० रुपये तर पुरुषांना २५० रुपये मजुरी मिळते. “इतक्या पैशात घर कसं चालवायचं? खेळासाठी लागणारी साधनं आणि सरावाचा खर्च तर लांबचीच गोष्ट झालीये,” २१ वर्षीय सोनाली सांगते.

२०२१ साली पुन्हा पूर आला आणि कांबळे कुटुंबाच्या अडचणीच भर पडली. सोनालीवर प्रचंड मोठा मानसिक आघात झाला. “२०२१ साली अगदी २४ तासात आमच्या घरात पाणी भरलं होतं,” ती सांगते. “आम्ही तेव्हा कसंबसं त्या पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर आलो. पण आता कुठेही पाणी वाढताना दिसलं ना की माझं अंग दुखायला लागतं आणि पूर येणार अशी भीती वाटायला लागते.”

यंदा, २०२२ च्या जुलै महिन्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली, गावातल्या लोकांना आता कृष्णेला पूर येणार अशी भीती वाटू लागली होती असं सोनालीची आई, शुभांगी सांगतात. रोजचा अडीच तासांचा सराव सोडून सोनालीने पुरापासून वाचण्याची सगळी तयारी करायला सुरुवात केली. त्यानंतर थोड्याच वेळात तिला मनावर प्रचंड ताण आल्याचं जाणवू लागलं, आणि ती तडक डॉक्टरांकडे गेली.

“पाणी वाढायला लागलं की अनेक लोक घराबाहेर पडायचं का नाही अशा द्विधा मनस्थितीत असतात,” डॉ. दातार सांगतात. “आता काय होणार आणि त्यावर काय निर्णय घ्यायचा हेच ते ठरवू शकत नाहीत आणि त्यामुळे ताण वाढतो.”

पाणी ओसरायला लागलं की सोनालीला लगेच बरं वाटायला लागतं, “पण सरावात असा सारखा खंड पडतो त्यामुळे मला स्पर्धांमध्ये भाग घेता येत नाही आणि त्यातून पुन्हा ताण निर्माण होतो.”

कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्या देखील सांगतात की पुरामुळे तरुण खेळाडूंच्या चिंतेत भर पडली आहे. “ते असहाय्य झालेत आणि हताश. पाऊसकाळ बदलत चाललाय, त्यामुळे त्यांची परिस्थिती आणखीच वाईट होत चाललीये,” घालवाडच्या आशा कल्पना कमलाकर सांगतात.

With the financial losses caused by the floods and her farmer father finding it difficult to find work, Saniya (left) often has no choice but to skip a meal or starve altogether. This has affected her fitness and performance as her body can no longer handle rigorous workouts
PHOTO • Sanket Jain
With the financial losses caused by the floods and her farmer father finding it difficult to find work, Saniya (left) often has no choice but to skip a meal or starve altogether. This has affected her fitness and performance as her body can no longer handle rigorous workouts
PHOTO • Sanket Jain

पुरामुळे झालेलं आर्थिक नुकसान आणि वडलांनाही काम मिळेनासं झाल्यावर सानियापुढे आता दिवसातून एकदा जेवण किंवा चक्क उपास याशिवाय पर्याय नाही. याचा तिच्या तंदुरुस्तीवर परिणाम झालाय. आता तिच्या शरीराला जोरकस व्यायाम सहनच होत नाही

ऐश्वर्या, सानिया आणि सोनाली या तिघीही शेतकरी किंवा शेती ही उपजीविका असलेल्या कुटुंबातल्या आहेत. आणि त्यांचं नशीब खरं तर कमनशीब पावसावर अवलंबून आहे. या तिन्ही कुटुंबांनी २०२२ च्या उन्हाळ्यात ऊस लावला होता.

या वर्षी भारतात कित्येक ठिकाणी पावसाने ओढ दिली. “पाऊस लांबला तरी आमचं पीक तगून होतं,” ऐश्वर्या सांगते. पण जुलैत सुरू झालेल्या लहरी पावसाने मात्र त्यांच्या पिकाची पुरती नासधूस केली आणि या कुटुंबांना कर्जाच्या विळख्यात ढकललं. [वाचाः पाऊस येतो आणि दुःख बरसतं ]

१९५३ ते २०२० या ६७ वर्षांच्या काळात भारतात पुराचा फटका बसलेल्या लोकांचा आकडा जवळपास २२ अब्ज - म्हणजे अमेरिकेच्या सध्याच्या लोकसंख्येच्या ६.५ पट - इतका आहे. आणि या पुरांमुळे झालेलं नुकसान तब्बल ४,३७,१५० कोटींच्या घरात जातं. गेल्या दोन दशकांमध्ये भारतात दर वर्षी पुराच्या सरासरी १७ घटना घडल्या असून चीननंतर आता पुराची समस्या असणारा भारत जगातला दुसरा देश ठरला आहे.

गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रात, खासकरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस फार लहरी झाला आहे. या वर्षी एकट्या ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या २२ जिल्ह्यांमधल्या ७.५ लाख हेक्टर शेतजमिनीला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. याच पिकं, फळबागा आणि भाजीपाल्याचं अतोनात नुकसान झालं आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार २०२२ साली २८ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात १,२८८ मिमी पाऊस झाला जो सरासरी पाऊसमानापेक्षा १२० टक्के अधिक आहे. त्यातला १,०६८ मिमी पाऊस जून ते ऑक्टोबर या काळात झाला होता.

A villager watches rescue operations in Ghalwad village after the July 2021 floods
PHOTO • Sanket Jain

२०२१ साली जुलै महिन्यात आलेल्या पुरादरम्यान लोकांना सुखरुप बाहेर काढण्याचं काम सुरू आहे

“पावसाळ्यात जास्त काळ ओढ आणि त्यानंतर थोड्या वेळात एकदम जोरात पाऊस असं सध्याचं चित्र आहे,” डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल सांगतात. ते पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमध्ये वातावरण बदल क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी आयपीसीसीच्या अहवालामध्ये आपलं योगदान दिलं आहे. “त्यामुळे, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खूप जास्त आर्द्रता साठलेली असते, आणि अगदी थोड्या वेळात पाऊस कोसळतो.” त्यातूनच ढगफुटी आणि अचानक येणाऱ्या पुरासारख्या घटना घडत असल्याचं ते सांगतात. “आपण उष्णकटिबंधात राहतो त्यामुळे वातावरणातल्या या घटना अधिकच तीव्रतेने आपल्याला अनुभवायला मिळतात. त्यामुळे आपण अधिक काळजी घ्यायला हवी आणि सतर्कही रहायला हवं. कारण या सगळ्यांचा परिणाम सगळ्यात आधी आपल्यालाच सहन करावा लागणार आहे.”

मात्र अजूनही काही त्रुटी आहेत ज्या दूर करणं गरजेचं आहे. एखाद्या भागातील बदलतं वातावरण आणि वाढते आजार यांचा संबंध जोडण्यासाठी आवश्यक अशी आरोग्यसेवाविषयक आकडेवारी उपलब्ध नाही. यामुळे वातावरण बदलाच्या संकटाचा विपरित परिणाम झालेल्या अगणित लोकांचं वास्तव शासकीय धोरणांमध्ये प्रतिबिंबित होतच नाही आणि जे सगळ्यात जास्त जोखमीत आहेत त्यांच्यापर्यंत कसलेही लाभ पोचू शकत नाहीत.

“ॲथलीट व्हायचं हेच माझं स्वप्न आहे,” सोनाली म्हणते, “पण घरी गरिबी असते ना तर पर्यायही मोजकेच असतात. तिथे काय निवडायचं याचं स्वातंत्र्य तुम्हाला नसतं.” जगभरात वातावरण बदलांचं संकट अधिकाधिक गहिरं होतंय, पावासाचं चक्र पुरतं बदलत चाललंय. अशा परिस्थितीत सानिया, ऐश्वर्या आणि सोनालीसमोरचे पर्याय निश्चितच सोपे नाहीत.

“माझा जन्मच पुरात झालाय. पण अख्खं आयुष्य पुरात काढावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं,” सानिया म्हणते.

या वार्तांकनासाठी लेखकाला इंटरन्यूजच्या अर्थ जर्नलिझम नेटवर्कतर्फे स्वतंत्र पत्रकारिता निधी मिळाला आहे.

Sanket Jain

ಸಂಕೇತ್ ಜೈನ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕೊಲ್ಹಾಪುರ ಮೂಲದ ಪತ್ರಕರ್ತ. ಅವರು 2022 ಪರಿ ಸೀನಿಯರ್ ಫೆಲೋ ಮತ್ತು 2019ರ ಪರಿ ಫೆಲೋ ಆಗಿದ್ದಾರೆ.

Other stories by Sanket Jain
Editor : Sangeeta Menon

ಸಂಗೀತಾ ಮೆನನ್ ಮುಂಬೈ ಮೂಲದ ಬರಹಗಾರು, ಸಂಪಾದಕರು ಮತ್ತು ಸಂವಹನ ಸಲಹೆಗಾರರು.

Other stories by Sangeeta Menon