'तुमचा आवडता विषय कोणता?' हा भारतीय शालेय विद्यार्थ्यांच्या वर्गात नेहमीच विचारला जाणारा एक निरस प्रश्न, आम्ही देखील विचारला. वर्गातील विद्यार्थ्यांनी एकमुखाने उत्तर दिले, "इंग्रजी". समोरच्या बाकांवर बसलेल्या दोन विद्यार्थ्यांनी "इंग्रजी" म्हंटलं की, वर्गातील प्रत्येक कच्चा-बच्चा तेच उत्तर देतो. पहिल्या दोन विद्यार्थ्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांना कोणतीही शिक्षा झाली नाही म्हणजे तेच बोलायचं हे मुलांना चांगलंच माहित असतं.


/static/media/uploads/Articles/P. Sainath/PotatoSong/teacher-s-vijaylaxmi-400x300.jpg

एस . विजयलक्ष्मी - असामान्य शिक्षिका


पण ही कोणतीही सामान्य शाळा नाही, तर ईडालिप्पारामधील एक शिक्षकी, एकत्रीकृत आदिवासी विकास प्रकल्प शाळा आहे. केरळ मधील सर्वांत दुर्गम भागात आणि एकमेव आदिवासी पंचायत असलेल्या ईडमालकुडीमध्ये ही शाळा वसलेली आहे. शाळेच्या बाहेर कुठेही आपल्याला इंग्रजीत बोलताना कोणीही आढळणार नाही. इंग्रजीत इथे एखादा बोर्ड, पोस्टर किंवा फलकही आढळणे अवघड आहे. तरीही विद्यार्थी सांगतात इंग्रजी हा त्यांचा आवडता विषय आहे. ईडुक्की जिल्ह्यातील इतर अनेक शाळांप्रमाणेच, या शाळेतही इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग एकत्र एकाच खोलीत भरवले जातात. एस. विजयलक्ष्मी खरोखरच एक असामान्य शिक्षिका आहेत. तुटपुंजा पगार, प्रचंड काम, अशक्य आणि अवघड परिस्थितीतही विद्यार्थ्यांसाठी एवढ्या समर्पित होउन त्या शाळा चालवतात.

इंग्रजी  म्हणणार्यांमध्ये, "गणित" आवडता विषय म्हणणारा एक छोटासा शूरवीर विरोधक उभा राहिला. आम्ही त्याला लक्ष्य करुन, तुझं गणिताचं कौशल्य दाखव पाहू, अशी मागणी केली. आणि त्याने ती पूर्ण केली. ताठ मानेने, छाती फुलवून त्याने एका दमात, १ ते १२ चे पाढे म्हणून दाखविले - शाबासकी मिळो ना मिळो. तो आणखी पाढे म्हणणार होता पण आम्हांला त्याला थांबवावं लागलं.

शिक्षिके जवळील एका स्वतंत्र बाकावर बसलेल्या पाच लहान मुलींकडे आम्ही वळलो. अर्थातच, त्या वर्गातील बुद्धिनिष्ठ 'एलिट' मुली आहेत हे त्यांची खास जागाच सुचवत होती. सर्वांत मोठी मुलगी कदाचित ११ वर्षांची असावी. बाकीच्या मुली नऊ वर्षांच्या किंवा लहान असाव्यात. आम्ही त्या मुलींना दाखवून दिले की, गणिताची आवड असणार्या मुलाने त्याचे कौशल्य सिद्ध केलंय. इंग्रजी हा खरंच त्यांचा आवडता विषय आहे हे सिद्ध करण्याची आता त्यांची पाळी होती. चला मग, मुलींनो इंग्रजी ऐकूया.


/static/media/uploads/Articles/P. Sainath/PotatoSong/tribal-girls-classroom-400x300.jpg

पाच गायिकांचा गट - आणि साहजिकच इयत्ता ली ते थी च्या बुद्धिमान हुशार ' विद्यार्थिनी


आठ अनोळखी आणि विचित्र दिसणारे पुरूष वर्गावर चालून आल्यावर कोणीही लाजेल तश्या त्या मुली थोड्या लाजत होत्या. मग शिक्षिका एस. विजयलक्ष्मी त्यांना म्हणाल्या: "मुलींनो, त्यांना गाणं गाऊन दाखवा." आणि त्यांनी गायलं देखील. आपल्या सर्वांना माहितच आहे की आदिवासी गाऊ शकतात. आणि या पाच मुथावन मुली तर अतिशय सुंदर गायल्या. उत्तम स्वरात गायल्या. एकही उच्चार चुकला नाही. अगदी तालात गायल्या. तरीही त्या अजूनही लाजत होत्या. लहानगी वैदेही एवढी लाजत होती की तिने वर पाहिलंच नाही. श्रोत्यांकडे पाहण्यापेक्षा ती बाकाकडे पाहूनच गात होती. पण त्या जबरदस्त गायल्या. या गाण्याचे बोल मात्र विलक्षण होते.

ती एक बटाट्यावर रचलेली कविता होती.

ईडुक्कीच्या डोंगरांवर कुठेतरी रताळे पिकवतात. पण ईडालिप्पारापासून शंभर किलोमीटरच्या परिसरात कुठेही बटाटा पिकवत असतील याची मला शंकाच आहे.

असो - आणि आता ते गाणं तुम्हीही ऐकू शकता – गाण्याचा मराठीत अर्थ आहे:

बटाटा, बटाटा

अरे, माझा लाडका बटाटा

मला प्रिय बटाटा

तुला प्रिय बटाटा

आमचा लाडका बटाटा

बटाटा, बटाटा, बटाटा

हे गाणं इतकं सुंदर गायलं या मुलींनी की, अक्षरश: बटाट्यासारख्या साध्या कंदवर्गीय भाजीला त्यांनी जणू उच्च सन्मान दिला. त्यांना बटाटा कधी खायला तरी मिळू शकेल का असा विचार करत आम्ही पाहतच राहिलो. (कदाचित आमची माहिती चुकीची असावी. मुन्नार जवळील काही गावांनी बटाट्याची लागवड सुरु केली असल्याचे कळते. ती गावे इथून सुमारे ५० किलोमीटर लांब असणार). पण या गाण्याचे बोल मात्र आमच्या मनातच रेंगाळत होते. अनेक आठवड्यांनंतरही, आमच्यातील बहुतेक जण आजही हे गाणं गुणगुणतात. त्याचं कारण आम्ही बटाटाप्रेमी आहोत हे नसून - आम्हां आठही जणांना बटाटा आवडत असावा बहुतेक - आम्ही त्या विलक्षण, विक्षिप्त पण अगदी गंभीरपणे, मनापासून गायलेल्या गाण्याने अगदी मंत्रमुग्ध झालो होतो, हे आहे. त्या विद्यार्थिनींची सादरीकरणातील मोहकता मनाला भावून गेली होती.


/static/media/uploads/Articles/P. Sainath/PotatoSong/teacher-students-ev-lbv-1024x709.jpg

विद्यार्थी आणि शिक्षिका विजयलक्ष्मी त्यांच्या एकवर्गीय शाळेबाहेर


आता आम्ही वर्गात परतलो. त्या मुलींचे टाळ्या वाजवून आणि कौतुक करून आम्ही व्हिडीओ कॅमेरासाठी पुन्हा गाणं गाण्यास त्यांचे मन वळविले. त्यानंतर आम्ही मुलांना आवाहन केले. मुलं मुलींपेक्षा कमी पडत आहेत असं सांगून आम्ही मुलांना चिथावत होतो. तुम्ही मुलींसारखी कामगिरी करुन दाखवू शकाल का? मुलांनी आवाहन स्वीकारले. त्यांनी गाण्यापेक्षा जास्त सादरीकरण केले. त्यांचं सादरीकरण जरी चांगलं असलं तरी मुलींच्या कामगिरीची त्याला सर आली नाही. त्यांच्या सादरीकरणातले शब्द मात्र अतिशय विचित्र होते.

ह्या सादरीकरणाचं नाव आहे 'डॉक्टरांसाठी प्रार्थना'. हे एक असं गीत आहे, जे फक्त भारतातच लिहिलं, गायलं किंवा सादर केलं जाऊ शकतं. मी तुम्हांला इतक्यातच त्यातले शब्द सांगून त्याची कल्पना देणार नाही - त्याचा व्हिडिओही या लेखात येणार नाही. तुमची उत्कंठा थोडी वाढवणार आहे. शिवाय हा लेख आहे त्या विलक्षण पाच गायिकांचा: अंशिला देवी, उमा देवी, कल्पना, वैदेही आणि जस्मिन. तरीही, मी एवढं सांगू शकेन की, डॉक्टरांसाठीच्या प्रार्थनेत काही खास भारतीय ओळी आहेत, जसे "माझं पोट खूप दुखतंय डॉक्टर. मला ऑपरेशनची गरज आहे, डॉक्टर. ऑपरेशन, ऑपरेशन, ऑपरेशन."

पण ते दुसरं गाणं आहे. आणि त्या व्हिडिओसाठी काही दिवस थांबावं लागेल.

तोपर्यंत, बटाटे सोलताना आपण हे, प्रिय बटाट्याचं गाणं गाऊ शकता.

हा लेख मूळ स्वरूपात २६ जून, २०१४ रोजी P.Sainath.org वर प्रकाशित झाला होता.

ಪಿ. ಸಾಯಿನಾಥ್ ಅವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಸ್ಥಾಪಕ ಸಂಪಾದಕರು. ದಶಕಗಳಿಂದ ಗ್ರಾಮೀಣ ವರದಿಗಾರರಾಗಿರುವ ಅವರು 'ಎವೆರಿಬಡಿ ಲವ್ಸ್ ಎ ಗುಡ್ ಡ್ರಾಟ್' ಮತ್ತು 'ದಿ ಲಾಸ್ಟ್ ಹೀರೋಸ್: ಫೂಟ್ ಸೋಲ್ಜರ್ಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯನ್ ಫ್ರೀಡಂ' ಎನ್ನುವ ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ.

Other stories by P. Sainath
Translator : Pallavi Kulkarni

Pallavi Kulkarni is a Marathi, Hindi and English translator.

Other stories by Pallavi Kulkarni