मळगावच्या पठारावरचा हा दर्गा गावातल्या लोकांचं कामाचं ठिकाण आहे. सातारा जिल्ह्यातला हा दर्गा अनेक शतकांपासून इथे उभा आहे आणि अनेकांनी त्याचा अनेक कामांसाठी आसरा घेतला आहे.

शाळेतली मुलं इथल्या झाडाच्या सावलीत अभ्यास करतात. तरुण मुलं-मुली स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी इथेच येतात कारण उन्हाच्या तलखीत इथेच गार सावली असते. पोलिसभरतीसाठी तयारी करणारी तरुण मंडळी इथेच येऊन इथेच तयारी करतात, इथल्या मोकळ्या माळावर व्यायाम आणि कसरत करतात.

“माझे आजोबा इथल्या काय काय गोष्टी सांगायचे,” ७६ वर्षीय विनायक जाधव सांगतात. त्यांची गावात १५ एकर जमीन आहे. “विचार करा, किती जुना आहे हा दर्गा. हिंदू आणि मुसलमानांनी एकत्र ही जागा जपलीये. आणि एकमेकांबरोबर शांतीत लोक राहू शकतात त्याचं हे प्रतीक आहे.”

मात्र सप्टेंबर २०२३ मध्ये काही तरी बदललं. सगळ्यांची आवडती जागा असलेल्या या दर्ग्याबद्दल वेगळंच काही बोललं जाऊ लागलं. काही तरुण मंडळी म्हणू लागली की हे अतिक्रमण आहे. हिंदुत्ववादी संघटनांची त्यांना चिथावणी होती.

मळगावच्या रहिवाशांपैकी काही २०-२५ वयोगटातल्या काही हिंदू तरुणांनी जिल्हा प्रशासनाला लिहून पाठवलं की हे “अवैध बांधकाम” ताबडतोब काढून घेण्यात यावं. त्यातल्या काहींनी दर्ग्याजवळच्या पाण्याच्या टाकीची मोडतोड केली होती. त्यांच्या पत्रात लिहिलं होतं की “भोवतालची जमीन मुसलमान समाजाला ताब्यात घ्यायची आहे.”

PHOTO • Parth M.N.

विनायक जाधव (गांधी टोपी घातलेले) त्यांच्या मित्रमंडळींसोबत मळगावच्या दर्ग्यामध्ये . सातारा जिल्ह्यामध्ये अनेक शतकांपासून हा दर्गा उभा आहे

मात्र बुलडोझर चालवून दर्गा पाडून टाका अशी चर्चा सुरू झाली तेव्हा मात्र गावकरी पुढे आले आणि जे योग्य आहे त्यासाठी ठामपणे पुढे पाऊल टाकायचं ठरवलं. “१९१८ च्या नकाशांमध्ये या दर्ग्याचा उल्लेख आहे,” जाधव सांगतात आणि अगदी हलक्या हाताने एक कागद उलगडून दाखवतात. “स्वातंत्र्याच्या आधीपासून या गावात अनेक प्रार्थनास्थळं अस्तित्वात आहेत. आणि आम्हाला ती सगळी जतन करायची आहेत. आमची पोरं बाळं एकमेकांसोबत सुखात नांदावीत असं आम्हाला वाटतं.”

“धर्मा-धर्मामध्ये भांडण लावून आपण पुढे नाही, मागे जाणार,” ते सांगतात.

जेव्हा हिंदुत्ववादी गटाच्या सदस्यांना दर्गा पाडून टाकण्यासाठी हालचाली सुरू केल्या तेव्हा माळगावातले दोन्ही समाजाचे लोक एकत्र आले आणि त्या विरोधात त्यांनी एक पत्र दिलं. इथल्या बहुसंख्य लोकांची ही मागणी नाही असं त्यात स्पष्ट लिहिलेलं होतं. विविध जातीच्या हिंदू आणि मुसलमान समाजाच्या २०० जणांनी त्यावर सह्या केल्या. आणि सध्या तरी हा दर्गा सुरक्षित राहिलाय.

मात्र फार कष्टाने मिळवलेली ही शांती टिकवणं हे याहून मोठं आव्हान आहे.

*****

समाजा-समाजात फूट पाडणाऱ्यांविरोधात एकजुटीने पुढे येणारं आणि मुस्लिम समाजाच्या एका वारसास्थळाचं रक्षण करणारं मळगाव हे दुर्मिळ उदाहरण आहे.

गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये मुसलमानांच्या प्रार्थनास्थळांवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. आणि बहुतेक घटनांमध्ये गुन्हेगारांच्या केसालाही धक्का लागलेला नाही. आणि याचं मुख्य कारण म्हणजे पोलिसांची निष्क्रीयता आणि बहुसंख्यांनी बाळगलेलं मौन.

२०१९ साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतरची अडीच वर्षं भारतातल्या या सर्वात श्रीमंत राज्याची धुरा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांच्या हाती होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.

मात्र २०२२ साली जून महिन्यात भारतीय जनता पक्षाने शिव सेनेच्या ४० आमदारांना फूस लावत त्यांच्यासोबत युती केली आणि आघाडीचं सरकार पाडलं. त्यानंतर कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत राज्यभरात अनेक मोर्चे काढले आणि मुसलमानांचं शिरकाण आणि आर्थिक बहिष्काराच्या घोषणा दिल्या. राज्यातलं वातावरण मुद्दामहून कलुषित करण्याचा हा संघटित प्रयत्न सुरूच आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मुसलमानांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले करण्यात येत आहेत.

PHOTO • Parth M.N.
PHOTO • Parth M.N.

डावीकडेः शाळेतली मुलं इथल्या झाडाच्या सावलीत अभ्यास करतात. तरुण मुलं-मुली स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी इथेच येतात कारण उन्हाच्या तलखीत इथेच गार सावली असते. उजवीकडेः जाधव काका आपल्या स्कूटीवर इथे दर्ग्यावर येतात. ‘स्वातंत्र्याच्या आधीपासून या गावात अनेक प्रार्थनास्थळं अस्तित्वात आहेत. आणि आम्हाला ती सगळी जतन करायची आहेत. आमची पोरं बाळं एकमेकांसोबत सुखात नांदावीत असं आम्हाला वाटतं’

साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते मिनाज सय्यद सांगतात की ही सगळी कारस्थानं बऱ्याच वर्षांपासून सुरू आहेत मात्र २०२२ नंतर त्यांना जोर मिळाला आहे. “गावातले दर्गे, मझारी किंवा घुमट असतात त्याची देखभाल हिंदू आणि मुसलमान दोघं करतात. पण त्यांच्यावरचे हल्ले वाढलेत,” ते सांगतात. “समन्वयाची, मेलजोल संस्कृती संपवायची हे त्यांचं लक्ष्य आहे.”

२०२३ साली फेब्रुवारी महिन्यात कोल्हापूरच्या विशाळगड गावातल्या हझरत पीर मलिक रेहान शाह दर्ग्यावर कट्टर हिंदुत्ववादी गटांनी रॉकेट डागलं. पोलिसांच्या उपस्थितीत हा सगळा प्रकार घडला.

सप्टेंबर २०२३ मध्ये भाजपच्या विक्रम पावसकर चालवत असलेल्या हिंदू एकता या कट्टर गटाने साताऱ्यातल्या पुसेसावळीमध्ये मशिदीवर जीवघेणा हल्ला केला. तिथे नमाज अदा करणाऱ्या १०-१२ निष्पाप मुसलमानांवर फरशी, काठ्या आणि सळयांनी हल्ला केला. त्यातल्या एकाचा जीवही गेला. आणि हे सगळं व्हॉट्सॲपवर पसरवण्यात आलेल्या खोट्या स्क्रीनशॉटचा बदला म्हणून करण्यात आलं. वाचाः पुसेसावळीत जीवघेण्या अफवा आणि अपप्रचार

डिसेंबर २०२३ मध्ये धार्मिक सलोखा वाढीस लागावा म्हणून स्थापन करण्यात आलेल्या सलोखा संपर्क गटाने एक पुस्तिका छापली ज्यामध्ये अशा घटनांचे तपशील दिले आहेत. एकट्या साताऱ्यात मुसलमानांच्या प्रार्थनास्थळांची मोडतोड करण्याच्या १३ घटना घडल्या आहेत. एखादी मझार किंवा घुमटाची नासधूस करण्यापासून ते मशिदीवर भगवा फडकवण्यापर्यंत कृत्यं करण्यात आली आहेत. धर्मा-धर्मामध्ये वितुष्ट यावं हाच यामागचा हेतू असल्याचं दिसतं.

२०२२ या एका वर्षात महाराष्ट्रात दंगलींच्या ८२१८ घटना घडल्याची नोंद आहे आणि यामध्ये ९,५०० नागरिकांना झळ बसल्याचं ही पुस्तिका म्हणते. म्हणजे दर दिवशी २३ दंगे!

PHOTO • Parth M.N.
PHOTO • Parth M.N.

डावीकडेः सलोखा संपर्क गटाने प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेत एकट्या सातारा जिल्ह्यात मुसलमानांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले झाल्याच्या १३ घटना घडल्याचं म्हटलं आहे. तसंच २०२२ या एका वर्षात महाराष्ट्रात दंगलींच्या ८२१८ घटना घडल्याची नोंद आहे आणि यामध्ये ९,५०० नागरिकांना झळ बसल्याचं ही पुस्तिका म्हणते. उजवीकडेः माळगावातला हिंदू आणि मुसलमानांनी एकत्र जपलेला हा दर्गा धार्मिक सलोख्याचं प्रतीक ठरतो आहे

जून २०२३ मध्ये ५३ वर्षीय शमशुद्दिन सय्यद नेहमीप्रमाणे चालत चालत आपल्या कोंडवे गावातल्या मशिदीत पोचले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांचा काळजाचा ठोका चुकला. जय श्री राम असं काळ्या गडद अक्षरात लिहिलेला भगवा मशिदीच्या गोलाकार मिनारावर फडकवला होता. सय्यद यांना काय करावं सुचेना. त्यांनी लगेचच पोलिसांना बोलावलं आणि ही परिस्थिती काबूत ठेवण्याचं आवाहन केलं. हा भगवा उतरवत असताना त्या गल्लीत पोलिस उभे असूनही कायदा सुव्यवस्थेचा काही तरी प्रश्न उद्भवणार आहे असं सारखं त्यांना वाटत होतं.

“एका मुस्लिम मुलाने काही दिवसांपूर्वी आपल्या स्टेटसवर टिपू सुलतानचा फोटो लावला होता,” मशिदीचे विश्वस्त असलेले सय्यद सांगतात. “हिंदुत्ववादी गटांना १८व्या शतकातल्या या राजाचा गौरव केलेलं आवडलं नाही आणि त्याचा बदला म्हणून त्यांना मशिदीची विटंबना करायची होती.”

टिपू सुलतानचं स्टेटस ठेवणारा २० वर्षीय सोहेल पठाण सांगतो की ते ठेवल्या ठेवल्या मला त्याचा पश्चात्ताप झाला. “मी ते तसं करायला नको होतं. एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे मी माझ्या घरच्यांचा जीव धोक्यात घातला.”

त्याने पोस्ट टाकल्यानंतर काही तासातच जहाल हिंदुत्ववादी गटाचे काही लोक त्याच्या अंधाऱ्या घरी पोचले आणि त्यांनी त्यांच्या थोबाडीत मारली. “आम्ही काहीच प्रतिकार केला नाही कारण त्यातून हे प्रकरण आणखी चिघळलं असतं,” सोहेल सांगतो. “पण ती फक्त एक इन्स्टाग्रामवरची स्टोरी होती. मुसलमानांवर हल्ले करण्याचं कारण काय?”

ज्या दिवशी त्याला घरी येऊन मारलं त्याच दिवशी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि केस दाखल केली. सोहेलवर. एक रात्र त्याला पोलिस ठाण्यात काढावी लागली. आणि सध्या त्याच्यावर जिल्हा न्यायालयात धार्मिक तेढ वाढवल्याच्या गुन्ह्याखाली खटला चालू आहे. त्याला मारणारे मात्र मोकाट फिरत आहेत.

सोहेलची आई, ४६ वर्षीय शहनाझ सांगतात की किती तरी पिढ्यांपासून त्यांचं कुटुंब साताऱ्यात अगदी खुशाल राहतंय. पण अशा प्रकारचा द्वेष आणि तिरस्कार किंवा समाजमाध्यमांवरची करडी नजर या आधी त्यांना कधीही जाणवलेली नाही. “माझे आई-बाप, आजा-आजी फाळणीच्या वेळी इथे राहिले कारण त्यांचा धर्मनिरपेक्ष संविधानावर विश्वास होता,” त्या सांगतात. “ही माझी मायभूमी आहे, हे माझं गाव आणि माझं घर आहे. पण आजकाल कामासाठी जरी माझी मुलं बाहेर गेली तरी जिवाला घोर लागून राहतो.”

PHOTO • Parth M.N.

साताऱ्याच्या कोंडवे गावाच्या सोहेल पठाणने आपल्या स्टेटसवर टिपू सुलतानचा फोटो ठेवला आणि त्यानंतर त्याच्या गावातल्या मशिदीवर भगवा फडकवण्यात आला आणि त्याला मारहाण करण्यात आली

सोहेल एका गॅरेजमध्ये काम करतो आणि त्याचा भाऊ आफताब, वय २४ वेल्डर आहे. त्यांच्या घरचे हे दोघंच कमावते सदस्य आहेत आणि महिन्याला साधारणपणे १५,००० रुपये कमावतात. सोहेलवर टाकण्यात आलेल्या या फालतू खटल्यामुळे जामीन आणि वकिलाच्या फीमध्ये त्यांची दोन महिन्यांची कमाई खर्च झाली आहे. “तुम्हीच बघा आम्ही कसं जगतोय ते,” आपल्या छोट्याशा घराकडे बोट करत शहनाझ म्हणतात. आफताबचं वेल्डिंग मशीन एका भिंतीला लावून ठेवलंय, रंगाचे पोपडे उडालेत. “कोर्टकचेरीवर पैसे खर्च करणं आम्हाला परवडणारं नाही. एकच चांगली गोष्ट झाली ती म्हणजे गावातल्या शांतता समिती मध्ये पडली आणि परिस्थिती निवळायला मदत झाली.”

कोंडवे गावातल्या शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य आणि शेतकरी असणारे ७१ वर्षीय मधुकर निंबाळकर सांगतात की २०१४ साली ही समिती स्थापन झाली त्यानंतर आता पहिलीच वेळ आहे की त्यांना हस्तक्षेप करावा लागलाय. “आम्ही ज्या मशिदीवर भगवा फडकवला तिथेच एक बैठक घेतली. आणि दोन्ही समाजाच्या लोकांनी शब्द दिला की परिस्थिती बिघडू देणार नाही,” ते सांगतात.

मशिदीमध्येच सभा घेण्याचं आणखी एक कारण होतं. “इथल्या समोरच्या अंगणात किती तरी वर्षांपासून हिंदू समाजाची लग्नं लागलीयेत. इतकी वर्षं आपण कसं सुखाने नांदलो आहोत याची आम्हाला लोकांना आठवण करून द्यायची होती,” निंबाळकर सांगतात.

*****

२२ जानेवारी २०२४. अयोध्येत रामलल्लाच्या मंदिराचं उद्घाटन झालं. २०१९ साली सर्वोच्च न्यायालयाने एकमताने निकाल देत ही वादग्रस्त जागा मंदिराच्या उभारणीसाठी देऊ केली. १९९२ साली विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली कडव्या हिंदुत्ववादी गटांनी तिथे उभी असलेली बाबरी मशीद पाडली आणि त्याच जागी आता मंदीर उभारण्यात आलं आहे.

बाबरी मशीद पाडण्याच्या त्या कृतीचा भारतात धार्मिक ध्रुवीकरणासाठी फार मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद पाडण्याची कृती घटनाबाह्य असल्याचं नमूद केलं असलं तरी ती जागा मंदिरासाठी देण्याच्या त्यांच्या निवाड्यामुळे ती कृती करणाऱ्या गुन्हेगारांना बळच मिळालं. आणि त्या निकालाचा वापर करत माध्यमांच्या किंवा इतर कुणाच्या नजरेपासून दूर असलेल्या छोट्या-मोठ्या गावांमधल्या मुसलमानांच्या इतर प्रार्थनास्थळांवर हल्ले करण्याची हिंमत कडव्या गटांमध्ये आली आहे.

PHOTO • Parth M.N.
PHOTO • Parth M.N.

२०२३ साली केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या आपल्या मुलाचा फोटो दाखवणारे नसीम काका. ते आणि त्यांचं कुटुंब राहतं त्या वर्धनगडमध्ये अनेक धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहिले आहेत

मिनाज सय्यद सांगतात की १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जी प्रार्थनास्थळं अस्तित्वात होती त्याबद्दल जैसे थे ही स्थिती सगळ्याच समाजांनी स्वीकारलेली होती. “सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निकालाने परिस्थिती पूर्ण पालटली,” ते म्हणतात. “बाबरी मशिदीपुरतं ते थांबलं नाही त्यामुळे हिंदू गट आता इतर मशिदींना लक्ष्य करत आहेत.”

आपलं गाव, जिल्हा आणि राज्याचीच वाटचाल अशांततेकडे होत असल्याचं दिसतं तेव्हा सातारा जिल्ह्यातल्या वर्धनगडचे ६९ वर्षीय हसैन शिकलगार यांना पिढी बदलली तसा स्पष्ट फरक पडलाय असं वाटतं. शिकलगार शिंपी आहेत. “तरुण पिढीची डोकी पूर्णपणे भादरली आहेत,” ते म्हणतात. “आमच्या वयाच्या लोकांना पूर्वीचे दिवस आजही आठवतात. बाबरी मशीद पाडल्यानंतर दोन धर्मांत कशी फूट पाडली ते मी पाहिलंय. पण आज आमच्या भागात जो तणाव आहे तितकं काही तेव्हा देखील झालं नव्हतं. १९९२ साली मी या गावचा सरपंच म्हणून निवडून आलो होतो. आज मात्र मी कुणी तरी दुय्यम दर्जाचा नागरिक आहे अशी भावना माझ्या मनात येते.”

शिकलगारांचं हे म्हणणं जास्त बोचतं कारण त्यांचं गाव इथल्या बहुपेडी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. वर्धनगडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावातल्या तीर्थक्षेत्राला महाराष्ट्रभरातले भाविक भेट देत असतात. पाच कबरी आणि एक देऊळ अगदी शेजारी शेजारी असलेला एक दाट झाडीचा डोंगर याच गावात आहे. हिंदू आणि मुसलमान लोक इथे शेजारी शेजारी आपापल्या देवाची प्रार्थना करतात. आणि दोन्ही समाजांच्या लोकांनी ही जागा एकत्र जोपासली आहे. खरं तर होती. जुलै २०२३ पर्यंत.

आता इथे पाच नाही चार कबरी उरल्या आहेत. अज्ञात रहिवाशांनी जून २०२३ मध्ये पीर दा-उल मलिकची मझार फोडली जिथे नियमितपणे नमाज अदा व्हायची. पुढच्या महिन्यात वनखात्याने ही मझार अवैध बांधकाम आहे असं म्हणत पूर्णच भुईसपाट केली. पण मुसलमानांना प्रश्न असा पडलाय की ही एकच मझार अवैध कशी काय बरं ठरली?

PHOTO • Courtesy: Residents of Vardhangad

वर्धनगडची मझार जी नंतर अज्ञातांनी आणि वनखात्याने फोडली. आपल्याच प्रार्थनास्थळांवर हल्ले का केले जात आहेत हा प्रश्न इथल्या मुसलमानांना पडला आहे

“गावातल्या मुसलमानांना भडकावण्याचं हे काम आहे,” २१ वर्षांचा मोहम्मद म्हणतो. तो वर्धनगडचा रहिवासी आहे आणि सध्या शिकत आहे. “त्याच काळात मलासुद्धा समाजमाध्यमांवरच्या एका पोस्टवरून लोकांनी टारगेट केलं होतं.”

सादचा एक भाऊ अगदी दोनेक तासांच्या अंतरावर पुण्यात राहतो. त्याने १७व्या शतकातला मुघल सम्राट औरंगजेबाबद्दल एक इन्स्टाग्राम पोस्ट केली होती. त्या पोस्टमुळे भावना दुखावलेल्या हिंदुत्ववादी गटाचे लोक सादच्या दारात हजर झाले. त्यांनी त्याला घरातून बाहेर खेचून काढलं, सळया आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण केली आणि ते करत असताना “औरंगजेब की औलाद” असं त्याला सतत म्हटलं गेलं.

“रात्री उशीरा हा सगळा प्रकार घडला. माझा जीव गेला असता त्या दिवशी,” साद सांगतो. “नशीब म्हणून तिथून पोलिसांची गाडी चालली होती. ती पाहिली आणि तो जमाव पळून गेला.”

साद पुढचे १५ दिवस दवाखान्यात होता. डोक्याला जखमा, पाय मोडला होता, गालाचं हाड मोडलं होतं. पुढचे काही दिवस त्याला रक्ताच्या उलट्या होत होत्या. आणि आजही त्याला एकट्याने प्रवास करणं अवघड जातंय. “मला वाटत राहतं की ते परत माझ्या मागे येतील,” तो बोलून दाखवतो. “अभ्यासात लक्षच लागत नाहीये.”

साद सध्या बीसीएस करतोय. तो एक हुशार विद्यार्थी आहे. बारावीत त्याला ९३ टक्के गुण मिळाले होते. पण गेल्या काही महिन्यात मात्र त्याचे मार्क एकदम खाली आले आहेत. “मला दवाखान्यात दाखल केल्यानंतर तीनच दिवसांनी माझ्या काकांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच ते वारले,” तो सांगतो. “त्यांचं वय ७५ होतं पण ते एकदम धडधाकट होते. त्यांना हृदयाचा कसलाही त्रास नव्हता. जे काही झालं ते ताणामुळेच झालं. मी त्यांना विसरूच शकत नाही.”

PHOTO • Parth M.N.
PHOTO • Parth M.N.

डावीकडेः ‘गावातल्या मुसलमानांना भडकवण्याचाच प्रयत्न होता,’ मोहम्मद साद सांगतो. तो वर्धनगडचा रहिवासी आहे आणि सध्या शिकत आहे. उजवीकडेः वर्धनगडमध्ये शिंपीकाम करणारे हुसैन शिकलगार म्हणतात, ‘मी आयुष्यभर लोकांचे कपडे शिवलेत. गेल्या दोन वर्षांमध्ये माझ्याकडे येणारं हिंदू गिऱ्हाईक कमी होत गेलंय. मला माहीत आहे की बाकी लोकांचा दबाव आहे’

शिकलगार म्हणतात की हे काही या दोन घटनांबद्दल नाही. रोजच्या व्यवहारातसुद्धा हे वितुष्ट दिसून यायला लागलंय.

“मी शिंपी आहे,” ते सांगतात. “मी आयुष्यभर लोकांचे कपडे शिवलेत. गेल्या दोन वर्षांमध्ये माझ्याकडे येणारं हिंदू गिऱ्हाईक कमी होत गेलंय. मला माहीत आहे की बाकी लोकांचा दबाव आहे.”

लोकांची भाषासुद्धा बदललीये, ते सांगतात. “मला तर गेल्या कित्येक वर्षांत लांड्या हा शब्द ऐकल्याचं आठवत नाही,” ते सांगतात. “पण आजकाल मात्र सर्रास हा शब्द ऐकायला मिळायला लागलाय. हिंदू आणि मुसलमान एकमेकांच्या डोळ्याला डोळा भिडवत नाहीयेत.”

वर्धनगड काही अपवाद नाही. सातारा जिल्हा ज्या प्रांतात येतो त्या पश्चिम महाराष्ट्रात हे आता सर्रास व्हायला लागलाय. गावांमध्ये धर्माच्या आधारावर उभी फूट पडलीये. सणाचं रुप बदललंय, लग्नाचे विधी पूर्वीसारखे राहिले नाहीत.

शिकलगार सांगतात की वर्धनगडमध्ये गणेशोत्सवाचं नियोजन करण्यामध्ये शिकलगार आघाडीवर असायचे तर गावातल्या उरुसात गावातले हिंदू रहिवासी देखील आघाडीवर असायचे. मोहिउद्दिन चिश्ती या सूफी संताच्या स्मरणात तर वर्षी ऊरुस भरवला जातो. गावातल्या लग्नातसुद्धा सगळे एकत्र असायचे. “आता ते सगळं मागे पडलं,” ते अगदी खेदाने म्हणतात. “पूर्वी रामनवमीचा यात्रा मशिदीसमोरून जाताना आवाज कमी केला जायचा. पण आता मात्र जास्त जोरात स्पीकर लावले जातात.”

असं सगळं असतानाही दोन्ही समाजाच्या काही लोकांनी मात्र आशा सोडली नाहीये. दोन धर्मात पाचर मारणाऱ्या हे गट म्हणजे गावातल्या सगळ्यांचं मत नसल्याचं ते सांगतात. “ते उच्चरवात बोलायला लागलेत, त्यांना राज्याचं पाठबळ आहे. त्यामुळे असं वाटतं की सगळ्यांना असंच वाटतंय,” मळगावचे जाधव म्हणतात. “बहुतेक लोकांना त्यांच्या आयुष्यात कसला तंटा बखेडा नको आहे म्हणून बरेचसे हिंदू काहीच बोलत नाहीत. आणि ही परिस्थिती बदलायला पाहिजे.”

जाधव यांना मनापासून वाटतं की मळगाव हे अख्ख्या साताऱ्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतं. खरं तर अख्ख्या महाराष्ट्रासाठीच. “दर्गा वाचवण्यासाठी गावातले हिंदू पुढे आले म्हटल्यावर धर्मांध गटांनी थोडी का होईना माघार घेतली,” ते म्हणतात. “धर्मांची बहुविधता जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, मुसलमानांवर नाही. जेव्हा आपण गप्प बसतो तेव्हा समाजकंटकांचं फावतं.”

Parth M.N.

पार्थ एम एन, साल 2017 के पारी फ़ेलो हैं और एक स्वतंत्र पत्रकार के तौर पर विविध न्यूज़ वेबसाइटों के लिए रिपोर्टिंग करते हैं. उन्हें क्रिकेट खेलना और घूमना पसंद है.

की अन्य स्टोरी Parth M.N.
Editor : Priti David

प्रीति डेविड, पारी की कार्यकारी संपादक हैं. वह मुख्यतः जंगलों, आदिवासियों और आजीविकाओं पर लिखती हैं. वह पारी के एजुकेशन सेक्शन का नेतृत्व भी करती हैं. वह स्कूलों और कॉलेजों के साथ जुड़कर, ग्रामीण इलाक़ों के मुद्दों को कक्षाओं और पाठ्यक्रम में जगह दिलाने की दिशा में काम करती हैं.

की अन्य स्टोरी Priti David
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले