हिंगोली जिल्ह्यातलं १३०० वस्तीचं नवलगव्हाण गाव. संध्याकाळचे सहा वाजले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा मोर्चा जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाकडे वळतो आणि तयारी सुरू होते. मैदान झाडलं जातं. पांढऱ्या फक्कीने सीमारेषा आखल्या जातात. अंधारून आलं तरी दिव्याच्या उजेडात सामन्याची सगळी तयारी होते.
निळ्या गणवेशातली ८ ते १६ वयोगटातली मुलं मैदानात हजर असतात. सात सात जणांचे
संघ बनतात आणि खेळाला सुरुवात होते.
‘कबड्ड! कबड्डी! कबड्डी!’
आणि मग सूर्य मावळल्यानंतरही कबड्डीचे डाव रंगत जातात. गावकरी मंडळी
शेजारी-पाजारी आणि घरची मंडळीही मुलांचा खेळ पहायला मैदानात जमलेली दिसतात.
एक खेळाडू चाल करतो. समोरच्या जास्तीत जास्त खेळाडूंना स्पर्श करून बाद करत
शड्डू ठोकत सुखरूप निसटून आपल्या हद्दीत यायची चढाओढ लागते. तोंडाने कबड्डी कबड्डी म्हणत रहायचं. पकडला गेला तर मात्र बाद.
नवलगव्हाणचे बहुतेक कबड्डी खेळाडू अगदी साध्या कुटुंबातले, शेती हाच जगण्याचा आधार असलेल्या मराठा समाजाचे आहेत
सहावीतला शुभम कोरडे आणि दहावीतला कानबा कोरडे या दोघांवर सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. दोघेही एकदम तरबेज कबड्डीपटू. हे दोघे मैदानात आले की समोरच्या संघाला घाम फुटतो. “रक्तात कबड्डी भिनल्यासारखं दोघं खेळतात,” असं त्यांच्याबद्दल कौतुकाने गावकरी सांगतात.
शुभम आणि कानबाचा संघ जिंकतो. सामना संपतो आजच्या खेळावर चर्चा होऊन पुन्हा
उद्याच्या खेळाचे डावपेच आखत प्रत्येक जण आपापल्या घरी रवाना होतो.
हिंगोली या जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या १२ किलोमीटरवर असलेल्या नवलगव्हाणमध्ये
हे अगदी रोजचं चित्र आहे. गावाचे सरपंच मारोतीराव कोरडे सांगतात, “आमच्या गावाला कबड्डीची परंपरा आहे.
अनेक पिढ्या कबड्डी खेळत आल्या आहेत. आजही प्रत्येक घरातील एक तरी मुलगा
कबड्डीच्या मैदानावर असतोच.” गावात कबड्डीचं चांगलं वातावरण तयार झालं आहे. आपली
मुलं मोठ्या ठिकाणी खेळताना पाहण्याचं या गावाचं स्वप्न असल्याचं मारोतीराव
सांगतात.
भारतीय उपखंडामध्ये कबड्डी हा खेळ
अनेक शतकांपासून खेळला जात आहे. १९१८ साली या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा
मिळाला. १९३६ साली बर्लिन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये कबड्डी खेळली गेली आणि
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला गेला. २०१४ साली प्रो-कबड्डी लीग
या स्पर्धा सुरू झाल्या आणि हा खेळ पुन्हा एकदा लोकप्रिय झाला आहे.
कबड्डी खेळणारी ही मुलं अगदी साध्या घरातली आहेत. गावातली काही घरं सोडता
बहुतेक कुटुंबं मराठा समाजाची असून शेती हाच त्यांच्या जगण्याचा आधार आहे. शेतीही
कोरडवाहू आहे. जमिनी हलक्या आणि खडकाळ आहेत.
शुभमचे आईवडील दोघेही शेती करतात. पहिलीत असल्यापासूनच शुभम कबड्डी खेळतो . “ गावातलं कबड्डीचं वातावरण पाहून मला प्रेरणा मिळते. मी दररोज मैदानावर येतो आणि अर्धा तास चांगली तयारी करतो,” शुभम उत्साहाने सांगतो. “मला प्रो कब्बडीमधील पुणेरी पलटन संघ खूप आवडतो. माझी इच्छा आहे की कधीतरी मी या संघात खेळावं.”
शुभम सहावीत तर कानबा दहावीत आहे. दोघेही शेजारी असलेल्या भांडेगावात
सुखदेवानंद हायस्कूल या शाळेत शिकतात. कानबा,
शुभम
यांच्याप्रमाणेच पाचवीत शिकणारा वेदांत कोरडे आणि सहावीतला आकाश कोरडे हे देखील अत्यंत चपळाईने समोरच्याला न
घबरता धाडसाने खेळतात. एका वेळी ४-५
जणांना एका दमात बाद करुनच परतात. “सिंहाची उडी, बॅक किक, साइडकिक हे प्रकार आम्हाला आवडतात,” ते सांगतात. हे सगळेच अष्टपैलू खेळाडू आहेत.
नवलगव्हाणमध्ये वजनानुसार संघाचे विभाजन केलं आहे. ३० किलोच्या आत, ५० किलोच्या आत आणि तिसरा म्हणजे
खुला गट.
२६ वर्षीय कैलास कोरडे खुल्या गटाचा कर्णधार आहे. तो सांगतो, “आम्ही आजवर अनेक ट्रॉफी जिंकल्या
आहेत.” मातृत्व सन्मान कबड्डी स्पर्धा २०२४, वसुंधरा फाउंडेशन
आयोजित कबड्डी चषक २०२३ आणि २०२२ या त्यांनी जिंकलेल्या काही स्पर्धा. सुखदेवानंद
कबड्डी क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्येही इथल्या
संघांना विजेतेपद मिळालं आहे.
“२६ जानेवारी रोजी
होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमुळे आम्हाला चांगलं प्रोत्साहन मिळतं. आसपासच्या गावातले
लोक आमचा खेळ पाहण्यासाठी इथे येतात. गावातील लोक बक्षिसं आणि रोख रक्कम देतात.”
मात्र, या स्पर्धा वर्षातून
फक्त दोन ते तीन वेळेस होतात. अधिक सामने आणि स्पर्धा झाल्या तर विद्यार्थ्यांची
प्रगती होईल असं कैलासचं मत आहे.
कैलास पोलिस भरतीसाठी तयारी करतोय. तो रोज सकाळी हिंगोलीच्या अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करतो, तिथेच ग्राउंडची तयारी देखील करतो. त्याची कबड्डी आणि शिक्षणातली निष्ठा नवलगव्हाणच्या तरुणांच्या धैर्याचं प्रतीक बनली आहे.
नवलगव्हाणच्या पंचक्रोशीतल्या साटंबा,
भांडेगाव, इंचा, नवलगव्हाण या गावांतील अनेक विद्यार्थ्यांनी कबड्डीच्या
माध्यमातून आपलं करिअर घडवलं असल्याचं २१ वर्षीय नारायणचं म्हणणं आहे. “कबड्डीच्या
सरावाचा मला पोलिस भरतीसाठी नक्कीच फायदा होईल." गावातील नारायण चव्हाण देखील
पोलीस भरतीसाठी तयारी करतोय. तो म्हणतो,
“आम्हाला
कबड्डीचं वेड आहे. लहानपणापासून आम्ही कबड्डी खेळतोय.”
संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि नवलगव्हाणमध्येही 'श्रीपतराव काटकर फौंडेशन’च्या
माध्यमातून कबड्डी स्पर्धेचं दर वर्षी आयोजन करण्यात येते. या फाऊंडेशनने "मातृत्व
सन्मान कबड्डी स्पर्धा" या नावाने कबड्डी स्पर्धा सुरू केली आहे. प्रशिक्षक
तयार करण्याचं कामही या संस्थेतर्फे केलं जातं. ग्रामीण भागातील व्यापार उदीम वाढीस लागून स्थलांतर थांबावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर
ठेवून काटकर फौंडेशन काम करत आहे. संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात त्यांनी आयोजित
केलेल्या कबड्डी स्पर्धा लोकप्रिय ठरत आहेत.
२०२३ साली विजय आणि कैलास या दोघांनी काटकर फौंडेशनच्या मदतीने पुण्यात गोल्डन
अकॅडमी आयोजित ‘प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण’ या दहा दिवसीय कार्यशाळेत भाग घेतला
होता. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सगळी मुलं सराव करतात. “जेव्हापासून
कबड्डी समजायला लागली तेव्हापासून मी कबड्डी बद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न
केलाय, जेणेकरून गावातील या
लहान मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने खेळता यावं.”
विजयच्या मते, गावात अशी अनेक मुलं आहेत जी खूप चांगल्या प्रकारे कबड्डी खेळतात आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर गावाचं प्रतिनिधित्व करु शकतात पण योग्य प्रशिक्षक आणि चांगल्या प्रतीचे मैदान असणं आवश्यक आहे. “पावसाळ्यात आमचा सरावदेखील होत नाही,” विजय सांगतो.
"आम्हाला खेळायला चांगलं
मैदान नाही. प्रशिक्षकही नाही. कबड्डीचे खेळाडू मॅटवर सराव करतात. असा सराव
आत्तापासून केला तर आमचे चांगले भविष्य घडू शकते," अशी इथल्या खेळाडूंची मागणी असल्याचं विजय, वेदांत आणि नारायण सांगतात.
नवलगव्हाणच्या या कबड्डीच्या परंपरेत मुलींना मात्र फारसं स्थान नाही. गावात
कबड्डी खेळणाऱ्या मुली क्वचितच पाहायला मिळतात. आणि दिसल्याच तर त्याही फक्त शालेय
स्तरावर तेही कोणत्याही प्रकारे पूर्वतायरी न करता. त्यांना शिकवणारं कोणीही नाही
अशी माहिती मिळते.
*****
खेळ म्हणजे फक्त मजा नसते. कधी कधी मोठी समस्याही निर्माण होते. गावातल्या पवन कोरडेच्या बाबत असंच घडलं.
होळीनिमित्त गावा-गावांमध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मॅचचा
दिवस होता, गावातील सर्व लोक सामना
पाहण्यासाठी जमले होते. हा सामना वजनी गटातील असल्यामुळे स्पर्धा तगडी होणार हे
निश्चित होतं. सामना सुरु झाला. दोन्ही बाजूने डाव, प्रतिडाव सुरुच होते. थोड्या वेळाने पवन राईड मारण्यासाठी
दुसऱ्या टिमच्या हद्दीत गेला. पॉइंट करुन परतताना अचानक पवनचा तोल गेला आणि तो
पाठीच्या मणक्यावर पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली.
घटना घडल्याक्षणी गावकऱ्यांनी तात्काळ पवनला हिंगोलीच्या दवाखान्यात भरती केले. परंतु परिस्थीती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नांदेडच्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. तिथे पवनवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली मात्र डॉक्टरांनी सांगितलं की आता पवनला पहिल्यासारखं खेळता येणार नाही.
“आम्ही हे ऐकलं आणि मन
खिन्न झालं,” पवन सांगतो. पण त्याने हार मानली नाही. पवनने स्वतःमध्ये खूप बदल केले.
पवनमध्ये असणारी जिद्द आणि मेहनतीमुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये तो पुन्हा चालायला
आणि पळायला लागला. “त्याला पोलिस भरतीत सहभागी व्हायचंय,” त्याचे वडील सांगतात.
त्याच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च काटकर फौंडेशनने केला.
गावात कबड्डीचे सकारात्मक वातावरण आहे. घरातल्या प्रत्येकाला आपला मुलगा या
खेळात झळकावा असं वाटतं. मात्र कबड्डी हे आपले पोट भरण्याचे साधन नाही असं समजून
कबड्डी खेळायचे सोडून देणारेही काही आहेत. त्यातील एक म्हणजे २२ वर्षीय विकास
कोरडे. “मला कबड्डीची खूप आवड होती,
पण
आर्थिक संकटांमुळे आणि शेतीच्या कामांमुळे ती आवड जोपासता आली नाही,” तो सांगतो. विकास दहावीपर्यंत
भांडेगावात शिकला. त्यानंतर शिक्षणाची आवड राहिली नाही. त्याचे वडील गाडीवर चालक
आहेत आणि वर्षभरापूर्वी त्याने एक छोटा टेम्पो घेतला आहे. “आता मी गावातील शेतकऱ्यांचा
माल हिंगोली शहरात नेतो. त्यातूनच काही पैसे मिळतात."
कबड्डी ही नवलगव्हाणची प्रथा,
परंपरा
आहे. आपल्या गावाची ओळखच “कबड्डीचं गाव” म्हणून होईल असा गावकऱ्यांचा निर्धार आहे.
आणि इथल्या मुलांसाठी “कबड्डी हाच अंतिम
ध्यास आहे!”