अंजलीसाठी तुलसी तिची अम्मा आहे, कायम. आणि ही गोष्ट आम्हाला सांगताना या अम्माचा चेहरा अभिमानाने फुलून येतो. कुरळ्या केसांचा अंबाडा आणि गुलाबी रंगाची चापून चोपून नेसलेली साडी. पारलिंगी तुलसी नऊ वर्षांच्या अंजलीची आई आहे.

विशीच्या उंबरठ्यावर असताना तुलसीने स्वतःला ‘कार्तिगा’ असं संबोधायला सुरुवात केली होती. पण नंतर रेशन कार्यालयात एका कर्मचाऱ्याने चुकून तिच्या नावाची नोंद तुलसी अशी केली. तमिळमध्ये हे नाव स्त्री पुरुष, कुणीही वापरू शकतात. म्हणून तिने खूश होऊन ते तसंच ठेवलं. आजही ती तुलसी आणि कार्तिगा या दोन्ही नावांचा वापर करते.

तमिळनाडूच्या तिरुपोरुर तालुक्यातल्या दरगस या इरुलार वस्तीमध्ये ती आणि अंजली एका छोट्या गवताने शाकारलेल्या झोपडीत राहतात. अंजली अगदी बाळ होती तेव्हा तुलसीची बायको सोडून गेली आणि तेव्हापासून तिची सगळी जबाबदारी तुलसीवरच आहे. २०१६ साली आलेल्या वारदा चक्रीवादळामध्ये या जोडप्याचा नऊ वर्षांचा मुलगा गेला.

आता चाळिशी पार केलेली तुलसी गेल्या अनेक वर्षांपासून तिरुनंगई समुदायाचा भाग आहे. तमिळमध्ये याचा अर्थ पारलिंगी स्त्री असा होतो. आपल्या मांडीवर बसलेल्या अंजलीकडे प्रेमभरल्या नजरेने पाहत ती सांगते, “तिला सोबत घेऊन मी आमच्या बैठकींना जायचे. तिची दुधाची बाटली तिच्या हातात असायची.”

PHOTO • Smitha Tumuluru
PHOTO • Smitha Tumuluru

डावीकडेः तुलसी आणि तिची मुलगी अंजली तमिळनाडूच्या तिरुपोरुर तालुक्यातल्या इरुलार वस्तीतल्या आपल्या घरी. उजवीकडेः अंजली बाळ असताना तुलसीच्या कुशीत

PHOTO • Smitha Tumuluru
PHOTO • Smitha Tumuluru

डावीकडेः तुलसी तेनमोळीसोबत (निळ्या साडीमध्ये) गीत सादर करत आहे. कोविडच्या महासाथीच तेनमोळीचा मृत्यू झाला

अंजली चार वर्षांची असताना तुलसीला असं तीव्रपणे वाटू लागलं की आपल्याला तिची आई म्हणून ओळखलं जावं. आणि तेव्हा तिने वेष्टी सोडून साडी नेसायला सुरुवात केली. तिरुनंगईमधल्या ५० वर्षीय कुमुदीला तुलसी आपल्या आजीप्रमाणे मानते. तिच्या सल्ल्यावरूनच तिने हा निर्णय घेतला.

आपली ओळख स्त्री म्हणून व्हावी हे खुलेपणाने व्यक्त करण्याची ही सुरुवात होती. त्या क्षणाबद्दल ती म्हणते, “ विलंबरमावे वंधुत्तेन [मी माझी ओळख उघड केली].”

हे रुपांतर पूर्ण व्हावं यासाठी तुलसीने लग्नाचा विधीही पूर्ण केला. तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या रवी या आपल्या नातेवाइकाशी तिचं प्रतीकात्मक लग्न लावण्यात आलं. तमिळनाडूच्या पारलिंगी स्त्रियांमध्ये हा विधी केला जातो. रवी, त्याची पत्नी गीता आणि त्यांच्या दोन मुलींनी तुलसीचं आपल्या परिवारामध्ये खुल्या मनाने स्वागत केलं. तुलसी म्हणजे आपल्याला मिळालेला आशीर्वाद आहे अशी त्यांची भावना आहे. “आम्ही सगळेच, माझा नवरासुद्धा तिला ‘अम्मा’ म्हणतो. ती आमच्यासाठी देवासारखी आहे,” गीता म्हणते.

तुलसी आजही दरगसमध्येच राहते आणि विशेष काही सणसोहळा असेल तर आपल्या या नव्या कुटुंबाला भेटायला जाते.

साधारण याच सुमारास, ती रोज साडी नेसू लागल्यावर तिच्या सात भावंडांनी देखील तिला ‘अम्मा’ किंवा ‘सक्ती’ म्हणजेच शक्ती/देवी म्हणायला सुरुवात केली. त्यांची अशी श्रद्धा आहे की तिचं हे रुपांतर ‘अम्मन अरुळ’ देवीच्या कृपेनेच, झालं आहे.

PHOTO • Smitha Tumuluru
PHOTO • Smitha Tumuluru

डावीकडेः उघडपणे स्त्री म्हणून आपली ओळख सिद्ध करण्यासाठी दररोज साडी नेसण्याचा निर्णय तुलसीने घेतला आणि त्यानंतर रवीशी तिचं प्रतीकात्मक लग्न लावण्यात आलं. उजवीकडेः रवीची पत्नी गीता तुलसीच्या केसात फुलं माळत आहे. रवी आणि त्याची मुलगी सोबत बसले आहेत

PHOTO • Smitha Tumuluru
PHOTO • Smitha Tumuluru

तुलसी आणि रवी, सोबत अजंली (डावीकडे). तुलसीचे कुटुंबीय तिला देवीचा आशीर्वाद मानतात. ‘असं वाटतं अम्मन [देवी] घरी आली आहे,’ तुलसीची आई सेंदामरई म्हणायची. ती आता या जगात नाही

तुलसीच्या इरुलास समुदायामध्ये सर्वांनाच तिची लैगिक ओळख काय आहे हे माहित होतं त्यामुळे ती लपवण्याचा कधी काही प्रश्नच आला नाही, ती सांगते. “आमचं लग्न होण्याआधीच माझ्या बायकोला माझ्याबद्दल सगळं काही माहीत होतं. मी कसं रहावं, कशा तऱ्हेचे कपडे घालावे याबाबत कुणीही मला कधीच काही सांगितलं नाही. मी केसांचा बुचडा बांधू लागले तेव्हाही नाही आणि साडी नेसू लागले, तेव्हाही नाही,” ती पुढे सांगते.

तुलसीचं वागणं मुलींसारखं का बरं आहे अशी मित्रांमध्ये चर्चा व्हायची, पुंगावनम सांगतात. “आमचं गाव हेच आमचं जग होतं. त्याच्यासारखं दुसरं कुणीच आम्ही कधी पाहिलं नव्हतं. पण कदाचित असेही लोक असतात असा विचार करून आम्ही त्याचं वागणं स्वीकारलं होतं,” ते सांगतात. तुलसी किंवा अंजलीला कुणी चिडवलं, त्रास दिला वगैरे कल्पनाच त्यांनी धुडकावून लावली.

तिच्या आई-वडलांनी, सेंदामरई आणि गोपाल यांनी देखील ती जशी आहे तसा तिचा स्वीकार केला. लहानपणी देखील तुलसीचा स्वभाव एकदम हळवा होता. त्यामुळे तेव्हाच तिच्या आई-वडलांनी ठरवलं होतं, की “अवन मनस पुनपडुद कूडाद [आपण तिच्या भावना दुखवायच्या नाहीत].”

तुलसी साडी नेसते त्याबद्दल तिची आई सेंदामरई म्हणायची, “चांगलंच आहे. अम्मन घरी आलीये असंच वाटतं.” असं म्हणत हात जोडून ती मनोमन देवीची आराधना करायची. तुलसी देवीचंच रुप आहे हीच सगळ्या घराची भावना तिच्या या कृतीतून व्यक्त होत होती. २०२३ साली सेंदामरई वारली.

दर महिन्याला तुलसी १२५ किमी प्रवास करून आपल्या तिरुनंगई समुदायासोबत विल्लुपुरम जिल्ह्यातल्या मेलमलयनूर या देवस्थानाला जाते आणि तिथे येणाऱ्या भाविकांना आशीर्वाद देते. “तिरुनंगईचा बोल खरा होतो अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. मी कधीच कुणाला शिव्याशाप देत नाही. केवळ आशीर्वाद देते आणि त्यांच्या खुशीने ते जे काही देतात ते स्वीकारते,” ती सांगते. ती दररोज साडी नेसत असल्याने आपण दिलेला आशीर्वाद जास्त प्रभावी ठरत असल्याची तिची भावना असून ती एका कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी केरळलाही जाऊन आली आहे.

PHOTO • Smitha Tumuluru
PHOTO • Smitha Tumuluru

डावीकडेः मेलमलयनूर देवस्थानातील जत्रेसाठी तयार होत असलेली तुलसी. उजवीकडेः या सणासाठी आलेल्या तुलसीच्या कुटुंबियांच्या हातातील टोपल्या. लोकांना आशीर्वाद देण्यासाठी पारलिंगी स्त्रिया देवळाबाहेर उभ्या राहतात

PHOTO • Smitha Tumuluru
PHOTO • Smitha Tumuluru

डावीकडेः फेब्रुवारी २०२३ मेलमलयनूर देवस्थानाच्या जत्रेसाठी तुलसी, रवी आणि तिचा तिरुनंगई परिवार. उजवीकडेः तुलसी एका भाविकाला आशीर्वाद देतीये आणि त्याच्यासाठी देवीची प्रार्थनाही करतीये. ‘मी कधीच कुणाला शिव्याशाप देत नाही. केवळ आशीर्वाद देते आणि त्यांच्या खुशीने ते जे काही देतात ते स्वीकारते,” ती सांगते’ ती सांगते

तुलसीला झाडपाल्यांची बरीच औषधं माहित आहेत आणि पूर्वी त्यातूनही तिची बरीच कमाई होत असे. पण गेल्या काही वर्षांत हे उत्पन्न मात्र घटलं आहे. “मी किती तरी लोकांना बरं केलं आहे. पण आता कसं झालंय, लोक मोबाइलवर सगळं पाहतात आणि स्वतःच उपचार करतात. एक काळ असा होता अगदी ५०,००० रुपयांची सुद्धा कमाई झाली आहे. त्यानंतर ४०,०००, मग ३०,००० आणि नंतर वर्षाला २०,००० असं कमी कमी होत गेलीये,” ती निराश होऊन सांगते. कोविडचा काळ यामध्ये सगळ्यात अवघड काळ होता.

इरुलार समुदायाची देवी कन्निअम्माच्या देवळाचं सगळं काम तुलसी पाहते. पण पाचेक वर्षांपूर्वी तिने नूर नाल वेलइ (रोजगार हमी) वर काम करायला सुरुवात केली. ती दरगासमधल्या इतर बायांसोबत २४० रुपये रोजावर मजुरीला जाते. ग्रामीण भागात मनरेगाखाली नोंद केलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

कांचीपुरम जिल्ह्याजवळच्या एका निवासी शाळेत अंजलीचं शिक्षण सुरू आहे. माझ्यासाठी तिचं शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुलसी सांगते. “तिला शिकता यावं यासाठी शक्य होईल ते सगळं मी करतीये. कोविडच्या काळात तिला दूर हॉस्टेलवर रहावंसं वाटत नव्हतं. म्हणून मग मी तिला इथेच माझ्या जवळ ठेवून घेतलं. पण इथे तिला शिकवायला कुणीच नव्हतं,” ती सांगते. २०२३ च्या सुरुवातीला तुलसी अंजलीचं नाव शाळेत नोंदवायला गेली तेव्हा पहिली पारलिंगी पालक म्हणून शाळेने तिचा सत्कारच केला.

तुलसीच्या तिरुनंगई परिवारातल्या अनेकींनी लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेण्याचा पर्याय स्वीकारला. पण तुलसी म्हणते, “जर मी जशी आहे तसं सगळ्यांनी मला स्वीकारलंय तर या वयात ऑपरेशन करून घ्यायची गरजच काय?”

पण या विषयावर त्यांच्यामध्ये सतत चर्चा होत राहते आणि अशा ऑपरेशनचे इतर परिणाम काय होतील ही आपल्या मनातील भीती बाजूला ठेवून तीही या पर्यायाचा विचार करू लागतेः “असं ऑपरेशन उन्हाळ्यात केलं तर बरंय. जखमा लवकर भरून येतात.”

PHOTO • Smitha Tumuluru
PHOTO • Smitha Tumuluru

डावीकडेः तुलसी झाडपाल्याची औषधंही देते. ती दरगासच्या आसपास काढे आणि औषधांमध्ये वापरण्यात येणारी औषधं शोधून आणते. उजवीकडेः तुलसी आणि अंजली मेलमलयनूर मंदिराच्या परिसरात

PHOTO • Smitha Tumuluru
PHOTO • Smitha Tumuluru

‘मी आता सगळ्यात खूश आहे!’ ती म्हणते आणि देवळाच्या जत्रेत आपल्या मैत्रिणींसोबत हसत हसत नाचू लागते

यासाठी येणारा खर्च काही कमी नाही. खाजगी दवाखान्यात ऑपरेशन नंतरचा राहण्याचा खर्च सुमारे ५०,००० इतका आहे. तमिळनाडू शासनाने पारलिंगी व्यक्तींसाठी मोफत लिंगबदल शस्त्रक्रियांचं धोरण आणलं असल्याने त्या अंतर्गत आपल्याला काही मदत मिळू शकते का याचा ती सध्या शोध घेत आहे.

फेब्रुवारी २०२३ मध्ये तुलसी, सेंदामरई आणि अंजली मेलमलयनूर देवळात जत्रेसाठी गेल्या होत्या. या सणाला मसान कोल्लइ किंवा मयान कोल्लइ असं म्हटलं जातं.

आपल्या आईचा हात धरून अंजली देवळाच्या गजबजलेल्या गल्ल्यांमधून मनसोक्त भटकली होती. तुलसीच्या जुन्या मैत्रिणींना भेटली होती. रवी आणि गीता देखील आपल्या नातेवाइकांसोबत इथे आले होते. तुलसीचा तिरनंगई परिवारही इथे होता. तिचे गुरू, बहिणी आणि इतरही किती तरी जण आले होते.

कपाळावर कुंकवाचा मोठाला टिळा आणि गंगावनाची मोठी वेणी घातलेली तुलसी सगळ्यांशी गप्पांमध्ये रमून गेली होती. “आता मी सगळ्यात खूश आहे,” असं म्हणत हसत हसत ती मधूनच नाचू लागते.

“फक्त अंजलीला एकदा विचार की तिला किती आया आहेत?” त्या जत्रेमध्ये तुलसी मला म्हणते.

आणि मी तिची आज्ञा पाळून हा प्रश्न अंजलीला विचारते. आणि क्षणात हसत हसत ती म्हणते, “दोन” आणि तुलसी आणि गीता अशा दोघींकडे बोट दाखवते.

Smitha Tumuluru

स्मिता तुमुलुरु, बेंगलुरु की डॉक्यूमेंट्री फ़ोटोग्राफ़र हैं. उन्होंने पूर्व में तमिलनाडु में विकास परियोजनाओं पर लेखन किया है. वह ग्रामीण जीवन की रिपोर्टिंग और उनका दस्तावेज़ीकरण करती हैं.

की अन्य स्टोरी Smitha Tumuluru
Editor : Sanviti Iyer

संविति अय्यर, पीपल्स आर्काइव ऑफ़ रूरल इंडिया में बतौर कंटेंट कोऑर्डिनेटर कार्यरत हैं. वह छात्रों के साथ भी काम करती हैं, और ग्रामीण भारत की समस्याओं को दर्ज करने में उनकी मदद करती हैं.

की अन्य स्टोरी Sanviti Iyer
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले