विशीतल्या तरुण-तरुणींच्या समुहाशी रुपेश मोहरकर छोटासा संवाद साधतो.

“लक्ष केंद्रित करा,” असं मोठ्याने सांगत हा ३१ वर्षांचा तरुण ह्या सगळ्यांचं लक्ष एकवटून घेण्याचा प्रयत्न करतो. “जीवनात आळशीपणाला जागा ठेवू नका, आताही आणि यापुढेही” याची त्यांना आठवण करून देतो.

होकारार्थी मान हलवत, चेहरा गंभीर करत ह्या तरुणाईने आत्मविश्वासाने त्याला प्रतिसाद दिला. आणि मग धावणे, स्ट्रेचिंग करणे, शारीरिक कवायत अशा सरावाला लागले. खरं तर मागच्या एक महिन्यापासून त्यांची ही सगळी तयारी सुरू आहे.

एप्रिल महिन्याची सुरुवात आहे, सकाळी सहा वाजता भंडारा शहरातलं एकमेव मैदान, शिवाजी स्टेडियम उत्साही तरुणांनी गजबजलेले दिसले. हे सर्व तरुण १०० मीटर, १६०० मीटर धावून घामाघूम झालेले दिसत होते. ताकदीसाठी इतर कवायतींचा सराव करण्यात ही तरुणाई व्यस्त होती.

देशभरात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांना पुन्हा निवडून येऊ इच्छित आहेत हा त्यांचा विषयच नाहीये. भंडारा-गोंदिया मतदारसंघात १९ एप्रिल, २०२४ ला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. हा काळ मोठा, कठीण आणि भयंकर उष्णतेचा असणार आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीपासून दूर राहून हे तरुण-तरुणी आगामी राज्य पोलीस भरती प्रक्रियेची तयारी करण्यावर लक्ष केंद्रित करताना दिसतात. ह्या परीक्षांची अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल आहे. ही परीक्षा लेखी आणि शारिरीक चाचणी अशा स्वरुपात घेतली जाईल. पोलिस कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल ड्रायव्हर, राज्य राखीव पोलिस दल, पोलिस बँडमन आणि तुरुंगातील हवालदारांच्या रिक्त जागा भरण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी उरला आहे.

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

रुपेश मोहरकर (डावीकडे) हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा येथील शेतकरी कुटुंबातला मुलगा असून तो राज्य पोलिसात भरती होण्याच्या शेवटच्या संधीसाठी प्रशिक्षण घेत आहे. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातल्या आणि कायमस्वरुपी राज्य सरकारी नोकरी मिळवण्याचं ध्येय असणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील तरुण-तरुणींना तो प्रशिक्षणही देतो

भारतातील बेरोजगारांमध्ये जवळजवळ ८३ टक्के तरुण आहेत, तर बेरोजगारांमध्ये माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या सन २००० मधील ५४.२ टक्क्यांवरून २०२२ मध्ये ६५.७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानव संसाधन विकास विभागाच्या २०२४ च्या भारत बेरोजगारी अहवालानुसार अलीकडेच ही आकडेवारी जाहीर करण्यात आली.

देशातील ग्रामीण तरुणांमधील बेरोजगारी आणि वाढती चिंता यांचा चेहरा म्हणजे या क्षणी शिवाजी स्टेडियमवर असलेली तरुणांची ही गर्दी. इथे प्रत्येक जण प्रत्येकाशी स्पर्धा करताना दिसतो, परंतु यातील काहीच लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. हा प्रवासही कठीण आहे, कारण मोजक्या रिक्त पदांसाठी लाखो उमेदवार तयारी करून परीक्षा देणार आहेत.

भंडारा आणि गोंदिया हे वन समृद्ध, जास्त पावसाचे जिल्हे आहेत. येथील शेतकरी भात लागवड करतात. इथे मोठ्या संख्येने असलेल्या दलित आणि आदिवासींना सामावून घेण्यासाठी फारसे उद्योगधंदे मात्र इथे नाहीत. गेल्या दोन दशकांमध्ये या जिल्ह्यांमधून लहान, भूमीहिन शेतकरी मोठ्या प्रमाणात इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने जिल्हानिहाय कोट्यासह १७,१३० पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. भंडारा पोलिस दलात ६० पदे रिक्त असून त्यापैकी महिलांसाठी २४ पदे राखीव आहेत. गोंदियात जवळपास ११० पदे रिक्त आहेत.

ह्या इच्छुकांपैकी एक रुपेशदेखील आहे. रुपेश लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या आईने त्याचा सांभाळ केला. रुपेशच्या कुटुंबाकडे भंडाराजवळील सोनुली गावात एक एकर शेत जमीन आहे. भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची आणि वर्दी मिळवण्याची त्याची ही शेवटची संधी आहे.

“माझ्याकडे ह्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही.”

PHOTO • Jaideep Hardikar

भंडारा येथील शिवाजी स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या सराव कवायती दरम्यान रुपेश मोहरकरचा सुमारे ५० पुरुण आणि महिलांचा संघ

आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना, तो पूर्व महाराष्ट्रातील या आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यात सुमारे ५० तरुण आणि तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून कामही करतो आहे.

स्वतः संघर्षाचा सामना करत असतानाच रुपेश ‘संघर्ष’ नावाची अकादमी चालवतो. त्याच्या गटातील प्रत्येक सदस्य भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या कुणाच्या गणतीत नसणाऱ्या खेड्यांतले आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुले, कायमस्वरुपी नोकरी मिळवण्याचे ध्येय उराशी बाळगून, गणवेशाची पिशवी हातात घेऊन आपापल्या कुटुंबाचा भार हलका करण्याच्या आशेने काम तयारी करताना दिसतात. त्यांच्यापैकी प्रत्येकाने दहावी पास केली आहे आणि फार कमी जणांकडे पदवी आहे.

त्यांच्यापैकी किती जणांनी शेतात काम केलंय असं विचारल्यावर सर्वांनी हात वर उंचावले.

त्यांच्यापैकी किती जण कामासाठी इतरत्र स्थलांतरित झाल्याचे विचारल्यावर पूर्वी जे स्थलांतरित झाले होते त्यांनी हात वर केले.

त्यापैकी बहुतेकांनी मनरेगा ( महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा) योजनेत काम केले आहे.

हा फक्त एक गट होता. स्टेडियम अशा अनेक अकादमींच्या गटाने भरलेले होते, स्वतः परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेले पण त्यासाठी प्रयत्नशील असणारे रुपेशसारखे अनेक जण त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

भंडारा शहरातील एकमेव मोकळ्या मैदानावर, २०२४ सालच्या राज्य पोलिस भरतीसाठी विशीतील तरुण-तरुणी मेहनत करताना दिसतात. त्यांच्यापैकी बहुतेक पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मतदान करणार आहेत, आणि त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे

इथे शारीरिक कसरत करणारे अनेक तरुण-तरुणी पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मतदान करणार आहेत. त्यांच्या मनात चीड आहे, परंतु करिअर आणि भविष्याच्या चिंतेने ते शांत बसले आहेत. ते ‘पारी’ला सांगतात की, त्यांना इतर क्षेत्रातही सुरक्षित नोकऱ्या, दर्जेदार उच्च शिक्षण, खेड्यांमध्ये चांगले जीवन आणि समान संधी हव्या आहेत. ते स्थानिक रहिवाशांसाठी जिल्हा पोलिसांच्या रिक्त पदांमध्ये कोट्याची मागणी करत करत आहेत.

“ही भरती तीन वर्षांनंतर होतेय,” गुरुदीपसिंग बच्चिल म्हणतो. रुपेशसारखाच तोही एक ३२ वर्षीय इच्छुक असून शेवटची एक परीक्षा देण्याच्या विचारात आहे. निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असणारा गुरुदीपसिंग दशकभरापासून पोलिसांत नोकरीसाठी प्रयत्न करत आहे. “मी शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होतो पण लेखी परीक्षेत पिछाडीवर असतो,” इच्छुकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये फिरताना त्याने माहिती दिली.

यात आणखी एक मेख आहेः महाराष्ट्रातील सधन भागातील चांगली तयारी केलेले आणि संसाधनसंपन्न उमेदवार भंडारा आणि गोंदिया सारख्या पिछाडीवर असलेल्या प्रदेशांमध्ये रिक्त जागांसाठी अर्ज करतात, स्थानिकांना मागे टाकत त्यातले बहुतेक इच्छुक पुढे जातात. गडचिरोली डाव्या अतिरेकी कारवायांनी प्रभावित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा असून तो यात अपवाद ठरतो. फक्त इथेच स्थानिक रहिवासी अर्ज करू शकतात आणि पोलिसाची नोकरी मिळवू शकतात. त्यामुळे रुपेश आणि इतरांसाठी स्पर्धा आणखी कठीण होते.

म्हणूनच ते अधिक आणि कठोर सराव करतात.

शंभरेक पायांच्या धावण्याने हवेत धुळीचा लोट उठतो आणि स्टेडियमधील हवा लालसर होऊन जाते. इच्छुकांनी ट्रॅक सुट किंवा पँट परिधान केले आहेत, त्यातील काही जण शूज घालून, तर काही जण अनवाणी पायांनीच आपला वेग वाढवण्याचा प्रयत्न करतायत. कोणतीही गोष्ट त्यांचे लक्ष विचलित करू शकत नाही, निवडणुका तर फारच दूर भासतात.

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

डावीकडेः रुपेश मोहरकर भंडारा येथे त्याच्या मावशीच्या चिकनच्या दुकानावर काम करतो. तो लहान असताना वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने त्याचे संगोपन केले, त्याच्या कुटुंबाकडे सोनुली गावात एक एकर जमीन आहे. परीक्षा देण्याची त्याची ही शेवटची संधी आहे. परीक्षेची तयारी करत असलेल्या तरुण-तरुणींना परीक्षेच्या तयारीचं नियोजन कसं करायचं आणि त्यातील कमतरता यावरती सकाळच्या सत्रात उपस्थित असलेले रुपेश आणि प्रशिक्षणार्थी

रुपेश जातीने खाटीक नाही पण आपल्या मावशीच्या दुकानात खाटीक म्हणून काम करतो. त्याची मावशी प्रभा शेंद्रे यांच्या कुटुंबाला हातभार लावतो. एप्रन घालून सराईतपणे तो कटई करतो आणि गिऱ्हाइकांची गर्दी सांभाळतो. एक दिवस खाकी वर्दी मिळेल ह्या आशेने तो गेल्या सात वर्षांपासून हे काम करतोय.

अनेक परीक्षार्थींसमोरचे आव्हान फार मोठे आहे कारण त्यांची गरीब परिस्थिती.

कठोर शारीरिक कसरत सहन करण्यासाठी, तुम्हाला चांगला आहार घेणे आवश्यक असल्याचे रुपेश सांगतो जसे की, चिकन, अंडी, मटण, दूध, फळे. “आमच्यापैकी बहुतेकांना चांगले जेवण घेणे परवडत नाही,” तो म्हणतो.

*****

भंडारा हे गरीब ग्रामीण तरुण-तरुणींसाठी पोलिस भरतीची तयारी करण्याचे राहण्यासाठी आणि येण्या-जाण्यासाठी योग्य केंद्र आहे. दर वेळी भरती जाहीर झाली की इथे लगबग वाढते.

शिवाजी स्टेडियमवर लाखो स्वप्ने एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. दिवस सरतील तसे जिल्ह्यातील आणखी तरुण मैदानावर येतील. गडचिरोलीच्या सिमेला लागून असलेल्या गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरकतोंडी गावात मनरेगा कामाच्या ठिकाणी आम्हाला २४ वर्षीय पदवीधर मेघा मेश्राम भेटली. आई सरिता आणि सुमारे ३०० तरुण आणि वृद्धांसह ती रस्त्याचं काम करत होती.  २३ वर्षीय मेघा आडेदेखील. मेघा मेश्राम दलित तर मेघा आडे आदिवासी आहे.

“आम्ही गावात सकाळी आणि संध्याकाळी धावतो आणि आमचा व्यायाम करतो,” मेघा मेश्राम ठामपणे सांगत होती. ती घनदाट जंगलात रहाते आणि दिवसभर आपल्या आईवडिलांना मदत म्हणून रोजंदारीवर काम करते. दोन्ही मेघांनी भंडारा अकादमीबद्दल ऐकले आहे आणि पोलिस दलात भरती होण्यासाठी इच्छूक असलेल्या शेकडो लोकांमध्ये सामील होण्यासाठी मे महिन्यात तिथे जाण्याचा विचार करत आहेत. तिथे गेल्यावर खर्च भागवण्यासाठी आता मिळणारी मजुरी त्या वाचवून ठेवतायत.

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

डावीकडेः मेघा मेश्रामने पोलिस भरतीसाठी अर्ज केला आहे. ही दलित तरुणी सध्या गावातील मनरेगा साइटवर आपल्या आईसोबत काम करून घराला हातभार लावत आहे. उजवीकडेः मेघा आडेसोबत मेघा मेश्राम. ह्या दोघी मनरेगा साइटवर काम करणाऱ्या मैत्रिणी आहेत. दोघीही पदवीधर असून राज्य पोलिस भरती २०२४ मध्ये पोलिस दलात भरती होण्यासाठी इच्छुक आहेत

तिथे गेल्यावर त्या खोली भाड्याने घेतील आणि सोबत राहतील, स्वयंपाक करतील आणि एकत्र परीक्षेची तयारी करतील. जेव्हा कुणी परीक्षा उत्तीर्ण होतो तेव्हा सर्वजण आनंद साजरा करतात. इतर लोक दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रॅकवर परततात आणि पुढील भरती जाहीर होण्याची वाट पाहतात.

ह्या मुली त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा मागे नाहीत, येणाऱ्या अडचणींचा त्या नेटाने सामना करतात.

“मी माझ्या उंचीमुळे मागे पडते,” २१ वर्षीय वैशाली मेश्राम सांगते. तिच्या या हसण्याला ओशाळलेपणाची किनार आहे. ते तिच्या हातात नाही हेही ती सांगते. म्हणून तिने बँड्समन श्रेणीत अर्ज केला आहे, जिथे तिची उंची अडथळा ठरणार नाही.

वैशाली तिची धाकटी बहीण गायत्री आणि दुसऱ्या गावातील २१ वर्षीय मयूरी घराडे हिच्यासोबत शहरात एका खोलीत एकत्र रहाते. त्यांच्या नीटनेटक्या खोलीतच त्या आपला स्वयंपाक करतात. त्यांना मासिक खर्च कमीत कमीत ३००० रुपये असतो आणि प्रोटिन म्हणून त्या प्रामुख्याने हरभरा आणि कडधान्ये यांचा आहारात समावेश करतात.

गगनाला भिडणाऱ्या किमतींचा त्यांच्या बजेटवर परिणाम होत असल्याचे वैशाली म्हणते. “सध्या सर्व काही महागले आहे.”

त्यांचे दैनंदिन वेळापत्रक व्यस्त असते, पहाटे ५ वाजता उठतात, शारीरिक प्रशिक्षणासाठी सायकलने मैदानावर जातात. सकाळी १० ते दुपारी १२.३० पर्यंत जवळच्या अभ्यासिकेत अभ्यास करतात. रुपेश त्याच्या चिकन दुकानातून वेळ काढून येतो आणि त्यांना मॉक टेस्ट पेपर तयारीचे मार्गदर्शन करतो. संध्याकाळी  शारीरिक कवायतीसाठी मैदानावर परत येतात आणि चाचणीची तयारी करण्यात त्यांचा दिवस संपतो.

PHOTO • Jaideep Hardikar
PHOTO • Jaideep Hardikar

फोटोतील इतर तरुणींप्रमाणेच, वैशाली तुळशीराम मेश्राम (डावीकडे) राज्य पोलिसात नोकरीसाठी प्रयत्न करत आहे. तिची मैत्रीण मयुरी घारडे (उजवीकडे) २०२४ च्या महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी तयारी करत आहे

रुपेश किंवा वैशालीसारखे तरुण शेती सोडून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण शेतीत त्यांना त्यांचे भविष्य दिवस नाही. त्यांच्यापैकी बहुतेकांनी आपल्या पालकांचे शेतातले कष्ट आणि न मिळणारा मोबदला जवळून पाहिला आहे. त्यांना मिळेल ते काम करणारे कामगार म्हणून फार लांब स्थलांतर करायचं नाहीये.

वय वाढत जाते आणि सुरक्षित नोकरी मिळवण्यासाठी या तरुणाईची धडपड सुरू होते कारण या कामाला प्रतिष्ठा आहे. पण खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या खूपच दुर्मिळ आहेत. २०२४ च्या निवडणुकांचे बिगुल वाजले पण विद्यमान सरकार आपल्या भविष्याबद्दल बोलत नाही याबद्दल हे सर्व निराश आहेत. १२ वी उत्तीर्ण झालेल्या परंतु त्याहून अधिक पात्रता नसलेल्यांसाठी ही पोलीस भरती एकमेव संधी आहे.

येत्या निवडणुकीत ते कोणाला मत देणार, मी विचारतो.

एक दीर्घ शांतता पसरते. हा प्रश्नच त्यांच्या अभ्यासक्रमात नाही.

Jaideep Hardikar

जयदीप हार्दिकर, नागपुर स्थित पत्रकार-लेखक हैं और पारी की कोर टीम के सदस्य भी हैं.

की अन्य स्टोरी जयदीप हरडिकर
Editor : Priti David

प्रीति डेविड, पारी की कार्यकारी संपादक हैं. वह मुख्यतः जंगलों, आदिवासियों और आजीविकाओं पर लिखती हैं. वह पारी के एजुकेशन सेक्शन का नेतृत्व भी करती हैं. वह स्कूलों और कॉलेजों के साथ जुड़कर, ग्रामीण इलाक़ों के मुद्दों को कक्षाओं और पाठ्यक्रम में जगह दिलाने की दिशा में काम करती हैं.

की अन्य स्टोरी Priti David
Translator : Ashwini Patil

Ashwini is a journalist based in Nashik with seven years of experience in Marathi print media. She has a keen interest in women and development, cultural studies, youth, finance and media.

की अन्य स्टोरी Ashwini Patil