रविवारची सकाळ आहे, पण ज्योतिरिंद्र नारायण लाहिरी कामात बुडालेले आहेत. हुगळी जिल्ह्यातल्या आपल्या घरातल्या एका खोलीच्या कोपऱ्यात उभे राहून ५० वर्षीय ज्योतिरिंद्र बाबू एक नकाशा न्याहाळत आहेत. हा आहे; मेजर जेम्स रेनेल यांनी १७७८मध्ये तयार केलेला सुंदरबनचा पहिला नकाशा.

“ब्रिटिशांच्या सर्वेक्षणावर आधारित असलेला सुंदरबनचा हा पहिला अस्सल नकाशा आहे. या नकाशात थेट कोलकात्यापर्यंत पसरलेलं कांदळवन दाखवण्यात आलंय. खूप काही बदललंय तेव्हापासून...’’ नकाशावर बोट ठेवत लाहिरी सांगतात. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना लागून असलेलं सुंदरबन हे जगातलं सगळ्यात मोठं कांदळवन किंवा खारफुटीचं बन आहे. अफाट जैवविविधता आणि अर्थातच रॉयल बंगाल टायगर (पॅन्थेरा टायग्रिस) यासाठी ते ओळखलं जातं.

त्यांच्या खोलीतली कपाटं सुंदरबन संदर्भातल्या जवळपास प्रत्येक विषयावरच्या शेकडो पुस्तकांनी भरलेली आहेत – वनस्पती, प्राणी, दैनंदिन जीवन, नकाशे... आणि इंग्रजी व बंगाली भाषेतलं बालसाहित्य. २००९ साली आलेल्या आयला चक्रीवादळानंतर इथे होत्याचं नव्हतं झालं. त्या पार्श्वभूमीवर लाहिरी यांनी सुंदरबनविषयीचं ‘सुधू सुंदरबन चर्चा’ हे त्रैमासिक सुरू केलं. या अंकांचं नियोजन आणि संशोधनाचं काम इथे चालतं.

“या भागातली परिस्थिती न्याहाळण्यासाठी मी वारंवार दौरे केले. भीती वाटावी असं होतं ते,’’ लाहिरी आपल्या स्मृती जागवतात. मुलांची शाळा सुटली, लोक बेघर झाले, असंख्य पुरुषांनी स्थलांतर केलं आणि सगळ्या गोष्टींचा सांभाळ करण्याची जबाबदारी येऊन पडली ती महिलांवर. नद्यांवरचे बांधबंधारे धड राहतील की कोसळतील, यावर लोकांचं भवितव्य पूर्णपणे अवलंबून होतं.’’

या आपत्तीविषयी प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या लाहिरी यांना अगदी जेमतेम आणि वरवरच्या वाटल्या. “माध्यमं सुंदरबनबद्दलच्या रूढीबद्ध गोष्टीच पुन्हा पुन्हा उगाळत राहतात. त्यात आपल्याला वाघांच्या हल्ल्यांची किंवा पावसाची वर्णनं सापडणारच. पाऊस किंवा पूर नसेल, तेव्हा सुंदरबन क्वचितच चर्चेत असतं,’’ ते सांगतात. “माध्यमांचा आवडता मसाला म्हणजे- आपत्ती, वन्यजीव आणि पर्यटन.’’

Lahiri holds the first map of the Sundarbans (left) prepared by Major James Rennel in 1778. In his collection (right) are many books on the region
PHOTO • Urvashi Sarkar
Lahiri holds the first map of the Sundarbans (left) prepared by Major James Rennel in 1778. In his collection (right) are many books on the region
PHOTO • Urvashi Sarkar

डावीकडे: मेजर जेम्स रेनेल यांनी १७७८ मध्ये तयार केलेला सुंदरबनचा पहिला नकाशा हातात घेऊन दाखवणारे लाहिरी. उजवीकडे: लाहिरींच्या संग्रहात या प्रदेशासंदर्भातली बरीच पुस्तकं आहेत

Lahiri has been collecting news (left) about the Sundarbans for many years. 'When it isn’t raining or flooded, the Sundarbans is rarely in the news,' he says. He holds up issues of Sudhu Sundarban Charcha (right), a magazine he founded in 2010 to counter this and provide local Indian and Bangladeshi perspectives on the region
PHOTO • Urvashi Sarkar
Lahiri has been collecting news (left) about the Sundarbans for many years. 'When it isn’t raining or flooded, the Sundarbans is rarely in the news,' he says. He holds up issues of Sudhu Sundarban Charcha (right), a magazine he founded in 2010 to counter this and provide local Indian and Bangladeshi perspectives on the region
PHOTO • Urvashi Sarkar

डावीकडे: अनेक वर्षांपासून सुंदरबनबद्दलच्या बातम्या लाहिरी गोळा करत आहेत. ‘पाऊस किंवा पूर नसेल, तेव्हा सुंदरबन क्वचितच चर्चेत असतं,’ असं ते सांगतात. उजवीकडे: या पलीकडे जात सुंदरबनबद्दलचा स्थानिक भारतीय आणि बांगलादेशी दृष्टीकोन उजेडात आणण्यासाठी त्यांनी २०१०मध्ये ‘ सुधू सुंदरबन चर्चा’ हे त्रैमासिक प्रकाशित करायला सुरुवात केली

‘सुधू सुंदरबन चर्चा’ सुरू झालं ते या भूभागासंदर्भात भारतीय आणि बांगलादेशी अशा दोन्ही दृष्टिकोनातून व्यापक विचार करण्याच्या हेतूने. २०१० पासून त्यांनी या त्रैमासिकाचे ४९ अंक प्रकाशित केलेत. २०२३ च्या नोव्हेंबर महिन्यात याचा सुवर्णमहोत्सवी अंक प्रकाशित होईल.

ते म्हणतात, “मागच्या अंकांमध्ये इथल्या अगदी बारीकसारीक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आलाय. सुंदरबनचे नकाशे, इथल्या मुलींचं जगणं, इथली गावं, चाचेगिरी आणि पाऊस... अशा कितीतरी गोष्टी! एका अंकात तर प्रसारमाध्यमं सुंदरबनविषयी कसं  वृत्तांकन करतात, हेही मांडलं गेलंय आणि तेसुद्धा पश्चिम बंगाल व बांगलादेशातल्या पत्रकारांचा दृष्टिकोन टिपत!

एप्रिल २०२३ ला आलेला अंक हा सध्याचा शेवटचा- ४९ वा अंक – कांदळवन आणि वाघांना वाहिलेला! “वाघांचा अधिवास असलेलं सुंदरबन हे जगातलं एकमेव कांदळवन आहे. त्यामुळे आम्ही या पैलूवर आधारित असा एक स्वतंत्र अंकच प्रकाशित केला,’’ ते सांगतात.

पन्नासाव्या अर्थात सुवर्णमहोत्सवी अंकाचं नियोजनही सुरू झालंय- हवामान बदल आणि समुद्राच्या वाढत्या पातळीचा सुंदरबनवर कसा परिणाम होतो यावर संशोधन करणाऱ्या विद्यापीठातल्या एका निवृत्त प्राध्यापकाचं काम केंद्रस्थानी ठेवून या अंकाचं नियोजन केलंय.

“विशिष्ट आकडेवारी किंवा माहितीच्या शोधात असलेले विद्यार्थी व विद्यापीठातले संशोधक आणि या भूभागात मनापासून रस असलेल्या व्यक्ती हे या अंकाचे वाचक. अगदी ओळ अन् ओळ वाचणारे ८० वर्षांचे वाचकही या अंकाला लाभलेत,’’ लाहिरी सांगतात.

प्रत्येक अंकाच्या अंदाजे एक हजार प्रती छापल्या जातात. “आमचे ५२०-५३० नियमित वर्गणीदार आहेत, त्यातले बहुतेक सगळे आहेत पश्चिम बंगालमधले. त्यांना कुरिअरने अंक पाठवला जातो. बांगलादेशात साधारण ५० प्रती जातात – खूप महाग पडतं म्हणून आम्ही या प्रती थेट कुरिअर करत नाही,’’ लाहिरी मोकळेपणाने सांगतात.

त्याऐवजी, कोलकात्याच्या कॉलेज स्ट्रीटवरच्या लोकप्रिय पुस्तक बाजारातून बांगलादेशी पुस्तक विक्रेते प्रती खरेदी करतात आणि त्यांच्या देशात घेऊन जातात. “आम्ही बांगलादेशी लेखकांचं साहित्य आणि तिथल्या छायाचित्रकारांनी काढलेली छायाचित्रंही अंकात प्रकाशित करतो,’’ ते म्हणतात.

Left: An issue of Sudhu Sundarban Charcha that focuses on women in the Sundarbans
PHOTO • Urvashi Sarkar
Right: Forty nine issues have been published so far
PHOTO • Urvashi Sarkar

डावीकडे: ‘सुधू सुंदरबन चर्चा’चा एक अंक – सुंदरबनमध ल्या स्त्रियांच्या जगण्याभवती विणलेला! उजवीकडे : आत्तापर्यंत ४९ अंक प्रकाशित झाले आहेत

Jyotirindra Narayan Lahiri with his wife Srijani Sadhukhan. She along with their two children, Ritaja and Archisman help in running the magazine
PHOTO • Urvashi Sarkar

पत्नी सृजनी सधुखान यांच्यासोबत ज्योतिरिंद्र नारायण लाहिरी. ऋतजा आणि आर्चिस्मन या आपल्या दोन मुलांच्या सोबतीने सृजनी हा अंक चालवण्यासाठी साहाय्य कर तात

गुळगुळीत कागदावर काळ्या-पांढऱ्या रंगात छापायला जाण्यापूर्वी प्रत्येक मजकूर टाईप केला जात असल्याने अंक काढणं खर्चिक होतं. “त्यात भरीला शाई, कागद आणि वाहतुकीचा खर्च असतो. मात्र आमचा संपादकीय खर्च जास्त नसतो; कारण सगळी संपादकीय कामं आम्हीच करतो,’’ लाहिरी सांगतात. पत्नी सृजनी सधुखान (वय ४८), मुलगी ऋतजा (वय २२) आणि मुलगा आर्चिस्मन (वय १५) हे तिघं त्यांना या कामी मदत करतात.

संपादकीय कामासाठी टीममधले १५-१६ जण आपला वेळ आणि मेहनत विनामूल्य देऊ करतात. “कुणाला नोकरीवर ठेवणं आम्हाला शक्य नाही. जी मंडळी आपला वेळ देतात, या कामासाठी श्रम घेतात; ती या अंकात उपस्थित केल्या जात असलेल्या मुद्द्यांविषयी संवेदनशील असतात,’’ लाहिरी म्हणतात.

या त्रैमासिकाच्या एका प्रतीची किंमत १५० रुपये आहे. “जर आम्हाला एक प्रत ८० रुपयाला पडत असेल, तर आम्हाला ती १५० रुपयांना विकावी लागेल, कारण आम्हाला विक्रेत्यांना थेट ३५ टक्के कमिशन द्यावं लागतं,’’ प्रकाशनातला व्यवहार समजावून सांगताना लाहिरी म्हणतात.

सुंदरबनविषयीच्या बातम्यांसाठी लाहिरी आणि त्यांचे कुटुंबीय जवळपास दररोज सहा बंगाली आणि तीन इंग्रजी वृत्तपत्रांवर नजर ठेवून असतात. ते स्वत: या भागातला एक मान्यताप्राप्त ‘आवाज’ आहेत. त्यामुळे वाघांच्या हल्ल्याच्या बातम्या अनेकदा थेट त्यांच्यापर्यंत पोहोचतात. वृत्तपत्रातली वाचकांची पत्रंही लाहिरी गोळा करतात. ते म्हणतात, “वाचक श्रीमंत किंवा बलशाली नसतील, परंतु त्यांना त्यांचा मुद्दा माहीत असतो आणि ते समर्पक प्रश्न विचारतात.’’

नियतकालिक चालवणं एवढी एकच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर नाही. सरकारी शाळेतल्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भूगोल शिकवण्यासाठी ते दररोज १८० किलोमीटरचा प्रवास करून शेजारच्या पूर्व बर्धमान जिल्ह्यात जातात. “मी सकाळी ७ वाजता घरातून निघतो आणि रात्री ८ वाजता परत येतो.

छापखाना बर्धमान शहरात आहे, त्यामुळे काही काम असलं तर मी तिथे थांबतो आणि तिथलं काम उरकून संध्याकाळी उशिरा घरी परततो,’’ गेली २६ वर्षं शिकवण्याचं काम करत असलेले लाहिरी सांगतात. ते म्हणतात, “शिकवणं ही माझी तळमळ आहे... अगदी या नियतकालिकासारखीच!’’

Urvashi Sarkar

उर्वशी सरकार, स्वतंत्र पत्रकार हैं और साल 2016 की पारी फ़ेलो हैं.

की अन्य स्टोरी उर्वशी सरकार
Editor : Sangeeta Menon

संगीता मेनन, मुंबई स्थित लेखक, संपादक और कम्युनिकेशन कंसल्टेंट हैं.

की अन्य स्टोरी Sangeeta Menon
Translator : Amruta Walimbe

Amruta Walimbe is an independent journalist and editor with a long experience of working with many NGOs and media houses in Maharashtra. She is also a trained psychologist.

की अन्य स्टोरी Amruta Walimbe