गेल्या दहा वर्षांत आपण किती दवाखाने पालथे घातले त्याची मोजदाद सुपारी पुतेल यांनी ठेवलेली नाही.
किती तरी वर्षं त्या आपल्या १७ वर्षांच्या मुलाच्या उपचारासाठी ओडिशा आणि छत्तीसगढमधील रुग्णालयांमध्ये जात होत्या. आणि नंतर काही काळ त्यांचे पती सुरेश्वर यांना घेऊन मुंबईत.
दोघंही २०१९ मध्ये चार महिन्यांच्या कालावधीत मरण पावले, आणि सुपारींच्या दुःखाला पारावार उरला नाही.
त्यांचे पती सुरेश्वर केवळ ४४ वर्षांचे होते. सप्टेंबर २०१९ मध्ये ते आणि सुपारी ओडिशाच्या बालांगीर जिल्ह्यातील त्यांच्या घराहून साधारण १४०० किमी दूर मुंबईला निघून आले होते. एका स्थानिक दलालाने त्यांना एका बांधकामावर कामाला ठेवलं होतं. "आम्ही आमचं कर्ज फेडायला अन् घर [इमारतीचं बांधकाम] पूर्ण करायला गेलो होतो," सुपारी म्हणाल्या. दोघांची एकत्रित रोजंदारी रू. ६०० होती.
"एक दिवस सायंकाळी मुंबईच्या साईटवर काम करताना माझ्या नवऱ्याला अचानक खूप ताप आला," ४३ वर्षीय सुपारी सांगतात. त्या तुरेकेला तालुक्यातल्या ९३३ वस्ती असलेल्या हियाल गावातल्या आपल्या मातीच्या घराच्या अंगणात बसल्या आहेत. त्या व त्यांचं कुटुंब माळी या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत.
सुपारी आणि बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या मुकादमाने मिळून सुरेश्वर यांना रिक्षा आणि अँब्युलन्स करून तीन रुग्णालयांमध्ये हलवलं, अखेर ते उत्तर-मध्य मुंबईतील सायनमधील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात येऊन पोहोचले.
"[त्यावेळी] आमच्याकडे आधार कार्ड अन् बाकीचे कागद नसल्यामुळे प्रत्येक दवाखाना आम्हाला दुसरीकडे पाठवत होता," सुपारी म्हणतात. "त्याला कावीळ झाला होता [लक्षणे होती]. कमरेखालचं शरीर पांगळं झालं होतं, म्हणून मी सारखे त्याच्या पायाचे तळवे घासत होते," त्या म्हणतात. नेमक्या आजाराची त्यांना कल्पना नाही. पुढल्याच दिवशी, ६ नोव्हेंबर, २०१९ रोजी सुरेश्वर रुग्णालयात मरण पावले.
"मुकादम म्हणाले की मुंबईतच त्यांचं दहन करा कारण मृतदेह ओडिशात न्यायला पुष्कळ पैसे लागतील. मी पण राजी झाले," सुपारी म्हणतात. "मुकादमांनी अंतिम संस्काराचे पैसे दिले अन् माझा हिशोब करून मला परत पाठवलं, एका हातात माझ्या नवऱ्याच्या अस्थी होत्या अन् दुसऱ्या हातात त्याच्या मृत्यूचा दाखला," त्या पुढे सांगतात. ११ नोव्हेंबर, २०१९ रोजी त्यांनी आपल्याला मिळालेल्या रू. ६,००० पैकी काही पैसे वापरून आपल्या भावासह परतीची ट्रेन पकडली. तो त्यांना परत न्यायला बालांगीरच्या कार्लाबहाली गावाहून आला होता.
मुंबईला जाण्यापूर्वी सुपारी आणि सुरेश्वर आपल्या गावी, बालांगीरच्या कांटाबांजी किंवा छत्तीसगढच्या रायपूर शहरात रोजंदारी करून दिवसाला रू. १५० कमवायचे. (जुलै २०२० मध्ये ओडिशा शासनाच्या एका परिपत्रकानुसार कामगारांच्या या "अकुशल" श्रेणीला दिवसाला किमान रू. ३०३.४ वेतन मिळणे बंधनकारक आहे). सुरेश्वर आणि त्यांच्या सहा भावांची सामायिक जमीन होती (त्यांच्या मालकीची किती ते सुपारी यांना सांगता आलं नाही) पण या भागात पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे ती पडक आहे.
२०१६ ते २०१८ दरम्यान दोनदा ते वीटभट्ट्यांवर काम करण्यासाठी मद्रासला गेल्याचं सुपारी सांगतात. "माझी मुलं मोठी होत होती अन् बिद्याधर आजारी पडू लागला, म्हणून आम्हाला पैशाची गरज होता. तो १० वर्षं आजारी होता."
बिद्याधर हा त्यांचा मधला मुलगा होता. सुपारी यांना एका मोठी मुलगी, २२ वर्षीय जननी, आणि एक धाकटा मुलगा, १५ वर्षीय धनुधर. त्यांच्या सासू सुफुल, वय ७१ यासुद्धा त्यांच्याच घरी राहतात. त्या आपले पती लुकानाथ पुतेल यांच्यासह शेती करायच्या (लुकानाथ आता मरण पावले आहेत) आणि आता वृद्धत्व पेन्शनवर भागवून नेतात. जननीचं २०१७ साली वयाच्या १८ व्या वर्षी नुआपडा जिल्ह्यातील सिकुआन गावातील एका कुटुंबात लग्न झालं. आणि इयत्ता १० वीत असलेला धनुधर मोठा भाऊ वारल्यानंतर आणि पालक कामानिमित्त मुंबईला निघून गेल्यानंतर आपल्या बहिणीच्या घरी राहायला गेला.
वयाच्या १७ व्या वर्षी कुठल्या कर्करोगाने आपला मुलगा हिरावून घेतला ते सुपारी यांना ठाऊक नाही. बिद्याधर गेली १० वर्षं त्याचा सामना करत होता आणि उपचारासाठी घरच्यांनी कित्येक दवाखाने पालथे घातले. "आम्ही [संबलपूर जिल्ह्यातील] तीन वर्षं बिर्ला रुग्णालयात जात होतो, तीन वर्षं बालांगीरमधल्या आणखी एका दवाखान्यात आणि नंतर रामकृष्ण रुग्णालयात," त्या आठवून सांगतात. यातील शेवटचं रायपूरमधील एक खासगी रुग्णालय असून सुपारी यांच्या गावाहून अंदाजे १९० किमी दूर आहे. हियालपासून सर्वात जवळचं स्थानक कांटाबांजी. तिथीन ते ट्रेन पकडायचे.
गेल्या काही वर्षांत या कुटुंबाने बिद्याधरच्या उपचारासाठी मित्र, नातेवाईक आणि स्थानिक सावकारांकडून पैसे उसने घेतले होते. सुपारी यांनी आपल्या मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी रू. ५०,००० उभे करण्यासाठी कांटाबांजीतील एका दुकानात जननीचे दागिनेसुद्धा गहाण ठेवले होते.
कर्ज आणखी वाढत गेलं, तेव्हा ते परत फेडण्याच्या दबावामुळे हे दांपत्य मार्च २०१९ मध्ये मुंबईला निघून आलं. पण त्या वर्षी जून महिन्यात त्यांच्या मुलाची तब्येत बिघडू लागली तेव्हा सुपारी तडक हियालला निघून आल्या आणि जुलै महिन्यात सुरेश्वरही गावी परत आले. "त्याला पुष्कळ महिने त्रास झाला, अन् शेवटी रथ यात्रेच्या वेळी [जुलैमध्ये] त्याने प्राण सोडला," सुपारी सांगतात.
बिद्याधर मरण पावल्यानंतर लगेच या कुटुंबाला प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत एक घर मंजूर करण्यात आलं. त्यांना एक नवीन घर बांधण्यासाठी टप्प्याटप्प्याने रू. १,२०,००० मिळणार होते. पण सुपारी आणि सुरेश्वर यांना या रकमेचा काही भाग आपल्या मुलाच्या उपचारासाठी खर्च करावा लागला, आणि बांधकाम अर्धवट राहिलं. "मला तीन हप्ते मिळाले – पहिल्यांदा २०,००० रुपये, दुसऱ्यांदा ३५,००० रुपये अन् तिसऱ्यांदा ४५,००० रुपये. पहिल्या दोन हप्त्यांमध्ये घरासाठी सिमेंट अन् गिट्टी आणली, पण शेवटचा हप्ता आम्ही आमच्या मुलाच्या उपचारावर खर्च केला," सुपारी म्हणतात.
ऑगस्ट २०१९ मध्ये तुरेकेलाच्या तहसील विकास कार्यालयातून जेव्हा अधिकारी घराची तपासणी करायला आले, तेव्हा त्यांना ते अर्धवट बांधलेलं दिसलं आणि त्यांनी या दांपत्याला खडसावलं. "त्यांनी आम्हाला घर पूर्ण बांधायला सांगितलं नाही तर म्हणाले आमच्यावर गुन्हा दाखल करतील. ते म्हणाले जर घर पूर्ण बांधलं नाही तर आम्हाला शेवटचा हप्ता मिळणार नाही," सुपारी म्हणतात.
"माझा मुलगा जाऊन जेमतेम महिना झाला होता, पण आम्हाला पुन्हा [सप्टेंबर २०१९ मध्ये] मुंबईला जावं लागलं, जेणेकरून आम्हाला घर पूर्ण कऱण्यासाठी थोडीफार कमाई करता यावी," सुपारी म्हणतात. त्यावर ना छत आहे, ना दारं, ना खिडक्या, आणि भिंतींचा गिलावा राहिलाय. त्यांच्या मातीच्या घराहून अंदाजे २० मीटर लांबीवर असलेल्या अर्धवट बांधकामाकडे बोट दाखवून त्या म्हणतात, "या घरापायी मी माझा नवरा गमावला."
सुपारी यांच्या सासू सुफुल अजूनही दुःखातून सावरल्या नाहीत आणि त्यांना वाटतंय की त्यांची सून सुपारी सुरेश्वर का गेला ते खरं सांगत नाहीये: 'माझा मुलगा माझ्याशी फोनवर बोलला होता अन् तो तर बरा वाटत होता. तो काही दिवसांनी मरण पावला हे मला खरंच वाटत नाही," त्या म्हणतात. त्यांना वाटतं की आपला मुलगा बांधकामाच्या ठिकाणी काम करताना एका अपघातात मरण पावला आणि सुपारी आपल्यावर दोष यायला नको म्हणून खरं कारण लपवतेय. पण सुपारी म्हणतात: "त्या नेहमी मला उगीच बोलत राहतात. पण असलं काही झालं नाहीये."
डिसेंबर २०१९ मध्ये त्यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत रू. २०,००० मिळाले. या योजने अंतर्गत एखाद्या कुटुंबातील मुख्य कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत मिळते. "मी ह्या पैशातून माझ्या नवऱ्याच्या दासा समारंभासाठी [दुखवट्याचा विधी] नातेवाइकांकडून घेतलेले कर्ज फेडलं," सुपारी म्हणतात. त्यांना डिसेंबर २०१९ पासून दरमहा रू. ५०० विधवा पेन्शनही मिळतेय.
बांधकाम मजूर म्हणून सुरेश्वर यांचं कुटुंब ओडिशाच्या इमारत व अन्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून रू. २,००,००० चं 'अपघाती मृत्यू' साहाय्य मिळण्यास पात्र आहे. पण सुरेश्वर यांनी जिल्हा श्रम कार्यालयात आपलं नाव नोंदवलं नसल्यामुळे हे कुटुंब तो निधी मागू शकत नाही. "थोडा जरी पैसा मिळाला तरी खूप मदत होईल," सुपारी म्हणतात. त्यांचं घर अर्धवट राहिलंय आणि नातेवाइकांकडून घेतलेलं रू. २०,००० हून अधिक कर्ज फेडायचंय.
सुपारी आता या घरातल्या एकमेव कमावत्या सदस्य आहेत. त्या हियाल आणि आसपासच्या गावांमध्ये राबून दिवसाला रू. १५० मिळवतात. "मला रोजचं काम मिळत नाही. आम्ही कधीकधी उपाशी राहतो," त्या म्हणतात. धनुधर आपल्या बहिणीच्या गावाहून हियालमध्ये परत आलाय. "मुलगा शिकत नाहीते. त्याचं मनच लागत नाही अभ्यासात," सुपारी म्हणतात. "त्याने शाळा सोडली अन् आता तो या वर्षी [एप्रिल २०२१] बोर्डाच्या परीक्षेला बसणार नाही."
घर अजूनही पूर्ण व्हायचं असून अर्धवट बांधलेल्या भिंती आणि फरशीवर गवत वाढू लागलंय. ते पूर्ण करायला पैसा कधी व कसा उभा करणार ते सुपारी यांना माहीत नाही. "छत बांधलं नाही तर पावसाळ्यात [आणखी] नुकसान होईल. मागच्या वर्षी पावसाने आधीच त्याच्या भिंतीचं नुकसान केलंय. पण माझ्याकडे पैसाच नाहीये, मी काय करू?"
टीप: एका स्थानिक वृत्तपत्रातून सुरेश्वर यांच्या मृत्यूची बातमी कळल्यावर पत्रकाराने एका मित्रासोबत हियाल गावी भेट दिली. त्यांनी कांटाबांजीतील एक वकील आणि सामाजिक कार्यकर्ते, बी. पी. शर्मा यांच्याशी या कुटुंबाच्या परिस्थिती बाबत चर्चा केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्थिक मदतीची लेखी मागणी केली. त्यायोगे जिल्हाधिकाऱ्यांनी तुरेकेलाच्या तहसील विकास अधिकाऱ्यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले. परिणामी सुपारी यांना आपल्या बँक खात्यात रू. २०,००० आणि विधवा पेन्शन कार्ड मिळालं.
अनुवाद: कौशल काळू