दिसत होतं ते काही चुकीचं नव्हतं. तो हत्तीच होता. आणि वर एक माणूस. आम्ही सरगुजा-पलामूच्या निर्जन सीमाभागातून चाललो होतो तेव्हा पहिल्यांदा आम्हाला तो माणूस आणि त्याच्यासोबत तो महाकाय प्राणी दिसला होता. किमान आम्हाला तसं वाटत तरी होतं. आम्ही तिघांनी एकमेकांशी तशी खातरजमाही केली होती. पण जवळ जाऊन पाहण्याची काही आम्हाला फारशी घाई नव्हती.

चंदवाहून खास मला भेटायला आलेल्या दलिप कुमारला मात्र हे फारसं रुचलं नाही. त्याच्या मते आम्ही जरा विचित्रच विचार करत होतो. “असं दृश्य जर आपल्याला पटना, रांची किंवा इतर कोणत्या शहरात दिसलं तर आपल्याला त्यात काहीच वावगं वाटत नाही. पण हे जंगल आहे. आणि हे हत्तींचंच घर आहे. आपण मूर्खपणा करतोय.”

कदाचित त्याच्यामुळेच आम्ही वेडेपणा करत होतो. ते जंगल होतं. दलिप एकदम तर्काला धरूनच बोलत होता. पण त्याच तर्काचं बोट धरून त्यावर काही कृती करण्याचा त्यालाही फारसा उत्साह नव्हता हेही त्याने मान्य करून टाकलं. आणि खरं तर त्या हत्तीवरचा माणूस आपण नक्की पाहिला का याची काही काळ आम्हालाच खात्री नव्हती.

या सगळ्या दरम्यान त्या माणसानं मात्र आम्हाला पाहिलं होतं. त्याने उत्साहाने हात हलवत त्याचा तो अगडबंब रथ आमच्या दिशेने वळवला. तिचं नाव होतं पार्बती. इतर कुठेही भेटणाऱ्या हत्तींसारखीच ती फारच प्रेमळ आणि मऊ मनाची होती. त्याचं नाव अगदी तिला शोभणारं – परभू*. आम्ही कधीही न ऐकलेल्या कुठल्याशा मंदिरात तो तिला घेऊन चालला होता. त्याच्या सांगण्याप्रमाणे, त्या भागातल्या सगळ्या मंदिरांमध्ये ते चकरा मारत असतात. तिथे काही तरी कमाई होते. एखादा सण असेल तर थोडी जास्त. गावाकडची कनवाळू माणसं येता जाता थोडे पैसे आणि खायलाही देत असतात.

परभूनं सांगितलं की तो मध्य प्रदेशातल्या सरगुजाला राहतो. पण तो आणि पार्बती पलामूजवळ सीमेच्या अल्याड पल्याड फिरत असतात. एकटा सरगुजा जिल्हा दिल्ली, गोवा आणि नागालँडचा प्रदेश एकत्र केल्यावर केवढा होईल, तेवढा आहे. पलामू बिहारमध्ये आहे**. दोन्ही जिल्हे देशातले सर्वात गरीब जिल्हे आहेत. म्हणजेच, दोन्हीकडे मोठ्या संख्येने गरीब लोक आहेत. पण संसाधनांचा विचार केला, तर त्यांची श्रीमंती अफाट आहे.


Elephant man and the belly of the beast_article_P. Sainath_map

पार्बती बहुधा चांगल्या कुळातली असणार. सरगुजाच्या हत्तींनी पूर्वी लढायांमध्ये फार मोलाची भूमिका बजावली आहे. जिल्हा गॅझेटच्या नोंदींनुसार, “मध्ययुगीन लढायांमध्ये तुमच्या हत्ती दळावरून तुमची ताकद जोखली जायची. काही ठराविक प्रदेशातून हत्ती आणले जात असत. छत्तीसगड राज्याचा सरगुजा प्रांत त्यात आघाडीवर होता. माळव्याचे सुलतान आणि सरगुजाच्या राजांमधले संबंध कशावर अवलंबून होते – माळव्याच्या सल्तनतला हत्तींच्या नियमित पुरवठ्यावर.”

आणि खरं तर माळव्याच्या सुलतानाने सरगुजावर आपला अंमल चालू ठेवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हे हत्ती. परभू आणि पार्बतीकडे पाहून मात्र त्यांचे पूर्वज हिंसक आणि योद्धे असतील अशी कल्पनाही करणं अवघड जात होतं. परभू म्हणजे मूर्तीमंत विनय. आणि पार्बती जास्तीत जास्त सशाएवढी लढाऊ असेल. एक प्रचंड मोठा, शांतचित्त ससा कसा असेल, अगदी तशी.


भटक्यांच्या भाषेत ‘जवळ’

मी, दलिप आणि अंबिकापूरला*** आम्ही जी पुराणकालीन जीप भाड्याने घेतली होती तिचा ड्रायव्हर एक गाव शोधत होतो. ते अखेरपर्यंत आम्हाला सापडलं नाही ते अलाहिदा. आम्ही बिरहोरांच्या वस्तीजवळ गाडी उभी केली होती. बिरहोर ही हो, संथाल आणि मुंडांप्रमाणे ऑस्ट्रो-आशियाई भाषा गटातली एक अगदी आदिम जमात आहे. छोटांगपूरच्या पट्ट्यातले हे भटके पलामू, रांची, लोहारडागा, हजारीबाग आणि सिंगभूमच्या आसपास फिरत असतात. हळू हळू ही जमातही लयाला चालली आहे. त्यांचे आता अगदी 2000 किंवा त्याहूनही कमी लोक राहिले असावेत.

या बिरहोरांनी अगदी जवळच असणाऱ्या एका अनोख्या गावाविषयी आम्हाला सांगितलं होतं. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर अनेक मैल पायपीट केल्यावर आम्हाला पूर्ण कळून चुकलं होतं की भटक्यांच्या अंदाजानुसार गाव जवळ आहे हे मान्य करून आम्ही घोडचूक केली होती. कुरकुर करणारी जीप बिरहोरांच्या हवाली करून आम्ही पायी निघालो होतो.

ड्रायव्हरला आमच्याच बरोबर यायचं होतं. बिरहोरांचं रंगरुप पाहून तो घाबरला होता असं त्याचं म्हणणं होतं. आणि आता तो पार्बतीकडे पाहून भयभीत झाला होता. तिकडे ड्रायव्हरच्या रुपाबद्दल दलिपने काही शेलके शब्द वापरले होते. तरीही तो आमच्यासोबत होता.

परभूने अगदी खुशीने हत्तीची स्वारी करण्याचा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला. आम्ही एका पायावर तयार. १९९३च्या मध्यावर माझी या कामासाठीची भटकंती सुरू झाली, तेव्हापासून मी कशा कशाने प्रवास केलाय ती वाहनं मी मनात मोजू लागलो. अगदी नावेपासून ते तराफा आणि आगगाडीच्या टपापर्यंत सगळं त्यात होतं. पण त्यात हत्ती काही नव्हता. काही अंतर गेल्यावर आम्ही परभूशी बोलायला एका जागी थांबलो. आम्ही ज्या गावाचा शोध घेत होतो त्याचा आम्हाला आता पार विसर पडला होता. जे काही अनोखं शोधत होतं ते तरं अगदी इथेच होतं. आणि खात्रीने ‘जवळ’. पार्बतीचं पोट तो कसं काय भरत होता ते आम्हाला जाणून घ्यायचं होतं.

मुलाखत घेण्याची आमची सगळी कौशल्यं पणाला लावूनही पुढच्या दीडेक तासात आम्हाला नक्की असं काहीही समजलं नव्हतं. परभू गोड तर होता पण तितकाच आतल्या गाठीचा किंवा मख्खही होता. त्याच्या सांगण्यानुसार जत्रांमध्ये आणि एरवी लोक जे काही दान करतात त्याच्यात त्यांचं बरं चाललं होतं. भारताच्या काही प्रांतात असं होऊ शकतं पण इथे काही हे शक्य वाटत नव्हतं. “खोटारडा *#%&*”, दलिप खेकसला. “त्या प्राण्याला दोनशे किलो गवत लागतं. वर इतर खाणं. मी सांगतो ना तुमचं कसं भागतं ते... तू सरळ तिला पिकात सोडत असणार, खरं की नाही?”

यात थोडं फार तथ्य असणार. पण परभूने सपशेल नकार दिला. “खरं तर ना त्या साल्या हत्तिणीचीच मुलाखत घ्यायला पाहिजे,” दलिप म्हणाला. “ती याच्यापेक्षा जास्त खरं बोलेल. तो काही तिला चारायला जंगलात आत जाऊ शकत नाही. तिथे खरे खुरे जंगली हत्ती असतात. आणि इतरही जनावरं आहेतच की. काही नाही, हा हिला शेतातच सोडत असणार. एकदा तिला सोडलं की साऱ्या पिकाची नासधूस करत असेल ती.” पार्बतीचं खाणं आणि त्याच्या खर्चावर आम्ही खल करत होतो आणि तिथे ती प्रेमाने परभूशी खेळत होती, त्याच्या डोक्यावरून मायेने सोंड फिरवत होती. तो तिचा लाडका होता हे दिसतच होतं. त्यानं पिकं जरी लुटली असली, तरी ती लूट सत्कारणी लागत होती हे नक्की.

02_PS_Elephant Man and the belly of the beast.jpg

परभू सांगत होता की कधी कधी बड्या घरचे लोक त्यांना काम देतात. उदाहरणार्थ, लग्नाच्या मंडपात सगळे दाग दागिने घालून, झूल चढवून, सजून उभी राहिलेली पार्बती म्हणजे सगळ्यांसाठीच मोठं आकर्षण. मात्र इतक्यात त्यांनी ज्या विवाह समारंभाची शान वाढवली त्यात मात्र घाटाच झाला होता. परभूने सगळी कहाणी सांगितली, “मालकानी पन्नास रुपये कापून घेतले. पार्बती त्या दिवशी भुकेजली होती. मग काय, तिने नको तिथे जाऊन खाण्यावर चांगला ताव मारला.” बोलता बोलता त्याने पार्बतीच्या सोंडेवर एक चापट मारली. त्याला गेलेल्या पन्नास रुपयांची आठवण आली असावी. पार्बतीनेही हुंकार भरला. कदाचित तिलाही लग्नातल्या जेवणाची आठवण आली असावी.

“एकदा एक गृहस्थ आला आणि म्हणाला की त्याला एका मिरवणुकीसाठी पार्बती हवी होती. त्याचा कुणी नेता निवडणुकीला उभा राहिला होता. पण ते काही जमलं नाही. नंतर त्याने सांगितलं की काही जणांनी त्याला पार्बतीबद्दल काहीबाही सांगितलं होतं, ती कशी बेभरवशाची आहे, वगैरे. लोक करतातच असं काही तरी.” खंतावत परभू म्हणाला.

एखाद्या गावात शिरल्यावर पार्बतीला पाहिल्यावर नुसती खळबळ माजत असेल. अशा वेळी त्याला काही अडचणी येत नाहीत का, आम्ही त्याला विचारलं. “एकदा”, परभू सांगू लागला, “ही कुत्र्यांची टोळधाड तिच्यावर भुंकायला लागली, गुरगुरायला लागली. ती घाबरली आणि मागे मागे जायला लागली. त्यातच ती एका घरावर आदळली आणि थोडं नुकसान झालं. घरमालक लई चिडला.”

काही क्षण आम्ही काही न बोलता या प्रसंगाची कल्पना करत राहिलो. पार्बती ज्या घरावर आदळली ते आपलं घर असेल आणि आपण त्याचे मालक असलो तर? या सगळ्या गोंधळानंतर त्या घराची काय दैना झाली असेल? मालक संतापला असेल का त्याची बोबडी वळली असेल?

“अजून एकदा, गावाबाहेर काही जण पार्बतीला दगडं मारू लागले.” परभू सांगत होता. “घ्या!” दलिप फुशारत म्हणाला, “तुम्ही तयार पीक लुटायच्या बेतात असाल, तेव्हाच झालं असणार हे.”

“छे छे. आम्ही फक्त पिकातनं चाललो होतो. मला वाटतं काही जण नशेत होते. त्यांनी दगड मारले. आम्ही सरळ आमची दिशा बदलली. पण दुर्दैवाने अंधारून यायला लागलं होतं. आणि आम्ही चुकून एका वस्तीतच शिरलो. पार्बती भराभर पुढे चालली होती. त्यामुळे लोक जरा घाबरलेच. ती अजिबात चिडली वगैरे नव्हती. ते उगाचच घाबरले आणि आरडाओरडा करायला लागले.”

आम्ही विचार करू लागलो, अचानक एक अगडबंब हत्ती आमच्यात येऊन घुसू लागला तर आम्ही तरी काय करू. आम्ही कदाचित दगड नाही मारणार. पण घबराट आणि आरडा-ओरडा होणार हे नक्की.

हत्तीचं पोट कसं भरायचं

आम्ही जितका विचार करू लागलो तितका परभू आणि पार्बतीच्या प्रश्नांचा गुंता आमच्या लक्षात येऊ लागला. सरगुजातले बहुतेक लोक उपाशी पोटी निजतात. असं असताना, एका हत्तीचं पोट कसं भरावं? का असं होतं की पार्बतीच तिच्या ‘कमाईतून’ परभूचं पोट भरत होती? सरगुजाचे हत्ती जसे प्रसिद्ध तसंच इथलं दारिद्र्यही, अगदी इतिहास काळापासून.

सल्तनत, मुघल, मराठे आणि इंग्रज – अगदी सगळ्या राजवटींनी या राज्यावर कमीत कमी कर लादल्याचा इतिहास आहे. सुलतान आणि मुघल हत्ती मिळाल्याने चालवून घेत. अगदी १९१९ पर्यंत शेजारच्या राज्यातून प्रचंड लूट करणारे इंग्रजही इथून अगदी किरकोळ कर घेत होते. दर साल ते सरगुजा, कोरिया आणि चांग भाखर या सरंजामी राज्यांमधून अनुक्रमे रु. २५००, रु. ५०० आणि रु. ३८७ गोळा करत होते. 03_PS_Elephant Man and the belly of the beast.jpg

अठराव्या शतकाच्या शेवटी मराठ्यांनी सरगुजाच्या अंमलाखाली असलेलं कोरिया आपल्या छत्रीखाली आणलं. पण एवढ्या बलाढ्य मराठ्यांनाही हा पूर्ण प्रदेश जिंकता आला नाही. हा भूभाग ताब्यात ठेवणं मुश्किल आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांनी बाकी कसलीही अपेक्षा न ठेवता कोरियाच्या राजाकडे २००० रुपयांची मागणी केली. इतका पैसा देण्याची त्याची कुवत नाही हे पाहून त्यांनी पुढच्या पाच वर्षासाठी दर साल २०० रुपयाची बोली केली आणि खबरदारी म्हणून अनेक जनावरं ताब्यात घेतली. मात्र लवकरच निग्रही मराठ्यांच्याही ध्यानात आलं की इथल्या राजाची एक रुपयाही देण्याची ऐपत नाहीये. मग तडजोड म्हणून त्यांनी, पाच तट्टं, तीन बैल आणि एक म्हैस घेऊन सौदा केला. अशी नोंद जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये आहे.

पुढे तर त्यांनी लुटून नेलेल्या जनावरांपैकीही काही परत केली. कारण तीही फारशी उपयोगाची नव्हती. अखेर त्यांच्यातलं वैर मिटलं आणि थक्क होऊन मराठे माघारी आले.

तर, सरगुजामध्ये एका हत्तीचं पोट कसं बरं भरायचं? तेही अशा हत्तीचं, ज्याला घेऊन तुम्ही घनदाट जंगलात आत जाऊ शकत नाही. प्रश्नाचं उत्तर काही आमच्या हाती लागत नव्हतं. एवढ्या वेळानंतरही काही प्रकाश पडला नव्हता. एक अखेरचा प्रयत्न करायला आम्ही सरसावलो.

आम्ही परभूला विनवण्या केल्या, त्याच्याशी हुज्जत घातली, त्याला घोळात घेतलं. त्यानेही अगदी मधाचं बोट लावून, कपाळावर आठी न आणता आमच्या सगळ्या प्रश्नांची बारकाईनं उत्तरं दिली. पण सांगितलं काहीच नाही. आणि पार्बतीदेखील हे सगळं चौकशीसत्र आणि खरं तर माणसाच्या नजरेतून तिचं स्वतःचं आयुष्य शांतपणे निरखत होती.

तासाभरात ते त्यांच्या वाटेने निघून गेले. “पुढच्या देवळाकडे,” मी म्हणालो. “निघाले कुणाचं तरी पीक लुबाडायला,” इति दलिप.

काहीही म्हणा, तो तिला रोजचं २०० किलो गवत आणि इतर काही खाणं पुरवत होता. कसा ते आपल्याला माहित नाही, इतकंच.


* प्रभू किंवा परभू हे शंकराचं एक नाव. त्याची सहचरी पार्वती (किंवा पार्बती).

**ते नंतर झारखंडमध्ये गेलं.

***सरगुजाचं जिल्हा मुख्यालय, आता छत्तीसगडमध्ये.


चित्रं:  प्रियांका बोरार

प्रियांका बोरार ही नवीन माध्यमांमधली कलाकार आणि संशोधक आहे. कोणत्याही माध्यमाच्या सादरीकरणाच्या अंगामध्ये तिला रस आहे. ती संवादी माध्यमांमध्येही काम करते, पण चित्रकला हे तिचं पहिलं प्रेम आहे, आणि सध्या ती हास्यचित्रांच्या प्रेमात आहे.

या गोष्टीची एक आवृत्ती फार वेगळ्या चित्रांसह सप्टेंबर १९९८ च्या इंडिया मॅगेझीनच्या अंकात पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. आणि नंतर काइ फ्रेझी संपादित, पेंग्विन प्रकाशनाच्या एल्सव्हेअरः अनयुज्वल टेक्स ऑन इंडिया या पुस्तकामध्ये ऑक्टोबर २००० मध्ये प्रकाशित झाली.

अनुवाद: मेधा काळे

पी. साईनाथ, पीपल्स ऑर्काइव ऑफ़ रूरल इंडिया के संस्थापक संपादक हैं. वह दशकों से ग्रामीण भारत की समस्याओं की रिपोर्टिंग करते रहे हैं और उन्होंने ‘एवरीबडी लव्स अ गुड ड्रॉट’ तथा 'द लास्ट हीरोज़: फ़ुट सोल्ज़र्स ऑफ़ इंडियन फ़्रीडम' नामक किताबें भी लिखी हैं.

की अन्य स्टोरी पी. साईनाथ
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले