सुरुवातीला काही गावकरी वीर नारायण सिंगचा उल्लेख डाकू असा करत होते. मात्र आम्ही निघेपावेतो त्यांचं मत जरा निवळल्यासारखं वाटलं.
“वीर नारायण सिंग?” छत्तीसगडच्या सोनाखान गावातल्या साहसराम कंवरचा प्रश्न. “तो एक लुटारू, दरोडेखोर होता. काही जणांसाठी तो महान वगैरे असेल, पण आमच्यासाठी बिलकुल नाही.” बसलेल्या बऱ्याच जणांनी माना डोलावल्या. काहींनी साहसरामच्या म्हणण्याला पुष्टी दिली.
हे ऐकून आमचा मात्र हिरमोड झाला. आम्ही फार दुरून सोनाखानचा पत्ता काढत आलो होतो. १८५० मध्ये छत्तीसगडमध्ये झालेल्या आदिवासी उठावांचा हा केंद्रबिंदू. १८५७च्या राष्ट्रीय उठावाच्याही आधीचं हे बंड. आणि इथूनच एक लोकनायक पुढे आला होता.
इंग्रजांविरोधात वीर नारायण सिंगने जिथे बंड पुकारलं ते हेच गाव.
१८५० मध्ये दुष्काळामुळे इथली परिस्थिती अगदी गळ्याशी आली होती. गोष्टी जास्तच चिघळायला लागल्या आणि नारायण सिंग इथल्या सरंजामांच्या विरोधात उभा ठकला. “त्याला कुणाची दया नको होती,” या आदिवासी बहुल गावातले सर्वात बुजुर्ग आदिवासी चरण सिंग सांगतात. नारायण सिंगबद्दल बरं बोलणारे ते बहुधा एकटेच.
“त्याला कुणाची दया नको होती,” इति चरण सिंग, सोनाखान गावातले सर्वात बुजुर्ग आदिवासी.
नारायण सिंगबद्दल बरं बोलणारे ते बहुधा एकटेच
“त्याने गावच्या व्यापाऱ्यांना आणि मालकांना त्यांची गोदामं खुली करायचं आणि गरिबांना धान्य घेऊ देण्याचं आवाहन केलं.” दुष्काळात नेहमीच घडतं तसं इथेही धान्याची कोठारं भरलेली होती. “तो म्हणाला, पहिलं पीक आलं की लोक धान्य परत करतील. ते काही बधले नाहीत. मग त्याने गरिबांना सोबत घेऊन कोठारं ताब्यात घेतली आणि धान्याचं वाटप केलं.” यानंतर ठिकठिकाणी लढे सुरू झाले आणि आदिवासींनी त्यांच्या शोषणकर्त्यांच्या विरोधात दंड थोपटले.
“हा संघर्ष १८५७च्या फार आधीचा आहे.” भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठाचे प्रा. हिरालाल शुक्ला सांगतात. “पुढे १८५७ च्या बंडखोरांशी त्यांनी हातमिळवणी केली.” याचाच अर्थ तिथे छत्तीसगडमधे आदिवासी आपल्या जीवावर उदार होऊन लढत होते आणि इथे मुंबई आणि कलकत्त्यातले अभिजन मात्र इंग्रजांना सुयश चिंतण्यासाठी बैठकांमध्ये मश्गुल होते.
१८५७मध्ये इंग्रजांनी नारायण सिंगला रायपूरमध्ये फासावर लटकवलं.
सोनाखानच्या लोकांना स्वातंत्र्यासाठी इतरांच्या त्यागाचा कित्ता गिरवण्याची गरज भासली नाही. त्यांनी स्वतःच खूप त्याग केला आहे. एक अल्पभू शेतकरी, जयसिंग पाइकरांच्या मते, “इंग्रजांविरुद्ध लढणं योग्यच होतं. हा आपला देश आहे.” स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांचं मोल ते जाणतात. “गरिबांच्या वाट्याला फार काही आलं नसलं तरी!”
सोनाखानचे काही गावकरी आमच्यासोबत समाधीपर्यंत आले
छत्तीसगडच्या आदिवासी आणि बिगर आदिवासींना छळणारी भूक सोनाखानच्याही पाचवीला पुजली आहे. ‘सोनाखान’ म्हणजे नावाप्रमाणे सोन्याची खाण खचितच नाही. श्यामसुंदक कंवर म्हणतात, “गेल्या हंगामात तर तुम्हाला आताइतकीही लोकं भेटली नसती. अनेकदा आम्हाला सगळ्यांनाच जगायला बाहेर पडावं लागतं.” या कारणामुळेच साक्षरता अभियान इथे सपशेल फसलं आहे.
या बायांच्या म्हणण्यानुसार भूक आणि निकृष्ट आरोग्य सेवा हे आजही इथले प्रश्न आहेत
सोनाखान एका अभयारण्याच्या मधोमध आहे. त्यामुळे वनांसंबंधीचे अनेक जुने नवे प्रश्न इथे आहेतच. वीर नारायण ज्यांच्या विरोधात लढला त्याच शक्तींच्या हातात सगळ्या नाड्या आहेत. व्यापारी, सावकार आणि सरंजाम. “कधी कधी जगण्यासाठी आम्हाला जमीन गहाण ठेवावीच लागते.” विजय पाइकरा, इथले अजून एक शेतकरी सांगतात.
हे सगळे प्रश्न आजही जिवंत असताना, हे गाव वीर नारायणला का बरं विसरलं असावं?
या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भूतकाळात नाही तर १९८०-१९९०च्या दशकात मध्य प्रदेशात जे राजकारण झालं त्यात मिळेल. भोपाळमधले एक अधिकारी आम्हाला समजावून सांगतात.
“अर्जुन सिंग इथे आले (हेलिकॉप्टरमधून) त्याला १३ वर्षं झाली.” चरण सिंग तेव्हाच्या आठवणी सांगतात. येऊन त्यांनी इथे एक रुग्णालय सुरू केलं. यंदाच्या एप्रिलमध्ये तर इथे अजून बडे बडे नेते आले. (हरवंश सिंग, कांतीलाल भुरिया आणि विद्याचरण शुक्ला हे मंत्री) तेही हेलिकॉप्टरमधूनच आले. अधे मधे अजून कोण कोण येतच असतात.
इंग्रजांविरोधात उठाव करणाऱ्या या ऐतिहासिक नायकाच्या कहाण्या जाणत्या लोकांकडून ऐकताना इतर गावकरी
रायपूर ते पिथोरा हे १०० किलोमीटरचं अंतर कापायला दोन तास लागतात. हे सोनाखानच्या सर्वात जवळचं ठिकाण. मात्र इथून पुढचे ३० किलोमीटर दोन तास खातात. “इथे जर कोणी गंभीर आजारी असेल तर त्याला दवाखान्यात न्यायला आम्हाला जंगलातून ३५ किलोमीटर वाट काढत जायला लागतं.” जयसिंग पाइकरा सांगतात.
मग अर्जुन सिंगांच्या हॉस्पिटलचं काय झालं? “अहो ते सुरू झालं तेव्हापासून तिथे एकही डॉक्टर फिरकलेला नाही, १३ वर्षं झाली.” तिथे एक कंपाउंडर आहे तो आरामात औषध गोळ्या लिहून देतो. पण ती बाहेरूनच आणावी लागतात.
पण एवढे सगळे बडी मंडळी इथे येण्याचं काय कारण? आणि येऊन ते नक्की करतात तरी काय?
त्यांचं दर वेळचं ठरलेलं आहे. ते येतात, नारायण सिंगबद्दल भाषण ठोकतात आणि एका कुटुंबाला – त्यांच्या वारसदारांना बक्षिसं, निधी वगैरे देतात. आम्हाला काही हे वारसदार सापडले नाहीत.
“अहो, ते कधीच इथे नसतात. कुणास ठाउक, ते खरे वारसदार आहेत का नाही.” चरण सिंग सांगतात. “ते काही का म्हणेनात, ते ग्रामदैवताची पूजाही करत नाहीत.”
“तरीही तेच सगळं लुबाडतायत.” पाइकरा थेट आरोप करतात.
मध्य प्रदेशातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नावांचे सरकारी खंड बुचकळ्यात टाकणारे आहेत. इंग्रजांशी लढताना हजारो आदिवासींनी आपला जीव दिला. पण या याद्यांमध्ये आदिवासी नाव शोधणं जवळ जवळ अशक्य आहे. ना छत्तीसगडमध्ये, ना बस्तरमध्ये. अख्खे खंड मिर्धा, शुक्ल, अगरवाल, गुप्ता, दुबेंनी भरलेले आहेत. जेत्यांचा इतिहास म्हणतात तो असा.
१९८० च्या मध्यावर तत्कालील मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांनी त्यांचे प्रमुख शत्रू असणाऱ्या दोघा शुक्ल बंधूंचा काटा काढायचा चंग बांधला. त्यातले एक, श्यामचरण शुक्ल तीनदा मुख्यमंत्री होते आणि दुसरे विद्याचरण शुक्ल, अनेकदा केंद्रात मंत्री होते. छत्तीसगड हा त्यांचा बालेकिल्ला – बऱ्याच अंशी आजही तीच स्थिती आहे. राज्य काँग्रेसवर पकड मिळवण्यासाठी झालेल्या सत्ता संघर्षात अर्जुन सिंग हात धुवून यांच्या मागे लागले. आणि यासाठी त्यांनी आधार घेतला वीर नारायणचा.
इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नारायण सिंगला जागा मिळाली नाही. पण जनतेसाठी तो सच्चा नायक होता. आणि आता मात्र राज्य सरकारनीच त्याला स्वीकारलं होतं.
नारायण सिंगला अग्रस्थान देण्यामागचा खरा हेतू शुक्ल बंधूंचे पंछ छाटणं हा होता. छत्तीसगडचे खरे नायक कोण, एक आदिवासी नेता की उच्चभ्रू असे शुक्ल? छत्तीसगडच्या थोर परंपरेचे उद्गाते नक्की कोण? वर्तमानातल्या लढाया लढण्यासाठी भूतकाळाची झूल अंगावर चढवली जात होती. वीर नारायण सिंगच्या दैवतीकरणातून अर्जुन सिंग स्वतःला आदिवासींच्या बाजूचे आणि अर्थातच शुक्लंच्या विरोधात असल्याचं दाखवत होते.
लवकरच सरकारी यंत्रणेने नारायण सिंगची एक अधिकृत प्रतिमा तयार करायला सुरूवात केली. त्याचा अर्थात काही फायदाही झाला. फार कोणाला माहित नसणाऱ्या एका नायकाला अखेर त्याचं श्रेय मिळालं. याबाबत कुणाचंच दुमत होणार नाही. पण त्यामागचे हेतू मात्र फार वेगळे होते. नारायण सिंगचा वारसा पुढे नेण्याची जणू स्पर्धाच लागली होती. रुग्णालयं आणि इतर इमारतींची उद्घाटनं होत होती. त्यांचं काम क्वचितच सुरू होत होतं. नोकऱ्या आणि मदतीच्या घोषणा होत होत्या. सरोवरांना आणि उद्यनांना वीर नारायण सिंगची नावं देण्यात येत होती.
गावकऱ्यांचा आरोप मात्र हाच की या सगळ्याचा लाभ एकाच कुटुंबाला मिळत होता.
इतर ठिकाणी नारायण सिंगचे नवे चाहते निर्माण होत होते पण त्याच्या स्वतःच्या गावात मात्र त्याच्याबद्दलचा आदर कमी होऊ लागला होता. अख्ख्या गावापासून एकच कुटुंब वेगळं काढणं आणि त्यांनाच सर्व लाभ देणं हे मात्र सोनाखानच्या रहिवाशांना पसंत पडलेलं नाही.
वीर नारायणने जे बंडाचं, विरोधाचं राजकारण केलं त्याची हार झाली. आश्रयाचं राजकारण वरचढ ठरलं. एका सच्च्या लोकनायकाला अभिजनांनी आपलसं केलं आणि त्याची प्रतिमा पूर्ण धुळीला मिळाली. त्याने ज्या एकीचा पुरस्कार केला तिच्याही चिंधड्या झाल्या. ८० चं दशक अवतरलं होतं.
आमचा तिथला मुक्काम संपला. तोपर्यंत गावकऱ्यांचं मत थोडं निवळलं होतं. त्यांचा राग अस्थानी होता पण सार्थ होता. “खरं तर तो भला माणूस होता,” विजय पाइकरा म्हणतात. “तो आमच्या सगळ्यांसाठीच लढला होता की नाही? तो काही फक्त त्याच्या कुटुंबासाठी लढला नाही. तो निःस्वार्थी होता. मग सगळा लाभ एकाच कुटुंबाला का मिळावा?”
वीर नारायण सिंगची समाधी – “कुत्र्यांच्या” हवाली
सोनाखानमध्ये वीर नारायण दोनदा मेला. पहिल्यांदा, इंग्रज सरकारच्या हातून आणि दुसऱ्यांदा, मध्य प्रदेश सरकारच्या. त्याने उठवलेले सगळे प्रश्न मात्र आजही तितकेच ज्वलंत आहेत.
पूर्वप्रसिद्धी – २७ ऑगस्ट १९९७, द टाइम्स ऑफ इंडिया