सगळं बंद करण्याआधी थोडी तरी तयारी करण्यासाठी त्याला कसलाच वेळ का देण्यात आला नाही हे काही मोहम्मद खोकन याला कळत नाहीये. जर इतके दिवस सगळं ठप्प होणार आहे याची जरा जरी कल्पना असती तर त्याने खाण्यापिण्यासाठी काही पैसा बाजूला काढून ठेवला असता असं बृहत बंगळुलु महानगरपालिकेमध्ये सफाईचं काम करणारा खोकन सांगतो.
मोहम्मदचं घर दूर आहे – दक्षिण दिल्लीच्या वेशीवर असणारं, जसोला – एक ‘शहरी’ खेडं. बंगळुरुच्या उत्तरेला असणाऱ्या अमृतहळ्ळी भागातल्या सुक्या कचऱ्याच्या एका डंपिंग साइटवर तो काम करतो. आणि तिथेच राहतो. “आम्हाला जर या टाळेबंदीविषयी आधी कळालं असतं तर आम्ही गाठीला काही पैसा तरी ठेवला असता. माझ्या मुकादमाला भेटून मी आमचे काय हाल सुरू आहेत ते तरी सांगितलं असतं, थोडे फार पैसे मागितले असते,” तो सांगतो.
आता कसली कमाई नाही, सोबत काही अन्न पाणी नाही, मोहम्मद सांगतो की तो आता स्वयंसेवकांनी दिलेल्या अन्नाच्या पाकिटातनं जेवतोय. “सगळ्यांचीच मोठी अडचण झालीये कारण सगळं अचानकच जाहीर केलंय,” तो म्हणतो.
शहराच्या दक्षिणेच्या टोकाला, सुंदर रामस्वामी देखील हेच म्हणतात – टाळेबंदीआधी काहीच वेळ देण्यात आला नाही. “आम्हाला या सगळ्यासाठी काही तरी तयारी करता यायला पाहिजे होती – आम्ही सोबत थोडा तरी अन्नाचा साठा करून ठेवला असता. अन्नपाण्याशिवाय आम्ही घरात कसं बसून रहावं?” सुमारे चाळिशी पार केलेले सुंदर विचारतात. ते व्यावसायिक रंगकाम करतात.
मोहम्मदचं घर दूर आहे – दक्षिण दिल्लीच्या वेशीवर असणारं एक ‘शहरी’ खेडं - जसोला. बंगळुरुच्या उत्तरेच्या अमृतहळ्ळीतल्या सुक्या कचऱ्याच्या डंपिंग साइटवर तो काम करतो, तिथेच राहतो
जवळच्याच बनशंकरी परिसरातल्या पद्मनाभनगरमधल्या दलित संघर्ष समितीचे सुंदर अध्यक्ष आहेत. गेली १० वर्षं या भागात कार्यकर्ते म्हणून काम करणारे सुंदर सांगतात की त्यांना या आधी कसलीच अडचण आलेली नाही. “सध्या काही जण दिवसातून एकदाच जेवतायत.”
बनशंकरीच्या यारब नगर कॉलनीमध्ये, सुंदर यांच्या अंदाजानुसार ३०० कुटुंबं राहतात. सगळे रोजंदारीवर कामं करतात आणि आता खाण्याच्या शोधातही ते घराबाहेर पडत नाहीयेत – पोलिस त्यांना मारतील अशी त्यांना भीती आहे. पण सुंदर म्हणतात की त्यांच्याकडे कसलाही पर्याय नाहीये. या भागात अन्नाची पाकिटं देणाऱ्या स्वयंसेवी गटांमध्ये समन्वयाचं काम सध्या सुंदर करत आहेत. “जेव्हा अन्नच नसेल, तेव्हा ते काय करतील? ते रस्त्यावर येणारच,” ते म्हणतात.
यारब नगरमधल्या कुटुंबांना कसल्याही पद्धतीचं सामाजिक अंतर ठेवणं शक्य नाहीये, सुंदर सांगतात. “आम्ही घराबाहेर पडलो नाही तर आम्हाला मदत करण्यासाठी किंवा खाणं देण्यासाठी लोक आलेत हे तरी आम्हाला कसं कळणार आहे? सामाजिक अंतर ठेवून हे करणं मुश्किल आहे. तुम्ही तिथे हजर नसाल तर तुम्हाला खायलाच मिळणार नाही अशी लोकांना भीती वाटतीये.”
टाळेबंदीची पूर्वसूचना दिली असती तर चंदन प्रजापती आणि मंजय प्रजापती यांना उत्तर प्रदेशातल्या महाराजगंज जिल्ह्यातल्या आपल्या घरी परतता आलं असतं. ते दोघंही बंगळुरूत सुतारकाम करतात आणि सगळं कामकाज ठप्प करण्याआधी त्यांना इथून बाहेर पडू द्यायला हवं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. “आम्ही किमान आमच्या रानात राबून आमचं पोट भरलं असतं,” तीन वर्षांपूर्वी बंगळुरूला आलेला मंजय म्हणतो.
चंदन आणि मंजय दोघंही टाळेबंदीचे सगळे नियम काटेकोरपणे पाळतायत. पण त्यांना अन्नाची चिंता लागून राहिली आहे. “आम्ही जो काही पैसा बाजूला टाकला होता, तो आता संपलाय. आमचा मुकादम आमचा फोन उचलत नाहीये, त्यामुळे तो काही आमच्य मदतीला यायचा नाही हे आम्ही ताडलंय,” मंजय सांगतो.
चंदन आणि मंजयचं रेशन कार्ड महाराजगंज मधलं आहे. त्यांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी बंगळुरूमध्ये त्याचा वापर करता येत नाही. आगामी काळात काय घडू शकतं याची धास्ती घेतलेला चंदन सांगतो, “ही टाळेबंदी आणखी लांबणार असं सगळे म्हणतायत. आम्हाला आता चिंता लागून राहिलीये. हे असं आम्ही किती काळ तगून राहणार?”
सुंदर सांगतात की यारब नगरमध्ये ज्या कुटुंबांकडे रेशन कार्ड नाहीत त्यांना स्थानिक संस्थांच्या धान्य वाटपामध्ये प्राधान्य दिलं जात नाहीये.
मी निघाले तेव्हा सुंदर म्हणाले, “इथे येणारे बहुतेक जण आम्हाला अन्नधान्य देताना आमचे फोटो काढतात. तसं तुम्ही केलं नाहीत हे चांगलंय.”
या लेखातील मुलाखतींसाठी सहाय्य केल्याबद्दल सफाई कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या हासिरू दल या संस्थेचे आभार.
अनुवादः मेधा काळे