मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं ते २०१९ साली. बकिंगहम कॅनॉलमधून मी चाललो होतो. तिथल्या पाण्यात एखाद्या बदकाच्या चपळाईने त्या पाण्यात डुबकी मारत होत्या, पाण्याखाली पोहत होत्या. माझं लक्ष त्यांच्या हालचालींनीच वेधून घेतलं होतं. नदीच्या तळाशी असलेल्या रेतीतून त्या फटक्यात कोळंबी पकडतात. सगळ्यांपेक्षा वेगात.
गोविंदम्मा वेलु इरुलार समाजाच्या आहेत. तमिळ नाडूमध्ये त्यांची नोंद अनुसूचित जमातींमध्ये करण्यात येते. अगदी लहानपणापासून त्या चेन्नईच्या कोसस्थलैयार नदीच्या पाण्यात कोळंबी धरतायत. आता त्यांचं वय सत्तरीपार गेलंय. पण घरच्या हलाखीमुळे त्यांना आजही हे काम करण्यावाचून पर्याय नाही. डोळ्याला कमी दिसतंय, हाताला जखमा झाल्या आहेत. तरीही.
चेन्नईच्या उत्तरेकडे असलेल्या कोसस्थलैयार नदीशेजारून वाहणाऱ्या बकिंगहम कॅऩॉलमध्ये गोविंदम्मा त्यांच्या कामात मग्न होत्या तेव्हा मी हा व्हिडिओ घेतला. कोळंबी पकडता पकडता मधेमधे त्या आपल्या आयुष्याविषयी बोलतात. हे सोडून दुसरं कोणतंच काम मला येत नाही, हेही सांगतात.
गोविंदम्माच्या आयुष्याविषयी अधिक वाचाः अख्खं आयुष्य पाण्यात काढणाऱ्या गोविंदम्मा