गुलजार अहमद भट शांतपणे दल लेकच्या १५ नंबर घाटापाशी लाकडी बाकावर बसलाय. इतर शिकाराचालकांप्रमाणेच त्याच्याकडेही २ ऑगस्टपासून फारसं गिऱ्हाईक नाही. याच दिवशी जम्मू आणि काश्मीर सरकारने पर्यटकांना तात्काळ काश्मीर सोडून जाण्याची सूचना जारी केली. “आमचं सगळं भविष्यच डळमळीत झालंय. गेल्या १८ वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणावर बुकिंग [रद्द झालेलं] मी पाहिलं नाहीये,” ३२ वर्षीय गुलजार सांगतो.
१० ऑक्टोबर रोजी सरकारने ही सूचना मागे घेतली त्यानंतर शिकाऱ्यातून सफर करण्यासाठी मोजके लोक येऊ लागले आहेत. बहुतेक सगळे प्रवासी सहलींच्या मध्यस्थांमार्फत आले होते. त्यामुळे त्यांना भरपूर घासाघीस केली. “जर पर्यटक थेट आमच्याकडे आले तर दल लेकमधून गोल फिरून येण्यासाठी आम्ही ६०० रुपये घेतो [जो सरकार मान्य दर आहे]. पण याच फेरीसाठी मध्यस्थ मात्र आम्हाला २५० रुपये देतात. आणि सध्या अशी वेळ आहे की भाडं नाकारणंही शक्य नाही,” ४२ वर्षीय मेहराज-उद्-दिन पक्तू सांगतात. निम्मा नोव्हेंबर महिना संपत आला तरी अजूनही ते पर्यटकांची वाट पाहतायत. येऊ घातलेल्या कडाक्याच्या थंडीत आपलं कुटुंब तगून राहील अशी आजही त्यांना आशा आहे.
स्वतः शिकाऱ्याचे मालक शिकारा चालवतात किंवा मग चालकांना हंगामाला अंदाजे ३०,००० रुपये भाड्यावर दिले जातात. पर्यटनाच्या सहा महिन्यांच्या हंगामात शिकारा चालक २ ते २.५ लाखाची कमाई करू शकतात. शिकाऱ्याचं भाडं आणि इतर खर्च वगळता त्यांच्या हातात साधारणपणे १,८०,००० रुपये येतात. हे उत्पन्न संपूर्ण १२ महिन्यांमध्ये विभागलं तर – महिन्याला केवळ १५,००० रुपये इतकंच भरतं. हंगाम नसतो तेव्हा शिकारावाल्यांकडे दुसरं कसलंही काम नसतं, किंवा ते पडेल ती कामं करतात. काही जण तलावात घरच्यापुरती किंवा विक्रीसाठी मासेमारी करतात.
काश्मीर खोऱ्यातला पर्यटनाचा हंगाम साधारणपणे मे ते ऑक्टोबर असा असतो. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा या वर्षीप्रमाणे जर बर्फ लवकर पडायला लागलं तर शिकाऱ्याची सफर करणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होऊ लागते. गेल्या वर्षी, जे मुळातच पर्यटनाच्या दृष्टीने फारसं चांगलं वर्ष नव्हतं, त्या वर्षी भारतीय आणि परदेशी अशा ८.५ लाख पर्यटकांनी काश्मीर खोऱ्याला भेट दिली. या वर्षी या संख्येला ग्रहण लागलंय आणि प्रत्यक्षातले आकडे अजूनही स्पष्ट नाहीत.
एक नक्की, काश्मीरच्या सगळ्या सरोवरांमध्ये, दल लेकसह, नौकाविहार करणाऱ्या ४,८०० शिकाऱ्यांचं ऑगस्टपासून फार मोठं नुकसान झालं आहे, असं ६० वर्षीय वली मोहम्मद भट सांगतात. ते अखिल जम्मू काश्मीर टॅक्सी शिकारा मालक संघटना आणि अखिल जम्मू काश्मीर शिकारा चालक संघटनेचे अध्यक्ष आहेत. सोबतच दल लेक, निगीन लेक, मानसबल लेक आणि झेलम नदीतल्या ९६० हाउसबोट मालकांचीही तीच गत आहे, काश्मीर हाउसबोट मालक संघटनेचे जनरल सेक्रेटरी अब्दुल रशीह कल्लू सांगतात.
“एकट्या दल लेकमधल्या [जिथे ३७ घाट किंवा छोटे धक्के आहेत] शिकारावाल्यांचंच ८ कोटींहून जास्त नुकसान झालंय,” भट अंदाज वर्तवतात. काहींनी शिकारा विकत घेण्यासाठी वेगवेगळीकडून कर्जं काढलीयेत. नव्या शिकाऱ्याची किंमत दीड लाखापर्यंत जाते. आता त्यांना हप्ते भरणं शक्य होत नाहीये. काहींनी देणेकऱ्यांचा तगादा सहन न होऊन कर्ज फेडण्यासाठी शिकारे विकून टाकलेत. ज्या कुटुंबाचं पोट केवळ शिकाऱ्यावर होतं अशा कुटुंबांसाठी सरकारची नुकसान भरपाईची कसलीही योजना नाहीये.
अनुवादः मेधा काळे