हुर्रर्र...

हेहेहे...हो..हेहेहे..हो...

आणि बागेचं वरच आभाळ अचानक पक्ष्यांच्या थव्याने भरून गेलं. सूरजचे पुकारे ऐकून भेदरलेल्या पक्ष्यांनी आकाशात झेप घेतली होती. भुकेल्या पक्ष्यांच्या तावडीतून बागेतल्या फळांची राखण करण्याचं काम सूरज करतो. तो जोरात पुकारे करत, गलोलीने मातीचे गोळे म्हणजेच रोडा फेकून पक्षी हाकलतो.

पंजाबच्या वायव्येकडे असणाऱ्या तरन तारन जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं पट्टी हे गाव आपल्या फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. पेअर आणि पीचच्या फळबागांची निगा राखण्यासाठी स्थलांतिरत कामगार इथे कामाला येतात. त्यांचं काम म्हणजे क्षणात खाली झेपावत पिकलेल्या फळांना टोचा मारणाऱ्या पक्ष्य़ांना हाकलणे. सूरजसारख्या बागेची राखण करणाऱ्यांना राखे म्हणतात.

सूरज बहारदार ज्या बागेची राखण करतो तिथे दोन एकराच जवळपास १४४ पेअरची झाडं आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या काळात फळाचा बहार असतो. तेव्हा एकटा सूरज या बागेची राखण करतो. त्याला बागेचा मालक महिन्याला ८,००० रुपये पगार देतो.

“झाडांना मोहर लागला की जमीनमालक बागा गुत्त्यावर देऊन टाकतात. ठेकेदार या बागा घेतात आणि राखे नेमतात,” सूरज आम्हाला सांगतो. बहुतेर राखेस उत्तर प्रदेश आणि बिहारहून आलेले स्थलांतरित कामगार आहेत.

A pile of rodas (pellets) made from wet clay and a kaman (bow) are the tools of the caretaker's trade.
PHOTO • Kamaljit Kaur
Suraj is aiming with a kaman at birds in the orchard
PHOTO • Kamaljit Kaur

डावीकडेः रोड्यांचा म्हणजेच मातीच्या गोळ्यांचा ढीग आणि कमान किंवा गलोल ही राखणदाराची अस्त्रं. उजवीकडेः गलोलीने नेम धरून सूरज बागेतले पक्षी हाकलतोय

सूरज बिहारचा आहे. दोन हदार किलोमीटर प्रवास करून कामाच्या शोधात तो इथे बागांमध्ये पोचलाय. इथे यायचं म्हणजे आधी बिहारच्या अरारिया जिल्ह्यातल्या भागपरवाहा गावाहून सहरसा या मोठ्या शहरात पोचायचं. त्यानंतर तिथून रेल्वेने १,७३२ किलोमीटर प्रवास करून पंजाबमध्ये अमृतसरला पोचायचं. तिथून एक तासाच्या अंतरावर असलेल्या पट्टीला पोचण्यासाठी ठेकेदारांनी बसची सोय केलेली असते.

*****

सूरज बहारदार या बिहारमध्ये अति मागास वर्ग (ईबीसी) या प्रवर्गात मोडणाऱ्या समुदायाचा आहे. तो आठवीत शिकत होता पण घरची आर्थिक परिस्थिती बिकट होत गेली आणि त्याला शाळा सोडावी लागली. “माझ्यापुढे काही पर्यायच नव्हता. पण मी इथनं घरी गेलो ना की माझ्या पैशातून मी माझी शाळा पुन्हा सुरु करेन.”

पंजाबच्या माझा क्षेत्र प्रांतात असलेलं पट्टी हे गाव तरन तारन शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. पाकिस्तानातलं लाहोर इथून एका तासाच्या अंतररावर. इथल्या बहुतेक बागा इथल्या जट्टा म्हणजे जाट या ‘वरच्या’ जातीच्या लोकांच्या मालकीच्या आहेत. फळबागांशिवाय त्यांच्याकडे शेतजमिनीही आहेत. तिथे धान्यपिकं घेतली जातात.

पेअर आणि पीचच्या बागांप्रमाणेच पेरूच्या बागांमध्येही वर्षातून दोनदा राखणीसाठी मजूर नेमावे लागतात. कधी कधी गावातल्याच कोणाला तरी राखणदार म्हणून नेमलं जातं. किंवा ठेकेदार या भागात स्थायिक झालेल्या स्थलांतरित कामगारांना कामावर ठेवतात.

बिहारहून कामासाठी स्थलांतरित झालेले कामगार वयाने मोठे असतात. सूरजसारखा छोटा मुलगा फळबागेत राखे म्हणून काम करतोय हे जरासं अवचितच. हा किशोरवयीन मुलगा पक्षी हाकलत असतो, एरवी स्वयंपाक करत सतो, कपडे वाळत घालत असतो आणि इतरही घरातली कामं करत असतो. सूरज सांगतो की इथले मालक त्याला घराची साफसफाई करायला लावतात, किराणा किंवा घरी काही सामान लागणार असेल तर ते आणायला लावतात. “बागेची राखण करण्याच्या बोलीवर बाकीचं इतकं सगळं काम करावं लागणार हे मला माहित असतं, तर मी कामाला आलोच नसतो,” बिहारमध्ये परत गेल्यावर फोनवर सूरज म्हणतो.

Suraj's meagre food rations on the table.
PHOTO • Kamaljit Kaur
He is crafting pellets (right) from wet clay
PHOTO • Kamaljit Kaur

डावीकडेः सूरजच्या घरातला अगदी मोजका किराणा. ओल्या मातीचे छर्रे किंवा गोळे (उजवीकडे) करण्याचं काम सुरू आहे

एप्रिलमध्ये झाडांना मोहर येतो आणि पट्टीमध्ये बागांमध्ये कामं सुरू होतात. ऑगस्टमध्ये फळांची तोडणी होते तोपर्यंत हे काम सुरू असतं. बागांमध्ये राहण्यासाठी पक्कं छत नाही काही नाही, अशा स्थितीत पाच महिने हे मजूर काम करतात. झाडांच्या मध्येच ताडपत्री अंथरून बांबूची खोप उभारली जाते. उन्हाळ्यात जमीन गरम होते आणि पावसाळ्यात हवा दमट. आणि सापांना, काही विषारी जातीच्या सापांनाही निमंत्रणच मिळतं.

सूरज म्हणतो, “पैसे कमवणं इतकं गरजेचं आहे की या असल्या सरपटणाऱ्या भयंकर प्राण्यांची भीतीदेखील त्यापुढे फिकी पडावी.” काम सोडून रिकाम्या हाताने घरी परत जाणं हा पर्यायच त्याच्यापुढे नाही.

*****

पट्टीच्या शिंगारा सिंह यांनी तीन एकर पेरूची बाग गुत्त्याने घेतलीये. ते आणि त्यांची बायको दोघं इथे राखे आहेत. ४९ वर्षीय शिंगारा मेहरा शीख आहेत आणि पंजाबमध्ये त्यांची गणना मागास वर्गात (बीसी) केली जाते. दोन वर्षांसाठी बागेचे १.२ लाख रुपये त्यांनी दिले आहेत. शिंगारा सिंह सांगतात, “मला बाग कमीच पैशात मिळाली. मालकाने झाडांच्या संख्येवर पैसे ठरवले. बागेच्या एकूण क्षेत्रफळाप्रमाणे नाही.”

बहुतेक लोक एका एकरात पेरूची ५५-५६ झाडं लावतात. पण या संपूर्ण बागेत फक्त ६० झाडं आहेत. शिंगारा सिंह यांना मंडीत फळं विकून त्यातून वर्षभरात ५०,००० ते ५५,००० उत्पन्न मिळतं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यात फारसा पैसा नसल्याने राखणीला दुसऱ्या कुणाला कामावर ठेवणं परवडत नाही.

“पुढची दोन वर्षं ही बाग आमची असणार आहे. हिवाळ्यात आम्ही पेरुसोबत झाडांच्या मधल्या मोकळ्या जमिनीत भाज्या लावतो आणि मंडीत विकतो,” शिंगारा सांगतात. “उन्हाळ्यात मात्र सगळी कमाई केवळ बागेतल्या फळांवरच अवलंबून असते.”

बागेची राखण करताना येणाऱ्या मुख्य अडचणी, ते सांगतात “आता पक्ष्यांचंच पहा, पोपट सगळ्यात जास्त त्रास देतात. त्यांचं सगळ्यात आवडतं फळ म्हणजे पेरू. अख्खं फळ खा, आमचं काहीही म्हणणं नाही. पण त्यांना फक्त आतला गर खायचा असतो. बाकीचा पेरु ते चावून चोथा करून फेकून देतात.”

Shingara Singh in his three-acre guava orchard in Patti. Along with fruits, turnip is also cultivated
PHOTO • Kamaljit Kaur
A temporary camp (right) in the orchard
PHOTO • Kamaljit Kaur

डावीकडेः शिंगारा सिंह पट्टीत आपल्या तीन एकर पेरूच्या बागेत. पेरूंसोबत शलगम देखील लावलाय. बागेत उभारलेली खोप (उजवीकडे)

पण सिंह सांगतात त्यावरून असं दिसतंय की पोपटांमध्येही काही खलनायक आहेत. “पोपटांमध्ये अलेक्झांड्रिन जातीचे पोपट सगळ्यात जास्त नुकसान करतात. जर का त्यांचा अख्खा थवा इथे बागेत उतरला, तर बाग संपलीच म्हणून समजा.” अशा वेळी मात्र राखणदारांना सूरज वापरतो तशा गलोलींचा भेदक मारा करावा लागतो.

गावातल्या लोकांच्या तुलनेत सूरजसारखे स्थलांतरित मजूर कमी पैशात काम करतात. “यूपी, बिहारमधले कमी पैशात कामाला तयार होतात. ठेकेदारांनाही त्यांची नोंदणी वगैरे भानगडी कराव्या लागत नाहीत,” शिंगारा म्हणतात.

२०११ साली झालेल्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश आणि बिहारमधून अशा कामांसाठी सगळ्यात जास्त प्रमाणावर स्थलांतर झालं आहे. आणि यातले बहुतेक कामगार पिढ्या न् पिढ्या परिघावर फेकल्या गेलेल्या समुदायांमधले असतात. कारखाने, शेती, वीटभट्ट्या आणि फळबागांमध्ये ते मजुरी करतात. आश्चर्याची बाब म्हणजे सरकार दफ्तरी त्यांची कुठलीही नोंद नाही. कामगारांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटना आणि इतर संस्थांकडे त्यांची सविस्तर नोंदणी करण्यासाठी पुरेशी संसाधनं नाहीत.

सामाजिक कार्यकर्ते असलेले कंवलजित सिंह सांगतात, “स्थलांतरित कामगारांपुढे दुहेरी पेच असतो. आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायद्याने असे मजूर आणि त्यांना नेमणारे मालक यांची नोंदणी बंधनकारक केली आहे. जवळपास कुणीच या कायद्याचं पालन करत नाही.” सिंह भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) या पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य आहेत. “परिणामी, कामासाठी इथे येणाऱ्या स्थलांतरित कामगारांबद्दल कसलीही आकडेवारी उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा अर्थातच त्यांना लाभ मिळू दिला जात नाही.”

*****

Suraj getting ready to scare birds away with a kaman. He was hoping he could earn enough from this job to get back into school
PHOTO • Kamaljit Kaur

सूरज गलोल घेऊन पक्षी हाकलण्यासाठी सज्ज आहे. शाळा परत सुरू करता येईल इतके पैसे तर हाती यावेत अशी मनात बाळगून

दोन एकराच्या या बागेत पेअरची जवळपास १४४ झाडं आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या काळात फळाचा बहार असतो तेव्हा एकटा सूरज या बागेची राखण करतो. त्याला बागेचा मालक महिन्याला ८,००० रुपये पगार देतो.

बिहारच्या अरारियामध्ये भागपरवाहा गावी सूरजचे वडील अनिरुद्ध बहारदार पटवाऱ्याच्या हाताखाली काम करतात. त्यांना महिन्याला १२,००० रुपये पगार मिळतो. भूमीहीन बहारदार कुटुंबाच्या कमाईचा हा एकमेव पक्का स्रोत आहे. सूरज सांगतो की त्याने कामासाठी इतक्या लांब यावं अशी त्याच्या वडलांची बिलकुल इच्छा नव्हती. पण दुसरा काहीच पर्याय नव्हता. “आमचे एक नातेवाईक म्हणत होते की इथे भरपूर पैसा मिळतो,” सूरज सांगतो. अशा रितीने तो पंजाबात दाखल झाला.

सहा जणांचं बहारदार कुटुंब कौलारू घरात राहतं. सूरजची आई सुरती देवी सांगतात, “पावसाळ्यात सगळं पाणी गळतं. आमच्या गावातली सगळी घरं मातीची आहेत. थोड्याच घरांना पत्र्याचं छप्पर आहे.” सूरजने पंजाबमध्ये काम करून घरी पैसा पाठवला तो घराच्या दुरुस्तीवर खर्च झाला. त्याची इच्छा असली तरी शिक्षणावर काही नाही. “माझी इच्छा असो नसो, मला परत पंजाबला यावं लागणार असं दिसतंय,” घरी परत गेल्यानंतर फोनवर तो मला सांगतो.

सुरती देवी, वय ३५ घरचं सगळं काम पाहतात आणि गरज पडेल तेव्हा मजुरीही करतात. सूरजचे धाकटे तिघं भाऊ सरकारी शाळेत जातात. १३ वर्षांचा नीरज सहावीत आहे, ११ वर्षांचा बिपिन चौथीत आणि सगळ्यात धाकटा ६ वर्षांचा आशिष बालवाडीत आहे. या कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही. त्यांनी अडीच एकर जमीन खंडाने कसायला घेतली आहे. त्यात १.५ एकरात तळं खोदून त्यांनी त्यात मासे सोडले आहेत. उरलेल्या एक एकरात ते भातशेती करतात आणि भाजीपाला लावतात. सूरज घरी असला की तो मंडईत भाजी विकतो. वर्षभरातून या विक्रीतून त्यांची २०,००० रुपयांची कमाई होऊ शकते. पण खात्रीने काहीच सांगू शकत नाही.

सूरज आता त्याच्या घरी असला तरी भविष्यात त्याच्यापुढे काय वाढून ठेवलंय हे काही त्याला माहित नाही. त्याला पैसे कमवण्यासाठी परत पंजाबला जावं लागू शकतं. त्याला मात्र अगदी मनापासून पुढे शिकायचंय. “बाकीच्या मुलांना शाळेत जाताना पाहिलं की मला राहवत नाही.”

Kamaljit Kaur

कमलजीत कौर, पंजाब की रहने वाली हैं और एक स्वतंत्र अनुवादक हैं. उन्होंने पंजाबी साहित्य में एमए किया है. कमलजीत समता और समानता की दुनिया में विश्वास करती हैं, और इसे संभव बनाने की दिशा में प्रयासरत हैं.

की अन्य स्टोरी Kamaljit Kaur
Editor : Devesh

देवेश एक कवि, पत्रकार, फ़िल्ममेकर, और अनुवादक हैं. वह पीपल्स आर्काइव ऑफ़ रूरल इंडिया के हिन्दी एडिटर हैं और बतौर ‘ट्रांसलेशंस एडिटर: हिन्दी’ भी काम करते हैं.

की अन्य स्टोरी Devesh