वाघाची डरकाळी. कुत्र्याचं भुंकणं. आणि माणसांचा जोरजोरात आरडाओरडा ऐकायला येतो.
चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर तुम्ही असलात तर या आवाजांमध्ये वावगं असं काही नाही.
वेगळं मात्र निश्चित आहे. कारण हे वेगवेगळे आवाज मांगी गावातल्या एका स्पीकरवरून येत होते. आणि ते चक्क रेकॉर्ड केलेले होते. विदर्भातल्या या गावातल्या तुरीच्या आणि कपाशीच्या रानात मध्यावरती एका बांबूला मेगाफोन लटकवलाय. बॅटरीवर चालणाऱ्या कीटकनाशक फवारणीच्या पंपाला तो जोडलेला आहे.
“हा भोंगा रात्री वाजवला नाही तर रानडुकरं किंवा नीलगायी येऊन सगळी पिकं खाऊन जातील,” ४८ वर्षीय सुरेश रेंघे सांगतात. जंगली जनावरांना घाबरवण्यासाठी त्यांनी केलेली ही सगळ्यात नवी युक्ती आहे. “त्यांना तूर आणि हरभरा फार आवडतो,” ते सांगतात. पिकांची प्रचंड नासाडी होते हे सांगायलाच नको.
सौरऊर्जेवर चालणारं किंवा विजेचा प्रवाह सोडलेलं कुंपण घातलं तरी या प्राण्यांना थोपवणं अशक्य झाल्यामुळे ते मेगाफोनची पिन बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपाच्या सॉकेटमध्ये घालतात. आणि अचानक जंगली प्राणी आणि माणसांचे जोरजोरात आवाज हवेत घुमायला लागतात.
रेंघे आपल्या १७ एकर रानात वेगवेगळी पिकं घेतात – कपास, हरभरा, तूर, मिरची, मूग, सोयाबीन आणि भुईमूग. शिवाय इतरही काही पिकं असतात.
रेंघेंसारखे असे भोंगे विदर्भातल्या ग्रामीण भागातल्या शेकडो गावांमध्ये तुम्हाला पहायला मिळतात.
या भोंग्यांनी जंगली जनावरं तर घाबरतातच पण “क्वचित कधी रिकाम्या रस्त्याने मोटारसायकलवर जाणारा कुणी प्रवासी देखील अचानक घाबरून जातो,” रेंघे म्हणतात. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मात्र हसू फुटतं.
मांगी गावाच्या सभोवताली झुडपी आणि सागाचं जंगल आहे. यवतमाळत्या राळेगाव तालुक्यातल्या नागपूर-पांढरकवडा महामार्गावर आतमध्ये हे गाव आहे. त्याच्या पूर्वेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प असून यामध्ये महाराष्ट्रातल्या ३१५ वाघांपैकी ८२ वाघ आहेत. गावाच्या राहतात.पश्चिमेला यवतमाळ जिल्ह्यातलं टिपेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्यात फक्त वाघ नाही तर बिबट, अस्वल, शिकारी कुत्री, गवा, चितळ आणि सांबर असे सगळे प्राणी राहतात – आणि या सगळ्यांपासूनच पिकांना धोका आहे.
८५० लोकवस्तीचं हे गाव या दोन अभयारण्यांच्या मधल्या पट्ट्यात आहे. मांगी गावाच्या समस्या झुडपी जंगलांनी वेढलेल्या, अधून मधून शेतजमिनी असलेल्या सगळ्याच गावांच्या समस्या आहेत. जंगलं दाट होती तेव्हा वन्यप्राण्यांना आवश्यक ते पाणी आणि अन्न जंगलाच्या आतच मिळत होतं. पण आता मात्र रेंघेंच्या रानात उभं असलेलं पीक त्यांच्यासाठी शिकारीचं मैदान झालं आहे.
“एक तरी त्यांनी हे प्राणी घेऊन जावं किंवा त्यांना मारण्याची परवानगी तरी द्यावी,” या समस्येसाठी वनखातं जबाबदार असल्याचं म्हणत शेतकरी आपलं गाऱ्हाणं मांडतात. “हे त्यांचे [वनखात्याचे] प्राणी आहेत,” सगळीकडे हाच सूर ऐकू येतो.
वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या तरतुदींमुळे वन्यप्राण्याची हत्या केल्यास किंवा पकडण्यासाठी सापळा लावल्यास “किमान एक ते सात वर्ष तुरुंगवास आणि किमान पाच हजार रुपये दंड” अशी शिक्षा होऊ शकते. प्राण्यांमुळे पिकाचं नुकसान कळवण्याची तरतूद कायद्यात केलेली असली तरी ही सगळी प्रक्रिया अतिशय किचकट आहे. शिवाय देण्यात येणारी भरपाई देखील अगदीच तुटपुंजी आहे. वाचाः ‘हा एक नवीन प्रकारचा दुष्काळच आहे’
रानडुकरं, हरणं किंवा नीलगायी शक्यतो बारा, वीस-बावीस किंवा त्याहून मोठ्या कळपाने येतात. “तुम्ही नसताना का ते शेतात शिरले,” रेंघे म्हणतात, “तुमच्या पिकाचं नुकसान केलं म्हणून समजा.”
माणसाचा वावर असला तर प्राणी येत नाहीत. पण मांगीचे शेतकरी आताशा रात्री गस्त घालत नाहीत. तब्येतीवर ताण येतोच पण जिवालाही धोका असतो. त्यापरीस गावांमध्ये ही असली उपकरणं, यंत्रं जास्त लोकप्रिय ठरतायत.
“मी माझ्या तब्येतीमुळे रोज रात्री काही जागलीवर शेतात राहू शकत नाही,” रेंघे सांगतात. “त्याला हा आम्ही पर्याय काढलाय.” बरं हे वापरायलाही सोपं आणि खिशाला फार भारही नाही. या भोंग्याच्या आवाजामुळे माणसं आसपास असल्याचा भास तयार होतो. पण, रेंघे म्हणतात तसं, “त्यातही फॉल्ट होतो. प्राणी तरीही येतात आणि पिकं खाऊन जातात.”
काहीच न करण्यापेक्षा ही युक्ती काही वाईट नाही.
*****
फक्त यवतमाळच नाही तर कपाशीचा प्रदेश असलेल्या विदर्भातली बहुतेक शेती कोरडवाहू किंवा पावसावर अवलंबून आहे. पण सध्या मांगी गावाजवळ सुरू असलेल्या बाभूळगाव इथल्या बेंबळा धरणाचं काम पूर्ण झालं की परिस्थिती बदलेल. कालव्याचं पाणी पाटाने गावात येऊन दुबार पिकं घेणं शक्य होईल, त्यातून चार पैसे जास्त मिळतील अशी इथल्या शेतकऱ्यांना आशा आहे.
“रानात एकाहून जास्त पिकं म्हणजे या वन्यप्राण्यांची चैनच,” रेंघे म्हणतात. “अहो प्राणी फार हुशार असतात. त्यांना माहित आहे की आपण परत परत इथे या शेतात येऊन ताव मारू शकतो.”
यवतमाळमधला हा जास्त करून कपास आणि सोयाबीन पिकवणारा पट्टा आहे. गेल्या दोन दशकांपासून शेतीवर आलेल्या अरिष्टामुळे इथे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कुठलंही सरकारी कर्ज मिळत नाही, कर्जाचा वाढता डोंगर, कोरडवाहू शेती, शेतमालाच्या भावातले तीव्र चढ-उतार, घटत चाललेली कमाई आणि लागवडीच्या खर्चात होत असलेली भरमसाठ वाढ या सगळ्या चिंतांनी शेतकऱ्यांना ग्रासलं आहे. जंगली प्राण्यांची शेतातली घुसखोरी आणि पिकांवरच्या “नकोशा किडी” सारख्याच असल्याचं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
२०२१ साली मी पहिल्यांदा मांगी गावाला भेट दिली. तेव्हा कापूस वेचून झाला होता. तुरीच्या शेंगांनी झाडं लगडलेली होती. रेंघेंच्या शेतातली मिरची पुढच्या महिनाभरात काढणीसाठी तयार होणार होती.
पिकं काढणीच्या वेळीच जंगली प्राण्यांचा वावर वाढतो आणि बराचसा माल त्यांच्या तोंडी जातो. जानेवारी २०२१ ते फेब्रुवारी २०२३ या दोन वर्षांच्या काळात पारीने रेंघेंची अनेकदा भेट घेतली आणि या काळात जंगली जनावरांमुळे त्यांच्या पिकांचं बऱ्याचदा नुकसान झालं होतं.
शेवटी अगदी हातघाईला येऊन त्यांनी भोंगा असलेल्या या छोट्या इलेक्ट्रॉनिक बॉक्सवर पैसे खर्च करायचं ठरवलं. सौरऊर्जेवर चालणाऱ्या या यंत्राची सध्या इथल्या बाजारात चांगलीच चलती आहे. स्वस्तातली चायनीज यंत्रं पण मिळतात. गावातल्याच दुकानात सहज मिळत असल्याने लोकांमध्ये ती बरीच लोकप्रिय झाली आहेत. बॅटरी किती काळ चालते, चांगलं साहित्य वापरलं आहे का अशा सगळ्या गोष्टींवर किंमत ठरते – रु. २०० ते रु. १,०००. हे यंत्र दारापाशी लावण्यात येणाऱ्या घंटेएवढं असून त्याची बॅटरी किमान ६-७ तास चालते. सौरऊर्जेवर चालणाऱ्या फवारणी यंत्रांवरही त्याचं चार्जिंग होऊ शकतं. शेतकरी शक्यतो दिवसभरात चार्जिंग करतात आणि रात्री ते वाजवतात. रानात मध्यभागी एक खांब रोवून त्यावर अडकवून टाकायचं.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतीवरील अरिष्ट यासाठी यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. जंगली प्राण्यांची शेतातली घुसखोरी ‘नकोशा किडींसारखी’ असल्याचं शेतकरी म्हणतात
गेल्या एक वर्षात विदर्भात ठिकठिकाणी मी इतक्या विविध तऱ्हेचे असले भोंगे आणि आवाज करणारी यंत्रं पाहिली म्हणून सांगू. रात्री एकदम दणक्यात आवाज सुरू असतो.
“आम्ही काही वर्षांपूर्वी हे भोंगे वापरायला सुरुवात केली,” रमेश सरोदे सांगतात. मांगीमध्ये त्यांची चार एकर जमीन आहे. शेतात अनेक बुजगावणी उभी केल्यानंतरही त्यांनी हा भोंगा शेतात बसवलाच. “दिवसभर आम्ही फटाके फोडायचो. पण एक तर त्यात पैसा जास्त जातो आणि ते काही सोपं नाही. हा भोंगा कसा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात मिळतो.”
सगळे शेतकरी रानातून घरी जाण्याआधी भोंगा सुरू करून ठेवतात. शेतातले हे प्राण्यांचे आवाज काही किलोमीटरवर आपल्या घरी देखील त्यांना ऐकू येतात. पण काही चुकार प्राणी यालाही घाबरणार नाहीत हे जाणून रेंघेंनी एक वाऱ्यावर सुरू होणाऱ्या पंख्यावर वाजणारी एक थाळी देखील शेतात बसवून घेतली आहे. शेताच्या दुसऱ्या टोकाला एका लाकडी खांबाला ही थाळी अडकवून टाकलीये. तेवढंच मनाला समाधान.
“मनाच्या तसल्लीसाठी करतो जी हे,” रेंघे अगदी ओशाळं हसून म्हणतात. “का करता!”
यातसुद्धा एक मेख आहे. शेतातल्या भोंग्यांचा आवाज तर होतो पण माणसाचा किंवा राखणीवरच्या कुत्र्याचा “वास येत नाही न.” त्यामुळे जनावरं घाबरतीलच असं काही सांगता येत नाही.
*****
“काढणीच्या वेळी जर आम्ही दिरंगाई केली तर ५० किंवा १०० टक्के पीक गेलंच समजा,” रेंघे म्हणतात.
आपल्या मातृभाषेत, वऱ्हाडीत रेंघे म्हणतात, “अजी त्ये सप्प साफ करते.”
२०२३ साली फेब्रुवारीच्या मध्यावर आम्ही त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या त्यांच्या रानातून फेरफटका मारत होतो. रेंघेंनी तिथे पडलेली शिट दाखवली – रानडुकरं रब्बीच्या गव्हात घुसून गेल्याच्या स्पष्ट खुणाच तिथे दिसत होत्या.
अगदी मिरचीची रोपंही त्यांच्या तडाख्यातून वाचत नाहीत. “मोर मिरची खातो की,” रेंघे सांगतात. लाल-हिरव्या मिरच्यांनी लगडलेल्या रोपांच्या वाफ्यातून आम्ही जात होतो. “त्यांच्या पिसाऱ्यावर भुलू नका. ते पण फार नुकसान करतात,” ते म्हणतात. एक-दोन एकरात ते भुईमूग करतात. एप्रिलच्या मध्यावर तो काढणीला येतो. रानडुकरांना भुईमूग भारी आवडतो.
पिकांच्या नुकसानीने पार कंबरडं मोडायची वेळ येते. त्यात हे भोंगे आणि बॅटऱ्यांचा खर्च वाढतो तो वेगळाच. कुणी पूर्ण रानाला कडेने सिंथेटिक साड्या बांधतं. रेंघेंनी कापडात डांबराच्या गोळ्या बांधून त्या पुरचुंड्या शेतात अधेमधे काठ्या खोवून बांधून टाकल्या आहेत. कुणी तरी म्हटलं की डांबराच्या गोळ्यांचा वास उग्र असतो आणि त्याने जंगली प्राणी निघून जातात म्हणून. खरं तर यातल्या काही युक्त्यांचा कसलाच परिणाम होत नाही. पण ते काहीही करून पहायला तयार आहेत.
“यावर आमच्यापाशी काहीच उपाय नाही,” सरोदे अगदी वैतागून म्हणतात. त्यांचा शेताचा एक छोटा तुकडा आहे. तो ते आजकाल पडक ठेवतात. दुसऱ्या मोठ्या रानाला तो लागून नाही. “रातभर राखण करावी तर तब्येत बिघडते. झोपावं तर पिकाची नुकसानी. का करावं सांगा!”
विदर्भाच्या अनेक भागात जिथे शिवारांमध्ये अधून मधून जंगल आहे तिथे ही समस्या आता इतकी गंभीर झाली आहे की छोटे आणि सीमांत शेतकरी चक्क शेतं पडीक ठेवू लागले आहेत. पीक घेण्यासाठी लागणारा खर्च, वेळ आणि कष्ट आणि नंतर पिकाचं नुकसान सहन करण्याची ताकद आता त्यांच्यात उरलेली नाही. शिवाय दिवसरात्र डोळ्यात तेल घालून राखण करायची, त्यातून येणारी आजारपणं वेगळीच.
जंगली प्राण्यांशी तुम्ही कसे काय चार हात करणार असं हसत हसत म्हणणाऱ्या या शेतकऱ्यांनी आता काही माल त्यांच्या तोंडी जाणार हे मनाशी मान्य केलंय.
दररोज सकाळी रेंघे जेव्हा शेतात येतात तेव्हा सगळं काही धड असू दे अशीच मनात प्रार्थना करत असतात. दुसरं मन मात्र वाइटाचा मुकाबला करायला सज्ज असतं.