या आठवड्यात जात्यावरच्या ओव्यांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या कोळवडे गावच्या मुक्ताबाई उभे आणि सीताबाई उभेंनी गायलेल्या पंढरपूरच्या वारीवरच्या पाच ओव्या सादर करत आहोत.

ओव्यांच्या या मालिकेत पंढरपूरच्या वारीवरच्या या पाच ओव्या. वर्षातून दोनदा पंढरीची वारी होते. विठ्ठलाचे भक्त (म्हणजेच विठोबा किंवा पांडुरंग) महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरला पायी जातात. त्यांच्या माउलीला पंढरीला जाऊन भेटतात. या साऱ्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे की विठोबा त्यांचं ऐकतो, त्यांची काळजी घेतो आणि त्याचं स्थान या सगळ्यांच्या मनात माऊलीसारखं, आईसारखं आहे. एकवीस दिवस पायी चालत पंढरीला पोचणारा हा वारकरी.

हिंदू कालगणनेप्रमाणे वर्षातून दोनदा पंढरपूरची वारी निघते. पहिली आषाढात (जून-जुलै) आणि दुसरी कार्तिकात (ऑक्टोबर-नोव्हेंबर). आषाढी वारी जास्त प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे कारण अगदी परेण्यांनंतर ती सुरू होते. वारीला जाणाऱ्यांमध्ये शेतकरी आहेत, धनगर आहेत, गुराखी आहेत आणि ग्रामीण भागातले बहुसंख्य लोक आहेत. गावाकडनं शहरात कामासाठी येऊन स्थायिक झालेले कित्येक जणही नेमाने वारी करतात.

तेराव्या शतकात ज्ञानेश्वरी लिहून भगवद् गीता मराठीमध्ये आणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या घराण्यात वारीची परंपरा होती. ते नेमाने वारी करत. १७व्या शतकात संत तुकारामांनीदेखील वारीची परंपरा कायम ठेवली. त्यांनी लिहिलेल्या गाथा तुकाराम गाथा म्हणून प्रसिद्ध आहेत. तेराव्या शतकातल्या जनाबाई, मुक्ताबाई आणि नामदेवांसारख्या संतांनीही वारी केली आहे.

या सगळ्या संतांचं दैवत म्हणजे विठ्ठल. हे सगळे भक्ती परंपरेतले थोर कवी. भक्ती परंपरा सातव्या शतकात दक्षिणेत सुरू झाली आणि १२ व्या ते १८ व्या शतकात उत्तरेकडे पसरली. अतिशय प्रगत असणाऱ्या या परंपरेतली कवनं, अभंग समाज सुधारण्यासाठी लिहिले गेले आहेत.

PHOTO • Namita Waikar

संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून निघते. संत तुकारामांची पालखी देहूहून. पंढरपूरच्या वाटेवर पुण्यामध्ये दोन्ही पालख्या एकत्र येतात

आता पुणे जिल्ह्यातल्या दोन गावांहून दोन वेगवेगळ्या पालख्या घेऊन वारी निघते. संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून तर संत तुकारामांची पालखी देहूहून निघते. या पालखी सोहळ्यातल्या दोन्ही पालख्या वाजत गाजत पुण्यात येतात, दोन दिवस एकत्र मुक्काम करतात आणि पुढे जातात. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून सासवड मार्गे जाते तर तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर, यवतमार्गे मार्गस्थ होते. पुढे वाखरीला त्या परत भेटतात आणि त्यानंतर पंढरपूरला पोचण्याआधी त्या एकत्र येतात.

महाराष्ट्रातल्या अनेक गावातल्या, शहरातल्या दिंड्या वारीत सामील होतात. त्याशिवाय मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्रातल्या भक्ती परंपरेतल्या इतर संतांच्या सन्मानार्थ निघालेल्या दिंड्या, पालख्याही पंढरपूरच्या मार्गावर विविध टप्प्यांवर वारीत सहभागी होतात.

PHOTO • Namita Waikar

चौथ्या ओवीत सीताबाई उभे त्यांच्या भावाला सांगतात , मीही तुझ्याबरोबर पंढरीला येते आहे...

पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या कोळवड्यातली एक वाडी खडकवाडी. तिथल्या मुक्ताबाई उभे आणि सीताबाई उभे पंढरीच्या वारीवरच्या पाच ओव्या इथे गातायत. जात्यावरच्या ओव्या गोळा करणाऱ्या टीमने ६ जानेवारी १९९६ ला या ओव्या रेकॉर्ड केल्या. आम्ही ३० एप्रिल २०१७ रोजी कोळवड्याला या दोघींना भेटलो. त्या भेटीतले त्यांचे फोटो इथे दिले आहेत.

मुक्ताबाई सुरुवात करताना म्हणतात की पंढरीला जायचं त्यांचं मन नव्हतं, पण पंढरपूरच्या विठोबारायाने त्यांना दोन चिठ्ठ्या पाठवल्या आणि बोलावून घेतलं. सगळ्या वारकऱ्यांची अशी गाढ श्रद्धा आहे की विठाबाराया त्यांना भेटायला आतुर झालेला असतो आणि त्यांना बोलावून घेतो.

दुसऱ्या ओवीत त्या गातात की पंढरीला जायला त्या आदल्या दिवसापासूनच तयार आहेत. विठोबा त्यांना घ्यायला आलाय आणि त्याची शिंगी, घोडी नदीकिनारी चरतीये.

पंढरीच्या वाटेवर न्यायला पीठ, कूट सगळा शिधा कालच तयार ठेवलाय असं पुढच्या ओवीत गायलंय. आपल्या मुलाला ती सगळं सामान हौशा बैलावर नीट लादायला सांगतीये.

चौथ्या ओवीत ती तिच्या भावाला सांगतीये, दादा, मी तुझ्याबरोबर पंढरीला यायला निघालीये, दोघं मिळून आपण चंद्रभागेमध्ये आंघोळी करू या.

विठ्ठलाला भेटण्याआधी सगळे भक्त चंद्रभागेमध्ये स्नान करतात, त्याने सगळी पापं धुतली जातात असं मानलं जातं.

शेवटच्या ओवीमध्ये ती सांगतीये की जणू चंद्रभागेत न्हाल्यासारखे तिचे केस मोकळे, निर्मळ झालेत, तरीही तिला पंढरीला गेल्यासारखं काही वाटत नाहीये. त्यामुळे ती निघणारच आहे.

पंढरी जाया यंदा नव्हतं माझं मन
देव त्या विठ्ठलानं चिठ्ठ्या पाठवल्या दोन

पंढरीला जाया माझी कालची तयारी
विठ्ठल मुराळी शिंगी चरती नाहायरी

पंढरीला जायाला माझं कालंच पीठकुट
सांगते बाळा तुला बैल हवशाव घालं मोट

पंढरी जायायाला दादा येते मी तुझ्या संगं
आपुण आंघोळ्या करु दोघं

आज मोकळं माझं केस चंद्रभागेत न्हाल्यावाणी
पंढरीला जाते, नाही वाटत गेल्यावाणी


PHOTO • Samyukta Shastri

मुक्ताबाई उभे , कलाकार-गायिका , त्यांना वाचनाची आवड आहे


कलाकार – मुक्ताबाई उभे, सीताबाई उभे

गाव – कोळावडे

वाडी - खडकवाडी

तालुका – मुळशी

जिल्हा – पुणे

जात – मराठा

दिनांक  – हे तपशील आणि या ओव्या ६ जानेवारी १९९६ रोजी रेकॉर्ड करण्यात आल्या. छायाचित्रं ३० एप्रिल २०१७ रोजी घेण्यात आली.


लेखमाला संपादक - शर्मिला जोशी

पोस्टर – संयुक्ता शास्त्री आणि सिंचिता माजी

PARI GSP Team

पारी ग्राइंडमिल सॉन्ग्स प्रोजेक्ट टीम: आशा ओगाले (ट्रांसलेशन); बर्नार्ड बेल (डिजीटाइज़ेशन, डेटाबेस डिज़ाइन, डेवलपमेंट ऐंड मेंटेनेंस); जितेंद्र मैड (ट्रांसक्रिप्शन, ट्रांसलेशन असिस्टेंस); नमिता वाईकर (प्रोजेक्ट लीड ऐंड क्यूरेशन); रजनी खलदकर (डेटा एंट्री)

की अन्य स्टोरी PARI GSP Team
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले