गेला आठवडाभर ती झोपली नव्हती. ती आणि तिचे काही सहकारी जुन्या कहाण्या, कथा आणि दंतकथा खणून काढत आधुनिक आर्यावर्तात फिरत होते. यमुनेचं एकेकाळचं हे सुपीक खोरं जवळजवळ मृत झालंय, हे ठाऊक होतं तिला; पण आता मात्र जे दिसत होतं, तो तिच्या आयुष्यात तिला लागलेला सर्वात भयंकर शोध होता! जसजसं खणत जावं, तसतसे दिसत होते मानवी सांगाडे, कवट्या आणि करड्या जमिनीतून डोकावणारी पांढरीशुभ्र हाडं... हा भयानक स्मशानघाट पाहून तिच्या उत्सुकतेची जागा भयंकर भीतीनं कधी घेतली, तिलाच कळलं नाही.
काही ठिकाणी मात्र त्यांना वेगळं काही मिळालं. जिथे शरयू नदी होती तिथे, काही किलोमीटर अंतरावर एका पुरातन मंदिराचे अवशेष होते. दगडांचा ढीग होता. त्या दगडांवर तांब्याच्या चकत्या लावलेल्या होत्या. अगदी वेगळी वास्तुशैली होती ही, कोणत्यातरी खूपच पुरातन काळाकडे इशारा करणारी. तिथेच तिला काही विटाही मिळाल्या, ज्यावर अनोळखी लिपीतली काही अक्षरं कोरलेली होती. याआधी यमुनेच्या पश्चिम तीरावर एका थडग्यासारख्या बांधकामातल्या दगडांवरही त्यांना अशीच अक्षरं कोरलेली मिळाली होती. तिला त्याची आठवण झाली. काही उंच पुतळेही मिळाले होते. काही १८२ मीटरचे... काही त्याहूनही उंच. पण या सगळ्याला पुरून उरणारे होते ते मानवी सांगाडे! प्रचंड संख्येने होते ते.
आणि या सगळ्याच्या मधोमध त्यांना एक त्रिकोणी बांधकाम दिसलं, राजाचा दरबार असावा तसं. विचित्र दिसणारा एक राजप्रासादही होता तिथे. यमुनेच्या काठी ज्यांचे सांगाडे दिसले होते, त्या लोकांचा राजा असावा तो कदाचित. तिला खूप भीती वाटली हे सगळं बघून. तिने त्या भागाला नाव दिलं, ‘स्मशान नगर.’ वाकडे तिकडे मोडून पडलेले खांब त्या थडग्यांच्या मधून दिसत होते. असं एवढं मोठं कोणतं हत्याकांड घडलं होतं इतिहासात...? तिच्यासोबत असलेले इतिहासतज्ज्ञ, पुरातत्त्वशास्त्रज्ञ आठवण्याचा, अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते.
सरताज!
ही कविता राजासाठी... हो, त्याच
राजासाठी
जो आपल्या आलिशान रथात बसून चिरडत
राहिला सारी धरती
जळत राहिल्या चिता, भरत राहिली कब्रस्तानं
जणू लकवा झाला आयुष्याला, मुठीतून
ओघळून गेलं आयुष्य वाळूसारखं.
लोक धडपडत राहिले, रडत राहिले, ओरडत
राहिले श्वास घेण्यासाठी
राजा मात्र मश्गुल, आपल्याच सुखात,
आपल्याच स्वर्गात
सगळं काही आलबेल आहे, असा स्वतःचा
समज करून घेत
चकचकीत, झगमगीत, त्याला सुंदर
छोटासा घुमट
रिता केला खजिना त्याने बांधण्यासाठी
राजमहल
मेलेल्यांना कुठे आलीय राहायला जागा
हकालपट्टी झाली, त्यांना थेट रस्ता!
अंत्यविधी नाहीत, कफन नाही, नाही
शेवटचा निरोपही
आमच्या हृदयांना जखमा, हातांना
कापरं
प्रत्येक फोन उचलताना
आणखी एक मृत्यू तर नसेल,
कुणा नातेवाईकाचा, कुणा मित्राचा,
कुणा शिक्षकाचा.
हा राजा मात्र...
आपल्या महालातून उंचावरून हसून
पाहाणारा
छोट्याशा विषाणूवर विजय मिळवल्याच्या
बढाया मारणारा!
आशा करूया, स्वतःच्याच प्रेमात
असणार्या ‘ओझिमंडियास’सारखा
एखाद्या कहाणीतच तो लक्षात राहील
बलाढ्य साम्राज्याचाही नाश अटळ असतो... आपल्याला आठवत राहील!
ध्वनी: सुधन्वा देशपांडे ‘जन नाट्य मंच’सोबत काम करणारे अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. ते ‘लेफ्टवर्ड बुक्स’ या प्रकाशन संस्थेमध्ये संपादक आहेत.