'चंद्र बदनी खोलो द्वार / तिहारे मनमोहन ठाढ़े हैं होली खेलन को' (‘ चंद्र तनु दार उघड / तुझा मनमोहन होळी खेळण्यासाठी बाहेर खोळंबला आहे. )
मार्चच्या थंडीत एका दुपारी, पंचाचुली शिखरांच्या पायथ्याशी महिलांचा आवाज घुमत होता. सकाळी पाऊस होऊन गेलेला, आणि नभ अजूनही दाटलेले होते. मी पिथौरागढ जिल्ह्याच्या मुनस्यारी विभागात होते. तेथील सरमोली गावातल्या पंचायतीच्या कार्यालयाजवळ पोचता पोचताच, ढोलकीची थाप मोठी होत गेली. डोंगराचे वळण पार करताच विस्तीर्ण मोकळ्या आकाशाखाली, हिमालयाच्या छायेत दहा-बारा महिला फेर धरून गाणी गात होत्या, नाचत होत्या.
उत्तराखंडच्या कुमाऊँ प्रदेशात, या वर्षी होळी ८ मार्चला सुरू झाली. इथे होळी केवळ रंगांपुरती मर्यादित नसून, तो संगीत, ताल आणि सुमधुर गाण्यांचा उत्सव असतो. या प्रदेशात होळी विविध प्रकारे आणि अनेक रूपात साजरी केली जाते आणि त्या सगळ्याचा गाभा आहे संगीत. वर्षाच्या या वेळी केवळ महिलाच नाही तर पुरूषदेखील सुरेल होलियार - होळी गायक बनतात.
कुमाऊँच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये बराच काळ चालणारी ‘बैठकी होळी’ लोकप्रिय आहे. महिलांच्या बैठका त्यांच्या घरी होतात. त्या बाजाची पेटी, तबला आणि ढोलाच्या तालावर हिंदी, ब्रजभाषा, अवधी आणि कुमाऊँनी या भाषांमधली गाणी गातात.
"आमच्यासाठी हसण्याची, मजा करण्याची, मोठ्याने गायची आणि नाचायची फक्त हीच वेळ आहे. इतर वेळी आमचा सगळा वेळ शेती, मुले आणि गुरांमध्ये जातो. गाण्यांतून आम्ही एकमेकींची थट्टा-मस्करी करतो किंवा गावातील लफडी आवडीने चघळतो. तुम्ही त्यांना नाचताना पाहिलं नाहीत तर डोंगररांगांमध्ये गुपचूप मान खाली घालून अपार मेहनत करणाऱ्या याच त्या स्त्रिया आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही," सरमोलीच्या सुंदरी लचपाल सांगतात.
बैठकी होळी १९व्या शतकाच्या मध्यावर . उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्याचे प्रख्यात संगीतकार उस्ताद अमानुल्लाह खान यांनी अल्मोरात सर्वप्रथम बैठकी होळी सादर केली होती. "असे म्हणतात की १८५०च्या सुमारास, खान यांनी अल्मोरात येऊन शास्त्रीय संगीताची सुरुवात केली," अल्मोराचे होळी गायक नवीन बिश्त सांगतात. "असे असले तरी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे काहीही ज्ञान नसलेले लोक देखील होळीची गाणी शिकू शकतात आणि गाऊ शकतात. म्हणूनच होळी गायकांची परंपरा अजूनही येथे टिकून आहे."
हिंदू कालगणनेनुसार, कुमाऊँत होळी डिसेंबरमध्ये, पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरु होते. पण उत्सवात खरा रंग भरतो तो मार्चमध्ये धुळवडीच्या एक आठवडा आधी. याच सुमारास, बैठकी असणारी होळी खडी होते. आता सर्व उभं राहून, नाचून वसंताच्या आगमनाचा उत्सव साजरा करतात. काही गावांमध्ये, महिला घरोघरी जाऊन होळीच्या गाण्यांवर नाचतात.
याशिवाय महिला होळीदेखील साजरी केली जाते. होळीच्या एक आठवडा आधी केवळ महिला घरांमध्ये आणि देवळांमध्ये ही होळी साजरी करतात. एकत्र येऊन, नृत्य करून त्या राधा-कृष्ण, गणेश आणि शंकरासाठी गाणी गातात.
मार्चच्या सुरुवातीला, मी पिथौरागढ जिल्ह्याच्या मुनस्यारी विभागातील गावांमध्ये तीन महिला होळी उत्सवांमध्ये सहभागी झाले. समुद्रसपाटीपासून २,२७० मीटर उंचीवर वसलेल्या कथेत थंडगार मुनस्यारीतील (‘बर्फाळ स्थान’) उत्सव या छायाचित्र कथेत रेखाटले आहेत. यात कुमाऊँ महिलांनी गायलेली गाणीदेखील रेकोर्ड केलेली आहेत.
सुंदरी लचपाल ढोलकी वाजवतायत आणि त्या तालावर सरमोलीच्या पंचायतीच्या कार्यालयाबाहेर महिला गाणी गात फेर धरून नाचतायत. ढोलकीला बांधलेल्या फिती इष्ट देवतेला प्रसन्न करण्यासाठी आहेत.
पंचायतीच्या कार्यालयाजवळ महिला पोहचताच, इतर जणी त्यांच्या कपाळाला गुलाल लावतात - जसा जसा उत्सव रंगत जातो, तसतशी हवेतली गुलालाची उधळणही वाढत जाते.
व्हिडिओ पहा: फेर धरून नाचत होळीचे गीत गाताना सरमोली गावातल्या महिला . डोंगररांगांमध्ये अजूनही थंडी आहे, आणि फेर धरून नाचणाऱ्या महिलांच्या मधोमध पेटविलेला विस्तव उत्सवात अजूनच ऊब आणत आहे
सुंदरी लचपालकडून हिरा देवी ढोलकी घेताना. महिला आळीपाळीने नाचतायत, तर ८ वर्षांचा भावेश सिंग उत्साहाने टाळ वाजवित आहे. सरमोलीत महिला होळी पाच दिवस चालते
चुलीवर जवळजवळ ५० जणींसाठी वाफाळता चहा तयार होतोय. भजी, हलवा, चिप्स आणि चहा सर्वांना दिला जातो. महिला हळूहळू सगळ्या पाड्यांवर वस्तीत उत्सव साजरा करत जातात, प्रत्येक पाड्यावर तिथले गट या महिलांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. "महिला एका दिवशी गावातल्या एका भागात तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागात उत्सवाचे आयोजन करतातजेणेकरून प्रत्येकालाच होळीचं आयोजन करण्याची संधी मिळेल. यासाठी येणारा खर्च सर्व जण वाटून घेतात. ," घोरपट्टा मल्ला गावाच्या मंजु त्रिपाठी सांगतात
व्हिडिओ पहा: घोरपट्टा मल्ला गावाच्या रजनी जोशी मथुरेत होळीच्या गीतावर नृत्य करत आहेत
९ मार्चला घोरपट्टा मल्लाच्या महिला बैठकी होळी साजरी करताना. होळी गीतांच्या पुस्तकातून त्या राधा-कृष्ण, शिव आणि गणेश यांची गाणी गातायत
ढोलकी आणि डफ हे कुमाऊँनी होळीचे अत्यावश्यक घटक आहेत ढोलकी आणि डफ असल्याशिवाय कुमाऊँनी होळी साजरीच होऊ शकत नाही.??
बैठकीच्या होळी नंतर खडी(उभी) होळी येते – येथे आजच्या यजमान, मंजु त्रिपाठी आणि सात वर्षांची चेतना सिंग होळीच्या गीतांवर नाचत आहेत
सरमोलीत, माटी संगठनच्या एका-खोलीच्या कार्यालयात, दारकोट, नानसेम, नया बस्ती, सरमोली आणि संकधुरा येथून आलेल्या महिला बसल्या आहेत. ही संघटना महिला होळी चा उत्सव साजरा करण्यासाठी गावकऱ्यांच्या घरांमध्ये राहण्याची सोय उपलब्ध करून देते. बाहेर नुकतीच बर्फ पडायला सुरुवात झाली आहे.
महिला एकमेकींना गुलाल लावताना, पाऊस आणि बर्फवृष्टी असतानाही कितीतरी जणी उत्साहाने होळीसाठी येऊ लागल्या आहेत
व्हिडिओ पहा: हे गीत आहे: 'जोहार आणि मुनस्यारी ही रंगीबेरंगीआणि प्रसन्न ठिकाणे आहेत. माझे हृदय जोहार आणि मुनस्यारीत वसले आहे. मी नाचते आणि मी गाते...'
१० मार्चला, मुनस्यारीची गावे बर्फाने आच्छादलेली आहेत. डोंगररांगांमध्ये उत्सवाची गाणी निनादत असताना पंचाचुलीची हस्तिदंती शिखरे उत्सव पाहण्यात मग्न आहेत.