गणेश वडंद्रेंच्या रानातल्या कपाशीच्या बोंडांवरचे काळे डाग सगळ्या शास्त्रज्ञांना एकच ओरडून सांगतायत – जा, यावर काही उतारा शोधा.

“अळी आत गेल्याची बिळं आहेत ही,” वडंद्रे सांगतात. वर्ध्याच्या आमगाव (खुर्द)चे पाच एकर रान असणारे आणि गावात मान असणारे वडंद्रे सांगतात. इथनंच बोंडअळी आत शिरली असणार, वडंद्रे म्हणतात.

“जर हे बोंड आपण फोडून पाहिलं, तर आतमध्ये गुलाबी अळी बोंड फस्त करताना सापडेल,” ते सांगतात. त्यांच्या आवाजातला राग आणि चिंता लपत नाही. त्यांनी बोंड फोडताच आतमधली अगदी नखाएवढी गुलाबी अळी दचकून हलली, जणू काही ती आम्हाला रामराम करत असावी. कापूस तयार होण्याआधीच तिने बोंड आतून पोखरलं होतं, त्यामुळे आता त्याचा उपयोग शून्य.

२०१७ च्या नोव्हेंबरमध्ये मी वडंद्रेना भेटलो होतो. तेव्हा या ४२ वर्षीय शेतकऱ्याने मला सांगितलं की “एक अळी हजारो अंडी घालते आणि काही दिवसांतच त्यापासून लाखो अळ्या तयार होतात.”

ही अळी बोंडांमध्ये आत जाऊन बसते त्यामुळे बोंडं उलेपर्यंत शेतकऱ्यांना कसलाच पत्ता लागत नाही. कापूस काढणीच्या वेळी किंवा बाजारात कापूस विकायला नेला की अचानक शेतकऱ्यांना धक्का बसतो कारण अळी असलेल्या कापसाला खूपच कमी भाव मिळतो.

वडंद्रेंची कहाणी महाराष्ट्रातल्या सगळ्यात कापूस शेतकऱ्यांची कहाणी आहे. खासकरून विदर्भाच्या कापूस पट्ट्यात २०१७-१८ च्या हिवाळ्यात कापसाच्या वेचणीच्या वेळी तर हेच चित्र सगळीकडे पहायला मिळत होतं. या प्रदेशात शक्यतो जुलै-ऑगस्ट दरम्यान कापूस लावला जातो आणि ऑक्टोबर ते मार्च दरम्यान वेचणी होते.

बोंडअळीच्या हल्ल्यात शेकडो हेक्टर रानातला कापूस वाया गेला. गेल्या ३० वर्षात झालं नाही असं नुकसान या अळीने केलं. वडंद्रेंच्या रानाला लागून असलेल्या शेतांमध्ये बोंडअळीच्या हल्ल्याच्या सगळ्या खुणा स्पष्ट दिसत होत्याः काळी पडलेली, सुकून गेलेली आणि डागाळलेली बोंडं, उलल्यावर दिसणारा काळपट रंगाचा, कमी प्रतीचा आणि कमी भाव येणारा कापूस.

याच अळीच्या धास्तीने जुलै ते नोव्हेंबर २०१७ या काळात काहीही करून आपला कापूस वाचवण्याची धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांनी विषारी कीटकनाशकांचा बेसुमार वापर केला, पण त्यांना काय कल्पना होती की कशानेच ही बोंडअळी मरणार नाही म्हणून. (पहा रसशोषक अळ्या, जीवघेणे फवारे )


“ही अळी कोणत्याच कीटकनाशकाला दाद देत नाही,” वडंद्रे सांगतात. “ती तितकी भयानक आहे. आता या बीटी कपाशीचा काय उपयोग, सांगा.”

A man in cotton farm
PHOTO • Jaideep Hardikar
a man showing pest-infested boll of cotton
PHOTO • Jaideep Hardikar

आमगाव (खुर्द) चे गणेश वडंद्रे त्यांच्या रानातली बोंडअळीची लागण झालेली बोंडं पाहतानाः ‘ही अळी कोणत्याच कीटकनाशकाला दाद देत नाही. ती तितकी भयानक आहे. आता या बीटी-कपाशीचा काय उपयोग, सांगा.’

विहिरीच्या पाण्यावर भिजलेल्या आपल्या एक एकर कपाशीच्या रानात वडंद्रेंचा सरासरी १५ क्विंटल कापूस निघायचा – यंदा मात्र त्यांना फक्त पाच क्विंटल कापूस झालाय. वडंद्रेंच्या हिशोबानुसार त्यांचं एकरी ५० हजाराचं नुकसान झालंय. आणि हा त्यांच्यासाठी प्रचंड मोठा आकडा आहे.

पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या, सिंचनाची सोय नसलेल्या रानांमध्ये तर या हंगामात एकरी तीन क्विंटलदेखील कापूस निघाला नाहीये. राज्य शासनानेही नुकसान भरपाई जाहीर केली आहे – हेक्टरी रु. १०,००० आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत लाभ मिळू शकेल. वडंद्रे पात्र ठरले तर त्यांना काही तरी मदत मिळेल.

गावचे तलाठी आणि (राज्याच्या महसूल आणि कृषी विभागाचे) कृषी सेवक यांनी नोव्हेंबर आणि पुन्हा फेब्रुवारीमध्ये केलेल्या पीक पाहणीनुसार राज्याच्या कपाशीखालच्या तब्बल ४२ लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळ जवळ ८० टक्के क्षेत्राला बोंडअळीचा फटका बसलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं उभ्या पिकातलं किमान ३३ टक्के ते ५० टक्के पीक हातचं गेलं आहे.

जानेवारी २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी खात्याने कपाशीच्या उत्पादनात आणि कापसाच्या गासड्यांमध्ये ४० टक्क्यांची घट आल्याचं नोंदवलं आहे, म्हणजेच एक प्रकारे बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचं मान्य केलं आहे. या राज्यात दर वर्षी ९० लाख गासड्यांचं उत्पादन होतं (प्रत्येक गासडीत १७२ किलो कापूस). एक क्विंटल कपाशीत ३४ किलो कापूस आणि ६५ किलो सरकी असते (कापसाचं बी, जिचं तेल निघतं आणि सरकी पेंड पशुखाद्य म्हणून वापरतात) आणि काही टक्के काडी-कचरा. मार्च २०१८ मध्ये विदर्भातल्या बाजारात एक क्विंटल कापसाला ४,८०० ते ५,००० रुपये इतका भाव मिळत होता.

२०१७-१८ मध्ये भारतात १३० लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. काही अहवालांनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आढळला. गुजरात, जिथे दोन वर्षांपूर्वी या अळीचा हल्ला झाला होता, तिथे लवकर वेचणीला येणाऱ्या वाणाची लागवड करण्यात आली, जेणेकरून हिवाळा सुरु होण्याआधी पीक हातात येईल. कारण बोंड अळीची वाढ थंडीत झपाट्याने होते.

भारत सरकारच्या कृषी खात्याने याची दखल घेतली तरी महाराष्ट्र आणि इतर राज्यांनी बीटी कापसाचं नाव यादीतून वगळण्याची मागणी मात्र नाकारली आहे – असं केल्यास बीटी कापसाला दिलेला विशेष दर्जा जाईल आणि इतर कोणत्याही कापसाच्या वाणाप्रमाणे बीटीची गणना होईल, कारण त्याची प्रभाविता गेलेली आहे (याचा परिणाम बियाण्याच्या किंमतीवर, बी निर्मात्या कंपनीच्या नफ्यावर होणार आह. याविषयी पारीवर एक वेगळा लेख लवकरच.) उलटपक्षी जुलै २०१७ मध्ये केंद्राने कापूस उत्पादक राज्यांना बोंडअळीच्या हल्ल्यावर राज्याच्या पातळीवर “सर्व हितसंबंध असणाऱ्यांच्या सहभागातून” मार्ग काढायला सांगितलं.

बोंडअळीचा पुनःश्च फेरा

बोंडअळीची लागण परत सुरू झाल्याची धोक्याची घंटा २०१५ मध्येच वाजली होती. त्या वर्षी भारतातल्या कापूस संशोधन संस्थांना जनुकीय सुधारित बीटी तंत्रज्ञान अपयशी ठरत असल्याने चिंतेने घेरलं होतं. सर्वच कापूस उत्पादक राज्यांमध्ये बोंडअळीची लागण पुन्हा होऊ लागल्याचे अहवाल येऊ लागले होते, गुजरात आणि महाराष्ट्रासह.

२०१० साली या गुलाबी अळीची लागण झाल्याचं वृत्त काही ठिकाणहून आलं होतं. मात्र नोव्हेंबर २०१५ मध्ये गुजरातमध्ये कापसावर प्रचंड प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. इंचभर असणारी ही गुलाबी अळी बिनघोरपणे कापसाची बोंडं आतून पोखरत होती आणि अर्थातच याच अळीला प्रतिरोध करण्यासाठी जनुकीय बदल केलेलं कापासाचं महागडं वाण त्या कामी सपशेल अपयशी ठरत होतं हेच त्यातून दिसून आलं.

नोव्हेंबर २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातल्या एका शेतकरी महिलेने भेट द्यायला आलेल्या कापूस तज्ज्ञांपुढे तिच्या रानातल्या कपाशीची काही बोंडं उकलून आत काय आहे ते दाखवलं. “ती भयंकर संतापलेली होती,” त्या गटाचे प्रमुख डॉ. केशव क्रांती सांगत होते. मी फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांना भेटलो होतो. डॉ. क्रांती तेव्हा केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर इथे संचालक होते आणि सध्या ते वॉशिंग्टन स्थित आंतरराष्ट्रीय कापूस मार्गदर्शक समितीचे संचालक (तांत्रिक) आहेत.

त्या शेतकरी महिलेला तिचं नुकसान डोळ्यापुढे दिसत होतं आणि तिचा संताप त्यातूनच आलेला होताः त्या इवल्याशा पण चिवट अळीने तिचं पीक तर खाल्लं होतंच पण जो काही कापूस हाती आला असता त्याचा दर्जाही या प्रादुर्भावामुळे खालावणार होता. या गुलाबी रंगाच्या अळीने कपाशीची हिरवी बोंडं आतून पूर्ण पोखरली आहेत हे पाहून शास्त्रज्ञ अवाक झाले होतेच मात्र त्यांना समोर दिसतंय त्या पलिकडे काही गोष्टींची चिंता लागून राहिली होती.


Farmer spraying pesticide in the cotton farm
PHOTO • Jaideep Hardikar
The worm on the cotton ball
PHOTO • Jaideep Hardikar

गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर विषारी कीटकनाशकं फवारली गेली. उजवीकडेः बोंडात अळी शिरल्याच्या खुणा स्पष्ट दिसतायत

पेक्टिनोफोरा गॉसिपिएला (सॉण्डर्स), जिला जास्तकरून गुलाबी बोंडअळी म्हणून ओळखलं जातं अशी ही अळी तब्बल तीस वर्षांनंतर भारतात परत आली – आणि आली ती सूड उगवायलाच. ती आरामात बोंडअळीपासून संरक्षित अशा बोलगार्ड – २ या बीटी कपाशीच्या बोंडांवर ताव मारत होती. बोंडअळीला प्रतिरोध करण्याचं तंत्र जनुकीय बदल करून विकसित केलेलं दुसऱ्या फळीचं सर्वशक्तीमान असं हे बीटी कापसाचं वाण होतं. आणि क्रांतींना ज्याची भीती होती ती अमेरिकन बोंडअळी देखील (तिच्या पूर्वजांमुळे तिला हे नाव मिळालंय) परत येऊ शकते याचा हा सूचक इशारा होता (अजून तरी ही अळी परत आलेली नाही).

गुलाबी बोंडअळी (कापूस संशोधन संस्थेच्या कापूस संशोधकांच्या मानण्यानुसार हिचा उगम भारत-पाकिस्तानातला आहे) आणि अमेरिकन बोंडअळी या दोन अळ्यांनी १९७० आणि १९८० या दशकांमध्ये कापूस शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. १९९० मध्ये या अळ्यांचा मुकाबला करण्यासाठी संकरित बियाण्यावर लागू पडतील अशी नवी कीडनाशकं विकसित करण्यात आली होती. नव्वदचं दशक संपता संपता, जेव्हा भारतात बीटी कापसाचं वाण येऊ लागलं होतं – ज्यात संकरित बियाण्यामध्ये बीटी जनुक घातलेलं होतं – तेव्हा या दोन्ही अळ्यांवर ते प्रभावी ठरेल असा कयास होता.

२०१५-१६ च्या कापूस हंगामात परत एकदा कपाशीच्या हजारो एकरांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आणि उत्पादनात ७-८ टक्के घट झाली, असं कापूस संशोधन संस्थेचे क्षेत्र अभ्यास दाखवतात.

गुलाबी बोंडअळी फक्त कापूस, भेंडी, जास्वंद आणि ताग अशा काहीच पिकांवर जगते. ती फुलं, कोवळी बोंडं, पाकळ्या आणि नवतीवर अंडी घालते. अंड्यातून बाहेर येताच दोन दिवसात या अळीची पिल्लं फुलाच्या स्त्रीबीजकोशात किंवा बोंडांमध्ये शिरतात. ३-४ दिवसांत त्यांचा रंग गुलाबी होतो, त्या जे अन्न खातात त्यावर हा रंग अवलंबून असतो – जर पिकलेलं बी खाल्लं तर त्या गडद गुलाबी होतात. अळीची लागण झालेली बोंडं पिकण्याआधीच उलतात किंवा सडून जातात. धाग्याचा दर्जा, उदा. लांबी आणि चिवटपणा कमी होतो. बोंडातल्या कापसाला इतरही जंतूंची लागण होऊ शकते.


बाजारात नेलेल्या सरकीतूनही ही अळी पसरते. गुलाबी बोंडअळी शक्यतो हिवाळ्याच्या सुरुवातीला येते आणि कोवळी बोंडं आणि फुलं आहेत तोवर जिवंत राहते. जास्त कालावधीच्या कपाशीच्या वाणामुळे या अळीला जास्त काळ जिवंत राहता येतं, तिची जास्त जीवनचक्रं होतात आणि त्यामुळे हाती येणाऱ्या पिकाच्या दर्जावर परिणाम होतो. या अळीची जनुकीय रचना अशी आहे की जर कोणत्या पिकात आसरा मिळाला नाही तर ती निद्रावस्थेत जाते आणि पुढच्या हंगामापर्यंत, अगदी ६-८ महिने त्याच अवस्थेत राहते.

सर्वदूर चिंता पण पर्याय नाही

२०१६ चा मे उजाडला तोपर्यंत बोंडअळी परतून आली आहे या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या अहवालांनंतर दिल्लीत भरलेल्या दोन बैठकांमध्ये याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषद (ICSR) या कृषी आणि वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रातल्या अग्रणी संस्थांनी या बैठका भरवल्या होत्या. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातले प्रकल्प जनुकीय बदल केलेल्या पिकांना काही पर्याय सुचवू शकतात का यावर अधिकाऱ्यांनी चर्चा केली.

“बोंडअळी परत आली आहे यात काही शंकाच नाही,” भारतीय कापूस संघाच्या कापूस – सांख्यिकी आणि वार्ता या प्रकाशनातल्या २०१६ च्या लेखात डॉ. क्रांती यांनी नमूद केलं होतं. “बीटी कापसाची बोंडअळीला प्रतिकार करण्याची प्रभाविता आपण २०२० पर्यंत जास्तीत जास्त कशी टिकवून ठेवू शकतो हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे,” ते लिहितात.

जनुकीय बदल केलेल्या कोणत्याच इतर कापूस तंत्रज्ञानाला – भारतीय सार्वजनिक क्षेत्रातल्या किंवा खाजगी क्षेत्रातल्या – चाचणी पश्चात व्यावसायिक वापरासाठी २०२० पर्यंत परवानगी मिळण्याची शक्यता नाही. जीएम बियाण्याच्या क्षेत्रात सध्या तरी सार्वजनिक क्षेत्राचा फारसा वावर नाही, अगदी मोजक्या काही कृषी संस्था मका, सोयाबीन, वांगी आणि भाताच्या काही जीएम वाणांवर संशोधन करतायत इतकंच.

आयसीएआर-आयसीएसआर बैठकांमध्ये बोंडअळीवर नियंत्रण मिळवण्याच्या विविध पर्यायांवर शास्त्रज्ञांनी खल केला. “भारतासाठी सध्या उपलब्ध असलेला सर्वात उत्तम पर्याय म्हणजे कमी कालावधीच्या संकरित बीटी कापसाच्या वाणाची निर्मिती किंवा असं वाण जे जानेवारीच्या आधीच वेचणीला येईल,” २०१६ मध्ये मला क्रांती यांनी असं सांगितलं होतं. असं झाल्यास बोंडअळीला अटकाव करता येईल कारण तिचा प्रादुर्भाव हिवाळ्यातच होतो. मात्र बहुतेक भारतीय कंपन्या जास्त कालावधीच्या बीटी कापसाच्या संकरित वाणांची निर्मिती करतात.

त्या वर्षी २०१७-१८ च्या तुलनेत बोंडअळीचा प्रादुर्भाव बराच कमी होता.


Rotten cotton on the tree
PHOTO • Jaideep Hardikar

२०१७-१८ च्या हिवाळ्यातली वेचणीच्या वेळची सुकलेली कपास आणि बोंडं, वडंद्रेंना जोमदार पीक येण्याची आशा होती पण बोंडअळीने त्यावर पाणी फिरवलं

बीटी कापूस तोंडघशी


“मोठा गाजावाजा केलेलं हे तंत्रज्ञान [बीटी-कापूस किंवा बीजी-१ आणि पुढच्या फळीचं बीजी-२] सपशेल तोंडघशी पडलं आहे,” क्रांतींनी २०१६ मध्ये माझ्यापाशी हे मत व्यक्त केलं होतं. “याचा अर्थ हा की आता शेतकऱ्यांना कमी प्रभावी असणाऱ्या बीजी-१ आणि बीजी-२ तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावं लागणार आहे आणि पुन्हा एकदा बोंडअळी आणि इतर काही किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर सुरू करावा लागणार आहे.”

बीटी कापसाचं नाव बॅसिलस थुरिन्जिएन्सिस या मातीत आढळणाऱ्या एका जीवाणूवरून आलं आहे. बीटी बियाण्यामध्ये या जीवाणूतली crystal जनुकं कपाशीच्या बीच्या जनुकांमध्ये प्रत्यारोपित केली जातात ज्याद्वारे बोंडअळीपासून रोपाला संरक्षण मिळतं.

बीटी कापसाने बोंडअळीवर नियंत्रण मिळवणं अपेक्षित होतं. पण आता मात्र बीटी कापसाच्या रानामध्ये बोंडअळी मुक्त वावर करणार हे औद्योगिक वार्तापत्रांमध्ये आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या त्यांच्या स्वतःच्या ब्लॉगमधल्या अनेक लेखांमध्ये क्रांती यांनी मांडलं होतं. यातून पुढे किती मोठा धोका उद्भवू शकतो याचं भान ना आयसीएआरला होतं ना केंद्रीय कृषी खात्याला. तेव्हापासून आतापर्यंत राज्य आणि केंद्र सरकारला बोंड अळीमुळे होत असणाऱ्या विनाशाची पूर्ण कल्पना आहे मात्र त्यावरचा उपाय मात्र आजपावेतो समोर आलेला नाही.

मोन्सॅन्टो या बियाण्यांमधील जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीची भारताच्या बीटी कापूस बियाण्याच्या बाजारावर संपूर्ण मक्तेदारी आहे. भारत सरकारने २००२-२००३ मध्ये बीटी कापसाच्या विक्रीला परवानगी दिली. मोन्सॅन्टोने भारतीय बी कंपन्यांना ‘तंत्रज्ञान हस्तांतरित केले’ ज्यासाठी बियाण्याच्या प्रत्येक बॅगमागे २० टक्के हिस्सा स्वामित्व शुल्क किंवा रॉयल्टी म्हणून मोन्सॅन्टोला दिला जातो. यामागचा उदात्त हेतू हा होता कीटकनाशकांचा वापर कमी व्हावा आणि कापसाचं उत्पादन वाढावं – या दोन्हीवरचा कळीचा उपाय म्हणून बीटी कापसाचं समर्थन करण्यात आलं होतं.

पहिल्या वर्षी ४०० ग्रॅम बीटी कापसाच्या संकरित बियाण्याची बॅग १८०० रुपयाला मिळत होती. कालांतराने केंद्र आणि राज्य सरकारने रॉयल्टी कमी करून अंततः बियाण्याची किंमत करण्याच्या दृष्टीने हस्तक्षेप केला. तरीही, पहिल्या काही वर्षांमध्ये बीटी कापसाच्या बियाण्याच्या ४०० ग्रॅम बॅगेची किंमत एक हजाराच्या आसपास राहिली, मोन्सॅन्टोचा २० टक्के हिस्सा मात्र तसाच कायम राहिला असं कपाशीच्या बियाण्यातले जाणकार सांगतात. २०१६ मध्ये डॉ. क्रांती यांनी लिहिलं होतं की भारतातला कपाशीच्या बियाण्याचा बाजार किमान रु. ४८०० कोटी असावा असा अंदाज आहे.

बीटी कापसाचा जागतिक व्यापार तब्बल २२६ लाख हेक्टर इतका पसरलेला आहे आणि यातल्या केवळ १६० लाख हेक्टरपर्यंत खाजगी तंत्रज्ञान दाते पोचले आहेत. २०१४-१५ मध्ये भारतात ११५ लाख हेक्टरवर बीटी कापसाची लागवड करण्यात आली होती. २००६-०७ मध्ये मोन्सॅन्टोने बीजी-२ संकरित वाण आणलं आणि हे नवीन तंत्रज्ञान जास्त टिकाऊ आणि जालीम असल्याचा त्यांचा दावा होता. या वाणाने हळूहळू बीजी-१ वाणाची जागा घेतली. आणि आता देशातल्या १३० लाख हेक्टर क्षेत्रावरील कपाशीपैकी ९० टक्के बियाणं बीजी-२ संकरित वाणाचं असल्याचा अंदाज सरकारी स्रोतांमधून मांडण्यात आला आहे.

बोलगार्ड बीजी-२ तंत्रज्ञानात बॅसिलस थुरिन्जिएन्सिस या जीवाणूची Cry1Ac व Cry2Ab ही जनुकं कपाशीच्या रोपामध्ये प्रत्यारोपित केली जातात आणि त्याद्वारे अमेरिकन बोंड अळी (Helicoverpa armigera), गुलाबी बोंड अळी आणि ठिपक्याची बोंड अळी (Earias vittella) या तीन किडींना प्रतिरोध करण्याची क्षमता निर्माण केली जाते. पहिल्या टप्प्यातल्या संकरित वाणामध्ये किंवा बीटी कपाशीत फक्त Cry1Ac हे जनुक होतं.

या सर्व काळात डॉ. क्रांती त्यांच्या दुसऱ्या एका निबंधात असं लिहित होते की भारतात परिस्थितिकी आणि पर्यावरण यांच्याशी सांगड घालून शाश्वत पद्धतीने बीटी तंत्रज्ञानाचा उपयोग कसा केला जावा याबाबत कुठलाही मार्ग आखण्यात आलेला नाही. पर्यावरण खात्याच्या जनुकीय तंत्रज्ञान मान्यता समितीने किमान सहा बीटी प्रयोगांना मान्यता दिली आहे मात्र त्यातल्या कुठल्यात प्रयोगाच्या शाश्वत नियोजनासाठी कोणताही आराखडा तयार करण्यात आलेला नाही.

बॅसिलस थुरिन्जिएन्सिस जीवाणूतलं जनुक एक प्रथिन तयार करतं जे बोंड अळीला प्रतिकार करणाऱ्या विषारी पदार्थाचं काम करतं. शास्त्रज्ञ विविध प्रकारच्या जनुकीय संरचना विकसित करत असतात ज्या कपाशीच्या बीमध्ये प्रत्यारोपित केल्यावर बोंडअळीला प्रतिकार करता येऊ शकतो. यालाच म्हणतात जीएम – जनुकीय बदल केलेला कापूस.  जेव्हा अशा पद्धतीची जनुकीय संरचना रोपाच्या जनुकीय रचनेतील गुणसूत्रांवर प्रत्यारोपित होते तेव्हा त्याला म्हणतात ‘event’ किंवा ‘प्रयोग’.

सावधानतेच्या इशाऱ्यांचा मात्र कधीच गांभीर्याने विचार केला गेला नाही, अगदी बीटी कपाशीच्या तंत्रज्ञानाला प्रतिकार निर्माण होत आहे हे सांगितल्यावरही फार परिणाम झालेला नाही असं क्रांतींनी लिहिलं आहे. प्रतिकार निर्माण होण्याची कोणतीही प्रक्रिया उत्क्रांतीसारखी असते. शेतीमध्ये पूर्वी वापरात असणारं तंत्रज्ञान जर संबंधित अळी-किडीवर नियंत्रण आणण्यात प्रभावी ठरत नसेल तर ती अळी कीटकनाशकाला दाद देत नाही किंवा त्या कीटकनाशकाला प्रतिकार करत आहे असं म्हटलं जातं. असं असताना अगदी चार ते पाच वर्षांच्या काळात खाजगी कंपन्यांच्या हजाराहून अधिक प्रकारच्या बीटी कापूस वाणांना – त्यांच्या स्वतःच्याच बियाण्यावरच्या जनुकीय प्रयोगांना – मान्यता देण्यात आल्या, असं क्रांती लिहितात. आणि यामुळे अर्थातच कृषीशास्त्र आणि कीड नियंत्रण या दोन्ही क्षेत्रात नुसता सावळा गोंधळ निर्माण झाला. या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतातल्या शेतकऱ्याला किडींना आळा घालणं अधिकच अवघड होत जाणार आहे.


Women working in cotton farm
PHOTO • Jaideep Hardikar
A man with cotton in hand
PHOTO • Jaideep Hardikar

वडंद्रेंच्या कापसाच्या रानातले मजूर सांगतात की बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस वेचणं खूपच अवघड बनलंय आणि कापसाचा दर्जाही चांगला नाहीये

२०१७ मध्ये, भारतात तणनाशक प्रतिरोधक (HT) कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. एचटी कापूस हे मोन्सॅन्टोचं नवीन वाण आहे. या वाणाच्या विक्रीला सरकारी मान्यता मिळाली नसली तरी बियाणे कंपन्या आणि नोंदणी नसलेल्या कंपन्यांनी मात्र शेतकऱ्यांना हे बियाणं विकलं आहे. एचटी कपास काही बोंडअळी किंवा तर अळ्यांवरचा उतारा ठरणार नाहीये. या वाणाची रोपं तणनाशकं आणि इतर रानगवताला आळा घालण्यासाठी जी औषधं वापरली जातात त्याला प्रतिकारक असतात आणि कापसाच्या रोपावर या औषधांचा परिणाम होत नाही.

आता, २०१८ मध्ये डॉ. क्रांतींनी दिलेले सगळे इशारे खरे ठरतायत. २०१० मध्ये अगदी सुरुवातीला बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असल्याच्या बातम्या गुजरातमधून आल्या होत्या. ही लागण अगदी छोट्या क्षेत्रावर आणि बीजी-१ कपाशीवर झाली होती. २०१२-२०१४ या काळात तिचा प्रादुर्भाव जास्त व्यापक क्षेत्रावर आणि बीजी-२ कपाशीवरही झाला.

२०१५-१६ च्या हंगामात केंद्रीय कापूस संसोधन संस्थेच्या सर्वेक्षणात असं आढळून आलं की बीजी-२ कपाशीवर बोंडअळीची अंडी जगण्याचं प्रमाण गुजरातमध्ये सगळीकडेच जास्त होतं आणि Cry1Ac, Cry2Ab आणि Cry1Ac+Cry2Ab (तीन वेगवेगळ्या रचना) या जनुकांना ही अळी दाद देत नसल्याचं खास करून अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांमध्ये दिसून आलं.

शेतकरी तसंही बोंडअळीच्या आणि इतर, खासकरून रसशोषक अळ्यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर करतच होते. डिसेंबर २०१५ च्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सर्वेक्षणानुसार दुबार आणि तिबार वेचणीच्या हिरव्या बोंडांना जास्त फटका बसला होता. ऑक्टोबर ते मार्च या चार ते पाच महिन्यांच्या काळात कापूस फुलोऱ्यावर आला की शेतकरी वेचणी करतात.

बोंडअळीचं पुनरागमन आणि बीजी – २ वाणाचं अपयश यासाठी जबाबदार असणारे अनेक घटक या अभ्यासांमधून समोर आले होते. यातला एक म्हणजे जास्त कालावधीच्या संकरित कपाशीची लागवड, ज्याने गुलाबी बोंडअळीला वाढीसाठी कायम पीक उपलब्ध होतं.

डॉ. क्रांतींच्या मते भारतात बीटी कापूस संकरित बियाण्यात न आणता, साध्या परागीभवन होणाऱ्या वाणामध्ये (म्हणजेच सरळसोट अशा देशी वाणामध्ये) आणायला पाहिजे होता. देशी वाणाऐवजी संकरित बियाण्यात बीटीचं रोपण करण्यास परवानगी देणारा भारत हा एकमेव देश आहे. देशी वाण असेल तर शेतकऱ्यांना बाजारातून परत परत बी विकत घ्यावं लागत नाही, संकरित बियाण्याच्या बाबतीत मात्र दर वर्षी नव्याने बी खरेदी करावं लागतं.

“बीजी-२ ला जास्त कालावधीच्या वाणामध्ये परवानगी द्यायला नको होती,” ते म्हणतात. “आपण नेमकं उलटंच केलंय.”

बोंड अळीच्या फेऱ्यामुळे गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान झालं त्यामुळे सुमारे ५० भारतीय बी निर्मिती कंपन्या आता मोन्सॅन्टोच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. या कंपनीकडूनच त्यांनी बीजी-१ आणि बीजी-२ कपास तंत्रज्ञान मिळवलं होतं. किमान ४६ कंपन्यांनी २०१६-१७ मध्ये मोन्सॅन्टोला रॉयल्टी द्यायला नकार दिला – अर्थात ती एक वेगळीच कहाणी आहे.

इतक्यात किंवा नजीकच्या काळात तरी बीजी-२ तंत्रज्ञानाला पर्याय ठरणारं दुसरं कोणतंही जीएम तंत्रज्ञान दृष्टीक्षेपात नाही. आणि कीडनाशकांची प्रभाविता वाढवणारं तंत्रज्ञानही चर्चेत नाही. खूप मोठी लागवड असणारी आणि ग्रामीण भागात लाखो दिवसांचा रोजगार निर्माण करणारी भारतातली कपाशीची शेती गहिऱ्या संकटात आहे.

A man walking through cotton trees
PHOTO • Jaideep Hardikar

यंदा चांगल्या कापसाची आशा असणाऱ्या वडंद्रेंनी जानेवारी २०१८ मध्ये पिकाची आशा सोडून दिली. ‘... हे वर्ष तर बरबादीचं निघालं,’ ते म्हणतात

‘काही दिवसात मी रान मोकळं करणार, बघा’

आमगाव (खुर्द) मध्ये संकटात सापडलेल्या वडंद्रेंनी जानेवारी २०१८ मध्ये रानाकडे पाहणंच सोडून दिलं. ते सांगतात, असला किडका कापूस विकून जो पैसा येईल त्यापेक्षा कापूस वेचणीचा खर्चच जास्त झाला असता. “तुम्ही ही रोपं पाहताय ना – त्यांच्याकडं पाहून असं वाटून राहिलं होतं की यंदा तर जोरदार पीक येणार बा. पण कसलं काय? हे वर्ष तर बरबादीचं निघालं,” ते म्हणतात. बांबूचा आधार द्यावा लागणाऱ्या जोमदार आणि रसरशीत रोपांमधून आम्ही वाट काढत जात होतो.

हा हंगामदेखील वाया गेल्यावर अनेक कापूस शेतकऱ्यांनी झाडांवर कापूस असतानाच रानं मोकळी केली. यवतमाळमध्ये तर काहींनी उभ्या पिकावर बुलडोझर फिरवला, इतरांनी उद्विग्न होऊन, वैतागून रानात जाणंच थांबवलं. पांढऱ्या सोन्याच्या या रानांवर अळ्यांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं.

पश्चिम विदर्भात अपघाताने अनेक शेतकऱ्यांच्या नाकातोंडात कीटकनाशकं गेली – जुलै ते नोव्हेंबर २०१७ या काळात सुमारे ५० जणांचा जीव गेला, हजारो शेतकरी गंभीर आजारी होते आणि काहींची दृष्टी गेली. हे सगळं घडून गेलं आणि कापूस वेचणी सुरू झाली. जानेवारीत थंडी शिगेला पोचली – बोंडअळीचा हा आवडता काळ – आणि कापूस कास्तकार भविष्यात काय नुकसान वाढून ठेवलंय या विचाराने अक्षरशः कोलमडून पडले.

मी जानेवारीमध्ये वडंद्रेंना परत भेटलो तेव्हा ते म्हणाले, “मी लवकरच रान मोकळं करीन, बघा.” इवल्याशा पण विनाशकारी बोंडअळीच्या हल्ल्याने सुकून गेलेली बोंडं त्यांनी मला दाखवली. मी त्यांना या आधी दोनदा भेटलो होतो. या वेळी मात्र बोंडअळीच्या तडाख्यात आधीच्या तुलनेत कपाशीची बोंडं अगदीच वाया गेलेली दिसत होती. कितीही कीटकनाशक फवारा, या अळीवर नियंत्रण मिळवणं अशक्य आहे. कारण ती बिळ करून रासायनिक फवाऱ्यांपासून सुरक्षित अशी बोंडांच्या आत शिरून बसते आणि झपाट्याने वाढते.

वडंद्रेंना लागून राहिलेली चिंता म्हणजे भारतातच्या कपाशीवर घोंघावणाऱ्या संकटाची नांदीच म्हणायला हवी.


अनुवादः मेधा काळे

Jaideep Hardikar

जयदीप हार्दिकर, नागपुर स्थित पत्रकार-लेखक हैं और पारी की कोर टीम के सदस्य भी हैं.

की अन्य स्टोरी जयदीप हरडिकर
Translator : Medha Kale

मेधा काले पुणे में रहती हैं और महिलाओं के स्वास्थ्य से जुड़े मुद्दे पर काम करती रही हैं. वह पारी के लिए मराठी एडिटर के तौर पर काम कर रही हैं.

की अन्य स्टोरी मेधा काले