तसं पाहिलं तर ते फक्त तिथून पुढे चालले होते – हजारांच्या संख्येत. रोज ते येत होते, पायी, सायकलींवर, ट्रकवरून, बसमधून, खरं तर त्यांना मिळेल त्या वाहनातून. थकलेले, भागलेले, घरी पोचण्यासाठी उतावीळ झालेले. सगळ्या वयाचे पुरुष आणि बाया आणि अनेक लहानगी देखील.
हैद्राबाद आणि त्या पल्याडहून येणारे लोक होते, मुंबई आणि गुजरातेतून, किंवा विदर्भाच्या पलिकडे पश्चिम महाराष्ट्रातून निघाले होते बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालला.
टाळेबंदी जाहीर झाल्यावर देशभरातल्या लाखो करोडोंची आयुष्यं अस्तव्यस्त झाली, उपजीविका ठप्प झाल्या आणि मग त्यांनी एक निर्णय घेतलाः गावाकडे, आपल्या कुटुंबांकडे, जिवलगांकडे परत जायचं. मग प्रवास कितीही खडतर असला तरी तेच बरंय.
आणि यातले अनेक जण नागपूर पार करून जातायत. नागपूर हे देशाच्या बरोबर केंद्रस्थानी असलेलं महत्त्वाचं शहर आणि एरवी सगळं सुरळीत सुरू असतं तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथलं रेल्वे स्थानक. आठवड्यामागून आठवडे जात राहिले आणि लोंढे येतच राहिले. मे महिना उलटत चालला तेव्हा कुठे राज्य आणि केंद्र शासनाने स्थलांतरित कामगारांना बस आणि रेल्वेने पोचवायची व्यवस्था केली. पण ज्यांना या वाहनांमध्ये जागा मिळाली नाही ते मात्र दूरवरच्या आपापल्या गावी कसेही करून जातच राहिले.
त्यात होतं एक तरुण जोडपं आणि त्यांची ४४ दिवसांची तान्ही मुलगी, हैद्राबादहून गोरखपूरला भाड्याच्या मोटरसायकलवरून निघालेले, उन्हाचा पारा चाळिशी पार करून गेला होता.
छत्तीसगडच्या धमतरीतल्या ३४ बाया अहमदाबादला एका कौशल्य विकास कार्यक्रमासाठी गेल्या होत्या, त्या परत घरी पोचण्याची धडपड करतायत.
पाच तरुण, नुकत्याच विकत घेतलेल्या सायकलींवर ओडिशाच्या रायगडा जिल्ह्याच्या दिशेने निघालेत.
नागपूरच्या बाह्य रिंग रोडवर अजूनही राष्ट्रीय महामार्ग ६ आणि ७ वरून रोज शेकडोच्या संख्येने स्थलांतरित येतायतच. मध्ये अनेक ठिकाणी त्यांची खाण्याची सोय केली गेलीये आणि टोल प्लाझाच्या आसपास निवारा शोधलाय. जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या गटांनी ही सोय केलीये. दिवसा उन्हाच्या कारात हे कामगार जरा विसावा घेतात आणि संध्याकाळी परत आपली पदयात्रा सुरू करतात. महाराष्ट्र शासनाने आता त्यांना त्यांच्या राज्याच्या सीमांपर्यंत सोडण्यासाठी दररोज बसगाड्यांची सोय केलीये. त्यामुळे आता हे लोंढे जरा रोडावले आहेत – आणि लोकही आता आपल्या घरी सुखरुप पोचतील – आणि त्यांची तितकीच अपेक्षा आहे.
अनुवादः मेधा काळे