डॉ. आंबेडकरांचा दलितांच्या राजकीय क्षितिजावर उदय
झाला. आणि त्यांनी जी प्रबोधनाची चळवळ सुरू केली त्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार
करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका शाहिरांनी आणि लोककलावंतांनी निभावली. डॉ.आंबेडकरांची भूमिका, त्यांचे संदेश, संघर्ष आणि एकूणच त्यांचे जीवन त्या अशिक्षित आणि
अडाणी समाजाला समजेल अशा त्यांच्या ग्रामीण भाषेत समजावून सांगितले. गावातील दलितांसाठी त्यांची गाणी म्हणजेच विद्यापीठ. याच गाण्याच्या ओळी ओळीतून पुढच्या पिढीला बुद्ध आणि आंबेडकर मिळाले.
आत्माराम साळवे (१९५३-१९९१) हे सत्तरीच्या अस्वस्थ दशकातल्या अनेक शाहिरांपैकी एक. बाबासाहेबांचं ध्येय त्यांना पुस्तकांमधून समजलं. बाबासाहेब आणि त्यांचा मुक्तीचा संदेश हेच साळवेंच्या जीवनाचं ध्येय बनलं. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी झालेल्या नामांतराच्या लढ्याची दोन दशकं आत्मराम साळवेंच्या गाण्यांनी निनादून गेली. नामांतर आंदोलन सुरू झालं आणि दोन दशकं मराठवाडा दलित-दलितेतर वादाची रणभूमी
बनला. या रणभूमीत आत्माराम साळवे आपल्या शाहिरीला, आवाजाला, आणि शब्दाला शस्त्र बनवत दलितांवर "लादलेल्या
जातीय युद्धाविरुद्ध" लढत राहिला. आपल्या आवाजाने, शब्दाने, शाहिरीने प्रबोधनाची मशाल घेऊन अत्याचाराच्या विरोधात, नामांतराचे ध्येय आणि त्यासाठी कष्ट ही दोन पावले
घेऊन ते महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात कोणत्याही साधनाशिवाय आयुष्याची दोन दशकं सतत फिरत राहिले. त्यांची शाहिरी ऐकायला हजारोंच्या संख्येने लोक गोळा व्हायचे. "विद्यापीठाचे नामांतर झाले की मी माझे घर, शेत विकून विद्यापीठाच्या कमानीवर सोन्याच्या
अक्षराने आंबेडकरांचे नाव लिहणार,” असं ते म्हणायचे.
शाहीर आत्माराम साळवेंचे जहाल शब्द आजही मराठवाड्यातल्या दलित तरुणाईला जातीय अत्याचाराविरोधात लढण्याची प्रेरणा देतायत. बीडच्या फुले पिंपळगावचा २७ वर्षीय सुमीत साळवे म्हणतो, आत्माराम त्याच्यासाठी काय होते हे सांगायला "अख्खी एक रात्र आणि अख्खा एक दिवसही पुरणार नाही." डॉ. आंबेडकर आणि आत्माराम साळवेंना आदरांजली म्हणून तो साळवेंचं एक चित्तवेधक गाणं सादर करतो. परंपरेच्या गोधडीतून बाहेर येऊन बाबासाहेबांच्या मार्गाने जाण्याची प्रेरणा देणारं. "घटनेच्या तोफानं, तुझ्या भीम बापानं, तोडल्या गुलामीच्या बेड्या" शाहीर लिहितात. सुमीतने सादर केलेलं हे गाणं पहा, ऐका.
घटनेच्या तोफाने, तुझ्या भीमबापाने
तोडल्या गुलामीच्या बेड्या,
कुठवर या गोधडीत राहशील वेड्या?
लक्तरात सडले होते तुझे जिने
माणूस बनविले तुला त्या भीमजीने
ऐकून घे आज पिशा, काढ बुचडी दाढीमिशा
रानोबाच्या टंगाळ घोड्या,
कुठवर या गोधडीत राहशील वेडया?
चार वर्णाचा होता गोधडीस रंग
जाळुनी भिमाने तिला बनवले
अपंग
हा जगे बुद्धनगरीवर, हात दोन्ही डगरीवर.
सुधरतील कशा या भीमवाड्या?
उवा तुझ्या गोधडीच्या शिरल्या
जटात
म्हणून रानोबा घरी ठेविला
मठात
नको आडण्यात शिरू, साळवेला कर तू गुरु
थांबव अप्रचाराच्या खोड्या,
कुठवर या गोधडीत राहशील वेड्या?
'Influential Shahirs, Narratives from Marathwada’ (मार्गदर्शक शाहीर, मराठवाड्यातील गीते-कथने) या चित्रफितींच्या संग्रहातील ही एक चित्रफीत असून इंडिया फौंडेशन फॉर द आर्ट्स तर्फे त्यांच्या संग्रह व वस्तूसंग्रह कार्यक्रमांअतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा हा भाग आहे. पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियासोबत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. गोइथ इन्स्टिट्यूट/मॅक्स मुलर भवन दिल्ली यांचे आंशिक अर्थसहाय्य या प्रकल्पास लाभले आहे.