पहिल्या मजल्यावरच्या खोलीला कुलुप आहे आणि सगळं सामसूम. खरं तर अजून वेळ संपायचीये. शेजारच्या लाकडी आणि पत्र्याच्या खोलीत देखील कुणीच नाहीये. खुर्च्या, टेबलं, लोखंडी बाकड्यांचा ढिगारा, लोह आणि फोलिक ॲसिडच्या गोळ्यांची खोकी आणि फेकून दिलेली वेष्टणं पडलीयेत. एक जुना, गंजून गेलेला फलकसुद्धा दिसतोय, बंद खोलीच्या इमारतीत आत शिरताना एक नवा फलक आहेः ‘गव्हर्नमेंट न्यू टाइप प्रायमरी हेल्थ सेंटर, शबरी मोहल्ला, दल, श्रीनगर’.
इथून बोटीने १० मिनिटांच्या अंतरावर नज़ीर अहमद भट यांचं ‘क्लिनिक’ आहे, जे बहुतेक वेळा उघडं असतं आणि तिथे लोकांची गजबज असते. हिवाळ्यातली थंडगार दुपार आहे. लाकडी खांबांवरच्या लाकडाच्याच दुकानात ते शेवटचं गिऱ्हाईक-पेशंट तपासतायत (संध्याकाळी आणखी काही रुग्णांना तपासायला ते येतील). दुकानाला आत एक वेगळी खोली आहे, इथे ते रुग्णांना इंजेक्शन देतात. बाहेर बोर्ड दिसतोय, ‘भट मेडिकेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट’.
सुमारे साठीच्या हफीझा दार बाकड्यावर वाट पाहत बसल्या आहेत. त्या नज़ीर डॉक्टरांना घ्यायला बोटीने आल्या आहेत, त्यांचा मोहल्ला इथून बोटीने १० मिनिटांच्या अंतरावर आहे. “माझ्या सासूला काही [मधुमेहासाठी] इंजेक्शन घ्यावी लागतात आणि नज़ीर साब घरी येऊन ती देतात कारण त्या वयामुळे इथे येऊ शकत नाहीत,” त्या सांगतात. बोलता बोलता त्या त्यांना आशीर्वाद देतात. “तिथे [नवीन पीएचसीत] आम्हाला डॉक्टर काही भेटत नाही,” हफीझा सांगतात. त्या शेतकरी आहेत आणि घर सांभाळतात. त्यांचे पती शेती करतात आणि दल सरोवरात शिकारा चालवतात. “तिथे फक्त लहान मुलांना पोलिओचे थेंब मिळतात आणि दुपारी ४ वाजल्यानंतर तर तिथे कुणीही नसतं.”
बेटांवर राहणाऱ्या लोकांना गेल्या दोन वर्षांत या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कधी डॉक्टर आल्याचंच आठवत नाहीये. २०१९ च्या ऑगस्ट महिन्यापासून काश्मीरमध्ये कर्फ्यू आणि टाळेबंदीचं सत्र संपलेलंच नाही. “काही वर्षांपूर्वी इथे एक डॉक्टर होते, ते चांगलं काम करत होते. पण त्यांची बदली झाली. २०१९ पासून तर इथे दुसरा कुणी डॉक्टर आलेला आम्ही पाहिलेला नाही,” ४० वर्षीय मोहम्मद रफीक मल्ला सांगतात. ते जवळच राहतात आणि पर्यटन छायाचित्रकार म्हणून काम करतात. “ते नियमितपणे येतही नाहीत आणि पुरेसा वेळ तिथे थांबतही नाहीत.”
श्रीनगरच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत काम करणाऱ्या नियोजन विभागाच्या सहाय्यक संचालकांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सर्व न्यू टाइप प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (काश्मीरमधली श्रेणीसुधार केलेली उपकेंद्रं) वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारा किमान एक एमबीबीएस डॉक्टर, एक फार्मासिस्ट, एक बहुद्देशीय महिला आरोग्य कर्मचारी आणि एक नर्सिंग ऑर्डर्ली असं मनुष्यबळ असणं अपेक्षित आहे.
“पोलिओच्या लसीकरणासाठी लाउडस्पीकरवर घोषणा करतात तेव्हाच या केंद्रात जरा हालचाल पहायला मिळते,” २५ वर्षांचे वासिम राजा सांगतो. तो एका बोटीवर पर्यटकांसाठी छायाचित्रकार म्हणून काम करतो आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्याच गल्लीत राहतो (हे केंद्र खरं तर कूली मोहल्ल्यात आहे, पण फलकावर मात्र शेजारच्या गल्लीचं नाव लिहिलं आहे). “माझ्या वडलांना गरज पडेल तेव्हा इथले फार्मासिस्ट यायचे आणि सलाइन लावून जायचे,” तो सांगतो. “पण आज, सगळ्यात जास्त गरज असताना हा दवाखाना बंद आहे. आम्हाला नाझिर किंवा बिलालकडे [केमिस्ट-डॉक्टर] जावं लागतं किंवा मग हॉस्पिटलला जाण्यासाठी रस्त्यापर्यंत पोचायला लागतं. त्यात वेळ जातो आणि अचानक काही झालं झालं तर सगळं अवघड होऊन जातं.”
इथून सर्वात जवळचं शासकीय सर्वोपचार रुग्णालय, जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉस्पिटल श्रीनगरच्या रैनावारी भागात आहे. कूली मोहल्ल्याहून १५ मिनिटं बोटीने प्रवास करून बुलेवार्ड रोडला जायचं आणि तिथून दोन बस बदलून पुढे. सरोवरात राहणाऱ्यांना ४० मिनिटं बोटीने प्रवास करून दुसऱ्या टोकाला जावं लागतं आणि तिथून १५ मिनिटं चालत जावं लागतं. काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीत तर हा असा प्रवास आणखीच खडतर होतो.
दल सरोवराच्या १८-२० चौरस किलोमीटर परिसरातल्या बेटांवर राहणाऱ्या ५०,०००-६०,००० लोकांसाठी बंद पडल्यात जमा असणारं प्राथमिक आरोग्य केंद्र सोडलं तर शासनाचा केवळ एकच दवाखाना उपलब्ध आहे. नंदपोरामध्ये भारतीय वैद्यक परंपरांवर आधारित उपचार देणारा एक आयुष दवाखाना आहे. तो सरोवराच्या पार दुसऱ्या टोकाला आहे आणि तिथेही आरोग्य कर्मचारी असतातच असं नाही. बुलेवार्ड रोडवर किनाऱ्यावर एक उपकेंद्र आहे (सध्या याच केंद्रावर कोविड-१९ ची लस आणि तपासणी करून मिळत आहे).
सरोवरात राहणाऱ्या लोकांसाठी, खास करून अगदी आतल्या भागातल्या बेटांवर राहणाऱ्यांसाठी डॉक्टरांची आणि वैद्यकीय सल्लागाराची भूमिका बजावणारे नज़ीर आणि आणखी तिघे केमिस्ट सोडले तर दुसरी कसलीच आरोग्य सेवा उपलब्ध नाही.
साधारण पन्नाशीचे असणारे नज़ीर अहमद भट गेल्या १५-२० वर्षांपासून दल सरोवर परिसरात काम करत आहेत. सकाळी १० ते रात्री १० या वेळात दोन पाळ्यांमध्ये ते त्यांच्या दुकानात उपस्थित असतात. दुपारी थोडा वेळ ते विश्रांती घेतात. दिवसाला १५-२० रुग्ण त्यांच्याकडे येतात असं ते सांगतात. बहुतेक लोकांना ताप, खोकला, रक्तदाबाचा त्रास, बरी न होणारी दुखी, ड्रेसिंग आणि मलमपट्टी लागणाऱ्या छोट्यामोठ्या जखमा अशा तक्रारी घेऊन येतात. (त्यांनी मला त्यांच्या वैद्यकीय किंवा औषधशास्त्रातील शिक्षण/पात्रतेविषयी फारशी माहिती दिली नाही). नज़ीर तपासणीचे पैसे घेत नाहीत मात्र किरकोळ दराने औषधांचे मात्र पैसे घेतात (तोच त्यांचा उत्पन्नाचा स्रोत आहे), तसंच गरजू लोकांसाठी औषधं मागवून ठेवतात.
अशाच एका औषधालय-दवाखान्यात ६५ वर्षीय मोहम्मद सिदिक चाचू रक्तदाब तपासायला आले आहेत. ते पर्यटकांना चामड्याच्या वस्तू विकतात. श्रीनगरमधल्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांची नुकतीच पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली आहे. “तो दवाखाना [न्यू टाइप पीएचसी] कसल्याच कामाचा नाही. कुणीच तिथे फिरकत नाही. आम्हाला हेच दवाखाने पसंत आहेत कारण ते जवळ आहेत आणि त्यांच्याकडे लगेच औषधं मिळतात,” ते म्हणतात.
चाचू ज्या दवाखान्यात जातात तो बिलाल अहमद भट चालवतात. ते श्रीनगरच्या दक्षिणेकडच्या वेशीजवळच्या नौगाममध्ये राहतात. ते परवानाधारक औषध विक्रेते आहेत. बोलता बोलता जम्मू काश्मीर फार्मसी कौन्सिलने दिलेलं प्रमाणपत्र ते मला काढून दाखवतात.
त्यांच्या दुकानात प्लायवूडच्या कप्प्यांमध्ये औषधं ठेवलेली आहेत आणि रुग्णांना आडवं होण्यासाठी एक खाट टाकलेली आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळामध्ये भट दररोज १५-२० रुग्णांना तपासत असल्याचं सांगतात. बहुतेक जण साध्या आजारांसाठी इथे येतात. तेही तपासायचे कसलेच पैसे घेत नाहीत. औषधं तेवढी किरकोळ विक्रीच्या दरात विकतात.
दल सरोवरात हॉस्पिटलची गरज आहे, म्हणतात. “इथे एक तरी स्त्रीरोग तज्ज्ञ पाहिजे. एक प्रसूतीगृह हवं, जिथे बायांना त्यांना आवश्यक त्या सेवा मिळतील. इथे वैद्यकीय तपासण्यांसाठी कसलीच सोय नाहीये. इथे किमान रक्तातली साखर तपासण्याची तर सोय पाहिजे, पूर्ण रक्ताची तपासणी झाली पाहिजे. इथले बहुतेक लोक कष्टकरी आहेत, गरीब आहेत. या सगळ्या सोयी जर दवाखान्यात [न्यू टाइप पीएचसी] मिळत असत्या तर असल्या कडाक्याच्या थंडीत त्यांना ५ रुपयाच्या गोळीसाठी माझ्याकडे यावं लागलं नसतं.”
त्याच दिवशी सकाळी बिलाल कूली मोहल्ल्यातल्या त्यांच्या घरी एका कॅन्सरच्या रुग्णाला तपासून आले होते. “एसकेआयएमएसमध्ये त्याचे उपचार सुरू आहेत आणि त्याला सलाइन लावायचं होतं,” ते सांगतात. सरोवराच्या पूर्वेकडच्या किनाऱ्यावर नेहरू पार्क घाटापासून १० किलोमीटरवर शेर-इ-काश्मीर मेडिकल सायन्सेस इन्स्टिट्यूट आहे. “तेवढ्या वेळासाठी मला माझं दुकान बंद ठेवावं लागलं. तो माणूस गरीब आहे. पूर्वी शिकारा चालवायचा. त्याच्याकडून काय पैसे घेणार.”
संध्याकाळनंतर, ४ वाजता न्यू टाइप पीएचसी बंद झाल्यावर तर सरोवराच्या रहिवाशांना या केमिस्ट-डॉक्टरांशिवाय दुसरा काही पर्यायच उरत नाही. “कधी कधी तर मला रात्री घरी फोन येतात,” बिलाल सांगतात. एका म्हाताऱ्या बाईला धाप लागायला लागली म्हणून तिच्या घरच्यांनी फोन केला होता. श्रीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तिला मधुमेह होता आणि हृदयाचाही त्रास होता, बिलाल सांगतात. “मध्यरात्र उलटून गेली होती आणि त्यांचा फोन आला. तिला हृदयविकाराचा झटका आला असणार अशी मला शंका आली म्हणून मी त्यांना सांगितलं की तिला ताबडतोब हॉस्पिटलला न्या. त्यांनी नेलं आणि पक्षाघाताचं निदान झालं. नशीब, ती वाचली.”
सरोवराच्या आतल्या भागातल्या बेटांवर ना बातमीदार पोचतात ना तिथले निसर्गसुंदर फोटो निघतात. इथे तर समस्या अधिकच बिकट बनतात. कडाक्याच्या हिवाळ्यात बोटीने काही फुटाचं अंतर जायचं तरी सहा इंच जाडीचा बर्फाचा थर कापत जावं लागतं. उन्हाळ्यात जे अंतर अर्ध्या तासात कापता येतं त्यालाच हिवाळ्यात कधी कधी तीन तास देखील लागू शकतात.
“इथे दिवस रात्र डॉक्टर राहतील अशी सोय पाहिजे,” सरोवराच्या आतल्या भागात टिंड मोहल्ल्यात राहणारी २४ वर्षांची हदीसा भट म्हणते. “तपासणीच्या पण सोयी हव्यात. दिवसा किंवा अगदी उशीरा संध्याकाळी सुद्धा आम्ही नज़ीर साहेबांच्या दवाखान्यात जाऊ शकतो. पण रात्री जर कुणी आजारी पडलं तर आम्हाला बोटी वल्हवत रैनावारीला जायला लागलं. मोठी माणसं रात्र काढू शकतात, पण छोट्या बाळांचं तसं नाही ना,” गृहिणी असलेली हदीसा सांगते. तिचे चारही भाऊ हंगामाप्रमाणे सरोवरात शिकारा चालवतात.
२०२१ साली मार्च महिन्यात तिची आई पडली आणि हाडाला इजा झाली असावी असं वाटलं. तेव्हा नेहरू पार्कपासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीनगरच्या दक्षिणेला असलेल्या बझरुल्लामधल्या बोन अँड जॉइंट हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं होतं. “जास्त गंभीर काही नव्हतं पण नुसतं [रिक्षाने आणि टॅक्सीने] तिथे जायलाच आम्हाला दोन तास लागले,” हदीसाचे भाऊ अबीद हुसैन भट सांगतात. “त्यानंतर आम्ही दोन वेळा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो कारण तिच्यावर उपचार करायला जवळपास कसल्याच सुविधा नव्हत्या.”
सरोवरातून लोकांना हॉस्पिटलला नेण्याची अडचण तरी सुटावी या उद्देशाने हाउसबोट मालक असलेल्या तारिक अहमद पतलू यांना आपल्या शिकाऱ्याचं रुपांतर एका जल-रुग्णवाहिकेमध्ये केलं. हे करण्याची गरज का वाटली हे त्या वेळच्या वर्तमानपत्रातल्या काही बातम्यांमधून वाचायला मिळतं. त्यांच्या मावशीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना स्वतःला कोविडची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. एका ट्रस्टकडून त्यांना आर्थिक मदत मिळाली आणि आता या अँब्युलन्समध्ये एक स्ट्रेचर, एक चाकाची खुर्ची, ऑक्सिजनची टाकी, प्रथमोपचाराचं साहित्य, मास्क, ग्लुकोमीटर आणि रक्तदाब मोजणारं यंत्र असं सगळं साहित्य आहे. ५० वर्षीय पतलू सांगतात की लवकरच ते एक डॉक्टर आणि एक सहाय्यकाची सुद्धा सेवा सुरू करणार आहेत. त्यांच्या अंदाजानुसार आतापर्यंत या रुग्णवाहिकेने ३० जणांना तरी हॉस्पिटलला पोचवलंय. इतकंच नाही, मृतदेहही सरोवरातून पलिकडे नेण्याचं काम केलं आहे.
आरोग्यसेवांबद्दल बोलायचं तर श्रीनगरमध्ये आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची परिस्थितीही बिकट झाली आहे. दल सरोवरातल्या तुटपुंज्या आरोग्य सेवांचा विषय काढल्यावर एक वरिष्ठ अधिकारी श्रीनगरच्या खान्यारमध्ये देखील पुरेसे कर्मचारी नसल्याचं सांगतात. मार्च २०२० मध्ये जिल्हा रुग्णालयाचं (रैनावारीमधलं जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉस्पिटल) कोविड-१९ सेवेमध्ये रुपांतर केल्यानंतर अनेक बिगर कोविड आजारांचे रुग्ण त्यांच्या दवाखान्यात येऊ लागले. मात्र रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत त्यांना पुरेसा कर्मचारी वर्ग मात्र देण्यात आला नाही. “बघा, एरवी जर एका दिवसात ३०० पेशंट येत असतील तर तीच संख्या आता ८००-९००, कधी कधी तर १,५०० वर गेली आहे,” जानेवारी महिन्यात त्यांनी मला सांगितलं होतं.
सरोवरातील रहिवाशांच्या समस्या त्या मानाने किरकोळ आहेत. त्यापेक्षा जास्त गंभीर आजारांना प्राधान्य असल्याने न्यू टाइप पीएचसी आणि उपकेंद्रातल्या कर्मचाऱ्यांना कित्येक वेळा रात्रपाळीसाठी देखील बोलावण्यात येतं. कित्येकदा कसलीच विश्रांती न घेता ते काम करत असतात. आणि म्हणूनच कूली मोहल्ल्यातल्या न्यू टाइप पीएचसीमधले फार्मासिस्ट वारंवार गायब असतात. बहुद्देशीय महिला आरोग्य कर्मचारी दवाखान्यातल्या कामासोबत कोविड-१९ दरम्यान संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात मोलाची भूमिका बजावत आहेत आणि त्यांच्यावरही कामाचा प्रचंड ताण आहे.
५० वर्षीय इफ्तिकार अहमद वफई गेल्या १० वर्षांपासून कूली मोहल्ल्यातल्या न्यू टाइप पीएचसीमध्ये फार्मसिस्ट म्हणून काम करत आहेत. ते सांगतात की त्यांना महिन्यातून किमान पाच वेळा खान्यारच्या हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर बोलावलं जातंय. त्यामुळे ते सकाळी आपल्या पीएचसीत पोचू शकत नाहीत. “या कामासाठी जादा पैसे दिले जात नाहीत, तरीही आम्ही हे काम करतो,” ते सांगतात. “आम्हालाही माहितीये, सगळ्याच दवाखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे आणि या महामारीने प्रत्येकाचे प्राण कंठाशी आले आहेत.”
ते पुढे सांगतात की न्यू टाइप पीएचसीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून डॉक्टरची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसल्याचा प्रश्न मांडला होता पण त्यांना ‘भागवून नेण्याचा’ सल्ला दिला गेला. “मी कधी कधी रुग्णांना इंजेक्शन देतो, कधी कधी त्यांनी आग्रह धरला तर त्यांचं बीपी तपासतो,” वफई सांगतात. हा त्यांच्या कामाचा भाग नाही हे ते स्पष्ट करतात. “पण पेशंटला ते काही समजत नसतं आणि तुमची देखील होईल तितकी मदत करण्याचीच इच्छा असते.”
आणि जेव्हा वफई सुद्धा नसतात, तेव्हा दल सरोवराचे रहिवासी न्यू टाइप पीएचसीच्या बंद दारावरून पुढे जाऊन केमिस्ट-दवाखाना गाठतात. जेव्हा सगळ्यात जास्त गरज असते, तेव्हा इथेच तर त्यांना सेवा मिळते.
अनुवादः मेधा काळे