२०१६ च्या जून महिन्यात, बोराटी गावच्या वयोवृद्ध सोनाबाई घोसलेंना एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाने जंगलाजवळच्या त्यांच्या रानात ठार मारलं. गावठाणापासून ५०० मीटर अंतरावरच त्यांचं रान होतं. जळण, सरपण, गौण वनोपज आणि गुरांच्या चराईसाठी बोराटी गाव जंगलावरच अवलंबून आहे. (पहा, Tigress T1’s trail of attacks and terror)
“आम्ही तेव्हापासून भीती आणि काळजीने गुरफटलेलो आहोत,” रमेश खन्नी सांगतात. स्थानिक भागात सामाजिक आणि राजकीय कार्य करणाऱ्या खन्नींनी गावकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन वन अधिकारी, जिल्हाधिकारी आणि स्थानिक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. “जंगली प्राणी तसंही आमच्या पिकाची नासाडी करत होते – आणि आता हे वाघ.”
५० गायी आणि एक वाघ
गेली अनेक वर्षं अत्रामांचा दिनक्रम फारसा काही बदललेला नाही. त्यांच्या दिवसाची सुरुवात गायी धुण्यापासून होते, त्यानंतर ते गुरं चरायला गावाजवळच्या जंगलात जातात.
उन्हं कलली की ते घरी परततात, दुसऱ्या दिवशी परत तोच दिनक्रम असतो. पूर्वी ते एका गायीमागे महिन्याला १०० रुपये घ्यायचे. “त्यांच्या कामात किती धोका आहे पहा, मंग आम्हीच त्यांना म्हटलं का पैसे वाढवा म्हणून,” सुलोचना सांगतात. आता गावकरी त्यांना महिन्याला एका गायीमागे १५० रुपये देतात – वरचे पन्नास रुपये, ते सांगतात त्यांना असणाऱ्या धोक्यासाठी. “मी एका वेळी ५० गुरं सांभाळतो,” अत्राम सांगतात. सांजेला जंगलातून ते नुकतेच घरी परत आलेले होते. “आता हे काम केलं नाही तर आम्ही दुसरं काय काम करावं जी?”
गावकऱ्यांनी अत्रामांना आधीच सांगून ठेवलंयः “काही धोका झाला तर आमची गुरांची काळजी करत बसू नका.” हे ऐकून त्यांच्या जीवावरचं ओझंच कमी झालं, ते म्हणतात, पहा किती चांगल्या दिलाची आहेत सारी. “गेल्या दोन वर्षांत वाघानी कळपातल्या किती तरी गुरांचा फडशा पाडलाय,” ते सांगतात. “गाय मेली तर दुःख होतंच पण मी जिवंत आहे ना म्हणून चांगलं पण वाटतं.”
अत्राम शाळेची पायरीही चढलेले नाहीत. आणि त्यांच्या पत्नीही नाहीत. पण त्यांची तिन्ही लेकरं शाळा शिकतायत. चरितार्थ चालवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकावा लागला तरी चालेल पण आपल्या लेकरांनी शिकावं अशी त्यांची इच्छा आहे. दिशाने जवळच्याच कॉलेजमधून नुकतंच बीएचं पहिलं वर्ष पूर्ण केलं आहे तर वैष्णवी गेल्या वर्षी दहावी पास झालीये आणि सगळ्यात धाकटा अनोज, आश्रम शाळेत नववीत शिकतोय.
गावातल्या अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सुलोचना महिन्याला रु. ३,००० कमवतात. “रोज सकाळी, ते सुखरुप परत येऊ देत म्हणून मी देवाकडे प्रार्थना करते,” त्या सांगतात. “दर संध्याकाळी त्यांना धडधाकट परत आलेलं पाहिलं की मी वाघोबाचे आभार मानते.”
अनुवादः मेधा काळे