“पिलिग [१९९४] आला, चिकुनगुन्या आला [२००६] अहो भूकंप झाला [१९९३] तेव्हा देखील कधी मंदिर बंद झालं नव्हतं. इतिहासात पहिल्यांदा हे असलं होतंय,” उद्विग्न झालेले संजय पेंदे म्हणतात. तुळजापुरातल्या तुळजा भवानी मंदिरात ते मुख्य पुजाऱ्यांपैकी एक आहेत.
मंगळवारी, १७ मार्च २०२० रोजी कोविड-१९ चा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी राज्याने केलेल्या उपायांचा भाग म्हणून भाविकांसाठी मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा धक्का इथल्या लोकांना अजूनही पचवता आलेला नाही. “असला कसला आजार आलाय? परगावहून भाविक यायला लागलेत पण त्यांना बंद दरवाज्यातून बाहेरून कळसाचं दर्शन घेऊन जावं लागतंय. तेवढं तर घेऊ द्या म्हणून आता पोलिसांशी मी-तू झालीये आमची,” ३८ वर्षीय पेंदे सांगतात. मंदीर बंद म्हणजे आता दिवसाला त्यांच्या ज्या काही १०-१५ पूजा असतात त्याही बंद होणार. म्हणजेच त्यांची दक्षिणाही. त्याचाही त्रागा त्यांच्या बोलण्यातून जाणवतो. पेंदेंच्या अंदाजानुसार तुळजापुरात देवीची पूजा, अभिषेक करणारे किमान ५००० पुजारी असावेत. देवळावरच त्यांची घरं चालतात.
बालाघाटच्या रांगा सुरू होतात त्या डोंगरावर १२ व्या शतकात बांधलेल्या या मंदिराभोवतीच या नगराचं (लोकसंख्या ३४,०००, जनगणना-२०११) अर्थकारण फिरतं. महाराष्ट्रातल्या आणि बाहेरच्या राज्यातल्या अनेकांची ही कुलदेवता आहे आणि राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक आहे. भाविकांच्या यात्रेच्या मार्गावरील देवतांच्या अनेक मंदिरांपैकी हे प्रमुख मंदिर आहे.
पण १७ मार्चनंतर हे गाव एकदम ठप्प पडल्यासारखं झालंय. मंदिराकडे जाणाऱ्या अरुंद गल्ल्या देखील ओस पडल्या आहेत. समोरचा चप्पल स्टँड आणि क्लोक रुम चक्क रिकामी आहे.
खाजगी गाड्या, शेअर रिक्षा, ‘कुल्झर’ आणि प्रवाशांना घेऊन येणाऱ्या प्रवासी वाहनांचा ओघ रात्रंदिवस इथे सुरू असतो. आता मात्र इथे शुकशुकाट आणि भयाण शांतता आहे.
मंदिरापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेला बस स्टँड देखील ओस पडलाय. दर दोन मिनिटाला येणाऱ्या एसटी बस, गाड्यांमधून उतरणारे आणि चढणारे भाविक आणि इतर प्रवासी हे इथलं कायमचं चित्र. तुळजापूर राज्याच्या सगळ्या छोट्या-मोठ्या शहरांना आणि शेजारच्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेकडच्या गावांनाही जोडलेलं आहे.
या नगराचं अर्थकारण या मंदिराभोवती फिरतं आणि इथे येणारे भाविक, पर्यटक, वाहतूकदार, लॉज आणि हॉटेल या सगळ्याचं पोट या मंदिरावर आहे. पूजा साहित्य, प्रसाद, देवीला चढवायच्या आणि देवीला चढवलेल्या साड्या, हळद-कुंकू, ठिपक्याच्या हिरव्या बांगड्या, कवड्या, देवीच्या फोटो फ्रेम, भक्तीगीतांच्या देवीच्या गाण्यांच्या सीडी विकणारी असंख्य दुकानं भाविकांवर चालतात. इथल्या दुकानदारांचा असा अंदाज आहे की इथल्या दोन किलोमीटरच्या परिघात अशी किमान ५५०-६०० दुकानं असावीत. या शिवाय रस्त्यात पथारी टाकून विक्री करणाऱ्या असंख्य विक्रेत्यांचं पोट भाविकांवरच अवलंबून आहे.
२० मार्च रोजी दुपारी १२ पर्यंत निम्मी दुकानं बंद झाली होती आणि बाकीचे माल आत घ्यायच्या तयारीत होते. पथारीवाले तर दिसेनासे झाले होते.
“हा असला कसला रोग निघालाय?” बंद दुकानाबाहेर पथारी टाकून बांगड्या विकणाऱ्या साठीच्या एक आजी वैतागून विचारतात. “निस्तं समदं बंद केलंय. मंगळवारपासून कुणीच येईना गेलंय. ते लोक आमाला इथं बसू भी देइना गेलेत. आता पोटाला लागतंच की काही तरी? म्हणून आलाव.” (आजी इतक्या करवादलेल्या होत्या की त्यांनी मला त्यांचं नावही सांगितलं नाही ना फोटो काढू दिला. त्यांच्याकडून मी घेतलेल्या काचेच्या डझनभर बांगड्यांचे २० रुपये हीच त्यांची त्या दिवशीची कमाई होती. थोड्याच वेळात त्या आवरून घरी निघाल्या.)
तिथनंच पुढे महाद्वाराशेजारी सुरेश सूर्यवंशींचं पेढा आणि प्रसादाचं दुकान आहे. “उन्हाळ्यात मार्च ते मे महिन्याची आम्ही वाट पाहत असतो. गुढी पाडव्यानंतर दररोज इथे किमान ३०,००० ते ४०,००० भाविक येतात. चैत्री पौर्णिमेला चैत्री यात्रा सुरू होणार होती, तेव्हा तर शनिवार-रविवारी भाविकांचा आकडा १ लाखांपर्यंत जातो. आता तर यात्राच रद्द केलीये. इतिहासात पहिल्यांदाच घडतंय असलं,” ६० वर्षीय सूर्यवंशी सांगतात.
त्यांच्या दुकानाशेजारचं धातूच्या वस्तूंचं दुकान आहे अनिल सोलापुरेंचं. टाळ, दिवे, देवीच्या मूर्ती, कलश अशा सगळ्या वस्तू त्यांच्या दुकानात आहेत. यात्रेच्या काळात महिन्याला ३०,००० ते ४०,००० रुपयांची त्यांची कमाई होते. कारण दिवस रात्र भाविकांची रांग हटतच नाही. “मी गेली ३८ वर्षं या व्यवसायात आहे. रोज दिवसभर मी इथे येतो. नुसतं घरी तर कसं बसून रहावं?” पाणावल्या डोळ्यांनी सोलापुरे सांगतात.
साठीच्या नागुरबाई गायकवाड देखील सगळं बंद असल्यामुळे धास्तावल्या आहेत. जोगवा मागून पोटाला काही तरी मिळवू पाहणाऱ्या नागुरबाईंचा डावा पंजा विजेचा धक्का लागून निकामी झालाय. त्यामुळे त्या रोजंदारीवर कामाला जाऊ शकत नाहीयेत. “चैत्री यात्रेची आमी वाट पाहत होतो. आता कुणी कपभर चहा जरी पाजला तरी पुरे,” त्या म्हणतात.
तुळजापुराचा आठवडी बाजार आसपासच्या गावातल्या ४००-५०० शेतकऱ्यांसाठी उदरनिर्वाहाचा स्रोत आहे. बाजार आता बंद केलाय आणि यातल्या अनेक, मुख्यतः महिला शेतकऱ्यांना आता त्यांचा ताजा आणि नाशवंत माल कुठे विकायचा हा प्रश्न पडला आहे. गावातल्या गावात काही विक्री होईल पण ती पुरेशी होईल का ही शंका आहे. [२६ तारखेपासून सकाळी २ तास भाजी बाजार भरवला जात आहे.]
सुरेश रोकडे शेतकरी आहेत आणि इथल्या एका शैक्षणिक संस्थेत वाहनचालक म्हणून काम करतात. मराठवाड्यातला द्राक्ष हंगाम आताच सुरू झालाय आणि दोन दिवसांसाठी तोडणी थांबवली आहे कारण बाजारच बंद आहेत. “सोमवारी [२३ मार्च] तरी बाजार उघडेल असं वाटतंय,” ते सांगतात. (मात्र त्या दिवसापासून राज्य सरकारने आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत.) १७-१८ मार्च रोजी शेजारच्या कळंब तालुक्यात आणि मराठवाड्याच्या इतर काही जिल्ह्यात गारपीट झाल्याने लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.
तुळजापुरात अजून तरी कोविड-१९ तपासणीची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे इथे कुणी संसर्ग झालेला रुग्ण आहे का किंवा प्रसाराची शक्यता किती याची काहीच माहिती उपलब्ध नाही. वर्तमानपत्रामधील बातम्या मात्र सांगतायत की समाज कल्याण विभागाचं एक वसतिगृह विलगीकरणासाठी सज्ज ठेवण्यात आलं आहे.