अरबी समुद्राला लागून असणारा हा भाग तुलुनाडू म्हणून ओळखला जातो. या प्रांताला समुद्रापार होत असलेल्या व्यापाराचा मोठा इतिहास आहे. गेल्या अनेक शतकांपासून इथे भुतांची किंवा सोंगांची उपासना केली जात आहे.
“भुतांच्या उपासनेवेळी मी वादन करतो आणि घर चालवतो,” सईद नासिर सांगतात. मुस्लिम वादक आणि गायकांच्या संगीत मंडळीचा ते भाग आहेत. “या विधींवेळी आम्ही वादन करतो पण आम्हाला कधी काही त्रास होत नाही.”
भुतांच्या उपासनेच्या विधींमध्ये अनेक समाज एकत्र येत असल्याचं नितेश अंचन म्हणतात. ते कर्नाटकातील मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन इथे सहयोगी संधोशक म्हणून काम करतात. “लोक [तुलुनाडूमध्ये] वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन स्थायिक झालेत आणि इथल्या अगदी आगळ्या वेगळ्या तुलु विधींमध्ये सहभागी झालेत असं तुम्हाला पहायला मिळू शकेल,” अंचन म्हणतात.
नासिरच्या घरची मंडळी गेल्या चार पिढ्यांपासून भुतांच्या उपासनेवेळी नादस्वरम वाजवत आली आहेत. ते आपल्या वडलांकडून ही कला शिकले मात्र आता संगीताचा हा वारसा पुढे नेणारे त्यांच्या कुटुंबातले ते शेवटचेच. “तरुण पिढीला संगीतात कसलाही रस नाही,” ते म्हणतात. “आता तो काळही राहिलेला नाही. सध्या तर हालत आणखीच बिकट होत चाललीये,” पन्नाशीचे नासिर म्हणतात.
“भुतं ही तुलुनाडूच्या लोकांचं दैवत आहेत,” अंचन म्हणतात. आणि त्यांची फक्त उपासना केली जाते असं नाही, तर लोकांच्या आयुष्याचा ते अगदी अविभाज्य भागही आहेत असंही ते पुढे म्हणतात. ही भुतं किंवा सोंगं स्त्रिया नाचवत नाहीत. पण कोला - म्हणजे भुतांच्या उपासनेच्या विधींमध्ये स्त्री रुपं असतात. पण यांचं सोंग मात्र पुरुषच वठवतात.
तुलुनाडूत विविध ठिकाणी होत असलेल्या भुतांच्या उपासनेवेळी नासिर आणि त्यांच्या संगीत मंडळींचं वादन आणि गायन
शीर्षक छायाचित्रः गोविंद रादेश नायर
या वार्तांकनासाठी मृणालिनी मुखर्जी फाउंडेशनकडून अर्थसहाय्य मिळाले आहे.