जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हशीचं २ महिन्यांचं रेडकू मरण पावलं आणि सारिका सावंतसमोर नवीनच संकट आ वासून उभं राहिलं. “मक्यात मोठी अळी होती बहुतेक, तीच पोटात गेल्याने मेलं बिचारं. कालपासून म्हशीचं दूधच बंद झालंय,” म्हसवडच्या चारा छावणीत आम्ही तिच्याशी बोलत असताना ती सांगते.
गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास झेपेना गेलं म्हणून सारिका आणि तिचा नवरा अनिल सावंत यांनी दोन गायी विकल्या आणि आता रेडकू गेलं. सावंत कुटुंबियांकडे सध्या चार जर्सी गायी, तीन म्हशी आणि दोन वासरं आहेत. त्यांचं मुख्य उत्पन्न दुधातनंच. पण, सारिका सांगते, “गेली दोन वर्षं पाऊसच नाही, आणि गेल्या दिवाळीपासून गावातल्या विहिरी आटल्या, माणसाला प्यायला पुरेसं पाणी नाही. कडबा नाही, हिरवा चारा नाही. जनावरं कशी सांभाळावी? डोक्यावरचं कर्ज तर वाढतच चाललं होतं...”
कर्जाचं ओझं वाढायला लागलं आणि अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सारिका, वय २४ आणि तिचा नवरा अनिल, वय ३२, हवालदारवाडीहून १५ किमीवरच्या म्हसवडमधल्या चारा छावणीत दाखल झाले. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातलं ९९४ वस्ती असलेलं हवालदार वाडी हे त्यांचं गाव.
३१ ऑक्टोबर २०१८ रोजी महाराष्ट्राच्या २६ जिल्ह्यांमधल्या १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला, यातल्या ११२ तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ जाहीर झाला. माणदेशात मोडणारे सर्व तालुके - सातारा जिल्ह्यातील माण व खटाव, जत, आटपाडी व कवठेमहांकाळ आणि सोलापूर जिल्ह्यातले सांगोला आणि माळशिरस – या यादीत आहेत. माणदेशी फौंडेशनने म्हसवड इथे सुरू केलेल्या चारा छावणीत माणदेशातल्या ६४ गावांमधली २५०० माणसं आणि ८,००० जनावरं आश्रयाला आली आहेत. (पहाः चाऱ्याच्या शोधात कुटुंबांची ताटातूट आणि अखेर चिमणाबाई जेवली, तेही ८००० जणांसोबत )
सारिकाच्या भावाची दिघंची गावात वीटभट्टी आहे, तिथे काम करणारा शिवप्पा गडी म्हणून त्यांच्यसोबत छावणीवर आला आहे. वॉर्ड क्र. १९ मधली त्यांची खोप छावणीतल्या इतर खोपींसारखी नाही. नीटसपणे ती बांधलीये – आत एक शेगडी आणि गॅसची टाकी, खलबत्ता, दुसऱ्या कोपऱ्यात घडी केलेली प्लास्टिकची चटई आणि पांघरुणं, मक्याच्या भरड्याचं ठिकं आणि पेंडीची पोती रचून ठेवलेली. आणि बाहेर त्यांचं छोटंसं कुत्र्याचं पिल्लू या आपल्या ‘नव्या’ घराची राखण करण्यात मग्न.
सावंत काही फार गरीब शेतकरी नाहीत. पण राज्यभरातल्या हजारो गावांमध्ये पडलेल्या दुष्काळाने सगळ्यांनाच – श्रीमंत असो वा गरीब, दलित असो किंवा जातीच्या उतरंडीत वरती – सारख्याच दुरवस्थेत टाकलंय.
सारिकाच्या खोपीसमोरच दोन रांगांमध्ये हिरवं शेडनेट आणि साड्यांच्या सावलीत जनावरं नीट बांधून घातलीयेत. “दुभती जनावरं असल्यामुळे त्यांना आहारही तसाच लागतो. मक्याचा भरडा द्यावा लागतो. इथे यायच्या आधी आठवड्याला १२०० चं पेंडीचं पोतं पुरत नव्हतं. पेंडीचं पोतं १२६० रुपयांचं, मक्याचे ९०० रुपये. नुसत्या पेंडीची ७,००० रुपयांची उधारी झाली होती, पाण्याचा खर्च वेगळाच,” सारिका सगळा हिशेब मांडते.
दिवाळीत दोन गायी विकल्या तरीही आजही त्यांच्यावर सुमारे रु. ७०,००० इतकं कर्ज झालंय, तेही केवळ जनावरांच्या चारा-पाण्याचं. “आम्ही बुलडाणा अर्बन बँकेतून ४२,०००/- कर्जाने घेतले, २ वर्षांत महिन्याला २२२२ हप्ता अशी फेड करायची आहे,” सारिका सांगते. “१५,०००/- खाजगी सावकाराकडून घेतलेत, महिना ३ टक्के व्याजाने आणि बचत गटाकडून रु. १०,०००/-, महिना २ टक्के व्याजाने. त्यांचंही ओझं आहेच.”
अनिल यांनी शेतीशिवाय अर्थार्जनासाठी बऱ्याच गोष्टी करून पाहिल्या आहेत. पदवीच्या दुसऱ्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडलं आणि पुण्याला भोसरी इथल्या एका इलेक्ट्रिक कंपनीत ३-४ वर्षं काम केलं, काही काळ मुंबईत पडेल ती कामं केली. त्यानंतर गावी येऊन २०१२ साली अनिल यांनी गावात पोल्ट्री सुरू केली. अकोल्यातल्या एका कंपनीकडून ५,००० पिलं घेऊन त्यांनी पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पाण्याची अडचण असल्याने पक्ष्यांची संख्या ३,५०० वर आली. एप्रिल महिन्यात अनिल यांनी सगळे पक्षी विकले आणि आता ते पोल्ट्री स्वच्छ करून घेतायत. या सगळ्या व्यवसायासाठी घेतलेल्या ७ लाखांच्या कर्जातले १ लाख अजून फेडायचे आहेत.
“दिवाळीच्या आधीपासून कुठल्याच विहिरींना पाणी नाही,” अनिल सांगतात. “त्यामुळे टँकर विकत घ्यावा लागत होता. ५,००० लिटरचा टँकर १२०० रुपयांना मिळतो. छावणीत येण्याअगोदर आठवड्याला दोन टँकर आणायला लागत होते. जितराब आणि कोंबड्या, दोन्हींना पुष्कळ पाणी लागतं.”
नोकरी करून घराला हातभार लावण्यासाठी सारिकानेही बरीच धडपड केली आहे. “माझं लवकर लग्न झालं, शिक्षण पण पूर्ण झालं नव्हतं. पण माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केला, त्यामुळे मी १२ वी पूर्ण केली. काही तरी कोर्स करायचा, नोकरी करायची होती पण मुली लहान असल्यामुळे जमत नव्हतं,” सारिका तिच्यासमोरच्या अडचणी सांगते. “यायला जायला बस नाही, पक्का रस्ता नाही, त्यामुळे रोजचं बाहेर जाऊन काही काम करायचं म्हटलं तर अवघड आहे,” सारिका सांगते.
दोन वर्षं सलग दुष्काळ पडल्यामुळे सावंत कुटंबियांचं १.५ एकर रान वाळून गेलंय्. “पावसाने साथ दिली तर ५-६ पोते ज्वारी आणि ८-१० पोते बाजरी होते. घरात खायला धान्य होतं आणि जनावराला कडबा,” अनिल सांगतात. “[मात्र २०१७ पासून पाऊस नाही. त्यामुळे २०१८ चा] शेतीचा हंगाम पूर्ण हातचा गेला. ज्वारी गेली, बाजरी गेली. थोडा फार कडबा झाला. रब्बी पेरलीच नाही,” अनिल यांच्या नजरेत शेतीची ही अशी विपन्नावस्था झालीये.
सावंत माण तालुक्यातल्या पुळकोटीच्या दूध केंद्रात दूध घालतात. “रोजचं ३-४ लिटर दूध निघतं. त्यातलं काही २३ रुपये लिटर दराने पुळकोटीला घालायचं [बाकी घरी वापरायला होतं],” सारिका सांगते. “माझे मिस्टर म्हशीचं दूध ४० रुपयाने म्हसवडला जाऊन विकतात. महिन्याला [दुधातून] ४००० रुपयांच्या आसपास कमाई होते, पण जनावरांचा महिन्याचा खर्च २००० रुपयांपर्यंत जातो. कर्ज कसं फेडायचं हा प्रश्नच आहे. दोघी मुलींच्या शिक्षणाचा खर्च माझ्या भावानेच उचललाय म्हणून त्याचा तरी भार नाही.”
सारिका आणि अनिल यांची तीन वर्षांची धाकटी स्वरा त्यांच्याबरोबर छावणीवर आलीये. तनिष्का, वय ७ आणि श्रद्धा, वय ४ सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातल्या दिघंचीला शाळेत जातात आणि सध्या तिथेच आजी आणि मामापाशी राहतात. “आम्हाला तीन मुली आहेत ना, त्यामुळे यांचं सरकारी नोकरीचं पण कुठे काही होणं अवघड आहे,” सारिका म्हणते. महाराष्ट्र शासनाच्या लोकसंख्या धोरणानुसार दोनहून अधिक जिवंत अपत्यं असणाऱ्या कुणालाही सरकारी नोकरी, योजना किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरवण्यात येतं.
“अशा सगळ्या अडचणी आहेत. पण दुधाचं काम आवडतं मला. घरबसल्या, फार कुठं रोज जा-ये न करता दर दहा दिवसाला हातात पैसा येतो. आणि तसं पण जनावरात वेळ जातो चांगला... पण दुष्काळानंच लई अवघड केलंय,” सारिका चिंतित स्वरात सांगते.