अमिताभ बच्चन म्हणतात की जर जनगणना सर्वेक्षकांनी जर कधी त्यांना त्यांची जात विचारली तर त्यांचं उत्तर असेलः जात – भारतीय. अर्थात, माध्यमांचं बॉलीवूड प्रेम चेतवण्याहून थोडं अधिक काही तरी यातनं घडावं. श्याम महाराज काही बच्चन नाहीत. ना त्यांचे भाऊ, चैतन्य महाराज. मात्र जनगणना सर्वेक्षकांनी त्यांना हा प्रश्न विचारलाच तर ते आणि त्यांचे बांधव याहून अधिक गहन उत्तरं देतात आणि प्रश्नही विचारतात. “आमचं उत्तरः आम्ही अजात आहोत. आणि हे सिद्ध करण्यासाठी हा माझा शाळा सोडल्याचा दाखला. अर्थात तुम्हाला जे लिहायचंय ते लिहायला तुम्ही मोकळे आहात,” अमरावती जिल्ह्याच्या मंगरूळ (दस्तगीर) गावातल्या आपल्या घरी चैतन्य प्रभू आम्हाला सांगतात.
अजात याचा शब्दशः अर्थ अ-जात, जात नसलेले. अजात ही १९२० आणि ३० च्या दशकातली एक बुलंद सामाजिक चळवळ होती आणि ती अगदी जोमात असताना आताच्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये या चळवळीचे हजारो समर्थक होते. एका बहुढंगी आणि विक्षिप्त सामाजिक सुधारकाच्या नेतृत्वाखाली ही चळवळ जोर धरत होती. गणपती भाबुटकर, ज्यांना सगळे गणपती महाराज म्हणून ओळखत. चैतन्य महाराज आणि श्याम महाराज हे त्यांचे हयात असलेले नातू. दारूबंदी आणि हिंसामुक्ती या नेहमीच्या उद्दिष्टांसोबत गणपती महाराजांनी इतर काही गोष्टी चळवळीशी जोडून घेतल्या. ते थेट जातीलाच भिडले. त्यांच्या आवाहनावरून अनेकांनी मूर्तीपूजा बंद केली. स्त्री पुरुष समानता यावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि अगदी खाजगी मालमत्तेचाही त्यांनी विरोध केला. आणि मग १९३० मध्ये त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी स्वतःला ‘अजात’ घोषित केलं.
ते ज्या गावांमध्ये काम करत होते तिथे जाती-जातींच्या संमिश्र भोजनाने गदारोळ माजला. त्यांचे एक शिष्य पी. एल. निमकर सांगतातः “ते त्यांच्या सगळ्या शिष्यांना आपापल्या घरून तयार शिजलेलं अन्न घेऊन यायला सांगायचे. हे सगळं अन्न ते एकत्र कालवायचे आणि मग तेच प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायचे.” त्यांचा मुख्य निशाणा होता जात. “आंतर-जातीय विवाह आणि विधवा पुनर्विवाह हेच त्यांचं ध्येय होतं आणि ते त्यांनी साध्य केलं,” प्रभू सांगतात. “आमच्या स्वतःच्या कुटुंबात, थेट आमच्या आजोबांपासून आम्ही ११ वेगवेगळ्या जातींमध्ये विवाह केले आहेत, ब्राह्मणांपासून ते दलितांपर्यंत. आणि आमच्या गोतात तर अशी असंख्य लग्नं झाली आहेत.”
गणपती महाराजांनी स्वतः असा विवाह केला होता. त्यांनी “मानव धर्म तयार केला आणि इथलं मंदिर दलितांसाठी खुलं केलं, वरच्या जातींना मिरच्या झोंबल्याच,” श्याम महाराज सांगतात. “त्यांच्याविरोधात केसेस टाकल्या गेल्या आणि त्यांची केस कुणी घेईनाच. त्या काळी इथले सगळे वकील ब्राह्मण होते.”
काळाच्या फेऱ्यात चळवळ विखरून गेली, जातीच्या मुद्द्यावर काही समर्थक सोडून गेले आणि १९४४ मध्ये त्यांच्या गुरूंचं निधन झाल्यावर काही. (निधनानंतर त्यांनीच बांधलेल्या आश्रमात त्यांचं दफन करण्यात आलं, प्रभूंच्या अगदी घरासमोरच). तरीदेखील स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळ या चळवळीचा सगळीकडे बोलबाला होता. “माझा शाळा सोडल्याचा दाखला पहा,” प्रभू आम्हाला दाखला दाखवूल सांगतात. “१९६० पर्यंत, अगदी १९७० पर्यंत आम्हाला दाखल्यावर अजात अशी नोंद करता यायची. आता मात्र शाळा किंवा महाविद्यालयं म्हणतात, की त्यांना आमच्याबद्दल काहीही माहिती नाही त्यामुळे आमच्या मुलांना प्रवेश देता येणार नाही.”
जे अजात उरले आहेत त्यांचंही फारसं बरं चाललेलं नाही. श्याम आणि प्रभू त्यांच्या शेतीशी निगडीत व्यापारातून कसं बसं भागवतायत झालं.
सत्तरीच्या दशकापर्यंत विस्मृतीत गेलेल्या अजातांचा पुन्हा एकदा शोध लावला तो नागपूरच्या अतुल पाण्डे आणि जयदीप हर्डीकर या दोन पत्रकारांनी. त्यांच्या बातमीमुळे महाराष्ट्र सरकारला त्यांना सहाय्य करणं भाग पडलं. मात्र या विषयात लक्ष घातलेले एक वरिष्ठ अधिकारी तिथनं गेल्यानंतर परत मामला थंड्या बस्त्यात गेला.
अजात उमेदवार पंचायतीच्या निवडणुकांना उभे राहू शकत नाहीत. निवडणूक अधिकारी त्यांचे – जात नाही – असं नोंदवलेले अर्जच स्वीकारत नाहीत. “अजात लोकांना रेशन कार्डही मोठ्या मेहनतीनंच मिळतं,” प्रभू सांगतात. महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती आणि सरकारी नोकऱ्या या एका कारणास्तव त्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यांची जात नक्की काय याची स्पष्टता नसल्याने इतर जातीची लोकं त्यांच्या जातीत लग्नं करत नाहीत. थोडक्यात काय तर एके काळी जातीअंताची एक स्वाभिमानी चळवळ आता केवळ एक-दोन हजार लोकांपुरती मर्यादित झाली आहे, आणि त्यांची ओळखच आता एखाद्या जातीत कप्पेबंद झाली आहे.
“माझी भाची सुनयना, तिला महाविद्यालयात प्रवेशच मिळाला नाही,” प्रभू सांगतात. “महाविद्यालयाचं म्हणणं काय तर ‘अजात वगैरे आम्हाला काही माहित नाही. योग्य असं जात प्रमाणपत्र घेऊन या आणि आम्ही तिला प्रवेश देऊ’.” त्यांच्या भाच्याला कसा बसा प्रवेश मिळाला, ते सांगतोः “ते आम्ही कुणी तरी विचित्र असल्यासारखे आमच्याशी वागतात. आमच्यापैकी कुणालाही शिष्यवृत्ती मिळाली नाही. तिथे कुणाला अजात म्हणून काही अस्तित्वात आहे हेच मान्य नाही.” आजच्या अस्वस्थ तरुण पिढीमध्ये भूतकाळामुळे आपण जखडून गेल्याची भावना आहे. अनेक अजात कुटुंबं, अगदी प्रभूंसकट, कुण्या तरी पूर्वजाचं मूळ शोधत आहेत, ज्याची जात स्पष्टपणे सिद्ध करता येईल.
“आमच्यासाठी हे किती अवमानकारक आहे, विचार करा,” ते म्हणतात. “आमच्या पोरांसाठी आम्हाला जातीचे दाखले काढावे लागतायत.” अनेक पिढ्यांमध्ये आंतर-जातीय विवाह झाले असल्याने हे सोपं नाहीये. आणि गावातल्या कोतवालाच्या खतावणीतही त्यांची नोंद अजात अशीच करण्यात आलेली आहे. काहींना तर त्यांच्या खापरपणजोबांचा शोध घ्यायला लागतोय, ज्यांची जात सांगता येईल. “तेव्हाच्या सगळ्या नोंदी मिळवणं आणि त्यातून पुरावा तयार करणं हे भयंकर क्लिष्ट काम आहे,” प्रभू सांगतात. “अधिकाऱ्यांना वाटतं आम्ही काही तरी लपवतोय आणि खोटी जात लावतोय. हे जातीचे दाखले करणे म्हणजे काळजाला डागण्या आहेत. पण त्यांच्या अभावी आमची पोरांचं सगळंच अडकून पडंलय.” खेदाची बाब ही की ज्यांनी ही जाती अंताची चळवळ सुरू केली त्या गणपती महाराजांची जातही हुडकून काढावी लागली. त्यांच्या पतवंडांसाठी ती आवश्यक होती.
आता जे दोन एक हजार अजात उरले आहेत त्यातले बरेचसे या गावातल्या आश्रमात दर वर्षी नोव्हेंबरमध्ये जमतात. “आता मध्य प्रदेशात आमच्या संपर्कातलं असं केवळ एक कुटुंब आहे,” नाराज भासणारे प्रभू सांगतात. बाकी सगळे महाराष्ट्रात आहेत. “आमच्या संस्थेकडे, अजातीय मानव संस्थेकडे केवळ १०५ कुटुंबांची नोंद आहे. मात्र त्याहून किती तरी अधिक संख्येने लोक आमच्या वार्षिक सभेला येतात. पण तुम्हीच विचार करा, कधी काळी या चळवळीत ६०,००० लोक सहभागी होते.”
“जनगणनेतल्या केवळ एका प्रश्नापलिकडे जाऊन आपल्याला जातीच्या प्रश्नाबद्दल एक व्यापक आणि सर्वसमावेशक सर्वेक्षण करणं गरजेचं आहे,” या विषयावर काम केलेले अर्थतज्ज्ञ (याआधी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज सोबत कार्यरत) डी के नागराज म्हणतात. “आपल्याला जातीसंबंधी आकडेवारी आवश्यक आहे याबाबत दुमत नसावं. मात्र ही आकडेवारी अशा पद्धतीने संकलित झाली पाहिजे ज्यात तिचं प्रचंड वैविध्य, स्थानिक वैशिष्ट्यं आणि इतर गुंतागुंत टिपली जावी. २०११ च्या जनगणनेतल्या केवळ एका प्रश्नातून ते साध्य होणार नाही. कदाचित हे राष्ट्रीय नमुना पाहणीच्या प्रशिक्षित सर्वेक्षकांद्वारे आणि आगाऊ तयारीनिशी करता येऊ शकेल. ”
तर, जर असा एखादा सर्वेक्षक तुमच्या घरी आला आणि त्याने तुम्हाला हा जातीचा प्रश्न विचारला तर? “मी सांगतो,” प्रभू म्हणतात, “तो चक्रावून जाईल. मला तर वाटतं आमच्यासारख्यांसाठी त्यांनी जनगणनेत एक वेगळा प्रवर्ग करावा. आम्ही कोण आहोत हे आम्ही सांगितलंच पाहिजे. जात म्हणून जे जे काही आहे त्या सगळ्याविरोधात आम्ही संघर्ष केलाय. पण या समाजात मात्र, जात हेच सर्वस्व आहे.”
पूर्वप्रसिद्धी – द हिंदू, ४ जून, २०१० (प्रस्तुत लेखात किंचित फेरफार करण्यात आले आहेत)
अनुवादः मेधा काळे