“बघा,बघा - ती चालली, जादुई मोपेड.. भाजीच्या पोत्यांनी चालवलेली!” चंद्रा जेव्हा आपला शेतमाल मोपेडवर लादून १५ किमी. दूर शिवगंगाईच्या बाजारला नेते तेव्हा रस्त्यावरचे तरुण हटकून अशी हाकाटी करतात. “कारण मी जाते तेव्हा पुढे आणि मागे लादलेल्या पोत्यांतून गाडी कोण चालवतेय ते दिसतच नाही,” तमिळनाडूची ही छोटी शेतकरीण सांगते.
आपल्या घराच्या अंगणात बाजेवर मोपेडजवळ बसलेली चंद्रा सुब्रमण्यन खरंच छोटीच दिसते. बारीक चणीची चंद्रा जेमतेम अठराची दिसते, आहे मात्र २८ वर्षांची. दोन लेकरांची आई आणि चलाख/उत्साही अशा चंद्राला तिच्या आसपासच्या वयस्कर बायका दाखवत असलेली सहानुभूती अजिबात आवडत नाही. ती विधवा आहे म्हणून “माझ्या आईसकट या सगळ्या माझ्या भाविष्याची काळजी करतात. ठीक आहे, मी २४ वर्षांची असताना माझा नवरा वारला पण मला पुढे जायचंय. या सगळ्यांना मी सांगते की तुम्ही उगीच मला उदास करू नका.”
खरं तर चंद्राच्या आसपास राहून कुणी उदास राहूच शकणार नाही. ती सहज हसू शकते, तेही विशेषत: स्वत:वर! तिच्या बालपणात अनुभवलेल्या दारिद्र्याच्या आठवणींची धार तिच्या विनोदाने बोथट होते. “एके रात्री माझ्या वडिलांनी आम्हा भावंडांना उठवलं, मी दहा वर्षांची असेन-नसेन. ते म्हणाले, ‘पौर्णिमेचा चंद्र पहा किती तेजस्वी आणि सफेद आहे. त्याच्या प्रकाशात आपण सहज कापणी करू शकू.’ पहाट झाली असावी या कल्पनेने आम्ही भावंडे – भाऊ, बहिण आणि मी – आमच्या आई-वडिलांसोबत गेलो. सगळे भात कापेपर्यंत चार तरी तास गेले असतील. मग ते म्हणाले, ‘आता शाळेच्या वेळेपर्यंत तुम्ही थोडी झोप घेऊ शकता.’ विश्वास बसेल तुमचा? पहाटेचे ३ वाजले होते; म्हणजे त्यांनी आम्हाला रात्री ११ वाजताच शेतात ओढून नेलं होतं!”
पण चंद्रा तिच्या मुलांसोबत असं कधीच करणार नाही. ती एकल माता आहे पण आपल्या दोन्ही मुलांना – ८ वर्षांचा धनुषकुमार आणि ५ वर्षांची इनिया यांना ती खूप शिकवणार आहे. ती दोघं जवळच्याच एका खाजगी इंग्रजी शाळेत शिकतात आणि त्यांच्यासाठीच चंद्राने शेती व्यवसाय निवडलाय.
सोळाव्या वर्षी माझ्या आतेभावाशी माझं लग्न झालं. सुब्रमण्यन आणि मी तिरुप्पूरमध्ये राहत होतो. तो एका होजियरी कंपनीत शिवणकाम करायचा. मी पण तिथेच काम करायची. चार वर्षांपूर्वी, माझे वडील एका रस्ता अपघातात वारले. माझा नवरा त्यामुळे सैरभैर झाला, माझे वडील त्याच्यासाठी सर्वकाही होते. चाळीस दिवसांनंतर त्याने गळफास घेतला...”
चंद्रा पुन्हा गावी आपल्या आईकडे परतली. परत शिवणकामाचा व्यवसाय करावा की पुढे शिकावं याबाबत तिचं मन दोलायमान होतं. दोन्ही गोष्टी तशा कठीणच पण शिकून पदवी घ्यायची तर आधी बारावीची बोर्डाची परीक्षा पास व्हायला हवी. आणि “मी पदवी घेईपर्यंत कोण राहील माझ्या मुलांसोबत? मला आईची खूप साथ आहे, तरी पण....”
स्पष्ट शब्दात तिने म्हटलं नाही पण चंद्राला शेतीकाम हे आपल्या सोयीने करता येण्याचं काम वाटतं. आपल्याच परसात, अगदी नाईट गाऊन घालून, काम करणं तिला खूप सोईचं वाटतं; त्यांचं शेत खरंच घराला लागून मागेच आहे. तिची आई चिन्नपोन्नू अरुमुगम (५५) हिने पतीच्या निधनानंतर आपली १२ एकर जमीन आपल्या तीन मुलांत वाटून दिली. आता माय-लेक मिळून त्या शेतात भाज्या, भात, ऊस आणि मक्याचं पीक घेतात. चिन्नपोन्नूने गेल्या वर्षी आपल्या मुलीसाठी छोटंसं घरही बांधलंय. घर भक्कम आहे पण त्यात संडास नाही. “इनिया मोठी होण्याआधी मी तो बांधीनच.” चंद्राने पक्कं ठरवलंय.
अशा मोठ्या खर्चांसाठी – आणि मुलांच्या फिया नि गणवेशासाठी – चंद्राचा भरोसा उसातून येणाऱ्या उत्पन्नावर आहे. इतर उत्पन्नातून - भातापासूनचं चार महिन्यांनी मिळणारं आणि रोजच्या भाजीपाला विक्रीतून मिळणारं – तिचं घर चालतं. त्यासाठी ती दिवसाचे १६ तास काम करते. पहाटे ४लाच उठून ती घरकामाला लागते, मुलांचे डबे बनवते.
मग ती जाते शेतात, वांगी, भेंडी आणि इतर भाज्या खुडायला. मग ती धनुष आणि इनियाला शाळेसाठी तयार करून पोचवते. “पालकांनी सकाळी नीटनेटके कपडे घालूनच यायला हवं असं शाळेत सांगतात. मग मी गाऊनवरच साडी गुंडाळते आणि जाते!”, ती खोडकरपणे हसत सांगते. परत येऊन ती शेतात काम करते ती जेवणापर्यंत. “अर्धा तास मी विश्रांती घेते पण शेतात नेहमीच काम असतं, अगदी कधीही.”
“लहानपणी मी कुठेही एकटी जायला घाबरत असे. आता दिवसातून चार वेळा मी शहरात जाते.”
बहुधा मुलं घरी येण्याआधी ती परतते. ती काम करत असताना मुलंही थोडा वेळ शेतात खेळतात आणि मग घरी येतात. गृहपाठ केल्यावर मुलं थोडा वेळ टीव्ही बघतात आणि आपल्या पाळीव कुत्र्याच्या पिलांसोबत आणि गिनी पिगबरोबर खेळतात. “माझ्या आईला हा प्राणी बिनकामाचा वाटतो. त्यापेक्षा मी शेळ्या का पाळत नाही, असं ती म्हणते.” पिंजऱ्यातल्या एका लठ्ठ गिनी पिगला उचलत चंद्रा सांगते, “पण गेल्या आठवड्यात मी त्यांच्यासाठी गाजरं आणायला गेले होते तेव्हा कुणीतरी विचारलं कि ती विकायची आहेत का?” फायदा होणार असेल तर चंद्रा नफ्यासाठी असा विक्रीचा विचार करू शकते.
चंद्राचा स्वभाव यातून दिसतो – वाईटातून चांगलं निर्माण करायचं, चंचल पण शहाणीही आहे ती. नारळीच्या रांगांजवळून जाताना ती चुटपुटते, “आता मी झाडांवर चढणं बंद केलंय. कशी चढणार? आठ वर्षांच्या मुलाची आई आहे मी!” दुसऱ्या क्षणाला ती इतर राज्यातून आलेल्या लोकांबद्दल, चेन्नईच्या पुराबद्दल आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या तुच्छ वागणुकीबद्दल बोलते. “मी एखाद्या कार्यालयात किंवा बँकेत जाते तेव्हा मला थांबायला सांगतात पण तुमच्या पोशिंद्यासाठी खुर्च्या कुठे असतात बसायला?”
छोटीशी शेतकरीण, तिची मोठी हिम्मत आणि जादुई मोपेड फोटो अल्बम पहा.
अनुवादः छाया देव