संध्याकाळचे सहा वाजलेत. गायी परतण्याची वेळ झालीये. पण म्हसईवाडीत पुढचे किमान सहा महिने तरी गायी काही परतून यायच्या नाहीत. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातली ३१५ उंबरा असणारी म्हसईवाडी एकदम सुनी सुनी झाली आहे. गायीच्या घुंगुरमाळांचा, घंटांचा आवाज नाही, हंबरणं नाही ना त्यांना हाकणाऱ्यांचे पुकारे. शेणाचा वास नाही, दूध गाड्यांची वर्दळ नाही. चारा आणि पाण्याअभावी वर्षाच्या सुरुवातीलाच म्हसईवाडीची निम्मी माणसं आणि बहुतेक सगळी गाई-गुरं पाच किलोमीटरवरच्या म्हसवडपाशी असलेल्या चारा छावणीत मुक्कामाला गेली आहेत.
त्यातल्याच
एक आहेत संगीता नंदू वीरकर, वय ४०. धनगर समाजाच्या संगीता १ जानेवारीपासून आपल्या दोन
जर्सी गाया आणि दोन म्हशींसोबत वडलांची एक गाय आणि वासरू घेऊन छावणीत दाखल झाल्या
आहेत. माहेरी भाऊ जगायला बाहेर पडलाय आणि म्हातारपणामुळे आई-वडलांना गुरं सांभाळणं
होत नाही. मुलांचं शिक्षण चालू रहावं म्हणून संगीताचे पती नंदू वीरकर, वय ४४ गावी
राहिलेत. त्यांची सर्वात थोरली मुलगी लग्न होऊन नांदायला गेलीये, दोन नंबरची कोमल,
वय १५ दहावीत शिकतीये आणि धाकटा विशाल सातवीत आहे. घरी कुत्रं, मांजर आणि तीन शेरडंही
आहेतच.
“लेकरांची
शाळा सुरू हाय, पोरगी दहावीला बसलीये. तिथं पोरं आन् इथे जितराब. दोघांचं बी बघावं
लागणार,” संगीता म्हणतात. “यंदा एक पण मोठा पाऊस नाही. सासरी १२ एकर रान आहे, तिघा
भावात. आमच्या वाट्याची २०-२५ पोते जवारी-बाजरी होते खायापुरती. पण यंदा काहीच
नाही. जवाऱ्या गेल्या, बाजरी गेली त्यामुळे कडबं नाही. पाऊसच नाही म्हटल्यावर चारा
तर कुठून मिळणार. रब्बीचा पेराही झाला नाही. गुरं कशी जगवावी सांगा.” प्रेमाने
आपल्या गायांच्या अंगावरून हात फिरवत संगीता विचारतात.
त्यांच्या दोन्ही जर्सी गाया चार वर्षापूर्वी घेतलेल्या. प्रत्येकीची किंमत ६०,००० रुपये. एकेकीला दिवसाला २० किलो वैरण लागते, ५०-६० लिटर पाणी लागतं. मात्र २०१८च्या नोव्हेंबरपासून आठवड्याला एक दिवस येणाऱ्या टँकरनी म्हसईवाडीतल्या माणसांची तहान कशी बशी भागतीये. वर्षभर चार दिवसातून एकदा या वाडीला म्हसवड नगर परिषदेकडून पाणी पुरवठा होतो, पण तोही आता थांबलाय. कसंबसं माणशी ४० लिटर पाणी मिळत असताना गुरांना पाणी कुठनं पाजावं? दुभत्या जनावरांना दिवसातून किमान ४०-५० लिटर पाणी लागतं. उन्हाचा कार वाढला की जास्तच.
“गावात
पाणी-चारा काहीच नव्हता म्हणून दिवाळीला एक बैल विकला,” नंदू सांगतात. “शंभर कडबं
घ्यायचं तर २५०० रुपये खर्चावे लागतात. तेही महिनाभरच पुरतं. उसाचं वाढं आणायचं तर
शेकडा ५००० रुपये. ते जातं दोन महिने. पाण्यासाठी वणवण वेगळीच. आता निदान शेतात
उसं आहेत. पाडव्यानंतर तर हिरवा चारा बघायला मिळायचा नाही. मग काय, २००६ साली ३०
हजाराला घेतलेला बैल १३ वर्षं सांभाळून, जोपासून गेल्या साली २५,०००ला
व्यापाऱ्याला विकला. आमचा एक आन् नागूअण्णाचा एक. जोडी होती दोघांची. आता परत घेणं
होत न्हाई,” आवंढा गिळत नंदू वीरकर सांगतात.
सातारा
जिल्ह्यातले माण, खटाव, सांगली जिल्ह्यातले जत, आटपाडी, कवठे महांकाळ आणि सोलापूर
जिल्ह्यातले माळशिरस आणि सांगोला या तालुक्यांचा मिळून बनतो तो माणदेश.
माणगंगेच्या अतितुटीच्या या खोऱ्यात अवर्षण आणि दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे.
सिंचनाच्या शाश्वत सोयी नाहीत त्यामुळे शेतीसोबत इथला महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे
पशुपालन. ज्या वर्षी पाऊसच होत नाही, शेती पिकत नाही, चारा-पाण्याची टंचाई तीव्र
होते तेव्हा इथली गावंच्या गावं ‘जगायला’ बाहेर पडतात.
चारा छावणीतली जगायची धडपड
२०१८
साली राज्य सरकारच्या दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांच्या यादीतील गंभीर दुष्काळ
असणाऱ्या ११२ तालुक्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग – संभाव्य पाणी टंचाई अहवाल २०१८-१९
या या अहवालातील आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यामध्ये ऑक्टोबर
महिना अखेर १९३ मिमि इतका पाऊस झाला असून तो सरासरीच्या ४८% कमी आहे. याच अहवालात
असंही नमूद करण्यात आलं आहे की माण तालुक्यातल्या ८१ गावांमध्ये भूजलाची पातळी
सरासरीपेक्षा १ मीटरहून खालावली आहे. ४८ गावांमध्ये ही पातळी ३ मीटरहून अधिक
खालावली आहे.
म्हसवड
येथील माणदेशी फौंडेशनने १ जानेवारी रोजी सुरू केलेल्या या चारा छावणीत ७०
गावांमधली सुमारे १६०० माणसं आणि ७७६९ जनावरं मुक्कामी आली आहेत. माणदेशी फौंडेशन
माणदेशी महिला सहकारी बँकेसोबत आर्थिक मुद्द्यांपलिकडे इतर प्रश्नांवर काम करते.
दुष्काळी गावांना मदत करण्यासाठी सुरू केलेली एवढ्या मोठ्या प्रमाणावरची ही पहिलीच
छावणी आहे.
सकाळी
६.३० वाजता आम्ही छावणीत पोचलो, तर पहावं तिथे गुरांचे गोठे आणि गुरं. बाया शेणघाण
काढत होत्या, धारा काढत होत्या आणि चुलींवर चहा उकळत होता. काही कुटुंबं आपल्या
कच्च्या-बच्च्यांना घेऊन छावणीत आलीयेत, त्यामुळे लेकरं पांघरुणात निजली होती.
रस्त्याच्या कडेला पुरुष माणसं शेकत गप्पा मारत बसली होती आणि स्पीकरवर भजनं सुरू
होती.
“इथे तांबडं फुटायच्या आत आमचा दिवस सुरू होतो, अंधारात उठून, चुलीवर पाणी तापवायचं, [कोपऱ्यातल्या चार काठ्या आणि लुगडं बांधून तयार केलेल्या न्हाणीत] आंघोळ उरकायची. त्यानंतर शेण-घाण काढायची, जनावरांना पाणी पाजायचं, पेंड घालायची आणि धारा काढायच्या. तोवर उजाडतं. ट्रॅक्टर शेण गोळा करून गेला की जेवणाची तयारी करायची. त्यानंतर वैरण घ्यायला कधी नंबर लागतो त्याची वाट बघत बसायचं. आपला नंबर आला की वजन करून उसाच्या मोळ्या घेऊन यायच्या. ७० किलोची एक मोळी. ती आणायची, त्याची कुट्टी करायची, कडबं मिळालं तर त्याची कुट्टी करायची. दिवसातून तीन चार वेळा गुरांना पाणी पाजायचं. कामं सरतच नाहीत,” बोलता बोलता आदल्या रात्रीची भांडी घासणं सुरूच आहे.
छावणीमध्ये
गुरांना चारा, पाणी आणि पशुवैद्यकीय सेवा पुरवल्या जातात आणि लोकांनाही प्राथमिक
सुविधा दिल्या जातायत. उदा. प्रत्येक ‘वॉर्ड’पाशी पाण्याचे ड्रम ठेवलेत, दर
दोन-तीन दिवसांनी गरजेप्रमाणे पाणी भरलं जातं, पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.
गुरांच्या संख्येप्रमाणे सगळ्यांना हिरवं शेडनेट देण्यात आलंय ते वापरून चार-सहा
खांब रोवून लोकांनी गुरांसाठी सावली केलीये. गोठ्याला लागूनच बायांनी ताडपत्री आणि
जुनी पातळं वापरून छोट्या तंबूवजा झोपड्या उभारल्या आहेत.
संगीताच्या
पलिकडेच विलासी नागू वीरकर, वय ४६ यांची जनावरं बांधलीयेत, दोन म्हशी, एक जर्सी
आणि एक खिल्लार गाय. एक रेडी आणि एक वासरूदेखील आहे. विलासी यांचा जन्मच १९७२ चा.
“जन्मच दुष्काळातला, अख्खी जिंदगी दुष्काळातच जाणार,” विलासी खेदाने म्हणतात.
त्यांचे पती आणि सासरे गावी, म्हसईवाडीत राहिलेत. घरी शेरडं आहेत आणि सासरे
शंभरीला टेकलेत. त्यांची मुलगी आणि मोठा मुलगा पदवी घेऊन मुंबईत नोकरी करतायत तर
धाकटा मुलगा कॉमर्सचं शिक्षण घेतोय. त्यामुळे जनावरांना घेऊन विलासी छावणीत आल्या
आहेत.
विलासी आणि इतर बायांनी घरनं चुली सोबत आणल्या आहेत (काहींकडे मात्र तीन दगडाच्या चुली आणि सरपण म्हणून उसाचं पाचट) किंवा काहींकडे गॅस शेगड्याही आहेत. सोबत काही भांडी-कुंडी. दर बुधवारी म्हसवडच्या बाजारातून घरचं कुणी तरी चहा-साखर-भाजी पाला आणून देतं. रोज सकाळी आपल्यासाठी आणि घरच्यांसाठी दोन वेळचं जेवण बनवायचं – बाजरीच्या भाकरी आणि वांगं, बटाटा, मटकीची अशी काही तरी भाजी - आणि गावाहून आलेल्या माणसाबरोबर डबा बांधून द्यायचा असं चालू आहे. “घरी त्यांना करून घालायला कुणी नाही, मी इथूनच डबा पाठवते. तोच डबा रात्री खातात. पुढचे सहा-आठ महिने असं डब्यावरच रहायचं आलंय.”
संगीता
आणि विलासीसारख्या अनेक बायांसाठी सोमवार ते शुक्रवार छावणीत रहायचं आणि
शनिवार-रविवार घरी जाऊन यायचं असं सुरू आहे. त्या जेव्हा घरी जातात तेव्हा घरचं
कुणी तरी किंवा नात्यातलं माणूस छावणीवर येऊन राहतं. एकेका गावचे लोक एकत्र छावणीत
आलेत, शेजारी शेजारी राहतायत त्यामुळे अशा वेळी ते एकमेकांना मदत करतायत.
या
बाया जनावरांसाठी घरापासून लांब आल्या असल्या तरीही संसाराची जबाबदारी
त्यांच्यावरच आहे. शनिवार-रविवार गावी जाऊन घरची झाडलोट, शेण सारवण, धुणी करायची,
दळणं करून ठेवायची आणि परत छावणीवर यायचं असा नित्यक्रम झाला आहे. “गावी असताना
रानानी, मजुरीला जायला लागायचं, ते इथे नाही, एवढाच काय तो आराम!” विलासी चेष्टेत
म्हणतात.
गाईगुरांशिवाय सुनी म्हसईवाडी
“दोन
बिऱ्हाडं थाटल्यागत झालंय, नांदत्या जोडप्यांनी घटस्फोट घेतल्यासारखं...,”
नागूअण्णा धुळा वीरकर, वय ५२, विलासींचे पती म्हणतात. पाचवीपर्यंत शिक्षण
घेतलेल्या नागूअण्णांना आम्ही म्हसईवाडीत त्यांच्या घरी भेटलो तेव्हा ते नुकतेच
त्यांच्या शंभरीला टेकलेल्या वडलांना, धुळा वीरकरांना दवाखान्यात दाखवून आले होते.
मंडळी (बायको) छावणीवर, घरी शेरडं बघायची, आठवड्याला टँकर आला की पाणी भरून
ठेवायचं, बुधवारी म्हसवडला बाजार करून छावणीवर गरजेपुरता शिधा पोचवायचा आणि
वडलांचं सगळं काम नागूअण्णा करतात. “या वर्षी एक पण मोठा पाऊस झालेला नाही. एरवी
फाल्गुनापर्यंत पाणी पुरतं पण यंदा दिवाळीलाच पाणी गायब. रस्त्यावर पाऊस पडला पण
अंगणात ओघळदेखील आला नाही...”
“शेतात पिकलं नाही त्यामुळे घरात खायला दाणा नाही,” विलासी सांगतात. सासरी १०-१२ एकर जमीन आहे दोघा भावात. “दुसऱ्याच्या रानानी कामं न्हाइती. सरकार रोजगार हमीची कामं काढंना. मजुरीला गेलं तरी बायांना १५०/- रुपये अन् गड्याला २५०/-. पण कामंच न्हाइती गावात. कसं जगावं, सांगा,” विलासी रोकडा सवाल करतात.
तिथे
संगीताचे पती नंदू सांगतात, “मी वीटभट्टीवर कामाला चाललोय. रोजची २५० रुपये मजुरी
मिळते. अजून आठ दिवस काम आहे. नंतरचं काय माहित न्हाई. रानानी तर कसलीच कामं
न्हाइती. ज्वारी-बाजरी गेली. कामांवर खाडे करून आयडीबीआय बँकेत पीक विमा भरला.
कितीक चकरा झाल्या. पण इमाच आला नाही,” संगीताचे पती नंदू वीरकर सांगतात. “दुधाचा
थोडा पैसा होतो. गुराला दाणा-पाणी नीट मिळालं तर रोजचं ४-५ लिटर दूध निघतं. २०
रुपये लिटरने दूध जातं डेअरीत. पण सध्या दुधाचं जनावर न्हाई. छावणीत सासऱ्याची एक
गाय आहे. तिचं दूध होतंय, २-३ लिटर.”
“गेल्याच्या
गेल्या सालचे दाणे (ज्वारी) होते ते संपले. कसं झालंय, शेतकऱ्याने ज्वारी विकायला
काढली तर (क्विंटलला) १२०० रुपये भाव मिळतो. आणि आज विकत घ्यायची म्हटलं तर २५००
रुपये मोजावे लागतायत. कसं भागवायचं सांगा,” नंदू वीरकर विचारतात. “रेशन कार्डावर
३ लिटर रॉकेल सोडून काही मिळत नाही. केशरी कार्ड आहे त्यामुळे धान्य, साखर कशाचा
पत्ता नाही.”
म्हसईवाडी
आणि आसपासच्या गावांमध्ये तरीही ना इथे रोजगार हमीची कामं निघालीयेत ना गुरांसाठी
चारा छावण्या. दि. ९ जानेवारी २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन
निर्णयानुसार मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी व औरंगाबाद या पाच
जिल्ह्यातल्या गोशाळांना ‘पशुधन राहत व चारा शिबिर’ सुरू करण्याची परवानगी देण्यात
आली आहे. यामध्ये किमान ५०० ते कमाल ३००० गुरांचा समावेश करण्यात येणार आहे.
मोठ्या संख्येने पशुधन असणाऱ्या सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांचा मात्र यात समावेश नाही. मात्र दि. २५ जानेवारी २०१९ काढलेल्या शासन निर्णयात दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांसोबत २६८ महसुली मंडळांच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या जनावरासाठी प्रति दिन रु. ७० आणि छोट्या जनावरासाठी रु. ३५ अनुदान म्हणून देण्यात येणार आहेत. छावणीत दर ३ दिवसाआड १५ किलो ओला चारा किंवा ६ किलो सुकी वैरण पुरवण्यात येणार आहे. मात्र एका कुटुंबाला केवळ ५ जनावरं छावणीत आणण्याची अटदेखील या निर्णयात घालण्यात आली आहे. पाचहून अधिक गुरं असणाऱ्या कुटुंबांनी बाकी गुरांसाठी चारा-पाणी कसं आणावं याबाबत हा निर्णय करताना काय विचार केला गेला असेल, कल्पना नाही. आतापर्यंत एकही छावणी सुरू झालेली नाही, केवळ प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत, सांगोल्यातील डॉ. आंबेडकर शेती व संशोधन विकास संस्थेचे ललित बाबर सांगतात.
“सरकार
कधी छावण्या सुरू करेल, माहित नाही,” माणदेशी फौंडेशनचे सचिन मेनकुदळे सांगतात.
माणदेशी फौंडेशनची छावणी पुढचे ६-८ महिने तरी हटणार नाही अशी चिन्हं आहेत असं
छावणीचे एक समन्वयक रवींद्र वीरकर सांगतात.
या
कठिण काळात म्हसईवाडीच्या साठीच्या लीलाबाई वीरकर यांना आपली गुरं जगतील अशी आशा
आहे. “दुष्काळ पडला की व्यापाऱ्यांच्या चकरा सुरू होताती. ६०-७० हजारांची जनावरं
५-६ हजाराला दावणीवरून नेताती. आमच्या हाताने आम्ही कसाब्याच्या हाती देत नाही.
सरकारने छावण्या काढल्या नाहीत तर निम्मी जनावरं कत्तल खान्यात जाणार बघा.”