त्यांना पाहिलं की वाटतं ते नुकतेच डिकन्सच्या कादंबरीतून अवतरले आहेत. कुलुपबंद घरांच्या रांगेतल्या आपल्या घराच्या व्हरांड्यात बसून ७१ वर्षांचे एस. कंदासामी जिथे आपला जन्म झाला, लहानाचे मोठे झालो त्या गावात आपल्या आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करतायत. आणि या काळात त्यांना सोबत करण्यासाठी इथे मीनाक्षीपुरममध्ये कुणीही नाही, इथली उरलेल्या ५० कुटुंबांमधलं शेवटचं कुटुंब – खेदाची बाब म्हणजे त्यांचंच – पाच वर्षांपूर्वी इथून बाहेर पडलं.
या एकाकी गावामधलं त्यांचं राहणं म्हणजे प्रेमाची, कुणी तरी हरपण्याची, आशेची आणि दुःखाची कथा आहे. इथल्या भीषण पाणी टंचाईपुढे हात टेकत मीनाक्षीपुरमचे सगळे रहिवासी इथून बाहेर पडले. मात्र कंदासामी मात्र “वीस वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने वीरालक्ष्मीने जिथे शेवटचा श्वास घेतला, तिथे मला माझे उरलेले दिवस व्यतीत करायचे आहेत” यावर ठाम होते. नातेवाइकही किंवा मित्रमंडळीही त्यांचं मन वळवू शकली नाहीत.
“बाकी सगळी कुटुंबं गेली, शेवटी माझ्या घरची मंडळी बाहेर पडली,” ते सांगतात. पाच वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या धाकट्या मुलाचं लग्न होऊन तो इथून बाहेर पडला, तेव्हा तमिळ नाडूच्या थूथुकोडी जिल्ह्यातल्या श्रीवैकुंठम तालुक्यातल्या या गावचे ते एकमेव रहिवासी झाले. पाण्याचं दुर्भिक्ष्य असणाऱ्या या जिल्ह्यात मीनाक्षीपुरममध्ये हे दुर्भिक्ष्य जास्तीच तीव्र होतं.
“मला नाही वाटत लोक फार जास्त दूर गेले असतील. दहा कुटुंबं सेखरकुड्डीला गेलीयेत.” इथून केवळ ३ किमी लांब असणाऱ्या या गावातही पाण्याची टंचाई आहेच, कदाचित इथल्यापेक्षा थोडी कमी. मात्र इथल्यापेक्षा तिथे बरं चाललेलं दिसतंय आणि खरं तर तिथे भरपूर वर्दळ आणि कायकाय चालू होतं. मीनाक्षीपुरममध्ये मात्र केवळ शांतता. इथल्या कुणाला जर या एकाकी गावाचा पत्ता विचारला तर लोक अचंबित होतात. “तुम्हाला तिथे देवळात जायचंय का? तिथे त्या गावात बाकी काहीही नाहीये.”
“थूथुकोडीचं सरासरी पाऊसमान (७०८ मिमि) राज्याच्या सरासरीपेक्षा (९४५ मिमि) कमी आहे, आमच्या जिल्ह्याच्या गरजा तामरापरणी नदी पुरवायची. मात्र गेल्या काही वर्षांत पाणी उद्योगांना वळवलं जातंय. ते पूर्ण थांबलंय असं काही मी म्हणणार नाही, मात्र त्यावर मर्यादा आल्या आहेत आणि लोकांना त्याचा थोडा फायदा झालाय. गावं मात्र तहानलेली आहेत आणि भूजलही दूषित झालंय,” थूथुकोडीस्थित पर्यावरणासंबंधी कार्यरत असणारे पी. प्रभू सांगतात.
२०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या १,१३५ होती. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक बाहेर पडले तरीही, “सहा वर्षांमागे इथे सहा ५० कुटुंबं होती,” कंदासामी सांगतात. कधी काळी त्यांच्या मालकीची पाच एकर जमीन होती आणि त्यात ते कांबू (बाजरी) आणि कपास पिकवायचे. त्यांचं रान सुपीक होतं, मात्र फार पूर्वीच त्यांनी ते विकून टाकलं - “त्या जमिनी होत्या म्हणून मी माझ्या मुलांना काही तरी शिकवू शकलो आणि त्यांची लग्नं लावून देऊ शकलो.” त्यांची चारही मुलं – दोन मुलगे, दोन मुली – आज थूथुकोडीत, जरा बरी परिस्थिती असणाऱ्या गावांमध्ये राहतात.
“मी कुणाचंही काहीही देणं लागत नाही. मनात कसलाही खेद-खंत न ठेवता मी मृत्यूला सामोरा जाईन कारण जेव्हा माझ्यापाशी जमिनी होत्या तेव्हा त्यांनी मला पुरेसं दिलंय,” कंदासामी म्हणतात. “शेती चांगली पिकत राहिली असती तर मी माझ्या जमिनी विकल्यादेखील नसत्या. मात्र हळू हळू सगळं बिनसायला लागलं. पाणी संपलं. जगायचं असेल तर इथून दुसरीकडे जाण्यापेक्षा दुसरा काही पर्याय त्यांच्यापाशी नव्हता.”
“पाणी हा फार मोठा प्रश्न होता,” ६१ वर्षीय पेरुमल सामी सांगतात. सुमारे दहा वर्षांपूर्वी इथून बाहेर पडलेल्या सुरुवातीच्या काही रहिवाशांपैकी ते एक. तमिळ नाडूत सत्तेत असणाऱ्या अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाचे माजी पदाधिकारी असणारे सामी आता सुमारे ४० किलोमीटरवर असणाऱ्या थूथुकोडीमध्ये स्थायिक झाले आहेत, तिथेच त्यांचा व्यवसायही आहे. आपल्या जीर्णशीर्ण गावातल्या आयुष्यापेक्षा त्यांचं आता चांगलं चालू आहे. “आमच्या रानातून तिथे काहीच निघायचं नाही. आणि तितक्या तुटपुंज्या कमाईत मी माझ्या कुटुंबासाठी कसा काय खर्च करायचा?” त्यांचंही घर आता ओस पडलंय. “त्यात अक्षरशः काहीही अर्थ राहिलेला नाही,” ते आपल्या गावाबद्दल म्हणतात.
पण कधी काळी इथे राहत असलेल्यांसाठी मात्र अजूनही इथे अर्थपूर्ण असं काही आहे. हे गाव आणि ते सोडून गेलेल्या रहिवाशांमधला एकमेव बंध म्हणजे इथली दोन देवळं. मीनाक्षीपुरमला जाणाऱ्या रस्त्यावर एका वैष्णव देवळासंबंधीचा एक फलक आहे – कार्य सिद्धी श्रीनिवास पेरुमल कोइल. हाती घेतलेलं कार्य सिद्धीस नेण्यात मदत करणारं श्रीनिवास पेरुमल देऊळ – गंमत आहे. कंदासामींनी घातलेलं साकडं मात्र अजून देवाच्या कानावर पडलेलं दिसत नाही. जे निघून गेले ते कधी तरी परततील या आशेवर ते आला दिवस ढकलतायत. ही मंडळी जर कायमची इथे परतली तर ते एक आश्चर्यच मानावं लागेल. देवाने तरी अजून काही कौल दिला नाहीये.
पण कधी कधी लोक परत येतात – त्यांच्या कुटुंबाच्या पराशक्ती मरिअम्मन कोइल या शैव देवळातल्या उत्सवासाठी ते येतात. अगदी काही दिवसांपूर्वी या महिन्यात या वार्षिक उत्सवात सहभागी होण्यासाठी ६५ लोक मीनाक्षीपुरममध्ये आले होते. “आम्ही या इथे स्वयंपाक केला, सगळ्यांसाठी,” आता कुणीही नसलेल्या स्वयंपाकघराकडे बोट दाखवत कंदासामी सांगतात. “नुसती धांदल होती त्या दिवशी. एरवी मी दोन-तीन दिवसांतून एकदा स्वयंपाक करतो. लागेल तसं तेच अन्न गरम करून खायचं.”
त्यांचं कसं भागत असावं? त्यांच्यापाशी जमीन नाही, घर सोडलं तर काही धनदौलत नाही, बँकेतल्या ठेवी नाहीत आणि रोकडही अगदी मोजकी. एक हजार रुपये पेन्शनही नाही. तमिळ नाडूची निराधार वृद्धापकाळ पेन्शन योजना आहे, ज्यासाठी ते अपात्र आहेत – कारण त्यांची दोन सज्ञान मुलं आहेत जी थूथुकोडीमध्ये वाहनचालकाचं काम करून कमाई करतात. (अर्जदाराच्या मालकीचं अगदी ५००० रुपये मूल्य असलेलं झोपडं किंवा घर असल्याचं आढळलं तरी अर्ज अपात्र ठरवला जातो.)
त्यांना नेमाने भेटायला येणारा त्यांचा धाकटा मुलगा, बालकृष्णन त्यांना महिन्याला सुमारे दीड हजार रुपये देतो. त्यातले, त्यांच्या सांगण्यानुसार, “३० रुपये बिडी-काडीवर खर्चतात आणि बाकी किराणा, वगैरे.” आणि थोडे फार त्यांच्या दुचाकीत अधून मधून पेट्रोल टाकण्यासाठी. गाव सोडून गेलेल्या त्यांच्या मित्राने त्यांना ही गाडी भेट दिली आहे. “तसंही माझा फार काही मोठा खर्च नाही,” कंदासामी म्हणतात. दर दोन-तीन दिवसांनी ते लागेल तो किराणा आणण्यासाठी सेक्करकुडीला स्कूटरवरून चक्कर मारतात. गेलं की दोन-तीन तास वेळ घालवून ते परत येतात.
घरी, सरकारकडून देण्यात आलेल्या टीव्हीची त्यांना जरा तरी सोबत होते. आणि त्यांचं एकटेपण जरा तरी दूर करणारी दोन शाही मंडळी त्यांच्या घरी आहेत – राजा आणि राणी. “ही दोघी भटकी कुत्री काही वर्षांपूर्वी आली. कोण जाणे, त्यांना कळलं असावं की मी इथे असा एकाकी राहतोय. मी त्यांची नावं राजा आणि राणी अशी ठेवलीयेत, मीच त्यांच्यासाठी खाणं बनवतो. दुसऱ्या कुणासाठी तरी खाणं बनवणं, मनाला बरं वाटतं,” ते हसतात.
कधी काळी सुपीक असणाऱ्या मीनाक्षीपुरमच्या आणि त्यांच्या शेतीच्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. “त्या काळी रोजच्या खाण्यात भात नसायचा. नाचणी असायची,” ते सांगतात. लोक इथे उडीद घ्यायचे. पण आज मात्र पडक रानं आणि निर्मनुष्य घरं इतकंच काय ते या गावात राहिलंय.
कंदासामींच्या घरातही त्यांची दुचाकी, चपला आणि इथे तिथे पडलेले कपडे वगळता जिवंतपणाच्या बाकी कसल्याही खाणाखुणा नाहीत. ओल धरलेल्या भिंतींवर घरच्यांचे फोटो नाहीत. सगळे फोटो, अगदी त्यांच्या दिवंगत पत्नीचाही, त्यांच्या धाकट्या मुलाकडे, बालकृष्णनकडे सांभाळून ठेवलेत. दोन दिनदर्शिका आहेत, एकीवर दिवंगत मुख्यमंत्री जयललितांची छबी आहे. पण ते काही त्यांच्याविषयी बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्यात एमजीआर यांचा उल्लेख येतो. एक असा अभिनेता जो कदाचित तमिळ नाडूतला सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री झाला असेल. “माझी निष्ठा कायम त्यांच्या चरणीच राहील,” ते म्हणतात. मीनाक्षीपुरमच्या या एकांड्या मतदाराला आपल्याकडे ओढण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचारकांची पावलं मीनाक्षीपुरमकडे वळली नाहीत. म्हणून काय झालं? एमजीआर यांच्याप्रती असलेली आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी कंदासामी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच.
दर आठवड्यात ते पराशक्ती देवळात नित्यपूजा घालतात, याच आशेवर की गावाला गतवैभव परत प्राप्त होईल. तसंही, आता जरा बरे दिवस आलेत. कंदासामींच्या घरी, त्यांच्या गरजेइतकं पाणी येतंय. “गेल्या वर्षी एका दूरदर्शन वाहिनीने माझी मुलाखत घेतली आणि मग अधिकाऱ्यांचा ताफाच माझ्या घरी अवतरला. त्यांनी लगेच मला नळजोड दिला त्यामुळे आता कसलीच चिंता नाही.” अशीही शक्यता आहे की बाकी गाव ओस पडल्यामुळे त्यांना पुरेसं पाणी मिळत असेल.
थूथुकोडीचे जिल्हाधिकारी संदीप नाडुरी सांगतात की लोकांना मीनाक्षीपुरमला परतायचं असेल तर प्रशासन त्यांना मदत करायला तयार आहे. “पाण्याची समस्या आता नाही. आणि जरी असली तरी आम्ही नियमित पुरवठा सुरू करू. माझा तरी कयास आहे की जे कुणी गाव सोडून गेले ते चांगल्या संधींच्या शोधात बाहेर पडले आणि आता वेगळीकडे स्थायिक झालेत. त्यांना काही इथे परतून यायचं नाहीये.”
तिकडे कंदासामी मात्र आपल्या तासंतास घराच्या ओसरीवर बसून पडक रानं आणि निर्मनुष्य रस्त्यांकडे पाहत राहतात, हे आश्चर्य कधी तरी घडेल एवढीच आशा त्यांच्या मनात आहे.
अनुवादः मेधा काळे