“तुम्ही त काय सण साजरा केला हवा. आम्ही काय करावा ? काम नाय ,धंदा नाय. कुठून आनायचा पैसा?” आपल्या घराच्या दारात बसून माझ्याकडे एकटक बघत सोनी वाघ, वय ६०, यांनी अचानक प्रश्न विचारला. बाजूच्यांनी त्यांना शांत राहण्याचा इशारा केला पण सोनी यांच्या शब्दात फक्त त्यांच्याच नाही अख्ख्या वाडीची वस्तुस्थिती मांडली होती. कोणीही ती वस्तुस्थिती लपवू शकत नव्हतं. नोव्हेंबर महिन्याचा सुरवातीचा काळ होता, दिवाळी नुकतीच साजरी झाली होती. पण वाडीतल्या कुठल्याच घरावर कंदील दिसत नव्हता ना कुठे सजावटीसाठी दिवे दिसत होते. बोट्याच्या वाडीतील कुठलेच घर, दिवाळीत शहरातली घरं जशी फुलांपानांनी सजतात तसं सजलं नव्हतं.
वाडी शांत होती. आवाज फक्त अंगणात खेळणाऱ्या मुलांचा. जुने व चुरगळलेले कपडे आणि पाय धुळीने माखलेले. काहींच्या अंगावर अर्धवट फाटलेले, बटणं तुटलेले कपडे. अंगणाच्या एका कोपर्यात ८-९ वर्षांच्या ५-६ मुली घर-घर खेळतं होत्या. आपापल्या घरातून आणलेली स्टील व अल्युमिनियमची भांडी समोर मांडलेली होती. जमिनीत रोवलेल्या ४ काठ्यांना चिंधी बांधून लहान बाळासाठी झोळी केली होती.
जवळच एक लहान मुलगी, एका तान्ह्या बाळाला घेऊन इतर मुलींचा खेळ बघत बसली होती. तिच्याजवळ एक मुलगा बसला होता. मी त्यांच्या जवळ गेले तेव्हा ते उठून दुसरीकडे जाऊ लागले. मला काहीतरी विचारायचं आहे हे पाहून ती मुलगी थांबली. “तू शाळेत जातेस का” यावर नाही असं उत्तर आलं. अनिता दिवे, वय वर्ष ९, पहिलीनंतर तिने शाळा सोडली होती. कारण विचारताच उत्तर मिळालं “मला बारक्याला बाळगायला लागतं. त कसं जावं मी शाळेत? घरचे पातल्यावर कामाला जात्यात.”
तिच्या बाजूला बसलेल्या काळू सावराची कहाणी अशीच होती. त्यानेही पहिल्या इयत्तेनंतर शाळा सोडली. बाजूला येऊन उभी राहिलेली काळू वळवी म्हणाली “मी पावसालचे शाळेत जाते अन उन्हालचे घरच्यांसोबत भट्टीवर कामाला.”
काळू वळवीच्या कुटुंबाप्रमाणेच या ३०-३५ कातकरी आदिवासी कुटुंबं असलेल्या वाडीतली बरीचशी कुटुंबं गोमघर गावात कामासाठी दरवर्षी स्थलांतर करतात. गोमघर गाव, महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा या छोट्या शहरापासून ३० किमी अंतरावर आहे.
शाळेचा विषय निघताच, शेजारी राहणारे ६५ वर्षांचे बुधा वाघ चिडून म्हणाले, “काम द्या आम्हाला, नाय तर पैसा तरी द्या. आमच्या पोटाची सोय करा.”
“शेती नाही. कामाचा दुसरा पर्याय पण नाय. पोटासाठी गाव सोडून जावं लागतंच,” काशिनाथ बरफ, वय ५५, बुधा वाघ यांना शांत करत म्हणाले. दरवर्षी पावसाळ्यात, जुलै महिन्यात काशिनाथ गाव सोडून शिर्डीजवळ खडी फोडण्याचं काम करण्यासाठी जातात. तर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी दिवाळी नंतर, मे महिन्यापर्यंत काशिनाथ ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात खारबाव या ठिकाणी वीटभट्टीत काम करण्यासाठी स्थलांतर करतात.
जेव्हा इथली लोकं स्थलांतर करतात तेव्हा त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर नेहमी असतो. कर्ज फेडण्यासाठी दरवर्षी त्यांना घर सोडून दुसरीकडे कामाला जावचं लागत. बऱ्याच जणांना ते वर्षभरात किती पैसे कमावतात याची कल्पनाही नसते. “आमचा ३ वर्षाचा हिशोब झाला नाही,” ५० वर्षांच्या लीला वळवी सांगतात. “आम्ही तिथे (उल्हासनगर) खूप वर्षांपासून राबतोय. मुलीच्या लग्नासाठी (वीटभट्टीच्या मालकाकडून) ३० हजार रुपये बयाना घेतला होता. अजून फिटला नाही. बऱ्याचदा पोटाची भूक आम्ही अन्नदानातून मिळणाऱ्या जेवणातून भागवलीय. हिशोब मागायला गेलो तर हाणामारी होते.”
लीला मला त्याचं घर दाखवतं होत्या, सिमेंट-विटांचं काम केलेलं. एका खोलीच्या दोन केल्या होत्या. (हे घर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलं होतं.) बोट्याची वाडीमध्ये, या योजनेंतर्गत बांधण्यात आलेली काही पक्की घरं वगळता, बाकीची घर म्हणजे फक्त झोपड्या आहेत. “एवढीच झोपडी होती आधी”, लीला त्यांच्या घरा शेजारच्या छोट्या झोपडीकडे इशारा करत सांगतात. मातीच्या भिंती, लाकूड आणि गवताने शाकारलेली झोपडी होती ती. लीला यांच्या घराला खिडकी नसल्याने सूर्यप्रकाश येत नाही. त्यांच्या घरी दुपारच्या वेळीही अंधार होता. चुलीच्या आजूबाजूला वस्तू विखुरलेल्या होत्या. “माझ्या घरी काहीही नाही, हा एवढाच तांदूळ उरलाय,” कोपऱ्यातील एक मोठा पिंप उघडून दाखवत त्या म्हणाल्या. त्यांच्याकडचं धान्य संपत आलंय.
इतरांसारखंच, भिका राजा दिवे, वय ६०, यांच्यावरही १३,०००
रुपयांचं कर्ज आहे. “ये
वर्षी मुलाचा साखरपुडा झाला त्यासाठी मी बयाना घेतलाय,” ते
सांगतात. ऑक्टोबरच्या सुरवातीस दसऱ्याच्या वेळेस, शेठ (भट्टीचा मालक) येऊन
त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला उल्हासनगर येथील वीटभट्टीत काम करायला घेऊन गेला. पण
पाऊस सुरु राहिल्याने काम थांबलं. शेठने त्यानंतर दिवे कुटुंबाला जवळच्या भात
शेतात मजुरीसाठी जाण्यास सांगितलं, त्या शेताचा मालक शेठच्या ओळखीचा होता. शेठने
कुटुंबाला दरोरोज मिळणाऱ्या ४०० रुपये मजुरीचाही काही भाग आपल्यापाशी ठेवला.
दिवाळी जवळ आल्यानंतर भिका आणि त्यांच्या कुटुंबाला घरी परत जाण्यासाठी पैश्यांची
गरज होती पण तेवढेही पैसे शेठने देण्यास नकार दिला. कुटुंबाने कसे तरी थोडे पैसे
साठवतं आपलं गावं गाठलं. दिवाळी संपताच, सेठ कुटुंबाला कामावर घेऊन जाण्यासाठी पाड्यावर
परत आला.
तोपर्यंत, या कुटुंबासाठी सरकारी योजनेतून घर वाटप
झाले होते, त्यासाठी त्यांना पाड्यावर थांबावे लागले. पण ते कर्जापुढे असहाय होते. “शेठने माझ्याकडे
कर्जाचे पैसे मागितले, पण मी घरासाठी इथे थांबलो. शेठ माझी बायको लीला, २ मुली व
माझ्या मुलाला (२१ वर्ष) घेऊन गेला.” हताश होतं भिका म्हणाले. त्यांची मोठी मुलगी
१२ वर्षांची आहे तर लहान मुलगी फक्त ८ वर्षांची आहे.
मला गोरख वळवीने सांगितलेला प्रसंग ऐकून मला धक्काच बसला. एकदा वीटभट्टीच्या मालकाचा बैल मेला, तेव्हा मालकाने शोक व्यक्त करण्यासाठी वीटभट्टीवर काम करणाऱ्या सर्व पुरुषांना केस कापायला भाग पाडलं. मालकाचा दरारा एवढा होता की कुणीही त्याला विरोध करायचं धाडस दाखवू शकलं नाही. वळवी यांनी सांगतो, “अवेळी येणाऱ्या पावसामुळे कधी कधी विटा भिजतात तेव्हा मजुरांना त्या विटा बनवण्यासाठी मजुरीही मिळत नाही.” परिस्थिती अत्यंत बेताची असूनही गोरखने आपले १०वी पर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. तरीही, इतरांप्रमाणे त्यालाही वीटभट्टीतच मजुरी करावे लागतीये.
त्याच्याप्रमाणेच, लता दिवे आणि सुनील मुकणे सुद्धा १०
वी पर्यंतचे शिकलेत. पण ‘आम्ही पुढचं शिक्षण कसं घेणार’ हा त्यांचा प्रश्न असतो.
त्यांना उच्च शिक्षण परवडू शकत नाही आणि जे शिक्षण त्यांनी घेतलंय त्याच्या जोरावर
त्यांना इतर रोजगाराचे पर्याय उपलब्ध होऊ शकत नाहीत. पाड्यातील बहुतांश मुलांचं
शिक्षण गरिबी आणि सततच्या स्थलांतरामुळे १-२ वर्षानंतर बंद होतं.
पाड्यातील घरांमध्ये काळोखाचं साम्राज्य आहे आणि
लोकांकडे थोडा तांदूळ सोडता कसलंच अन्न नाही. अशा परिस्थितीत कुपोषण साहजिक आहे. लहानग्या
मुली लहान भावडांना सांभाळत दिवस काढतात. लग्न झाल्यानंतर या मुलींना त्यांच्या
नवीन कुटुंबासोबत स्थलांतर करावंच लागतं. या स्पर्धात्मक जगात आपल्या
अस्तित्वासाठी लढणाऱ्या व स्वप्न बघण्याचीही मुभा नसलेल्या या मुलींचं स्थान कुठे आहे?
आशेच्या व स्वप्नांच्या किरणांनी त्यांच्या आयुष्याला अजून स्पर्श केलेला नाही.
अशा परिस्थितीत एकच प्रश्न उरतो, की ही किरणं त्यांच्या आयुष्यात येणार तरी कधी?
मूळ वारली भाषेतील संवाद - ममता परेड