“माझ्या घरच्यांनी असं घर शोधलं ज्याला एक स्वतंत्र खोली होती. म्हणजे मला विलग राहता येईल,” एस. एन. गोपाला देवा सांगतात. मे २०२० सुरू होता. काही कुटुंबांनी आधी घरातले इतर लोक सुरक्षित रहावेत म्हणून काही जास्तच उपाय करायचं ठरवलं होतं. हे करत असताना जोखमीच्या व्यवसायात असणाऱ्या सदस्यांवरच्या खांद्यावर असणारं ओझंही थोडं कमी करायचा त्यांचा हेतू होता.
पन्नास वर्षीय गोपाला देवी नर्स आहेत. २९ वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या त्या अतिशय कुशल, प्रशिक्षित नर्स आहेत आणि त्यांनी करोना विषाणूमुळे आलेल्या महामारी दरम्यान खूप काळ चेन्नईमधल्या राजीव गांधी शासकीय सर्वोपचार रुग्णालयामध्ये काम केलं आहे. यातल्या थोड्या काळासाठी त्या याच शहरातल्या पुलियंतोपे या वस्तीत उभारलेल्या विशेष कोविड सेवा केंद्रातही काम करत होत्या.
आणि आता, टाळेबंदीचे निर्बंध हळूहळू शिथिल होतायत, अनेक व्यवहार संथगतीने परत एकदा पूर्ववत होतायत, पण गोपाला देवींना मात्र अजूनही कोविड-१९ कक्षात काम केल्यानंतर क्वारंटाइन व्हावं लागतंय. “माझ्यासाठी, लॉकडाउन सुरूच आहे,” त्या हसतात. “नर्सेसचं म्हणाल, तर बिलकुल संपलेला नाही.”
मला अनेक नर्सेसनी सांगितलंयः “आमच्यासाठी लॉकडाउन कायमचाच - आणि कामही.”
“माझ्या मुलीचं सप्टेंबरमध्ये लग्न झालं आणि मी फक्त आदल्या दिवशीपासून रजा घेऊ शकले,” गोपाला देवी सांगतात. “तिच्या लग्नाची सगली जबाबदारी माझे पती, उदय कुमार यांनी त्यांच्या खांद्यावर पेलली.” कुमार चेन्नईतल्या संकरा नेत्रालय या रुग्णालयात अकाउंट विभागात काम करतात. “माझ्या कामाच्या मागण्या ते समजून घेतात.”
याच रुग्णालयात कोविड कक्षामध्ये केलेल्या कामासाठी – रजा न घेता अविरत सेवा - पुरस्कार मिळालेल्या ३९ वर्षीय तमिळ सेल्वी देखील काम करतात. “क्वारंटाइन झाले ते दिवस वगळले तर मी कधीच रजा घेतली नाही. माझी सुट्टी असताना देखील मी काम केलं कारण मला या परिस्थितीचं गांभीर्य कळतं,” त्या म्हणतात.
“माझ्या लहान मुलाला, शाइन ऑलिव्हरला सोडून यायची वेदना खूप गहिरं आहे. कधी कधी अपराध्यासारखं वाटतं पण मग मी विचार करते की महामारी सुरू आहे आणि आम्हाला पुढ्यात थांबून काम करावंच लागणार आहे. माझे रुग्ण जेव्हा बरे होऊन त्यांच्या घरच्यांकडे परत जातात तेव्हा जो आनंद होतो ना त्याच्यामुळे आम्ही आमच्या स्वतःच्या घरापासून दूर आहोत त्या सगळ्या कष्टाचं चीज होतं. माझ्या नवऱ्याने जर आमच्या १४ वर्षांच्या मुलाचं सगळं केलं नसतं, माझ्या काम समजून घेतलं नसतं तर हे काहीही घडू शकलं नसतं.”
पण सगळे इतके समजूतदार नव्हतेच. कामावरून परत आपल्या घरी येणाऱ्या नर्सेसना हे नक्कीच कळून चुकलं होतं. आणि तेही फार सहज नाही.
“दर वेळी मी क्वारंटाइनचा काळ संपवून घरी आले की लोक मी आले त्या वाटेवर हळद आणि कडुनिंबाचं पाणी शिंपडताना मी पाहिलंय. मला त्यांची भीती समजू शकते, पण मनाला फार लागल्या या गोष्टी,” निशा सांगते (नाव बदललं आहे).
चेन्नईतल्या शासकीय रुग्णालयात स्त्रीरोग विभागात निशा स्टाफ नर्स आहेत. कोविडची बाधा झालेल्या गरोदर स्त्रियांची सेवा त्यांना करावी लागत होती. “फार ताण यायचा कारण आम्हाला आईलाही वाचवायचं होतं, आणि बाळालाही.” अलिकडेच, निशाला स्वतःला कोविडची लागण झाली. तीन महिन्यांपूर्वी तिच्या नवऱ्याला कोविड झाला पण आणि त्यातून तो बरा झाला. “आमच्या रुग्णालयातल्या किमान ६० नर्सेसना गेल्या आठ महिन्यांच्या काळात कोविड झालाय,” निशा सांगते.
“विषाणूपेक्षा त्या भोवतीचा जो सामाजिक कलंक आहे ना त्याला तोंड देणं अवघड आहे,” ती म्हणते.
नवरा, दोन मुलं आणि सासूसोबत राहणाऱ्या निशाला चेन्नईत एका ठिकाणाहून दुसरीकडे घर शोधत हिंडावं लागलं होतं. शेजाऱ्यांच्या मनातली भीती आणि दुष्टाव्यामुळे.
दर वेळी कोविड वॉर्डात केलं की निशाला क्वारंटाइन व्हावं लागायचं आणि मग तिला आपल्या एक वर्षाच्या, अंगावर पिणाऱ्या मुलापासूनही कित्येक दिवस लांब रहावं लागायचं. “मी इथे कोविड झालेल्या स्त्रियांना त्यांच्या बाळंतपणात मदत करत होते आणि तिथे माझी सासू माझ्या बाळाला सांभाळत होती,” ती म्हणते. “विचित्र होतं सगळं, आणि अजूनही तसंच वाटतं.”
भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेची (आयसीएमआर) नियमावली सांगते की स्तनदा माता आणि ज्यांना काही दुसरा आजार आहे अशांना कोविड वॉर्डात काम करण्यापासून सूट द्यावी. मात्र राज्यभरात नर्सेसची संख्या इतकी अपुरी आहे की निशासारख्या अनेकींना फारसा काही पर्यायच नाही. तमिळ नाडूच्या दक्षिणेकडच्या विरुधुनगर जिल्ह्याच्या निशाचे चेन्नईत कुणी नातेवाईक देखील नव्हते. “मी तर म्हणेन, माझ्यासाठी हा सगळ्यात कठीण काळ होता.”
२१ वर्षीय शैला नुकतीच नर्स म्हणून कामाला लागली आहे, तिला हे नक्कीच पटेल. २०२० च्या ऑक्टोबर महिन्यात, तिने चेन्नईतल्या एका कोविड-१९ काळजी केंद्रात अस्थायी नर्स म्हणून दोन महिन्याच्या करारावर काम सुरू केलं. तिचं काम म्हणजे प्रतिबंधीत क्षेत्रांमध्ये दारोदारी जाऊन घशातल्या स्रावांची तपासणी करायची, लोकांमध्ये मास्क घालण्याचं आणि इतर संसर्ग प्रतिबंधक वर्तनाचं महत्त्व लोकांना पटवून देणं.
“अनेक ठिकाणी लोकांनी तपासणी करून घ्यायलाच नकार दिला आणि आमच्याशी वादावादी केली,” शैला सांगते. आणि लोकांच्या मनातला कलंक तर होताच. “आम्ही तपासणी करण्यासाठी एका घरी गेलो होतो आणि तिथे गेल्यावर आमच्या लक्षात आलं की तपासणीच्या नवीन किटचं आवरण खोलण्यासाठी आम्ही कात्रीच न्यायला विसरलो होतो. आम्ही त्या लोकांना कात्री द्यायची विनंती केली तर त्यांनी आम्हाला एक अगदी वाईट कात्री दिली. ती परतसुद्धा घ्यायला नकार दिला आणि आम्हालाच ती फेकून द्यायला सांगितलं.”
शिवाय, चेन्नईच्या भयंकर उकाड्यात आणि दमट हवेत ७-८ तास पीपीई सूट घालून काम करणं म्हणजे मोठी त्रासदायक बाब होती. त्यात, ती सांगते, “आम्हाला अन्न पाण्याशिवाय काम करावं लागायचं. लोकांच्या घरी बाथरुम देखील वापरता यायची नाही.”
तरीही, ती तशीच काम करत राहिली. “माझ्या वडलांचं स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं. त्यामुळे जेव्हा मी पहिल्यांदा हा नर्सचा गणवेश परिधान केला आणि पीपीई किट घातलं तेव्हा कितीही त्रास झाला तरी मी त्या स्वप्नाच्या किमान एक पाऊल तरी जवळ गेलीये हे मला माहित होतं,” ती सांगते. शैलाचे वडील हाताने मैला साफ करायचे आणि एक सेप्टिक टँक साफ करत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
जोखीम, सामाजिक कलंक तर आहेच पण नर्सेसना आणखी एका आघाडीवर झगडावं लागतं. कामाच्या ठिकाणची वाईट स्थिती आणि अतिशय तोकडा पगार. शैलाने नुकतंच काम सुरी केलेलं असल्यामुळे तिला त्या दोन महिन्यांसाठी प्रति महिना केवळ १४,००० रुपये पगार मिळाला. निशा गेली १० वर्षं नर्स म्हणून काम करतीये, ज्यातली सहा वर्षं ती एका सरकारी रुग्णालयात कंत्राटी कामगार म्हणून काम करत होती. तिला महिन्याला १५,००० रुपये मिळतात. तीस वर्षांच्या नोकरीनंतरही गोपाला देवींना ४५,००० रुपये पगार मिळतो – एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेत नुकत्याच लागलेल्या एखाद्या कारकुनाच्या पगारापेक्षा फार काही जास्त नाही.
अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी आरोग्य कार्यकर्त्यांच्या अंदाजानुसार तमिळ नाडूमध्ये सरकारी आणि खाजगी आरोग्यसेवांमध्ये मिळून किमान ३०,००० ते ८०,००० नर्सेस काम करतात. नर्सेससाठी काम करणं खडतर आहे हे मान्य करत भारतीय वैद्यक परिषदेचे (इंडियन मेडिकल कौन्सिल - आयएमसी) तमिळ नाडूचे अध्यक्ष, डॉ. सी. एन. राजा सांगतात की आयएमसीने त्यांच्यासाठी समुपदेशनाची सोय सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. “विशेषतः ज्या अतिदक्षता विभागात काम करतात त्यांच्यासाठी. त्यांना पूर्ण कल्पना असते की त्यांना खूप जास्त जोखीम आहे तरीही त्या पुढे येतात आणि त्यांचं काम करतात. मला वाटतं की आपण त्यांची उत्तम काळजी घेतली पाहिजे.”
पण नर्सेसना मात्र त्यांची चांगली बडदास्त ठेवली जातीये असं काही वाटत नाहीये.
“राज्यात १५,००० हून जास्त नर्सेस अस्थायी नोकऱ्यांमध्ये आहेत,” के. शक्तीवेल सांगतात. नर्स किंवा ब्रदर म्हणून काम करणारे शक्तीवेल तमिळ नाडू शासकीय नर्सेस संघटनेचे ते अध्यक्ष असून मूळचे कल्लकुरुची जिल्ह्याचे आहेत. “मुख्य मागण्यांपैकी एक म्हणजे रास्त पगार. भरती किंवा बढती, काहीच भारतीय परिचर्या परिषदेच्या (इंडियन नर्सिंग कौन्सिल) मानकांनुसार केलं जात नाही.”
“एकूण १८,००० नर्सेस अस्थायी कामावर आहेत, त्यातली केवळ ४,५०० पदं कायमस्वरुपी करण्यात आली आहेत,” डॉ. ए. आर. शांती सांगतात. तमिळ नाडूमधल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांची एक व्यापक संघटना आहे, हेल्थ वर्कर्स फेडरेशन. त्या संघटनेच्या त्या जनरल सेक्रेटरी आहेत. “बाकीच्या नर्सेसना महिन्याला १४,००० रुपये पगार मिळतो. आणि काम कायमस्वरुपी नोकरीवर असणाऱ्यांइतकंच करावं लागतं, किंवा जास्तच. कायम झालेल्या नर्सेसना मिळतात तशा रजा त्यांना मिळत नाहीत. आणि अगदी तातडीच्या कारणासाठी जरी त्यांनी रजा घेतली तरी त्यांचा पगार कापला जातो.”
सगळं काही उत्तम सुरू असताना ही गत आहे.
वर्ष झालं, आधी कधीच पाहिली नाही अशी परिस्थिती या कोविड-१९ मुळे झालेली आहे, सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही हॉस्पिटलमध्ये कामाचा अनुभव असलेल्या गोपाला देवी सांगतात. “भारतातला पहिला एचआयव्हीचा रुग्ण [१९८६ साली] चेन्नईच्या मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये [राजीव गांधी ह़स्पिटलशी संलग्न] सापडला होता,” त्या सांगतात. “पण तेव्हा सुद्धा आम्ही इतके चिंतित नव्हतो. या आधी कधीही आम्ही असं पूर्ण झाकून घेतलं नाहीये. कोविड-१९ चं काहीच सांगता येत नाही आणि त्याचा मुकाबला करणं म्हणजे धाडसच पाहिजे.”
या महामारीला तोंड देता देता आयुष्यात उलथापालथ झालीये, त्या म्हणतात. “जेव्हा सगळं जग टाळेबंदीत ठप्प झालं होतं, तेव्हा कोविड-१९ वॉर्टात आम्हाला कधी नव्हतं तितकं काम होतं. आलात आणि थेट वॉर्डात गेलात असं शक्यच नव्हतं. जर ७ वाजताची पाळी असेल तर मला सकाळी ६ वाजल्यापासूनच तयारीला सुरुवात करायला लागायची. पीपीई किट घालायचं आणि त्या आधी इथून बाहेर पडेपर्यंत तहान-भूक लागणार नाही याची काळजी घेतलेली असायची. पीपीई किट घातलं की अन्न-पाणी काहीही घेता येत नाही – कामाची सुरुवात अशी तिथपासून व्हायची.”
“कसं असतं, तुम्ही सात दिवस कॉविड वॉर्डात काम करता आणि त्यानंतर सात दिवस विलगीकरणात राहता. आमच्या वॉर्डातल्या आम्ही ६०-७० नर्सेस एकापाठोपाठ एक काम करतो. ३-६ नर्सेस एक आठवडाभर सलग काम करतात, अर्थात रुग्णांच्या संख्येप्रमाणे. [याचाच अर्थ ३-६ नर्सेस एकाच वेळी विलगीकरणात राहणार]. म्हणजे आमच्यापेकी प्रत्येकीला साधारणपणे ५० दिवसांत एकदा कोविडचं काम लागणार.”
म्हणजेच प्रत्येक नर्स दर सात आठवड्यातले दोन आठवडे प्रचंड जोखीम असणाऱ्या कोविड-१९ च्या सेवेमध्ये होती. आणि अचानक काही झालं किंवा [मनुष्यबळाची] कमतरता असली तर मग कामाचा बोजा आणखीनच वाढणार. नर्सेससाठी विलगीकरणाची सुविधा राज्य शासनाकडून पुरवण्यात येते.
कामाची पाळी खरं तर सहा तासाची असते पण बहुतेक नर्सेस त्याच्या दुप्पट वेळ काम करत असल्याचं दिसतं. निशा म्हणते, “काहीही करा, रात्र पाळी १२ तासांची असते – संध्याकाळी ७ ते सकाळी ७. पण एरवीसुद्धा आम्ही सहा तासात काम आटोपलंय असं कधीच होत नाही. बहुतेक वेळा कुठलीही पाळी एक किंवा दोन तासांनी लांबतेच.”
भरतीच्या सदोष पद्धतींमुळे प्रत्येकावरचाच कामाचा बोजा वाढत जातो.
डॉ. शांती सांगतातः “नवीन नर्सेसची भरती करण्याऐवजी नव्या [कोविड] केंद्रांसाठी इतर दवाखान्यांमधल्या नर्सेस कामावर घेतल्या जातात. आणि मग तुम्हाला खूप जास्त तडजोडी कराव्या लागतात. जर एका पाळीला सहा नर्सेसची गरज असेल तर तुम्हाला दोघींवरच भागवावं लागतं. आणि चेन्नईचा अपवाद सोडला तर जिल्ह्यातल्या कोणत्याच दवाखान्यात कोविड-अतिदक्षता विभागासाठी सक्तीचा असलेला एक रुग्ण-एक नर्स हा नियम पाळला जात नाही. आणि मग तपासण्यांमधला, खाटा मिळवण्यात होणाऱ्या विलंबाच्या तक्रारी कानावर येतात ना त्या अशा सगळ्या कारणांमुळे आहेत.”
जून २०२० मध्ये राज्य सरकारने चेन्नई, चेंगलपट्टी, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर या चार जिल्ह्यांसाठी मिळून खास करून कोविड सेवांसाठी २,००० नर्सेसची भरती केली होती, महिना १४,००० रुपये पगारावर. मात्र डॉ. शांती म्हणतात की हा आकडा कसंही करून पुरेसा नाहीये.
२९ जानेवारी रोजी राज्यभरातल्या नर्सेसनी एक दिवसाचं आंदोलन केलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये असणाऱ्या नर्सेसच्या समकक्ष पगार मिळावा, या आपत्तीच्या काळात कोविड वॉर्डांमध्ये काम करणाऱ्या नर्सेसना बोनस मिळावा आणि कामावर असताना ज्यांचं निधन झालंय अशा नर्सेसच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी अशा त्यांच्या काही मागण्या होत्या.
आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र इतर वॉर्डात काम करणाऱ्या नर्सेसचीही चिंता आहे. “कोविडची लागण होण्याची शक्यता कमी जास्त असू शकते, पण कोविडेतर वॉर्डात काम करणाऱ्यांनाही हा धोका आहेच. मला तर वाटतं की कोविड वॉर्डात काम करणाऱ्या नर्सेसची परिस्थिती बरी आहे कारण किमान त्यांच्याकडे पीपीई किट आणि एन-९५ मास्क तरी असतात. त्यांची मागणी त्या करू शकतात, त्यांचा तो हक्कच आहे. बाकीच्यांना अर्थातच असं काही करता येत नाही,” डॉ. शांती सांगतात.
अनेक जण रामनाथुपरम जिल्ह्यातल्या मंडपम कँपमध्ये कोविड रुग्णांसाठी सुरू केलेल्या बाह्योपचार दवाखान्यात काम करणाऱ्या अँथनीअम्मल अमृतसेल्वींचा दाखला देतात. १० ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या रुग्ण असलेल्या अमृतसेल्वींचं कोविड-१९ मुळे निधन झालं. “बरं वाटत नसलं तरी तिनी कामावर जाणं थांबवलं नाही,” त्यांचे पती ए. ज्ञानराज म्हणतात. “साधा ताप असेल असं तिला वाटत होतं, पण तिला कोविड-१९ ची लागण झाल्याचं निदान झालं. त्यानंतर काहीच करता आलं नाही.” आदल्याच वर्षी अमृतसेल्वींची बदली मदुराई सर्वोपचार रुग्णालयातून मंडपम कँपमध्ये करण्यात आली होती.
आणि, कलंक कायमच असतो – ज्या नर्सेस दलित आहेत, त्यांच्यासाठी तर हा बोजा दुहेरी आहे.
पुरस्कार विजेत्या तमिळ सेल्वी (शीर्षक छायाचित्रात) यांच्यासाठी हे नवं नाही. त्या मूळच्या रानीपेट (पूर्वी वेल्लोर) जिल्ह्याच्या वालजपेट तालुक्यातल्या लालपेट गावातल्या एका दलित कुटुंबातल्या आहेत. भेदभाव काय असतो हे या कुटुंबाने कायमच अनुभवलं आहे.
आणि त्यात आता कोविड-१९ चा मुकाबला करणारी नर्स असल्याची भर त्यात पडलीये. “हातात बॅग घेऊन क्वारंटाइन संपवून मी घरी येते ना, तेव्हा आमच्या रस्त्यावर पाऊल टाकलं ना टाकलं, माझ्या ओळखीचे देखील माझ्या तोंडावर दारं लावून घेतात. मला वाईट वाटतं, पण त्यांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेची चिंता आहे हे देखील मी समजून घेते.”
प्रसिद्ध कवी आणि तमिळ सेल्वींची बहीण सुकृतरानी त्यांच्या तिघी बहिणींनी नर्सिंगचा पेशा का स्वीकारला त्याबद्दल सांगतातः “फक्त आम्हीच नाही, अनेक दलित कुटंबांमधल्या मुली नर्स व्हायचा निर्णय घेतात. माझी मोठी बहीण जेव्हा नर्स झाली, तेव्हा एरवी जे आमच्या दारात यायला खळखळ करायचे, ते देखील मदतीसाठी आमच्याकडे येऊ-जाऊ लागले. अगदी वेशीच्या आतले (उर – तमिळमध्ये वरच्या मानलेल्या जातीची वस्ती) लोकही आमच्या वस्तीतल्या (चेरी – तमिळमध्ये दलितांची वस्ती-वाडा) घराकडे बोट दाखवून म्हणायचे की माझ्या वडलांसारखं, षण्मुगम यांच्यासारखं त्यांनाही त्यांच्या मुलांना शिकवायचंय. मी स्वतः शालेय शिक्षिका आहे आणि आमचा दुसरा भाऊसुद्धा शिक्षक आहे. माझ्या तिघी बहिणी नर्सेस आहेत.”
“एक भाऊ अभियंता आहे, त्याचा अपवाद सोडला तर आम्ही सगळे भाऊ-बहिणी समाज सुधारण्याच्या कामात आहोत. आणि आम्ही कुठून आलोय ते जर पाहिलं तर आमच्यासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. जेव्हा माझ्या सर्वात थोरल्या बहिणीने तिचा गणवेश घातला ना, तिच्या व्यक्तिमत्वात एक डौल आला आणि तिला आदरही मिळाला. पण हा पेशा स्वीकारण्याचं फक्त तेवढं एकच कारण नव्हतं. सत्य हे आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे आम्हाला देखील संपूर्ण समाजाच्या कामी यायचंय.”
आणि मग त्यासाठी काही क्षण जीव टांगणीला लागला तरी बेहत्तर. दर वेळी कोविड-१९ वॉर्डात काम केल्यानंतर त्यांच्या बहिणीची तपासणी होते ना तेव्हा ताण येतोच. “मला तर जास्त चिंता या गोष्टीची होती की तिला आचा तिची नोकरी करता येणार नाही,” सुकृतराणी हसून सांगतात. “अर्थात, पहिल्या पहिल्यांदा आम्हाला चिंता वाटली. आता सवयीचं होऊन गेलंय.”
“कोविडच्या कामावर जायचं म्हणजे आगीत पाऊल टाकण्यासारखं आहे, काय होणार ते तुम्हाला माहित असतं,” गोपाला देवी म्हणतात. “पण आम्ही नर्सिंग करायचं ठरवलं ना तेव्हा अशा सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला लागणार हे नैसर्गिक आहे. समाजाची सेवा करण्याचा आमचा हा मार्ग आहे.”
शीर्षक छायाचित्रः एम. पलानी कुमार
अनुवादः मेधा काळे