“आम्हाला ज्यांनी इथे आणलं,
त्यांच्यासाठी मी स्वयंपाक करीत आहे. माझे पती
त्यांना विटा बनवण्यात मदत करतात,” हैदराबादेच्या वीटभट्ट्यांमध्ये
फिरताना आम्हाला भेटलेल्या उर्वशी सांगत होत्या.
६१ वर्षीय देगू धरूआ आणि ५८ वर्षीय उर्वशी धरूआ यांना वीटभट्टीवर पाहून आम्हाला जरा धक्काच बसला. हे जोडपं पश्चिम ओडिशातील बोलांगीर जिल्ह्यातील बेलपाडा ग्राम पंचायतीचा भाग असलेल्या पांडरीजोड गावचं आहे. हा भाग देशातील अत्यंत गरीब भागांपैकी एक.
मी गेली २० वर्षे वृत्तांकन करीत असलेल्या पश्चिम ओडिशातून लोक गेली ५० वर्षे कामासाठी स्थलांतर करीत आहेत. उपासमार, भूकबळी आणि नाइलाज म्हणून मुलांची विक्री अशासाठी हा भाग प्रसिद्ध होता. आणि अर्थात हे सगळं गरिबी आणि चुकीच्या धोरणांचा परिणाम म्हणून होत आहे.
१९६६-६७ मध्ये आलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीनंतर स्थलांतराची सुरुवात झाली. ९० च्या दशकात कलाहांडी, नौआपाडा, बोलांगीर आणि इतर जिल्ह्यांतून स्थलांतरात वाढ झाली. त्यावेळी आम्ही पाहत होतो की, ज्या लोकांना मजूर म्हणून काम करणं शक्य होतं त्यांनी स्थलांतर केलं, मात्र वयोवृध्द लोक तिथेच मागे राहिलेत.
“ते अनेक कारणांनी मागे राहिलेत. वीटभट्टीत [जिथे काम मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे] दिवसरात्र काम करावं लागतं आणि वृद्ध लोकांना ते शक्य नसतं,” वकील आणि मानवी हक्क कार्यकर्ते असलेले बिष्णु शर्मा म्हणतात. त्यांनी गेल्या काही दशकांत ओडिशातून होणाऱ्या स्थलांतराचा अभ्यास केला आहे. ते कंटाबांजी येथे स्थायिक आहेत. कंटाबांजी हे बोलांगीरपासून इतरत्र प्रवास करण्यासाठीचं सर्वांत नजिकचं रेल्वेस्थानक आहे. स्थलांतर करणारे लोक इथूनच पुढे निघतात – यात आंध्र प्रदेश आणि तेलंगण इथल्या वीटभट्ट्यांमध्ये जाणारे कामगारही आले. “आणि कुठलाही [भट्टी] मालक वृद्धांना आगाऊ रक्कम देण्यास तयार नसे,” ते म्हणतात, “तसंही, ही म्हातारी मंडळी घराची काळजी घ्यायला, मुलाबाळांकडे लक्ष द्यायला आणि रेशन घ्याला मागे राहत. आणि, ज्यांना स्वतःचं कोणीच नसायचं त्यांचे मात्र हाल होते.”
पण गेल्या काही काळात १९६६-२००० दरम्यान ज्या समस्या होत्या त्यात बरीच सुधारणा झाली आहे. मुख्यतः अनेक सामाजिक सुरक्षितता योजनांमुळे – जसे की विधवा आणि वृद्धांना पेन्शन हमी, इ. आणि मागील दशकभरात तरी या भागात उपासमारीने मृत्यू झाल्याची एकही खबर नाही. यामागाचं मुख्य कारण म्हणजे ऑगस्ट २००८ पासून दारिद्र्यरेषेच्या खाली असणाऱ्या परिवारांना २ रुपये प्रति किलो या दराने मिळणारा तांदूळ. २०१३ पासून हाच तांदूळ १ रुपये प्रति किलो या दराने देण्यात येत आहे. (प्रत्येकी परिवाराला एका महिन्यात २५ किलोपर्यंत).
कित्येक दशकांपासून इतकी बिकट परिस्थिती असतानाही या भागातून वृद्ध मंडळी मजुरीसाठी स्थलांतर करीत नव्हती; पण मग उर्वशी आणि देगू धरुआ यांच्या बाबतीत असं काय घडलं की त्यांना हैदराबादेतील या वीटभट्टीत काम करायला यावं लागलं?
“आम्हाला दोन्ही मुली, दोघींचीही लग्नं झाली आहेत. आमचं आता कुणी नाही. त्यात सीमांत शेतकरी [भात आणि कापसाचं पीक घेतो, तेही यंदा फारसं पिकलं नाही]. आता आमच्याकडे लक्ष द्यायला कोणीही नाही,” उर्वशी म्हणतात.
“तरुणपणी आम्ही दोनदा अशा भट्टीत काम करायला आलो होतो. आणि आता परिस्थितीने आम्हाला इथे येण्यास भाग पाडलंय,” देगू म्हणतात. “तेव्हा इथे ५००-१,००० रुपये उचल म्हणून मिळत असत. त्या मानाने आता २०,००० रुपयांची उचल मिळते.” देगू म्हणाले की, त्यांना या भट्टीत कामाला लावणाऱ्या नातेवाईकाने मालकाकडून २०,००० रुपये घेतले; पण त्यांना देताना १०,००० रुपयेच दिले.
ही उचल साधारण पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यात येते – जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पिकाची काढणी झाली की आसपासच्या गावातील सगळे शेतकरी येथे मजुरीसाठी येतात, आणि मग मॉन्सून येताच जून महिन्यात पेरणीच्या वेळी गावी परततात.
“इथे आल्यावर माझं वय आणि प्रकृतीचा विचार करता मी माझं मन बदललं,” देगू म्हणतात. “मी मालकाला घेतलेली उचल परत करून गावी परतण्याचा विचार करत होतो कारण एवढे कष्ट करणं शक्य नाही. मात्र, मालकाने पैसे घेण्यास नकार तर दिलाच शिवाय काम सोडून जायच्या बदल्यात दुसरा मजूर शोधायला सांगितलं. आता दुसरा मजूर मी कसा शोधणार?”
आमच्याशी बोलता बोलता देगू त्यांच्या गावातल्या तरुण मजुरांना विटा सुकवायला मदत करतायत आणि ऊर्वशी भट्टीशेजारच्या तात्पुरत्या निवाऱ्यात चुलीवर या कामगारांसाठी स्वयंपाक करतायत – भात आणि एखादी भाजी. खूप वेळ त्यांच्याशी बोलल्यानंतर धरुआ दांपत्य आम्हाला त्यांच्या खऱ्या समस्या सांगतात.
त्यानंतर आम्ही तेलंगणातल्या इतरही काही वीटभट्ट्यांवर गेलो पण धरुआंइतकं म्हातारं जोडपं आम्हाला कुठेही भेटलं नाही. “ते किती कृश, अशक्त दिसतायत,” शर्मा त्यांच्याबद्दल म्हणतात, “आणि आता ते या सापळ्यात अडकलेत [उचल घेतल्यामुळे]. हे दयनीय आहे. स्थलांतराचा खरा चेहरा हा असा आहे.”
अनुवादः कौशल काळू