काहीच पर्याय नाहीत असं लक्षात आल्यावर विजय कोरेती आणि त्याच्या मित्रांनी अखेर पायीच घरी जाण्याचा निर्णय घेतला.
एप्रिलचे दोन आठवडे उलटले होते. कोविड-१९ च्या महामारीमुळे भारतात कडक टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परक्या भूमीत आपल्या खोपटांमध्ये अजून किती काळ असंच अडकून राहू शकू असा त्यांना प्रश्न पडला होता.
“दोन वेळा माझ्या मित्रांनी इथून निघण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी त्यांना अडवलं आणि माघारी पाठवलं,” कोरेती सांगतात. “पण एक एक करत ते सगळे निघून गेले, पायीच, घराच्या दिशेने.”
या सगळ्या मित्रांकडे मिळून जीपीएसची सुविधा असणारा एकही स्मार्टफोन नव्हता, त्यांनी एक कच्चा मार्ग ठरवलाः
तेलंगणाच्या कोमारम भीम जिल्ह्यातल्या सिरपूर-कागझनगरमध्ये ते कापूस जिनिंग आणि प्रेसिंग मिलमध्ये कामाला होते. हे गाव हैद्राबाद-नागपूर रेल्वे मार्गावर आहे.
तिथून महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातलं झाशीनगर हे त्यांचं गाव रेल्वेरुळांच्या कडेकडेने चालत गेलं तर ७००-८०० किलोमीटरवर होतं. भयंकर कष्टप्रद, पण प्रयत्न करायला हरकत नाही. सोबत, ते जर रेल्वेलाइन शेजारून चालत निघाले तर पोलिसांनी अडवण्याची शक्यताही कमी होती.
तर, देशभरातल्या लाखो-करोडो लोकांप्रमाणेच कोरेती आणि झाशीगरचेच इतर काही जण निघाले. एक एकरभर जमीन असणारे कोरेती गोंड आदिवासी आहेत. गावी आपापल्या कुटुंबाकडे पोचण्यासाठी त्यांचा कागझनगर ते झाशीनगर असा १३-१४ दिवसांचा खडतर प्रवास सुरू झाला.
खरं तर हे अंतर बस किंवा रेल्वेने अर्ध्यात दिवसात पार होण्याइतकं आहे. पण त्यांना मात्र पायी जावं लागलं.
त्यांनी आपले दोन गट केले. ४४ वर्षीय हुमराज भोयार यांच्या नेतृत्वाखाली १७ जणांचा एक गट १३ एप्रिल रोजी झाशीनगरला निघाला. त्यानंतर आठवडाभराने कोरेती आणि बाकी दोघं – धनराज शहारे, वय ३० आणि गेंदलाल होडीकर, वय ५९ यांचा प्रवास सुरू झाला.
अहोरात्र सुरू असलेल्या त्या प्रवासात कोरेती काहीही करून आपल्या सात वर्षांच्या मुलीला, वेदांतीला भेटायला आतुरले होते. आणि त्यामुळेच ते चालत राहिले. ती आपली वाट पाहतीये, ते स्वतःला सांगायचे आणि उन्हाच्या कारात, पायाचे तुकडे पडले तरी चालत राहिले. “आमाले फक्त घरी पोचायचे होते,” ठेंगणे पण काटक असलेले कोरेती म्हणतात, चेहऱ्यावर हसू लेऊन. नवेगाव अभयारण्याच्या वेशीवरच झाशीनगर हे त्यांचं गाव वसलंय. त्यांच्या त्या पैदल मार्चनंतर काही महिन्यांनी आम्ही त्यांना आणि त्यांच्या मित्रांना भेटलो तेव्हा सूर्य डोक्यावर तळपत होता. उकाडा असह्य होता. बाहेरच्या लोकांसाठी लावलेल्या आडकाठ्या या गावाने आता काढून टाकल्या आहेत. पण महामारीचं भय आणि चिंता मात्र अजूनही वातावरणात भरून आहे.
***
कोरेतींनी नववीनंतर शाळा सोडली पण २०१९ सालाआधी कामासाठी ते आपलं गाव सोडून बाहेर कुठेच गेले नव्हते. ते आपल्या एकर रानात शेती करायचे, आसपासच्या जंगलातून गौण वनोपज गोळा करायचे, शेतीसोबत शेतमजुरी करायचे किंवा गरज पडलीच तर जवळच्या छोट्या नगरांमध्ये मजुरी करायचे. त्यांच्या गावातल्या इतरांसारखे ते कामासाठी स्थलांतर करून दूरदेशी मात्र गेले नव्हते.
पण २०१६ सालच्या नोटाबंदीनंतर, गोष्टी बिनसत गेल्या. आणि काही महिने शेतमजुरी सोडली तर गावात किंवा आसपासही त्यांना फार काही काम मिळेनासं झालं. आर्थिक बाजू अवघड होत चालली होती.
त्यांचे बालपणातले सवंगडी, भूमीहीन दलित असलेले ४० वर्षीय लक्ष्मण शहारे यांच्या गाठीला रोजगारासाठी स्थलांतर करण्याचा दांडगा अनुभव. त्यांनी कोरेतींना २०१९ साली कागझनगरमध्ये कामावर जायची गळ घातली.
वयाच्या १८ व्या वर्षापासून शहारे कामासाठी त्यांचं गाव सोडून दुसरीकडे स्थलांतर करतायत (व्हिडिओ पहा). जेव्हा महामारी सुरू झाली, तेव्हा ते कागझनगरमध्ये एका व्यापाऱ्यासाठी पर्यवेक्षक म्हणून काम करत होते. कापूस जिनिंग आणि प्रेसिंगच्या तीन कारखान्यांमधले ५०० कामगार त्यांच्या हाताखाली काम करत होते. यातले बहुतेक पुरुष कामगार होते आणि शहारेच्या गावाजवळच्या गावांमधून आणि छत्तीसगडसारख्या राज्यातून इथे कामाला आले होते.
शहारे काही चालत घरी परतले नाहीत, ते जूनच्या सुरुवातीला एका वाहनातून परत गेले. पण त्यांच्या हाताखालची माणसं चालत आपल्या घरी निघालेली त्यांनी पाहिली, ज्यात त्यांचा धाकटा भाऊ, धनराजही कोरेतींसोबत निघाला होता. ते स्वतः त्या काळात एका मिलमधून दुसरीकडे धावपळ करत होते, पगार करायचे होते, रेशनची पाकिटं तयार करायची होती आणि “त्यांना गरजेच्या सगळ्या गोष्टी मिळतील यासाठी जे काही शक्य आहे ते करायचं होतं.”
२०१९ च्या नोव्हेंबरमध्ये कोरेती कागझनगरला गेले आणि जून २०२० मध्ये, खरिपाच्या पेरण्यांआधी ते माघारी परतणार होते. जिनिंगच्या कारखान्यात जितके तास काम करतील त्याप्रमाणे त्यांना आठवड्याला ३,००० ते ५,००० रुपये मिळणार होते. ते २०२० च्या एप्रिल महिन्यात परत आले तेव्हा कारखान्यात केवळ पाच महिन्यांचं काम करून ते गाठीला ४०,००० रुपये साठवू शकले होते.
इतका पैसा तर त्यांच्या गावात वर्षभर काम करूनही मिळाल नसता, ते म्हणतात.
त्यांनी कागझनगरमध्ये २१ दिवसांची टाळेबंदी संपण्याची आणि वाहतूक सुरू होईल याची धीराने वाट पाहिली. पण तसं काहीच झालं नाही, उलट टाळेबंदी लांबतच गेली.
मिलच्या मालकाने त्यांना रेशन आणि इतर लागेल ती मदत केली पण काम मात्र थांबलं होतं. “टाळेबंदी होती ना तेव्हा आम्ही जणू काही वेगळ्याच देशात होतो,” कोरेती म्हणतात. “आमच्या खोपटांमध्ये नुसता गोंधळ होता, आपल्या तब्येतीची प्रत्येकाला काळजी होती, आणि कोविड-१९ ची भीती पण होती सगळ्यांच्या डोक्यावर. थांबायचं का जायचं तोच प्रश्न पडला होता. माझी बायको काळजी करत होती आणि परत या म्हणून माझ्या मागे लागली होती.” त्यानंतर एका वादळात कारखान्याच्या आवारात असणाऱ्या त्यांच्या खोपटांवरचं छप्परच उडून गेलं. आणि त्यानंच खरं तर त्यांचा निर्णय पक्का केला.
“आम्ही २० एप्रिलला निघालो बहुतेक,” कोरती सांगतात. ते त्यांनी स्वतः बांधलेल्या सुंदर अशा मातीच्या घरात बसले आहेत.
उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावरच्या नागपूर-हैद्राबाद पट्ट्यात ते उत्तरेच्या दिशेने निघाले. महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर त्यांनी चंद्रपूर जिल्हा गाठला आणि त्यानंतर पूर्वेला वळून आता नव्यानेच ब्रॉडगेज झालेल्या रेल्वेमार्गाशेजारून आणि अधून मधून घनदाट जंगलातून वाट काढत त्यांनी गोंदियातलं त्यांचं गाव गाठलं.
वाटेत त्यांनी वर्धा आणि इतर अनेक छोट्या नद्या पार केल्या. त्यांनी जिथून चालायला सुरुवात केली ना, तिथून त्यांचं गाव दूर कुठे तरी आहे असं वाटत असल्याचं कोरेती सांगतात.
एका वेळी एक पाऊल इतकंच त्यांनी ठरवलं होतं.
झाशीनगर ग्राम पंचायतीत नोंदी आहेत की दोन तुकड्यांमध्ये १७ पुरुषांचा एक गट गावी आला, त्यातली पहिली तुकडी २८ एप्रिल रोजी पोचली. त्यातले पाच जण इतर १२ जणांपासून वेगळे पडले होते कारण थकवा घालवायला म्हणून ते अर्ध्या वाटेत एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले होते. ते १ मे रोजी पोचले.
कोरेती आणि त्यांचे दोघं मित्र ३ मे रोजी गावी आले, पाय सुजलेले होते आणि तब्येत ढासळली होती.
ते झाशीनगरला पोचले तेव्हा त्यांच्या चपलांची लक्तरं झाली होती. मोबाइल फोनची बॅटरी कधीच संपली होती, आणि त्यांच्या घरच्यांशी किंवा मित्रांशी त्यांचा कसलाही संपर्क नव्हता. ते म्हणतात, की या प्रवासात त्यांनी माणसाची चांगलं आणि वाईट अशी दोन्ही रुपं पाहिली – जसे त्यांना अन्नपाणी देणारे, राहण्याची सोय करणारे गावकरी आणि रेल्वे अधिकारी भेटले तसेच आपल्या गावात प्रवेश करू न देणारे लोकही होते. बहुतेक जणांनी बरंचसं अंतर अनवाणीच पार केलं होतं कारण चपला तुटून गेल्या होत्या. उन्हाळा होता म्हणून मग ते संध्याकाळनंतर चालायला सुरुवात करायचे आणि दिवसभर उन्हाच्या तलखीत विश्रांती घ्यायचे.
आता मागे वळून विचार करता कोरेतींना वाटतं की त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जे हाल सोसावे लागले ते टाळता असले असते. फक्त चार तासांच्या ऐवजी त्यांना ४८ तासांची पूर्वसूचना पुरेशी होती.
“दोन दिवसांचा टाइम भेटला असता, तर आम्ही चूपचाप घरी पोचलो असतो,” ते म्हणतात.
***
२४ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ चार तासांची पूर्वसूचना देऊन मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर केली. करोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या उद्देशानेच हा निर्णय घेतला असला तरी इतका थोडा अवधी आणि तो ज्या घाईने जाहीर करण्यात आला त्यामुळे भीती पसरली आणि गोंधळ माजला.
आपापल्या गावी पोचण्यासाठी लाखो स्थलांतरित कामगारांनी जीवघेणे प्रवास केले – अगणित लोक चालत घरी पोचले, शेकडो लोकांनी धोकादायक वाटांनी दुसऱ्यांच्या वाहनांनी प्रवास केला, अनेक जण सायकलींवर गावी गेले किंवा सरळ ट्रक आणि इतर गाड्यांमध्ये बसून त्यांनी घर गाठलं. कारण वाहतुकीचे नेहमीचे सगळे पर्याय ठप्प झाले होते.
बाकी आपण सगळे मात्र महामारीपासून सुरक्षित आपापल्या घरात बसून होतो.
रस्त्यावर असलेल्या त्या करोडो लोकांसाठी हे दुःस्वप्न होतं. किती तरी भेदक कहाण्या समाज माध्यमांवर पहायला मिळाल्या, अनेक पत्रकार त्यांची चाकोरी सोडून, कदाचित त्यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच स्थलांतरित कामगारांचा संघर्ष टिपण्यासाठी रस्त्यावर उतरले. काहींनी या सगळ्या प्रकाराचं वर्णन ‘रिव्हर्स मायग्रेशन’ किंवा ‘उलटं स्थलांतर’ असं केलं. मात्र सर्वांनी एक गोष्ट मान्य केली की १९४७ च्या रक्तरंजित फाळणीनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक एका ठिकाणाहून दुसरीकडे निघाले होते.
टाळेबंदी जाहीर झाली तेव्हा करोनाचे केवळ ५०० रुग्ण सापडले होते. अनेक जिल्हे किंवा प्रदेशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण नव्हता. कोविड-१९ च्या तपासण्याही सुरू झाल्या नव्हत्या. केंद्र सरकार मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आणि तपासणी संच खरेदीच्या निविदा आणि करार करण्याची धडपड करत होतं आणि मोलाचा वेळ वाया घालवत होतं.
एप्रिलच्या अखेरपर्यंत करोना रुग्णांचा संख्या हजारोंनी वाढली होती जी जूनच्या अखेरीस १० लाखांवर पोचली होती. आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्या होत्या. हा आठवडा संपेल तेव्हा भारतात १ कोटी १० लाख करोना रुग्णांची आणि जवळ जवळ दीड लाख मृत्यूंची नोंद झाली असेल. अर्थव्यवस्थेची लक्तरं झाली आहेत – आणि त्यातही सर्वात गरीब असलेल्यांना मोठा फटका बसलाय, ज्यात अशा असंघटित स्थलांतरित कामगारांचा समावेश आहे. महामारीच्या आधीही आणि नंतरही या समूहाची स्थिती बिकट आहे.
***
कोरेतींना आठवतं, त्यांनी दुपारी ४ वाजता कागझनगर सोडलं त्या दिवशी रात्री उशीरापर्यंत ते चालत होते. कपड्याचा एक जोड, काही किलो तांदूळ आणि मसूर, मीठ, मसाला, साखर, बिस्किटाचे पुडे, थोडी फार भांडीकुंडी आणि पाण्याच्या बाटल्या इतकाच काय तो पसारा त्यांच्यासोबत होता.
तेव्हाचे तपशील – तारीख-वार-ठिकाणं – आता त्यांना लक्षात नाहीत. लक्षात आहे तो केवळ थकवणारा प्रवास.
रस्त्यात ते तिघं एकमेकांशी फारसे काही बोललही नसतील. कधी कधी कोरेती पुढ्यात असायचे आणि कधी बाकी दोघांच्या मागोमाग. वाटेत लागणारा किराणा आणि आपापलं सामान त्यांनी डोक्यावर किंवा पाठीवर वाहून आणलं. मध्ये कुठे विहीर किंवा बोअरवेल दिसली की ते आपल्याकडच्या पाण्याच्या बाटल्या भरून घ्यायचे जेणेकरून तहानेने शोष पडू नये.
त्यांचा पहिला मुक्काम रेल्वेमार्गावरच्या रेल्वेच्या निवाऱ्यात होता. पहिल्या दिवशी संध्याकाळी ते साधारण पाच तास चालले असतील. त्यानंतर त्यांनी जेवण बनवलं आणि गवत असलेल्या एका मोकळ्या जागेत ते झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे त्यांनी परत चालायला सुरुवात केली आणि सूर्य आग ओकायला लागला तोपर्यंत ते चालतच राहिले. रानात, झाडाखाली, रेल्वेच्या रुळांशेजारी, ते विसाव्याला थांबले. दिवस कलल्यावर त्यांनी आपला प्रवास परत सुरू केला. आपल्या हाताने रांधलेला डाळ-भात खाल्ला, काही तास निजले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे परत चालायला सुरुवात केली. सूर्य वर माथ्यावर येईपर्यंत ते थांबले नाहीत. तिसऱ्या दिवशी ते महाराष्ट्राच्या सीमेजवळ असणाऱ्या मकोडी नावाच्या जागेवर पोचले.
दोन-तीन दिवस उलटल्यानंतर मात्र आमचं मन बधीर झालं, कोरेती म्हणतात. त्यांना काही सुचत नव्हतं.
“आम्ही रेल्वेलाइनच्या बाजूने चालत राहिलो, गावं-पाडे, रेल्वे स्टेशन, नद्या, जंगलं सगळं मागे टाकलं,” हुमराज भोयार सांगतात. १७ जणांचा पहिला गट घेऊन झाशीनगरला आलेले सीमांत शेतकरी असलेले भोयार सांगतात.
हे कामगार प्रामुख्याने १८-४५ या वयोगटातले आहेत. त्यांना चालण्यात अडचण नव्हती पण उन्हाच्या कारामुळे त्रास वाढत होता.
छोटे मैलाचे दगड देखील मोठं यश असल्यासारखे वाटायचे. आणि जेव्हा मराठीत पाट्या दिसायला लागल्या तेव्हा ते आनंदले – ते महाराष्ट्रात पोचले होते!
“आम्हाला वाटलं आता काही त्रास होणार नाही,” हुमराज सांगतात. कोरेती आणि त्यांच्या मित्रांनी हुमराज ज्या रस्त्याने गेले तीच वाट धरली होती आणि ज्या ठिकाणी ते थांबले तिथेच मुक्काम केला होता.
“आम्ही महाराष्ट्राच्या सीमेवर विहीरगाव नावाच्या एका ठिकाणी थांबलो होते आणि पुढच्या दिवशी माणकगडमध्ये – चंद्रपूर जिल्ह्यातलं हे ठिकाण इथल्या सिमेंटच्या कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे,” कोरेती सांगतात.
रोज रात्री त्यांच्या प्रवासात चंद्र आणि तारे तारका त्यांच्या सोबतीला होत्या.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर रेल्वे स्टेशनला पोचल्यावर त्यांनी अंघोळ केली आणि दिवसभर झोप काढली. आणि पोटभर जेवण घेतलं. शेकडोंच्या संख्येने येत असलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी रेल्वे अधिकारी आणि गावकऱ्यांनी खाण्याची सोय केली होती.
“असं वाट होतं पुरा देश चालून राहिला,” कोरेती म्हणतात. “आम्ही एकटे नव्हतो.” पण थकली भागली, असहाय्य लेकरं आणि बायांना पाहिल्यावर मात्र ते थिजून गेले. “वेदांती आणि माझी बायको शामकला घरी ठीकठाक होत्या त्याचंच बरं वाटलं,” बोलता बोलता त्यांच्याकडे नजर टाकत कोरेती सांगतात.
त्यांचा पुढचा थांबा होता, चंद्रपूर शहर. तिथे रेल्वेच्या पुलाखाली काही काळ विश्रांती घेतल्यानंतर ते गोंदियाच्या दिशेने जाणाऱ्या रुळांशेजारून पुढे निघाले. पुढे वाटेत वाघाच्या राज्यातलं केळझर हे छोटेखानी स्टेशन लागलं आणि त्यानंतर मूल, दोन्ही चंद्रपूर जिल्ह्यात. “केळझर आणि मूलच्या मध्ये आम्हाला बिबट्या दिसला. आम्ही एका तळ्याच्या कडेला बसलो होतो आणि मध्यरात्री तो तिथे पाणी प्यायाला आला,” कोरेती सांगतात. ते बोलत असताना त्यांच्या मागे बसलेल्या शामकला लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत असतात आणि आपल्या पतीला सुखरुप घरी पाठवल्याबद्दल देवाचे आभार मानत काही तरी पुटपुटतात. “बिबट्या दाट झाडीत पळून गेला,” ते म्हणतात. त्यानंतर जिवाच्या भयाने ते झपाझप चालू लागले.
केळझर सोडल्यावर त्यांनी रेल्वे मार्ग सोडला आणि रस्ता धरला.
हे तिघं जण, त्यातही वयस्क असलेले होडीकर चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरीला पोचले तोवर पार थकून गेले होते. तिथून ते गडचिरोली जिल्ह्यातल्या वडसाला पोचले आणि मग उलटं फिरून त्यांनी झाशीनगर गाठलं. आम्ही सप्टेंबर महिन्यात त्यांना भेटायला गेलो तेव्हा होडीकर गावात नव्हते. त्यानंतर आम्ही या गटाच्या नियमित संपर्कात होतो.
“आम्ही मूलला पोचलो तेव्हा स्थानिक लोकांनी आमच्या सारख्यांसाठी निवारे उभारले होते, तिथे आम्हाला चांगलं खायला मिळालं,” कोरेती सांगतात. १४ व्या दिवशी, ३ मे रोजी जेव्हा ते अखेर झाशीनगरला पोचले आणि गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं, तेव्हा मोठी कामगिरी फत्ते केल्यासारखं त्यांना वाटलं.
त्यांचे सुजलेले पाय बरे व्हायला मात्र किती तरी दिवस लागले.
“जवापर्यंत हे लोक घरी पोचले नव्हते, आम्हाले लागित टेन्शन होते,” शामकला म्हणतात. “आम्ही बाया बाया एकमेकीला बोलायचो आणि त्यांचा काही पत्ता लागतो का ते त्यांच्या मित्रांना फोन करून विचारायचो.”
“मी वेदांतीला पाहिलं आणि माझे डोळे भरून आले,” कोरेती सांगतात. “मी दुरूनच माझ्या मुलीला आणि बायकोला पाहिलं आणि त्यांना तिथनंच घरी जायला सांगितलं.” त्यांना कसलाही संपर्क टाळायचा होता. परत येणाऱ्या स्थलांतरित रहिवाशांना १४ दिवसांचं विलगीकरण सक्तीचं होतं. त्यासाठी दोन शाळा, एक मध्यवर्ती भागातलं मैदान आणि ग्राम पंचायतीच्या सगळ्या इमारती उघडून त्यात त्यांची सोय करण्यात आली होती. काही ठिकाणी हा काळ ७-१० दिवस असा कमी करण्यात आला होता. सरकारच्या सतत बदलत असलेल्या सूचना आणि खरं तर परतून आलेल्यांमधल्या काहींचा त्यांच्या परतीच्या एकाकी प्रवासात फार कुणाशी संपर्कच आला नव्हता, त्यामुळे असा निर्णय घेतला जात होता.
एक आठवडा कोरेती गावातल्या शाळेत विलगीकरणात राहिले. पहिल्या दिवशी त्यांना शांत झोप लागली. कोरेती किती तरी दिवस इतके गाढ आणि निश्चिंत झोपले नव्हते. ते अखेर आपल्या घरी परतले आले होते, खरंच.
***
झाशीनगर पूर्वी तांभोरा म्हणून ओळखलं जायचं. आज त्या गावाची लोकसंख्या २,२०० आहे (२०११ च्या जनगणनेनुसार १,९२८). १९७० साली इटियाडोह सिंचन प्रकल्पाने मूळ गाव गिळंकृत केलं त्यानंतर या नवीन भूमीवर हे गाव वसवलं गेलं. आता ५० वर्षांनंतर नवीन पिढी नव्या व्यापाला लागली मात्र जुन्या गावचे रहिवासी जे इथे येऊन राहिले, आजही जबरदस्त केलेल्या विस्थापनानंतर पुनर्वसन आणि नव्या ठिकाणी वस्ती करताना आलेल्या समस्यांशी झगडतायत.
गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात नवेगाव अभयारण्याला लागून असलेल्या झाशीनगरमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. इथली उपसा सिंचन योजना पूर्ण होण्याची इथले शेतकरी अजूनही वाट पाहतायत. गावात धान, डाळी आणि काही भरड धान्यं घेतली जातात.
कामाच्या शोधात दर वर्षी झाशीनगरचे किमान २५-३०० स्त्री-पुरुष दूरदेशी स्थलांतर करतात. गावाच्या कोविड व्यवस्थापन समितीने एप्रिलमध्ये स्थलांतरित रहिवाशांचा पहिला गट गावी परत आला तेव्हापासून परतणाऱ्यांची नोंद ठेवली आहे. त्यामध्ये इथले लोक कामासाठी गेले त्या किमान दोन डझन गावांची नावं सापडतात – गोव्यापासून चेन्नईपर्यंत, हैद्राबादपासून कोल्हापूर अशी एकूण सात राज्यातली लांबलांबची ठिकाणं यात सापडतात. लोक शेतात, कारखान्यात, कचेऱ्यांमध्ये, रस्त्याची कामं करायला गेले होते आणि तिथून घरी पैसा पाठवत होते.
पूर्व विदर्भातले धानाची शेती करणारे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यांतून बाहेर स्थलांतर होतं, म्हणजे, इथले लोक कामासाठी गावं सोडून बाहेर पडतात. बाया आणि गडी लांबचा प्रवास करून केरळच्या भातशेतीत कामं करायला जातात किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस कारखान्यात किंवा कापूस गिरण्यांमध्ये. यातले काही जण तर चक्क अंदमानलाही पोचलेत. गेल्या २० वर्षांत कामगारांना कामावर नेणाऱ्या मुकादमांची एक साखळीच तयार झाली आहे, त्याद्वारे इथले लोक वेगवेगळीकडे पोचतायत.
भंडारा आणि गोंदियासारख्या जिल्ह्यांमधून स्थलांतर होण्यास अनेक घटक कारणीभूत ठरतात. एक पीक शेती आणि उद्योगांचा अभाव हे त्यातले महत्त्वाचे घटक. एकदा का खरिपाचा हंगाम संपला की भूमीहीन आणि छोट्या शेतकऱ्यांना निम्मं वर्ष तगून राहण्यासाठी पुरेसं काम इथे आसपास मिळत नाही.
“या भागातून लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून जातात,” ४४ वर्षीय भीमसेन डोंगरवार सांगतात. ते शेजारच्या धाबे-पवनी गावातले एक बडे जमीनदार आणि वन्यजीव संवर्धक आहेत. “[महामारी येण्याआधी कित्येक वर्षं] स्थलांतर सुरूच होतं.” स्थलांतर करणारे बहुतेक भूमीहीन, छोटे आणि सीमान्त शेतकरी होते. रोजगार मिळवण्यासाठीचा दबाव आणि इथल्यापेक्षा बाहेर मिळणारा थोडाफार बरा म्हणावा असा रोजगार ही त्यामागची कारणं.
लक्षणीय गोष्ट ही आणि सुदैवाचीही की जवळून-दुरून सगळे स्थलांतरित रहिवासी गावी परतून आल्यानंतरही महामारीच्या सगळ्या काळात आणि आता नव्या वर्षात पदार्पण करत असताना झाशीनगरमध्ये कोविड-१९ आजाराचा एकही रुग्ण नाही – निदान आतापर्यंत तरी.
“एप्रिल पासून असा एकही दिवस नाही ज्या दिवशी आम्हाला कसल्या ना कसल्या संकटाला तोंड द्यावं लागलं नाहीये,” गावाच्या कोविड समन्वय समितीचे सदस्य विकी अरोरा सांगतात. त्यांचे वडील माजी सरपंच असून विकी समाजकारण आणि राजकारणात सक्रीय आहेत. ते सांगतात की परतून येणाऱ्या स्थलांतरितांना टाळेबंदीच्या काळात सक्तीने विलगीकरण करावं लागलं होतं तेव्हा त्यांची काळजी घेता यावी म्हणून गावकऱ्यांनी वर्गणी गोळा केली होती.
“परवानगीशिवाय कुणीही गावात प्रवेश करणार नाही याची आम्ही काळजी घेतली. परतून आलेल्यांचं अन्नपाणी, राहण्याची सोय, कोविडच्या तपासण्या आणि इतर आरोग्याच्या तपासण्या इत्यादी गोष्टींची गावकऱ्यांनी काळजी घेतली,” अरोरा सांगतात. “सरकारकडून आम्हाला एक रुपया मिळालेला नाही.”
गोळा झालेल्या निधीतून गावकऱ्यांनी गावी परतल्यावर विलगीकरण केंद्रात दाखल झालेल्या रहिवाशांसाठी सॅनिटायझर, साबण, टेबल फॅन, अंथरुणं आणि इतर गोष्टी खरेदी केल्या.
सप्टेंबर महिन्यात आम्ही झाशीनगरला गेलो तेव्हा गोव्याहून परत आलेल्या चार तरुणांची सोय ग्राम पंचायत वाचनालयाच्या खुल्या रंगमंचावर करण्यात येत होती.
“आम्ही तीन दिवसांपूर्वी परत आलोय,” त्यांच्यातला एक जण म्हणाला. “आम्ही तपासणी होण्याची वाट पाहतोय.”
तपासणी कोण करणार, आम्ही विचारलं.
“गोंदियाच्य आरोग्य विभागाला माहिती कळवलीये,” अरोरा आम्हाला सांगतात. “एक तर गावातल्या कुणाला तरी त्यांना जवळच्या हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल किंवा मग आरोग्य खात्याला त्यांच्या कोविड-१९ च्या तपासण्या करण्यासाठी त्यांच्या टीमला इथे पाठवावं लागेल. त्यानंतर तपासणीचा अहवाल काय येतो ते पाहून ते घरी जाऊ शकतील.” हे चौघंही मडगावच्या स्टील रोलिंग कारखान्यात कामाला आहेत. आणि एक वर्षानंतर सुट्टी घेऊन घरी परतले आहेत. टाळेबंदीच्या काळात ते कारखान्याच्या आवारातच राहिले आणि त्यांनी कामही केलं.
***
सध्या झाशीनगरपुढची मोठी समस्या म्हणजे गावात कामंच नाहीत. पंचायतीची रोज बैठक होते. कोरेती आणि इतर कामगार कागझनगरहून परतल्यानंतर मोजकेच कामगार कामाच्या शोधात गावाबाहेर गेलेत, शहारे सांगतात.
“आम्ही रोजगार निर्माण करण्यासाठी धडपडतोय,” झाशीनगरचे ग्राम सेवक, ५१ वर्षीय सिद्धार्थ खडसे सांगतात. “सुदैवाने, या वर्षी पाऊस चांगला झालाय आणि शेतकऱ्यांचं पीकपाणी देखील चांगलं आहे. [मात्र, काही जणांचं खरिपाचं चांगलं पीक किडीमुळे हातचं गेलंय]. तरीही गावाच्या पंचायतीने कामं काढणं गरजेचं आहे. स्थलांतर न करता लोक इथे राहिले तर आम्हाला त्यांना काम देता येईल.”
कोरेती आणि शहारे यांच्यासह काही गावकऱ्यांनी इतर काही पर्याय सामूहिकरित्या शोधण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी आपली जमीन, एकूण १० एकर रब्बीसाठी एकत्र कसलीये. त्याचा फायदा झालाय मात्र तरीही गरजेच्या मानाने गावात कामं खूपच कमी आहेत. आणि २०२१ च्या हिवाळ्या आधी कामासाठी कुणी गाव सोडून जाईल अशी शक्यता कमी आहे.
“मी काही या वर्षी बाहेर जाणार नाही, मग पोटाला चिमटा काढावा लागला तरी चालेल,” कोरेती म्हणतात. महामारीची भीती अजूनही कायम आहे त्यामुळे झाशीनगरहून स्थलांतर करून बाहेर जाणाऱ्या बहुतेकांची हीच भावना आहे. एरवी बहुतेक जण ऑक्टोबर २०२० च्या सुमारास बाहेर पडले असते.
“यंदा कुणीच गाव सोडून चाललं नाहीये,” आपल्या खुर्चीत रेलत शहारे ठासून सांगतात. “आम्ही आहे ती बचत आणि गावात जी काय शेतमजुरी मिळेल त्यावर भागवू.” गेल्या उन्हाळ्याच्या जखमांचा सल अजून गेलेला नाही. “मिलचा मालक मला फोन करून राह्यलाय. लोकं घेऊन ये म्हणून. पण आम्ही काय जायचो नाही.”
अनुवादः मेधा काळे