अनिता घोटाळेंसाठी, शनिवारी, मार्च २१ हा कामावरचा नेहमीचा दिवस – इतरत्र शहरात मात्र दुकानांना टाळे आहेत, बाजार बंद आहेत, रस्ते शांत आहेत. कोविड-१९ च्या संसर्गामुळे सरकारनं बंदी लागू केली आहे, या दिवशी बरेचजण घरीच राहिले आहेत.
पण अनिता ते शांत रस्ते स्वच्छ करतेय, साचून राहिलेल्या काळ्या आणि घाणरेड्या पाण्यातून ती कचरा झाडून बाहेर काढतेय. त्यातलं काही मैला पाणी तिच्या पायांवरही उडलं आहे. “आमाचा तर रोजचाच दिवस धोक्याचा असतो. फक्त कोरोनामुळंच नाय काय, पन [नेहमी हीच परिस्थिती असते] पिढ्यांपासून,” ती सांगते.
सकाळचे ९ वाजले होते, आणि गेले दोन तास ती पूर्व मुंबईतल्या माहुलमधील एम-पश्चिम वॉर्डमधील रस्ते आणि गल्ल्या झाडते आहे.
पण या गंभीर परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेचं काय? “आमाला हे मास्क कालच [२० मार्चला] मिळाले, ते पन आमी वायरसमुळे मागितले म्हणून,” ती सांगते. तिने तो मास्क तिच्या साडीला खोचला आहे, ३५ वर्षांच्या अनिताने तिच्या गळ्यात सुरक्षेसाठी ओढणी बांधली आहे. “हे मास्क पातळ आहेत आनी परत नाय वापरू शकत [दोन दिवस घातल्यानंतर],” ती सांगते. तिच्या हातात हातमोजे नाहीत कि तिच्या पायात कुठली संरक्ष असे मजबूत बूट. तिच्या कामात या गोष्टी विरळाच.
अनिता महाराष्ट्रात अनुसूचित जातीत समाविष्ट असलेल्या मातंग समाजाची आहे. ती सांगते तिचं कुटुंब पिढ्यानपिढ्या या स्वच्छतेच्या कामातच आहे. “माझे आजोबा डोक्यावरून गटारातील मैला [मुंबई] उचलायचं काम करत होते,” ती सांगते. “कुटली बी पिढी असो, वर्ष असो, आमच्या लोकांना माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी नेहमीच लढावं लागलंय.”
अनिता आणि तिचं कुटुंब २०१७ साली झोपडपट्टी पुर्नवसन योजनेअंतर्गत, मुंबईतल्या ईशान्य भागातील विक्रोळी पूर्वमधून इथे स्थलांतरित झालं. ते सुभाष नगर परिसरात दोन खोल्यांच्या सदनिकेत राहतात. त्यांची ६ ते ७ मजल्यांची इमारत बीपीसीएल (भारत पेट्रोलियम कोर्परेशन लिमिटेड) च्या तेलशुद्धीकरण कारखान्यापासून अगदी १५ मीटरच्या अंतरावर आहे.
मागील दशकभरात, इथे प्रकल्प बाधित लोकांची वस्ती म्हणून ६०,००० हून अधिक लोकांसाठी ७२ इमारतींमध्ये १७,२०५ घरं बांधण्यात आली. शहरातल्या विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या अनेक नागरिकांचं इथं पुर्नवसन करण्यात आलं. मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या उद्योगांचे सान्निध्य आणि संसर्गामुळे, इथल्या रहिवाशांमध्ये श्वाशोच्छवासाचा त्रास, फुफ्फुसाचे आजार, खोकला, डोळे आणि त्वचेचे आजार आढळून आल्याचं समजतं.
बराच काळ आंदोलन केल्यानंतर आणि न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर, सप्टेंबर, २०१९ रोजी, मुंबई उच्च न्यायालयानं कुटुंबांचं पर्यायी पुर्नवसन होईपर्यंत त्यांना दरमहा १५,००० रुपये ट्रान्झिटचं भाडं देण्याचे आदेश पालिकेला दिले होते. “पन पालिकेनं मागच्या चार महिन्यात काहीच केलं नाय. माझ्या सहा वर्षांचा साहिल सारखा आजारी पडतो आणि त्याला श्वासाचाही त्रास आहे, इथल्या घाणेरड्या हवेमुळे आनि केमिकलच्या वासानं.”
कंत्राटी कामगार म्हणून अनिताला दिवसाला २०० रुपये मजुरी मिळते, ज्या दिवशी काम नाही त्या दिवशी पगारही नाही. मात्र मागील तीन महिन्यांपासून त्यांना त्यांचा पगार मिळालाच नाही. त्या सांगतात की कंत्राटदार बहुतेकवेळा वेळेत पगार देत नाहीत, पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याकडे पैसे अकडून असल्याचं ते सांगतात – अनिता मागील १५ वर्षांपासून हे काम करत आहेत.
त्यांच्या दोन मुली आणि दोन मुलं माहुलच्या पालिकेच्या शाळेत शिकतात. पती नरेश, वय ४२, घरोघरी फिरून प्लास्टिक गोळा करून त्या बदल्यात लसूण देतात, गोळा केलेले प्लास्टिक ते भंगारवाल्याला पैशांसाठी विकतात. त्यांची सासूदेखील चेंबूरमधील ठिकठिकाणी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून प्लास्टिक गोळा करून भंगारवाल्याला विकतात.
“आमच्या तिघांची महिन्याची कमाई ५-६००० च्या जास्त नायी होत,” अनिता सांगतात. या एवढ्याशा कमाईत, त्यांचं सात जणाच्या कुटुंबासाठी महिन्याचं राशन, विजेचं बिल, इतर खर्च – यासह लहान-मोठ्या आजाराचा खर्च भागवावा लागतो.
पण उशिरा मिळणाऱ्या मजुरीमुळे, दरमहिन्याला कुटुंबाला पोटाची खळगी भरणं कठीण होऊन जातं. “सरकार मालकांना सांगतंय की कामगारांना आगाऊ पगार द्या,” त्या सांगतात, “पन, आमच्या इतके महिने पगार अडकलाय, त्याचं काय?”
अनिता काम करत असलेल्या जागेपासून अर्धा किलोमीटर त्याच वॉर्डमध्ये, एका सार्वजनिक कचराकुंडीपाशी कतिन गंजेय कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पायात फक्त चप्पल घालून उभे आहेत. अनिताप्रमाणेच, तेदेखील कंत्राटी कामगार आहेत. ते महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या अंतर्गत कार्यरत आहेत. पालिकेत सध्या ६,५०० कंत्राटी कामगार आहेत असं खात्याचे मुख्य पर्यवेक्षक जयवंत पराडकर सांगतात.
कतिन जो कचरा उचलत आहेत त्यात काचेचे तुकडे, गंजलेले खिळे, वापरून फेकलेले सॅनिटरी नॅपकिन्स आणि नासलेलं अन्न आहे. हे सगळं आणि इतर धोकादायक कचरा काट्यानं खोदून प्लास्टिकच्या चटईवर गोळा करत आहे. मग ते आपल्या इतर पाच सहकाऱ्याच्या मदतीनं ती कचऱ्यानं भरलेली चटई उचलून कचऱ्याच्या गाडीत टाकतात.
“हे हातमोजे [रबराचे] आमाला कालच[२० मार्चला] दिलेत,” कतिन सांगतात २८ वर्षांचे कतिन सांगतात. तेही मातंग समाजातील आहेत. इतरवेळी ते उघड्या हातानीच कचरा हाताळतात. “हे नवे हातमोजे आहेत, पन बगा- हा फाटला सुदा. असे हातमोजे घालून असल्या कचऱ्यात हात सुरक्षित ठेवायचे कसे? आनी आता हा वायरस आलाय. आमी मानसं नाही का?”
सकाळचे ९.३० वाजले आहेत, आणि दुपारी २ वाजेपर्यंत त्यांना २० कचऱ्याची ठिकाणं कचरा उचलून स्वच्छ करायची आहेत. “आपला जीव धोक्यात टाकणं हे आमाला नवीन नायी. पन या वायरसमुळे तरी तुमी [महानगरपालिका आणि सरकार] आमचा विचार केला पाहिजे,” ते सांगतात. “आमी लोकांसाठी इते कचऱ्यात आहोत, पन लोक आमचा विचार करतील?”
अनेक धोके पत्करून कतिन जे काम करतायत, त्याच्या मोबदल्यात त्यांना दिवसाची रुपये २५० इतकीच मजुरी मिळते. त्यांची बायको, सुरेखा, २५ वर्षांची, घरकामाला जाते.
करोनाचा संसर्ग शहरात नवा आहे, पण कतिन आणि इतर सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या मात्र जुन्याच आहेत – सुरक्षित आणि कायमस्वरूपी नोकरी, आरोग्य विमा आणि मास्क, हातमोजे आणि बुटांसारख्या सुरक्षेच्या साधनांचा नियमित पुरवठा.
या परिस्थितीत तर त्यांना सुरक्षेची सर्वाधिक गरज आहे. १८ मार्च रोजी, कचरा वाहतूक श्रमिक संघ, या सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मुंबई स्थित संस्थेतर्फे - पालिका आयुक्तांना पाठववेल्या पत्रात - सफाई कर्मचाऱ्यांना पुरेसे सुरक्षेची साधनं पुरवली जावीत, यासाठीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर २० मार्च रोजी काही कर्मचाऱ्यांना मास्क पुरवण्यात आले.
“वायरसमुळे, आमी पालिका अधिकाऱ्यांना विनंती केली की आमी गाडीवर काम करनाऱ्या कर्मचाऱ्यांना साबून आणि सॅनिटायझर द्या म्हणून. पन आमाला काहीच भेटलं नाही,” ४५ वर्षांचे दादाराव पाटेकर सांगतात, एम-पश्चिम वॉर्डमध्ये काम करतात आणि नवबौद्ध समाजाचे आहेत. “जे कर्मचारी दुसऱ्यांची घाण साफ करतात त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी झाली पाहिजे. वायरसचा सर्वाधिक धोका तर त्यांनाच आहे.”
तरीही, पराडकर यांचं म्हणणं आहे की “आम्ही उत्तम दर्जाचे मास्क आणि निर्जंतुक द्रव्य सर्व कर्मचाऱ्यांना दिलं आहे. आणि वायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आहोत.”
२० मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, बंदीसंदर्भाच्या अनेक उपायांची घोषणा केली, ही बंदी २२ मार्चपर्यंत वाढवत अत्यावश्यक सेवा वगळून, सर्वत्र पूर्णत: लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या स्टोरीचं रिपोर्टिंग करत असताना, २१ मार्चला, कंत्राटी आणि कायमस्वरूपी असे दोन्ही सफाई कर्मचारी रोजच्याप्रमाणे शहरातल्या वॉर्डमधील चौकींमध्ये सकाळी ६.३० वाजता हजेरी लावत होते आणि तिथून निवडून दिलेल्या ठिकाणी कचरा उचलण्याच्या कामासाठी निघत होते.
“आमचं काम अत्यावश्यक सेवांमध्ये मोडतं. आमाला बाहेर पडावं लागणारंच. ज्याप्रमाणे सैनिक सीमेवरती आपल्या सुरक्षेसाठी तैनात आहे, त्याप्रमाणे आमा सफाई कर्मचाऱ्यांना देखील जनतेची सुरक्षा केली पाहिजे,” पाटेकर सांगतात.
पण सफाई कर्मचारी आपलं स्वत:च संरक्षण कसं करणार? “सरकार सागतं की सतत हात धुवा मनून. आमी कसं करायचं ते? पानी दोन दिवसा आड येतं. आनि ते लिक्विड [सॅनिटायझर] घ्यायला तरी कसं पडवनार आमाला? सार्वजनिक संडास शंभरजण वापरतात,” ३८ वर्षांच्या अर्चना चाबुस्कवार सांगतात. त्याही नव बौद्ध समाजाच्या आहेत. त्या दर दिवसाला सुभाषनगरमधील ४० घरांमध्ये जाऊन कचरा गोळा करतात, यातून दिवसाची २०० रुपये मजुरी त्यांना मिळते.
माहुलमधील सुभाष नगरपासून चार किलोमीटरवर चेंबुरमधील आनंद नगर झोपडपट्टीत अगदी अरुंद गल्लीतून त्यांचं १०० चौरस फुटाचं घर आहे. या झोपडपट्टीत अनेक सफाई कर्मचाऱ्यांची घरं आहेत, यातील बहुतेकजण १९७२ च्या दुष्काळात जालना, सातारा आणि सोलापूरमधून इथे स्थायिक झालेत. काही वर्षांपुर्वीच, इतर सहकऱ्यांच्या मदतीनं अवजड लोखंडी कचरा पेटी उचलण्याचा प्रयत्न करताना, अर्चनाचा नवरा राजेंद्र यांचा पायच डब्ब्याखाली चिरडला गेला आणि तुटला. २०१७ मध्ये फुफ्फुसाच्या आजारानं त्यांचा मृत्यू झाला.
आमची लोकं तशी पन मरत असतात, पन कोनी कदी विचारत नाय,” अर्चना सांगतात. “आता या वायरसनं आमी मेलो तरी काय फरक पडतोय?”