राधाबाई आणि चिमणाबाई निवांत बसल्या आहेत. काजलदेखील आराम करतीये. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील म्हसवडच्या चारा छावणीत दुपारचे तीन वाजलेत, पण हवेतला गारवा काही कमी झालेला नाही. बदाम मात्र आज जरा अस्वस्थ वाटतोय, गेल्या दोन दिवसांपासून नीट खात नाहीये.
त्यांना
इथे छावणीत येऊन २० दिवससुद्धा झाले नाहीयेत. साताऱ्याच्या वळईपासून १६ किलोमीटर चालत
हे चौघं छावणीत पोचलेत. चाऱ्याची तीव्र टंचाई त्यांना सोसेनाशी झाली – त्यांचं तेच
तर मुख्य खाणं आहे ना.
म्हणून
मग लक्ष्मी काळेल, वय ४० आणि त्यांचे पती परमेश्वर अण्णा काळेल, वय ६० आपल्या चार
जनावरांसह – राधाबाई, चिमणाबाई, काजल आणि बदाम – त्यांच्या दोन म्हशी, एक गाय आणि
एक बैल - चालत म्हसवडच्या छावणीत पोचले. “पिकअपला ८००-१००० रुपये लागतात, तेवढे
आम्हाला नाहीत परवडत, म्हणून मग चालवतच आणलं जितराब,” चारा डेपोवरून उसाचे वाढे
आणता आणता लक्ष्मी सांगतात.
त्यांच्या
खोपीपाशी टेकत त्या सांगतात की त्यांना आणि जितरबाला इथे सोडून परमेश्वर गावी परतले. “सुरुवातीचे
तीन दिवस मी उघड्यावरच निजले. मंग पुतण्याच्या आन् नव्या ‘शेजाऱ्यांच्या’ मदतीने खोप बांधून घेतली, गुरांसाठी सावली
केली." त्याच्या बदल्यात त्यांना कधी डब्यातलं खाऊ घातलं, चहा पाजला.
छावणीत आल्यापासून त्यांच्या दोन म्हशी - पाच वर्षांची राधाबाई आणि तीन वर्षांची चिमणाबाई, तीन वर्षांची काजल नावाची खिल्लार गाय आणि पाच वर्षांचा बदाम हा बैल खुशीत आहेत असं त्यांना वाटतंय. “खायला मिळतंय, निवांत आहे जितराब,” त्या म्हणतात.
“आले
त्या दिवसापासून मी एकटीच हाय हतं. आमचे मालक मला आन् या गुरांना हतं सोडून जे
गेले, ते आजतोवर पत्त्याच नाही त्यांचा. कसं करायचं, सांगा,” मध्यम बांध्याच्या,
दरदरीत नाक असणाऱ्या, हसऱ्या चेहऱ्याच्या लक्ष्मी विचारतात. “दोन ल्योक हायत, एक
पुण्याला डेअरीवर कामाला आणि एक चारणीला गेलाय कराड भागात. घरी सून हाय, दीड
वर्षाचा नातू [अजिंक्य] हाय. आमचं घर हाय डोंगरात, आन् दुष्काळात चोऱ्या माऱ्या लई
वाढताती. त्यांना एकटं कसं टाकायचं म्हणून मालक तिथेच राहिलेत. मी आन् माझं जितराब
हतं पाठवून दिलंय.”
३१
ऑक्टोबर २०१८ रोजी महाराष्ट्राच्या २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ
जाहीर करण्यात आला. त्यातल्या ११२ तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे.
माणदेशातल्या सगळ्या तालुक्यांचा – साताऱ्यातले माण, खटाव, सांगलीतले जत, आटपाडी
आणि कवठे महांकाळ आणि सोलापूरमधल्या सांगोले आणि माळशिरस – यात समावेश आहे.
माणदेशातल्या ७० गावातली सुमारे ८००० जनावरं आणि १६०० माणसं म्हसवडच्या चारा
छावणीत मुक्कामाला आली आहेत. (पहाः
चाऱ्याच्या शोधात कुटुंबांची ताटातूट
)
१ जानेवारी २०१९ रोजी म्हसवडच्या माणदेशी फौंडेशनने गंभीर दुष्काळाने होरपळलेल्या गावांसाठी महाराष्ट्रातली ही एवढ्या मोठ्या स्तरावरची पहिलीच चारा छावणी सुरू केली आहे. छावणीत जनावरांना चारा आणि पाणी (मोठ्या जनावराला रोज १५ किलो ओला चारा, १ किलो पेंड आणि ५० लिटर पाणी) पुरवलं जातं. तसंच प्रत्येक कुटुंबाला गुरांच्या संख्येप्रमाणे हिरवं शेडनेट दिलं जातं. “आजारी जनावरं असतील तर इतरांना लागण होऊ नये म्हणून त्यांची छावणीच्या बाहेर सोय करण्यात आली आहे. जनावरांचे दोन डॉक्टर दिवस रात्र काम करत आहेत,” माणदेशी फौंडेशनच्या चारा छावणीचे एक प्रमुख समन्वयक रवींद्र वीरकर सांगतात. छावणीत आलेल्या कुटुंबांना काही मूलभूत सुविधा देण्यात येत आहेत. उदा. प्रत्येक ‘वॉर्डात’ पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत (दर दोन तीन दिवसांनी पाण्याचा टँकर पाणी भरून जातो), आणि पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र टाकीदेखील बांधलेली आहे.
छावणीतली
लक्ष्मींची खोप अगदी जेवढ्यास तेवढी. पाय पसरले तरी बाहेर यावेत इतकी. दोरीवर दोन
पातळं, आडूला अडकवलेल्या पिशवीत चहा-साखरेची पुडी, काडेपेटी आणि थोडा शिधा. बाहेर
तीन दगडाची चूल आणि पलिकडेच चारा, कडबा आणून टाकलेला. चूल, सरपण चहापुरतंच झालंच
तर अन्न गरम करण्यापुरतं. “घरनं डबा येतो कुणाबरोबर तर...” लक्ष्मी सांगतात. पण, गेले
दोन दिवस त्यांच्या घरनं डबाच आला नव्हता. पुतण्याच्या डब्यातले चार घास खाऊन
त्यांनी कसं तरी भागवलं होतं. “आता आज जर का डबा आला नाही, तर दुपारी जीपने घरी जाऊन यावं लागतंय.
बगा, मागच्या येळंला सुनेने निसत्या भाकरीच दिल्या बांधून. कोरड्यास काहीच नाही. जनावरासोबत
मी पण कडबं खाऊ का आता? माझं नाव लक्ष्मी आन् हालत बगा कसली हाय...”.
लक्ष्मींचं
गाव, वळई, ता. माण. ३८२ घरं असणाऱ्या या गावची लोकसंख्या
आहे सुमारे १७६८. (जनगणना, २०११). “गावातली निम्मी माणसं सांगली, कोल्हापूरला
कारखान्यांवर ऊसतोडीला जातात. दिवाळीला जाऊन पाडव्याला परत. पण यंदा काही सांगता
येत नाही. ज्येष्ठाच्या आत कुणी बी माघारी येत नाही,” लक्ष्मींच्या खोपीपाशी ऊन
खात बसलेले सत्तरी पार केलेले यशवंत धोंडिबा शिंदे सांगतात. माण तालुक्यातल्या
पाणवनहून ते त्यांच्या चार गायी घेऊन छावणीवर आले आहेत. शेतीच्या प्रश्नावर किती तरी आंदोलनं केल्याचं ते सांगतात.
लक्ष्मींकडचं प्यायचं
पाणी संपलंय म्हणून ते आपल्या एका पाव्हण्याला पाणी द्यायला सांगतात. बदल्यात
लक्ष्मी त्यांच्यासाठी चहा टाकतात. चहा कोराच आणि तोही पितळीतून किंवा छोट्या
ताटल्यांमधून पितात. एकमेकांना धरून माणसं आणि जनावरं दिवस काढतायत.
लक्ष्मी परमेश्वर काळेल लोणारी समाजाच्या (इतर मागासवर्गीय जाती) आहेत. पारंपरिक रित्या मातीपासून मीठ तयार करणारा आणि लाकडापासून कोळसा करणारा हा समाज आहे. माणदेशातल्या खारपड जमिनीतून मीठ काढण्याची कला या समाजाकडे होती. वळईत राहणाऱ्या या समाजात गेल्या अनेक पिढ्यांपासून गाई-म्हशीचं दूध विकायचं नाही अशी प्रथा आहे. त्यामुळे गाई-गुरं पाळली तरी त्यांच्या दुधाचा धंदा करत नाहीत. “दूध फक्त वासराला आणि घरी खायला लागेल तितकंच वापरायचं. आम्ही दुधाचा पैसा करत नाही. मंग कसंय, जास्त गाई-म्हशी असल्या अन् गाभण राहिली की इकायची आन् नवं जितराब घ्यायचं, असं करतात लोक,” लक्ष्मी सांगतात. त्यांनी मात्र असं केलेलं नाही. त्यांची गाय, काजल आठवडाभरात व्यायला आली आहे, त्या सांगतात.
त्यांच्या
गुरांच्या नावांबद्दल त्यांना विचारलं तर त्या म्हणतात, “फक्त खिल्लार गाई-बैलाची
आणि म्हसरांची नावं ठेवताती. जरस्या गायींची काही नावं नसतात. माझ्या लेकानं तर
सगळ्या शेरडांची नावं ठेवलीयेत आणि त्यानं हाक मारली की पटापटा गोळा होतात समदी.”
वळईत त्यांची १० एकर पडक जमीन आहे. विहीर आहे, पण २०१८ च्या उन्हाळ्यापासनंच पाणी नाही. गेली दोन वर्षं सलग दुष्काळ त्यामुळे यंदा ज्वारी तर आलीच नाही, बाजरीचा उतारा घटला आणि कांदाही कमीच झाला. “माझं लगीन झालं तवा फक्त २-३ एकर जमीन असेल. माज्या सासूने मेंढ्या विकून जमिनी घेतल्या. एक मेंढी विकायची आन् एकर रान घ्यायचं. असं करत सात एकर जमीन घेतलीये सासूने,” छावणीपासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या पिण्याच्या टाकीवर १५ लिटरचा हंडा भरत भरत लक्ष्मी सांगतात. पिण्याचं पाणी आणण्यासाठी दिवसभरात अर्धा किलोमीटरवर असणाऱ्या टाकीच्या त्यांच्या ३-४ खेपा होतात. “छावणीत जनवराला जागच्या जागी हाय पाणी पण आपलं आपल्यालाच भरावं लागणार ना...” लक्ष्मी खळखळून हसतात.
तर, छावणीत
गुरं आणून सोडल्यानंतर जानेवारी महिना संपता संपता पहिल्यांदाच, म्हसवडचा बाजार करून लक्ष्मीचे
पती परमेश्वर त्यांच्यासाठी मेथीची पेंडी, वांगी, मिरच्या असा थोडा भाजीपाला, चहापत्ती-साखर
आणि नातवासाठी भजी आणि लाह्यांचा चिवडा घेऊन आले. त्यातलं थोडं आपल्यासाठी काढून
ठेवून लक्ष्मींनी निगुतीने घरच्यासाठी बाकी पिशवी बांधून ठेवली.
गाजराचे
शेंडे कागदात बांधून त्यांनी पिशवीत टाकले. निम्मी गाजरं आपल्यासाठी काढून ठेवून
निम्मी पिशवीत टाकली. घरामागे परसात सुनेनं गाजरं लावावीत अशी त्यांची अपेक्षा. “भांडी
धुतलेल्या पाण्यावर गाजरं लावली तर तेवढाच माझ्या राधा आन् चिमणाला हिरवा चारा होतुया. आणि आलाच यंदा
पाऊस तर शेतातही पिकंल, आन् चार घास होतील खायाला.”
तोवर,
लक्ष्मी म्हणतात, “हतं छावणीत करमायला लागलंय बगा. हे सगळं जितराब आजूबाजूला, असं
वाटतंय की लहान लहान लेकरंच हायतं. तिथं घरी, निस्ता उन्हाळा, इथं येळ कसा जातो कळत
नाही...”