“जिथे कुठे आम्ही जातो, तिथे एकत्रच जातो,’’ आपल्या शेजारी उभ्या असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे - सकुनीकडे आपलेपणाने बघत गीता देवी सांगते.
जवळच्या जंगलात जाऊन या दोघी साल (शोरिया रोबस्टा) वृक्षाची पानं गोळा करतात. त्यापासून द्रोण आणि ताटल्या तयार करून पलामू जिल्हयाचं मुख्यालय असलेल्या डाल्टनगंज शहरात नेऊन विकतात.
गेल्या तीस वर्षांपासून गीता आणि सकुनी देवी या एकमेकींच्या शेजारणी आहेत. कोपे गावातल्या नादीटोला या लहानशा पाड्यात त्या राहतात. झारखंड राज्यातल्या इतर बहुतेकांसारख्या गीता आणि सकुनीसुद्धा आपल्या उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून आहेत.
त्यांचे सात - आठ तास जंगलात जातात. गुरं चरून घरी जायला निघाली की त्या माघारी फिरतात. पुरेशी पानं गोळा करण्यासाठी त्यांना साधारण दोन दिवस लागतात. वेळ भुर्रकन निघून जातो, अधेमधे त्या थोडी विश्रांती घेतात, आपल्या घरच्यांबद्दल, आसपासच्या घटनांबद्दल गप्पा मारतात.
‘निघालीये...’ दररोज सकाळी आपल्या शेजारणीचा हा आवाज कानावर येण्याची वाट गीता बघत असते. काही क्षणात दोघी घराबाहेर पडतात. प्रत्येकीकडे आपली आपली एक जुन्या सिमेंटच्या पोत्यापासून बनवलेली पिशवी, पाण्याची प्लास्टिकची बाटली, एक छोटी कुऱ्हाड आणि एखादं जुनंपानं कापड असतं. झारखंडमधल्या पलामू व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील हेहेगरा जंगलाच्या दिशेने त्या चालू लागतात.
या दोघी मैत्रिणी वेगवेगळ्या समुदायाच्या आहेत - गीता भुईया दलित आहे आणि सकुनी उराव आदिवासी समुदायाची आहे. चालता चालता गीता सावधानतेचा इशारा देते : “इथे एकटं येऊ नकोस,’’ ती सांगते, “कधी कधी जंगली जनावरंही दिसतात. बिबटेही आमच्या नजरेस पडलेत.’’ साप आणि विंचवांचाही धोका वाढलाय आणि सकुनी पुढे सांगते, “अनेकदा आम्हाला हत्तींचा सामना करावा लागलाय.’’ २०२१च्या वन्यजीव गणनेनुसार पलामू व्याघ्र प्रकल्पात ७३ बिबटे आणि २६७ हत्ती आहेत.






















