सुकुमार बिस्वास नारळ विकतात. पण ते काही साधेसुधे विक्रेते नाहीत बरं. तहानलेल्या गिऱ्हाइकांसाठी शहाळी सोलत असतानाही ते गातात. कारण त्यांचं संगीतावरचं प्रेम. “मी अन्नाशिवाय जगू शकतो, पण गाण्याशिवाय नाही,” ते म्हणतात. शांतीपूरच्या लंकापाडाच्या परिसरात त्यांना लोक डाबदादू (नारळवाले आजोबा) म्हणूनच ओळखतात.
सत्तर वर्षांचे डाबदादू स्ट्रॉ घालून शहाळं देतात, पाणी पिऊन झालं की ते फोडून त्यातली मलई खायला देतात. आणि हात या कामात गुंतलेले असले तरी ओठावर गाणी मात्र कायम सुरूच असतात. लालोन फकीर, शाह अब्दुल करीम, भाबा ख्यापा आणि इतर काही गूढत्वाचा शोध घेणाऱ्या कवींची गाणी ते गातात. या गाण्यांमध्ये त्यांना आयुष्याचा अर्थ सापडतो असं म्हणत ते आम्हाला एका गाण्याचा अर्थ त्यांच्या शब्दात समजावून सांगतात. “आपण सत्यापर्यंत पोचू शकतो, पण कधी? जेव्हा सत्य काय आहे हे आपल्याला माहित असेल तेव्हाच. आणि सत्य काय हे समजून घ्यायचं असेल तर आपल्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे. लबाडीपासून आपण सुटका करून घेऊ शकलो तरच आपण दुसऱ्यांवर प्रेम करू शकतो.”
तर दिवसभर ते आपली टोली म्हणजेच सायकलला जोडलेली गाडी घेऊन गावाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जात असतात. तेही गाणी गात. त्यांच्या गाण्याचा आवाज आला की लोकांना समजतं की डाबदादू आलेत म्हणून.
“काही लोक तर शहाळी विकत पण घेत नाहीत. थोडा वेळ माझं गाणं ऐकत थांबतात फक्त. माझी काहीच हरकत नसते. तसंही फार काही शहाळी विकली जातील अशी माझी अपेक्षा नसतेच. आहे त्यात मी सुखी आहे,” गिऱ्हाइकांशी बोलता बोलता ते आम्हाला सांगतात.




